Saturday, March 3, 2012

‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने...

दि. २१ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये ठाणे दिवाणी
न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालाचे वृत्त प्रसिद्ध झाले
आहे. जात आणि धर्माचा उबग आल्याने आपल्याला धर्मविरहित घोषित करुन केवळ
भारतीय म्हणून ओळख मिळावी, अशी मागणी ठाणे येथील श्रीरंग खंबाटे या
वकिलाने केली होती. न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली.
एखादी व्यक्ती कोणत्याच धर्म किंवा जातीची नाही, अशी मान्यता कोर्टाने
दिल्यास त्याची व्यक्तिगत मते इतरांवर लादल्यासारखे होईल, तसेच त्या
व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये वारसा हक्क व त्यांचा धर्म
यावरुन समस्या निर्माण होऊ शकतात, असे कारण न्यायालयाने दिले. घटनेच्या
३४ व्या कलमानुसार न्यायालयांना धर्मसंबंधी घोषणा करण्याचा अधिकार नाही,
असेही कोर्टाने म्हटले.

ठाणे कोर्टात गेल्या २० वर्षांपासून वकिली करणारे ऍड. श्रीरंग बळवंत
खंबाटे यांनी जुलै २००९ मध्ये हा दावा दाखल केला होता. जातीधर्माच्या
नावाखाली होणार्‍या राजकारणाला कंटाळल्यामुळे आपल्याला हिंदू धर्माचा
त्याग करायचा असून, कोणताही दुसरा धर्म स्वीकारायचा नाही, असे त्यांनी या
दाव्यात म्हटले होते. आधार म्हणून इस्त्रायल येथील एका कोर्टाने दिलेल्या
अशा स्वरुपाच्या निकालाचा दाखला त्यांनी दिला होता. परदेशी न्यायालयांची
भूमिका आपल्यासाठी बंधनकारक नसल्याची भूमिका ठाणे दिवाणी न्यायालयाने
घेतली आणि खंबाटे यांची मागणी फेटाळली. 
१०० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात एखाद्याला
धर्मत्यागाची इच्छा व्हावी, हा त्याचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे, असे म्हणून
याकडे दुर्लक्ष करता येईल काय? स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘धर्म हा
भारताचा प्राण आहे.’ आणि दुसरीकडे नेहमी कुजबूज एकू येते की, ‘जाती आणि
धर्म यामुळे या देशाचे नुकसान झाले आहे, होत आहे. त्यामुळे जाती आणि
धर्मविरहित समाजाची निर्मिती झाली पाहिजे.’
आपल्या समाजात जात आणि धर्म या बाबींविषयी सर्वाधिक संभ्रम आणि गोंधळाची
स्थिती आहे. म्हणूनच या निमित्ताने ‘धर्म सोडायचंय मला...!’वाद समजून
घेणे आवश्यक आहे.
गेल्या दोन हजार वर्षांमध्ये धर्मांधतेमुळे मानवजातीचे खूप नुकसान झाले
आहे. शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत याविषयी स्वामी विवेकानंद म्हणाले
होते की, ‘‘ पंथाभिमान, स्वमतान्धता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी
या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजविला आहे. त्यांनी जगामध्ये
अनन्वित अत्याचार माजविले असून, कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने न्हाऊन
काढली आहे. संस्कृतींचा विध्वंस करून त्यांनी कधी कधी राष्ट्रेच्या
राष्ट्रे हताश करून सोडली आहेत. हे भयंकर राक्षस नसते तर मानवसमाज आज आहे
त्याहीपेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता.’’
धर्मांधतेने झालेल्या रक्तपाताचा इतिहास पाहिला तर कोणात्याही संवेदनशील
सामान्य माणसाला ‘धर्म सोडायचंय मला...!’ असे वाटले तर त्यात नवल नाही.
परंतु......जगातील एकांतिक धर्मांच्या इतिहासाकडे डोळेझाक करून ‘धर्म
सोडायचंय मला...!’ असे म्हणणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखे आहे.
येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या संदेशाची आठवण होते. ‘सारे
धर्म हे जेव्हा आपला संकुचितपणा सोडून देऊन विश्‍वाच्या बुडाशी असलेल्या
सनातन तत्त्वांच्या विचारांचे असे एक जागतिक पीठ निर्माण करतील! आणि हे
सारे मानवकुटुंब एकाच शासनाखाली वैभवाने नांदावयास पाहिजे असेल तर
असल्याच भेदाभेदशून्य भक्कम पायाची आवश्यकता आहे.’, असे म्हणणारे सावरकर
बजावतात, ‘आपापली आग्रही मते जोपर्यंत दुसर्‍या धर्मांनी सोडून दिलेली
नाहीत तोपर्यंत हिंदुत्वाचा आग्रह सोडता येणार नाही. हिंदू हे नावच टाकून
देणे म्हणजे आपल्या राष्ट्राचे हृदयच चरचरा चिरण्यासारखे आहे.’
संपूर्ण चराचराच्या कल्याणाची प्रार्थना करणारी संस्कृती या भारतात
सुमारे ५ हजार वर्षांपूर्वीपासून नांदत आहे. या भारतवर्षांत उदयास आलेले
सारे पंथ आणि संप्रदाय यांनी सदैव मानवधर्माचा जयजयकार केला आहे.
जगातल्या अन्य उपासनापंथीयांनी आपल्याच उपसनापद्धतीचा अवलंब केला पाहिजे
अन्यथा त्यांना जगण्याचा अधिकारच नाही, असा अमानवी विचार मांडणार्‍या
पंथांचा उदय गेल्या दोन हजार वर्षांत भारताबाहेर झाला. परंतु भारतात
मात्र सर्वसमावेशक संस्कृती नांदत होती. याबद्दल अमेरिकेतील जगप्रसिद्ध
भाषणात स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘जो धर्म समस्त जगताला ‘सहिष्णुता’
आणि ‘सर्वच मतांना मानणे’ या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आला आहे, त्या
धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. अन्य धर्मीयांविषयी आम्ही केवळ
सहिष्णुताच बाळगतो असे नव्हे, तर सर्वच धर्म सत्य आहेत, असा आमचा
दृढविश्‍वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही
जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीने सर्वदा
आश्रय दिला आहे, त्या जातीत जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो.
ज्यावर्षी रोमनांच्या निष्ठूर अत्याचारांनी यहुदी लोकांचे पवित्र देवालय
भग्न होऊन मातीस मिळाले, त्याच वर्षी काही जातिवंत यहुदी आश्रयार्थ
दक्षिण भारतात आले असता माझ्याच जातीने त्यांना सादर हृदयाशी धरिले, हे
सांगताना मला भूषण वाटत आहे. वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना
ज्या धर्माने आसरा दिला आणि आजही जो धर्म त्यांचे प्रतिपालन करीत आहे,
त्याच धर्मात मी जन्मास आलो आहे.
बंधूंनो, लक्षावधी हिंदू नर-नारी ज्या स्तोत्राचा प्रतिदिन पाठ करतात आणि
जे मी अगदी लहानपणापासून म्हणत आलो आहे, त्याच स्तोत्रातील काही ओळी मी
आज तुमच्यासमोर उद्धृत करितो -
रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनानापथजुषाम्‌
नृणाम् एको गम्य: त्वमसि पयसाम् अर्णव इव |
भिन्न भिन्न उगमांतून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास
मिळून एक होऊन जातात, त्याचप्रमाणे रुचिवैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ
वा वक्र मार्गांनी जाणारे सर्व पथिक प्रभो, अंती तुलाच येऊन मिळतात.
’’एकांतिक धर्मीय मंडळी धर्मांतरावर विश्‍वास ठेवतात कारण ‘माझाच धर्म
खरा’ असा त्यांचा आग्रह असतो. या आग्रहातून धर्मांधपणा जन्मास येतो. आणि
या धर्मांधतेतूनच जगात अशांती आहे. परंतु भारतीय धर्म हा असा एकांतिक
धर्म नाही. त्यामुळे भारतीय धर्मात जन्मास आलेल्यांनी आपण हिंदू असल्याचा
अभिमान बाळगला पाहिजे. थोर विचारवंत दंत्तोपंत ठेंगडी यांनी सांगितलेल्या
एका गोष्टीचे येथे स्मरण होते. तूप विक्री दुकानदार आपल्या दुकानावरील
‘तुपाचे दुकान’ ही पाटी बदलून तिथे ‘शुद्ध तुपाचे दुकान’ अशी पाटी लावतो.
असे करण्यामागचे कारण विचारण्यात आल्यावर दुकानदार म्हणतो, ‘बाजारात
वनस्पती तूप (डालडा) येण्यापूर्वी ती पाटी ठीक होती. परंतु आता माझ्याकडे
शुद्ध तूप मिळते हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.’
हिंदू धर्माचेही असेच आहे. ‘माझाच धर्म खरा आणि माझ्या धर्माचा अवलंब न
करणार्‍याला देव नरकात पाठवतो.’, अशी समज बाळगून धर्मांतर करणार्‍या,
जिहाद पुकारणार्‍या धर्मांहून माझा धर्म वेगळा आहे. हिंदू या गौरवशाली
शब्दाने जग या भारतीय जीवनधारेला ओळखते. त्यामुळे जगातील अन्य एकांतिक
धर्मांकडे बघून हिंदूंनी स्वत:त अपराधीपणाची भावना निर्माण होऊ देण्याचे
काहीच कारण नाही.
याचा अर्थ हिंदू धर्मात काहीच दोष आलेले नाहीत, असे नव्हे. जातीभेद,
स्वार्थीपणा, निक्रियता, आळस, संकुचितपणा, धर्माच्या नावाखाली
गोर-गरीबांची लुबाडणूक अशा गोष्टी या दूर झाल्याच पाहिजेत. त्यासाठी कठोर
उपाययोजना करतानाच सुधारणांना स्वत:पासून सुरूवात करण्याची गरज आहे,
धर्माचा त्याग करण्याची नाही.जातीभेद आणि उच्चनीचतेची भावना यांनी हिंदू
धर्मावर कलंक लावला आहे. जाती-जातींमधील उच्चनीचतेची भावना कमी करण्याची
आवश्यकता आहे. याविषयी स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘जात ही एक नैसर्गिक
व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे
चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ
हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.मी छातीठोकपणे सांगतो की, आजची
अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न
केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार
करणारे दलाल!’’
हिंदू धर्मात शिरलेले दोष दूर करण्याची दिशाही विवेकानंदांनी सांगितली
आहे. ते म्हणतात, ‘‘एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार.
त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी
हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण
करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी
केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ? पुनर्बांधणी हेच
सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला
तर चटकन कापला जातो, तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या
धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी
चळवळींची मुळीच गरज नाही.’’
जातीधर्माच्या नावाखाली होणार्‍या राजकारणाला कंटाळल्यामुळे खांबेटे हे
अस्वस्थ झाले आहेत, हे सुचिन्ह आहे. जाती आणि धर्म यांच्या आडोशाने होत
असलेले राजकारण कोणत्याही विचारी मनुष्याला खटकल्याशिवाय राहणार नाही. हे
थांबविले पाहिजे. परंतु हिंदू धर्माचा त्याग केल्याने जातीधर्माच्या
नावाखाली होणारे राजकारण थांबणार आहे काय, हा खरा प्रश्‍न आहे.
हा समाज आपला आहे. या समाजाचे माझ्यावर ऋण आहेत. हा देश माझा आहे. या
देशातील लोकांच्या विकासासाठी यथाशक्ती प्रयत्न करणे, ही देशभक्ती आहे.
जाती किंवा धर्म यांच्या आधारे भेदभाव होणे म्हणजे माझ्या देशाच्या
प्रगतीला बाधक ठरणे होय. विस्तार हेच जीवन असून संकुचितता म्हणजे मृत्यू
होय. अशा विचारांचे समाजात जागरण करण्याचा प्रयत्न स्वत:पासून करणे हे
वरील परिस्थितीवर योग्य उत्तर असणार आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘आधी विचार जन्म घेतात, आणि मग कृती !’म्हणून
उदात्त, शक्तीदायी आणि देशभक्ती जागविणार्‍या विचारांचा आचरणातून प्रसार
करण्याचा प्रयत्न करणे सर्व समस्यांवर उत्तर नाही काय ? मनुष्य
निर्माणासाठी कार्य करणार्‍या संस्था-संघटनांच्या माध्यमातून हे कार्य
करणे हा एक सकारात्मक मार्ग असू शकतो.

2 comments:

  1. Anonymous3.3.12

    apratim vishleshan
    reg.
    Ganesh sawant

    ReplyDelete
  2. Anonymous4.3.12

    विचार स्तुत्य पण आपल्या देशातील वारसा कायदे धर्माधारित आहेत. अशा व्यक्तींचे वारसा कायदे कसे असावेत आदी प्रॅक्टिकल मुद्द्यांवरदेखिल आपण लिहायला हवेहोते

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी