Monday, August 13, 2012

‘शिवाय नम: अप्पा’ यांना अशी घडली कैलास-मानस सरोवर यात्रा


सोलापूर - भगवान शिवशंकराचे निवासस्थान मानले गेलेल्या कैलास पर्वताचे याचि देही दश्रन घडणे कोणत्याही शिवभक्तासाठी परमोच्च आनंदाचा क्षण. सोलापुरात ‘शिवाय नम: अप्पा’ या नावाने ज्यांची ओळख आहे त्या नागनाथ सिद्धप्पा कळंत्रे (वय 67) यांनी कैलास मानस सरोवराची केलेली यात्रा रोमहर्षक आहे. गेल्या 52 वर्षांपासून नित्य नेमाने दिवसातून दोनदा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दश्रन घेणार्‍या या शिवभक्ताशी साधलेला हा संवाद.

वडील अतिशय धार्मिक. वयाच्या नव्वदीपर्यंत ते नित्यनेमाने सिद्धेश्वराला 108 बिल्व अर्पण करत. त्यांच्या आजारपणात हे दायित्व अप्पांवर आले. समाधी कट्टय़ाजवळ बेलाची पाच रोपं लावून कायमची सोय केली. त्यांनी 1976 पासून तीर्थाटनाला सुरुवात केली. 12 ज्योतिर्लिंग, चार धाम, गंगासागर आणि नेपाळ यात्रा केली. पण मनात कैलासाविषयी जिज्ञासा अस्वस्थ करत होती. भूकैलास, कायकवे कैलास असे शब्द नेहमी कानावर पडायचे. कैलास कसा असेल, असा विचार येऊन अनेकांना विचारले. कोणीच समाधान केले नाही. एकदा वृत्तपत्रात कैलास यात्रेसंदर्भात जाहिरात पाहिली आणि तत्काळ मुंबईला दूरध्वनी केला. कैलास आता चीनच्या हद्दीत असल्याने पासपोर्ट लागेल, असे समजले. सरकारी नोकर असल्यामुळे उगीच मागे ससेमिरा नको म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत थांबले. खडतर यात्रा, तापमान रक्त गोठवणारे म्हणून घरून विरोध झाला. ‘करता ती सिद्धेश्वराची सेवाच खूप आहे’, असेही सांगण्यात आले. परंतु हृदयापासून असलेल्या तळमळीमुळे अर्धांगिनीने यात्रेस सहमती दश्रवली. मुंबई ते काठमांडू. काठमांडूनंतरच्या चौदाशे किलोमीटरच्या प्रवासाचे शब्दांत वर्णन करणे कठीण. रस्त्यात झाडे नाहीत की गवत नाही. तीन ठिकाणी मानवी वस्त्या मात्र आहेत. चीनच्या हद्दीत गेल्यावर तिथल्या सुसज्ज गाड्या. तेथून कैलासाकडे रवाना.
मानस सरोवराच्या काठी तंबू पडला. मध्यरात्री देवगण सरोवरात येतात, अशी आख्यायिका असल्याने रात्र जागून काढली. बर्फाच्छादित परिसरामुळे तिथे रात्र ही रात्र वाटतच नाही. सकाळी 11 वाजता सरोवरात स्नान करून तेथून 80 किलोमीटर दूर असणार्‍या कैलासाकडे यात्रा सुरू झाली. अष्टपदीवरून कैलास दश्रन घेतले तो क्षण अवर्णनीयच. जीवन कृतकृत्य झाले. अष्टपदीपासून कैलास तीन किलोमीटर दूर. कैलासावर जाता येत नाही. पर्वताला परिक्रमा करण्याची प्रथा आहे. 52 किलोमीटरची परिक्रमा यमद्वारापासून सुरू होते. दोन दिवस आणि दोन रात्रीत परिक्रमा पूर्ण केली. रस्ते नाहीत, प्राणी नाहीत, गवत नाही की झाडे नाहीत. केवळ निरव शांतता. परिक्रमेनंतर परतीचा प्रवास. 2007 च्या कैलास यात्रेने दुसर्‍या भेटीची ओढ तीव्र झाली. म्हणून पुन्हा 2010 मध्ये कैलासाच्या भेटीस गेले.



शेजारील शत्रू देशांनी भारताच्या सीमा संकुचित केल्याने आपले श्रद्धास्थान आज चीनच्या ताब्यात असल्याचे मनोमन दु:ख होते. त्यामुळे कैलास दश्रनाचा खर्च एक लाखाहून अधिक होतो. पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांना मी पत्र लिहून विनंती केली होती की, हिंदूंच्या यात्रांनाही अनुदान मिळावे. फक्त शिंदे यांचे उत्तर आले की हे काम माझ्या अखत्यारित येत नाही. मी पर्यटन मंत्रालयाकडे वर्ग केले.’’

नागनाथ कळंत्रे, कैलास यात्रेकरू

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी