Saturday, September 18, 2010

अयोध्या निकाल आणि गणेशोत्सवाचा संदेश

आता येत्या 24 सप्टेंबरला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीबाबत लखनौ उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. या निकालानंतर हिंदू-मुस्लिमांतील स्नेहबंध टिकून राहतील काय?
यंदा हिंदूंची गणेशचतुर्थी आणि मुस्लिमांची रमजान ईद एकाच दिवशी आले. मुस्लिमांनी आपल्या हिंदू मित्र-परिचितांना शिरखुर्म्यासाठी प्रेमाने घरी बोलावले. आजच्या भारतीय समाजाला एकत्र आणणारे असे सोनेरी क्षण मोलाचे आहेत. स्नेहाचे बंध दृढ करणारे हे अनुबंध दोन्ही समाजाने जपले पाहिजेत.
आता येत्या 24 सप्टेंबरला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीबाबत लखनौ उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. या निकालानंतर हिंदू-मुस्लिमांतील स्नेहबंध टिकून राहतील काय? किंवा ते टिकून राहण्यासाठी काय करता येईल, हा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांतील धुरिण आणि सर्वसामान्यांच्या चिंतनाचा विषय असला पाहिजे.
मुस्लिमांबद्दल हिंदू कशा रीतीने विचार करतात हे विख्यात साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी अतिशय मार्मिक शब्दांत नोंदविले आहे. ते म्हणतात, ""...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''
बाबर, औरंगजेब, टिपू सुलतान, अकबर हे परकीय आक्रांता आहेत. त्यांनी येथील शेकडो मंदिरे उद्‌ध्वस्त केली. हजारो लोकांना तलवारीच्या जोरावर बाटविले. मुस्लिम व्हायला नकार दिला म्हणून कित्येकांची अतिशय क्रूरपणे कत्तल केली. महिलांची अब्रू लुटली. हा इतिहास आहे. याची ढिगाने पुरावे उपलब्ध आहेत. असे असताना भारतातील आजच्या मुसलमानांनी बाबराशी नातं सांगावं का, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचे विवेकाने उत्तर शोधल्यास रामजन्मभूमी हा वादाचा विषय ठरणारच नाही.

भारतातील हिंदूंना अपमानित करण्यासाठी अयोध्या, मथुरा आणि काशीची मंदिरे पायदळी तुडविणाऱ्या धर्मांधांची बाजू घेणारे मुसलमान काही प्रमाणात का होईना या देशात आजही आहेत, हे सत्य आहे. तसे नसते तर बाबरीचा ढांचा पाडायची वेळच कशाला आली असती?
बहुतांश मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहत असला तरी जिहादच्या धर्मवेडाने भारलेल्यांची संख्याही प्रभावी आहे, हे विसरून चालणार नाही. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच खिलापतच्या दंगलीत हजारो हिंदूंना आपल्या प्राणास मुकावे लागले होते. देशाची फाळणी व्हावी म्हणून, पाकिस्तान हवे म्हणून दंगली घडविण्यात आल्या होत्या. दुर्दैवाने इतिहास असा सांगतो की, हिंदू गाफील राहतात आणि धर्मांध मुस्लिम अचानक हल्लाबोल करतात. गाफील असणे आणि दुर्बल असणे हा अन्याय करण्याएवढाच अपराध आहे.
सन 1883 मध्ये मुसलमानांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निष्कारण दंगे करून हिंदूंना सळो की पळो केलं होतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उन्मादाचा सफलतापूर्ण सामना करण्यासाठी आणि हिंदू समाजाला समर्थ बनविण्यासाठी गणेशोत्सवाचा आधार घेतला. लोकमान्य टिळक हे द्रष्टे महापुरुष होते. हिंदू समाजासमोरील संघटित आव्हानाला संघटित प्रतिसाद देणे हा गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्यामागचा उद्देश होताच; पण केवळ प्रतिक्रयेच्या भावनेतून त्यांनी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलेलं नाही, हे त्यावेळच्या त्यांच्या चिंतनावरून दिसून येतं.
गणेशोत्सवाला टिळकांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाचं प्रेरणास्त्रोत बनविलं. हा उत्सव पुढील काही दशकांमध्ये महाराष्ट्राच्या सीमा पार करून देशभरातच नव्हे तर विदेशांमध्ये स्थायिक हिंदूंमध्येही जनोत्सवाच्या स्वरूपात प्रतिष्ठित होईल, हे त्यांच्या द्रष्ट्या मनाने हेरलं असावं.
गणपती हा गणांचा नायक आहे. गणतंत्रामध्ये नायकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. जर गणच असंघटित, उद्देशहीन आणि अशक्त असेल तर गणनायकाकडे हात जोडून करुणा भाकल्याने काहीही साध्य व्हावयाचे नाही. राष्ट्राला गौरव, स्वातंत्र्य आणि अभ्युदय प्राप्त करून देणारा एक शक्तिशाली गण (संघटित समाजशक्ती) गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण करणे हा लोकमान्यांचा उद्देश होता. आपल्या आतील गणनायकाला सबल, सशक्त करत अजेय गणशक्ती संघटित करणे हा गणेशोत्सवामागील मूळ भाव आहे; कर्मकांड नव्हे.
अंथरुणातून बाहेर न पडताच मोठमोठे उपदेशाचे डोस पाजणारी, फुकटचे सल्ले देणारी मंडळी सर्वच काळात असतात. सुरुवातीच्या काळातच लोकमान्यांनी त्यांना खणखणीत उत्तर देऊन ठेवलं आहे. 22 सप्टेंबर 1896 रोजी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात लोकमान्य म्हणतात, ""आपले राष्ट्र म्हणजे काही गुलामांचे राष्ट्र नाही. मानवी प्राण्याला कैद्याच्या राहणीने राहा असे सांगणे म्हणजे महामूर्खपणा आहे. समारंभ व थाटमाट ही प्रत्येक उत्सवाची आवश्यक अंगे होत. कोणतेही काम पैशावाचून होत नसते. इतर वाईट गोष्टींत पैसे खर्च होण्यापेक्षा गणेशोत्सवात थोडेबहुत खर्च झाल्यास पुण्यच आहे. या उत्सवात प्रत्येकजण आपापल्या हौसेने खर्च करीत असतो. कोणाची कोणावर सक्ती नाही. आठ-दहा दिवस जर उत्साहाने काढता येत नाहीत व त्या उत्सवाप्रीत्यर्थ थोडेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामर्थ्य नाही, तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत, पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची व शांतीची होण्यास असले खर्च आवश्यकच आहेत.''
लो. टिळक यांनी गणेशोत्सवासंबंधी व्यक्त केलेली मते वाचली तर ध्यानात येईल की, भारतीय तरुणांना जल्लोष करण्याची, रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे हाही गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे एक उद्देश होताच. त्यामुळे गणेशोत्सवावर टीका करणाऱ्यांना टीका करू द्या. परंतु धर्मांध शक्तींशी संघटितरीत्या मुकाबला करणे हा गणेशोत्सवामागील एक प्रमुख उद्देश होता हे विसारता येणार नाही.
आता 24 सप्टेंबर या दिवशी योगायोगाने शुक्रवार (जुम्मा) आहे. याआधीच्या दंगलींचा अभ्यास केला तर ध्यानात येईल की, हा दिवस दंगल घडविणाऱ्यांसाठी सोयीचा असतो. ज्या भागात मुस्लिम अधिक संख्येने राहतात त्या भागाला "संवेदनशील' भाग म्हणण्याची आपल्या देशात प्रथा आहे. कारण आपला देश सेक्युलर आहे. हिंदूबहुल भाग हा संवेदनशील नसतो. आता हिंदूंनाही एका वेगळ्या अर्थाने संवेदनशील व्हावे लागेल.
अयोध्येतील उत्खननात सापडलेली मंदिराची खांबं आणि इतर रचना पाहता निकालाचा अंदाज येऊ शकतो. समजा निकाल हिंदूंच्या विरोधात गेला तर हिंदू आपल्या स्वभावानुसार पुढच्या कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढाई करतील. परंतु निकाल मंदिर पाडणाऱ्या बाबराच्या विरोधात गेला तर मात्र स्वत:ला बाबराचे कैवारी मानणारे ठिकठिकाणी दंगली घडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. "संवेदनशील' ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणारच आहे, परंतु कोणत्याही क्षणी खात्रीने होणारी मदत म्हणजे आपण स्वत:च असतो हे विसरून चालणार नाही.
यावेळी तुम्ही शांत असता किंवा नाही हा प्रश्न नसतो, तर तुम्ही शक्तीशाली आणि संघटित असता किंवा नाही हे महत्त्वाचे असते. यावेळी गणेश मंडळांना सुरक्षा मंडळांचे काम करावे लागेल. देशभक्त मुस्लिमांच्या मुहल्ला कमिट्यांनाही आपल्या शक्तीप्रमाणे धर्मांधांना रोखण्यासाठी पुढे यावे लागेल.
गणेश मंडळं आणि मुहल्ला कमिट्यांनी आतापासूनच कठीण समयी आवश्यक ती तयारी करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत. आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार, पोलीस चौकी यांच्या संपर्क क्रमांकांची यादीही आपल्याकडे असणे सोयीचे ठरेल. पाकिस्तानच्या प्रेरणेने देशभरात जिहादी शक्ती सक्रीय झाल्याचे रोजच्या बातम्यांतून समोर येतच आहे. मराठवाडा, सोलापूरसारखा भागही याला अपवाद नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळातली गणेश मंडळं वर्षभरासाठी आपल्या गल्लीत सुरक्षा मंडळं बनली तर दंगलींना आळा घालणे शक्य होईल.
आपला समाज शांतताप्रिय आहे. आपण शेळीप्रमाणे राहिलोत तर लांडग्यांना चेव येऊ शकते. म्हणून वाघासारखे राहा. हाच गणेशोत्सवाचा आजच्या काळासाठीचा संदेश आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी