Tuesday, February 26, 2013

गंगोघ आस्था,एकात्मताव अखंडतेचा

साभार : तरुण भारत 

तारीख: 2/23/2013 5:32:33 PM
 
$img_title कुंभमेळाकेवळ भारतीयांच्याच नव्हे तर संपूर्ण जगाचे आकर्षण आहे. प्रचंड आस्थेपायी भारतातील लोक सर्व प्रकारचे भेद विसरून कुंभमेळ्यात पुण्यप्राप्तीच्या हेतूने जातच असतात. त्याचवेळी भारतीयांना एकत्र आणणारी अशी कुठली आस्था आहे, याचा शोध घेण्यासाठी अनेक विदेशी लोक आवर्जून हा कुंभमेळा बघण्यासाठी येत असतात. कोट्यवधी लोकांची श्रद्धा हा जगातल्या अन्य देशांसाठी तसा कुतुहलाचाच विषय असतो. यामागे कुठले रसायन आहे, याचा शोध घेण्यासाठी भारतात आले आणि रामनामाची चादर लपेटून येथेच रमले अशीही असंख्य उदाहरणे आहेत.

 प्रामुख्याने सर्वच हिंदूंसाठी कुंभमेळा हा आस्थेचा विषय आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार देव आणि दानव यांच्या समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्या अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्याच चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. हजारो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चवथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता, असे आमचे धर्मग्रंथ सांगतात. तेव्हापासूनच ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. याच स्थानांवर कुंभमेळा भरत असतो.
 ज्यावेळी अमृतकुंभातील अमृत पृथ्वीवर पडले, तेव्हा जी ग्रहाची स्थिती होती तशीच स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जात असते. हा योग प्रत्येक बारा वर्षांनंतर येत असतो. म्हणजेच ठरावीक आवर्तन काळानुसार येत असतो.
 दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत अलाहाबाद म्हणजेच प्रयाग, उज्जैन, नाशिक -त्र्यंबकेश्‍वर आणि हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा भरतो. आता कुंभमेळ्यात जाणार्‍यांची संख्या लाखात राहिलेली नाही. कोट्यवधी लोक कुंभमेळ्यात हजेरी लावून गंगा नदीत स्नान करून, पुण्य पदरी पाडून घेत असतात. कुंभपर्वाच्या वेळी गंगेत स्नान केले असता, अनंत पुण्यलाभ होतो, अशी हिंदूंची धारणा आहे. हिमालयात वर्षानुवर्षे तपःश्‍चर्या करणार्‍या साधू-संतांसह दुर्गम जंगलात राहणारे योगीही महाकुंभात येत असतात. कुंभ परंपरेचा इतिहास सिंधु संस्कृतीच्या परंपरेपेक्षाही जुना आहे. कुंभमेळ्याला सहस्त्रो वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे. कुंभमेळ्याचा आरंभ कधीपासून झाला, हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही. पौराणिक ग्रंथात कुंभमेळ्यांचा उल्लेख आहे. नारद पुराणात कुंभमेळ्याची महती सांगितली आहे. जगद्‌गुरू आदिशंकराचार्य यांनी विविध पंथ-संप्रदायांच्या साधूसंतांना कुंभमेळ्यात भाग घेण्यास प्रवृत्त केले. आदिशंकराचार्यांनी याला वैदिक स्वरूप देऊन प्रतिष्ठा मिळवून दिली. श्री चैतन्य महाप्रभू देखील बंगालहून कुंभमेळ्यात आले होते. चीनी यात्री हुआंगत्संग यानेही आपल्या पुस्तकात कुंभमेळ्याचे वर्णन केले आहे.
 कुंभमेळ्यात मकरसंक्रांत, अमावस्या, वसंतपंचमी आणि माघी पौर्णिमा हे चार मुख्य पर्व आहेत. या दिवसांच्या स्नानाला विशेष महत्त्व असते. कुंभ म्हणजे पवित्रता आणि मांगल्य यांचे प्रतीक असणारा कलश! यालाच मंगल कलश असेही म्हटले आहे. कुंभात देवता, समुद्र, पृथ्वी आणि चारही वेद यांचा वास मानला जातो. म्हणूनच आपल्यासाठी कुंभाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. महाकुंभाच्या वेळी स्नान आणि दानधर्म करणार्‍यांना स्वर्गप्राप्ती होते. तेथील तीर्थ भक्तीभावाने प्राशन केल्यास पापांचे क्षालन होते. या ठिकाणी ध्यानधारणा केल्याने सिद्ध ऋषीमुनींकडून येणारी ऊर्जा आपल्याला मिळते. अनेक कष्ट आणि व्याधी यांच्यापासून सुटका होते. आपल्याला चांगले मानसिक स्वास्थ्यही लाभते, अशी भाविकांची मान्यता आहे.
 पाश्‍चात्यांचा देखील हा आकर्षणाचा विषय असल्याचे वर्षानुवर्षे आपल्याला दिसते आहे. आता कुंभमेळा हा हार्वर्ड युनिवर्सिटीत देखील अभ्यासाचा विषय झाला आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनातील आर्थिक बाजूचा तसेच संगमनगरी अलाहबादच्या इतर धार्मिक आयोजनाचा यात सविस्तरपणे अभ्यास करण्यात येणार आहे. हार्वर्डचे आर्ट्‌स अँड सायन्स, स्कूल ऑफ डिझाईन, हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, हार्वर्ड मेडिकल स्कूल, हार्वर्ड डिव्हिनिटी स्कूल आणि हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे एक पथक अलाहबाद येथे आले असून, हे शोध पथक महाकुंभाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहे. मेळ्यात कोट्यवधी लोक सामील होतात. कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक तात्पुरते शहर वसविण्यात येते. यात श्रद्धाळू आणि पर्यटक एक महिन्यांपेक्षा अधिक काळ वास्तव्यास असतात. या अभ्यासाला ‘मॅपिंग इंडियाज कुंभमेळा’ असे नाव देण्यात आले आहे. अनेक विदेशी पर्यटक कुंभमेळा पहायला आले आणि भगवद् भक्तीत दंग झाल्याची उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. गंगानदीच्या शुद्धिकरणासाठी सुरू असलेल्या चळवळीत आध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक परकीय लोकही सहभागी असल्याचे दिसते आहे. दरवेळी वेगवेगळ्या देशांमधून अभ्यासकांची गर्दी कुंभमेळ्याकडे आकृष्ट होत असते. वैविध्यांनी नटलेल्या भारताची एकात्मता आणि अखंंडता अबाधित राखण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या धर्मसुत्राचे हे प्रगटीकरण आहे. गर्दीसाठी जाहिराती देण्याची गरज नाही. निमंत्रण पत्रिका पाठवण्याची गरज नाही. कोणालाच आठवणही करून देण्याची गरज नाही. आषाढी एकादशीला पंढरपुरला तर कुंभमेळ्याला तिर्थक्षेत्री जाण्याचे कुणीच कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही.
 नेमकी हीच अवस्था या देशातल्या धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या लोकांना पहावली जात नाही. कोट्यवधी लोकांमध्ये खुटकन वाजले की ही मंडळी कुंभमेळ्यालाच जबाबदार धरणार. गवताच्या गंजीला आग लावणार्‍याच्या हातापेक्षा आगपेटीलाच जबाबदार धरण्याची या मंडळींची मानसिकता आहे. कोट्यवधी लोक आस्थेने स्नानासाठी येणार तेव्हा गंगेचे पाणी शुद्ध करण्याचा आग्रह धरण्यापेक्षा गंगेचे पाणी किती दुषित झाले आहे, याचाच बाऊ करण्यात हे लोक धन्यता मानतात. यंदा सर्व प्रसारमाध्यमांनी गंगेतील दुषित घटकांची वारंवार आकडेवारी दाखवली. मात्र, कुठलाच परिणाम झाला नाही. नेहमीपेक्षा अधिक लोक कुंभात स्नान करण्यासाठी आले. मुस्लिमांचा ‘इज्तेमा’ असेल आणि त्यात गडबड होवून मनुष्यहानी झाली तर हे लोक सरकारला जबाबदार ठरवणार. त्याचवेळी हिंदूंचे मोठे एकत्रिकरण असेल आणि गडबड झाली तर तुमच्या आस्था दडलेला विषयच किती भंपक आहे, याचे चित्र रंगवण्याची सवय या लोकांना झालेली आहे. महाकुंभातील छोटे छोटे विषय घेवून हे एकत्रिकरण किती घातक आहे, हेच दाखवण्याची स्पर्धा यंदा दूरचित्रवाहिन्यांमध्ये लागलेली होती. पुरेशी माहिती न घेता, अभ्यास न करता आपण ठरवलेल्या दिशेनेच आपले घोडे दामटवत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, कोट्यवधी भारतीय अशा अपप्रचाराला बळी पडत नाही, हीच सगळ्यात मोठी उपलब्धी आहे.
 गंगा स्नानासाठी भाविक जमणार असे दिसताच गंगा ‘मैली’ झाली म्हणून हे रान माजवणार. गंगेच्या शुद्धिकरणासाठी दिला गेलेला कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याबद्दल चकार शब्दही काढला जात नाही. गंगा ही अर्ध्या भारताची जीवनदायिनी आहे. भारताच्या एकात्मतेचे ते एक प्रतिक आहे. तिचे पावित्र्य कायम राखणे हा यांच्या चिंतेचा विषय नाही. ‘सुपारी’ घेऊन हे लोक अशा प्रवाहांना नख लावण्याचेच काम करतात, असा अनुभव गेल्या काही वर्षात आपल्याला येतो आहे.
 आगामी निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकांपूर्वी होणारा हा महाकुंभ आहे. परिणामी महाकुंभातील धर्म संसद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भरवल्याची ओरड प्रसार माध्यमांनी केली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, अशोक सिंघल यांची भेट राजकीय स्वरूपाचीच असते, असेच चित्र त्यांना रंगवायचे आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियात आलेली नवी पिढी मागची पाने उलटून पहायला तयार नाही. प्रत्येकच कुंभमेळ्यात श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माणाचा निर्धार केला गेला, हे त्यांना माहीत नाही. देव, धर्म व देश विषयक आस्था असलेले लोक एकत्र येऊन काही निर्णय करतात, ही बाब त्यांच्या पचनीच पडत नाही. कुंभमेळ्यात सातत्याने धर्मसंसद भरवली जाते, हे माहीत असले तरी ती यावेळी निवडणुकीच्या तोंडावरच झाल्याची ओरड करण्यावर यांचा भर असतो. आणिबाणीपूर्वी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत श्रद्धेय बाळासाहेब देवरसांनी सामाजिक प्रश्‍नांवर आपली मते मांडली होती. धर्मात सुधारणा घडवून आणण्यावरही त्यांनी भर दिला होता. प्रमुख धर्माचार्यांनी दर काही वर्षांनी एकत्र बसून काय परिवर्तनीय, काय त्याज्य आणि काय शाश्‍वत याची मिमांसा करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली होती. त्याहीपूर्वी द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या प्रेरणेने सुरू झालेल्या विश्‍व हिंदू परिषदेने या कामाला प्रारंभ केला होता. १९६४ साली मुंबई येथे स्वामी चिन्मयानंद यांच्या अध्यक्षतेखाली विहिंपची स्थापना झाली. पूर्वी एकमेकांचे वावडे असलेले धर्माचार्य हिंदू समाजाची सांस्कृतिक एकता सुदृढ करण्यासाठी एकत्र आले. ‘न हिंदू पतितो भवेत्’ हा नारा धर्माचार्यांनी एक मुखाने दिला. या कामासाठी मठ-मंदिर सोडून शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी कधी नव्हे ते धर्माचार्य सिद्ध झाले.
 राष्ट्र उभारणीच्या कार्यात सर्व पंथ-संप्रदायांनी एकत्र येण्याची अधिक गरज भासू लागल्यावर १९८२ मध्ये ‘धर्मसंसद’ स्थापन करण्यात आली. शंभराहून अधिक पंथ-संप्रदायाचे प्रतिनिधी एकत्र आले. हिंदू जागरण, राष्ट्रनिर्माण आणि संस्कृती रक्षणाचा एवढा तेजस्वी स्वर कदाचित पहिल्यांदाच या देशात ऐकायला मिळाला. गंगा, गायत्री, गीता, गोमाता व भारतमाता पुज्य मानणारा वर्ग एका दिशेने विचार करू लागला. शेकडो वर्षांपासून या देशाला एका नव्या स्मृतिची गरज होती. नवी बदलती परिस्थिती आणि आमची जीवनमूल्ये याची सांगड आवश्यक होती. अशी स्मृती ज्याला आपण आचारसंहिता म्हणून शकतो ती व्यवहारात आणणे कठीण काम होते. मात्र, दधिची, भगिरथ, वशिष्ठ, भगवान बुद्ध, महावीर, शंकराचार्य आणि गुरूनानक यांचे अनुयायी या साठी एकत्रितरित्या सज्ज झाले. महाकुंभ केवळ स्नानासाठी, पापक्षालनासाठी नाही तर धर्मचर्चा घडवून आणणारा तो सोहळा ठरला पाहिजे, असा प्रयत्न सुरू झाला. समाजातील कुप्रथांवर जोरदार प्रहार केले गेले. अस्पृश्यता हद्दपार करण्याचा संकल्प सोडला गेला. गिरीकंदरात राहणार्‍या वनवासींचे जबरीने होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी समाज पुढे सरसावला. धर्मसंसदेत राजकीय वाटणारे सोबतच सामाजिक पातळीवरही क्रांतिकारी ठरावे, असे निर्णय सातत्याने घेतले गेले. दुर्दैवाने प्रसार माध्यमांचे याकडे दुर्लक्ष आहे. कदाचित ठरवून दुर्लक्ष आहे. कुणी झोपेचे सोंग घेतले असेल तर त्याला उठवणार कसे? यांना जातींची संमेलने चालतात. पंथ-संप्रदायांची संमेलने चालतात. मात्र, ‘हिंदू’ या नावाखाली सर्व भेद विसरून लोक एकत्र झाले की यांचे चेहरे पांढरे फट्ट पडतात. राम मंदिराचा मुद्दा धर्मसंसदेने निवडणुकीच्या तोंडावर उचललेला नाही. तर आजपर्यंतचे रामजन्मभूमीचे आंदोलन धर्मसंसदेच्याच मार्गदर्शनात होत आले आहे, हे समजून न घेता कुजलेल्या मानसिकतेतून सापडेल तिथे महाकुंभाचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला गेला.
 राममंदिर आणि धर्म याविषयांना नवी पिढी अजिबात थारा देणार नाही, असा निष्कर्ष ढोबळमानाने वृत्तवाहिन्यांनी काढला आहे. देशातले सर्व धर्माचार्य एकत्रितपणे राममंदिराचा मुद्दा उचलून धरतात. त्या धर्माचार्यांना समाजाचा पाठिंबा मिळणार नाही, हा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढल्या जातो, हेच कळत नाही. उलट चित्रण दाखवूनही कुंभमेळ्यातील गर्दी दरवेळी वाढतेच आहे. सर्वच तीर्थस्थानांवर गर्दीचा महापूर आहे. रामसेतू रक्षणासाठी झालेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. काश्मीरघाटीत अमरनाथ आंदोलनाचा विजय झाला. हे दिसत असतानाही कंठशोष करतात याचाच अर्थ त्यांच्या दुकानदार्‍या संपुष्टात येऊ घातल्या आहेत, असाच काढावा लागेल.
 प्रसार माध्यमांनी आणि हिंदूद्वेष्ट्यांनी कितीही विष पसरवले तरी कुंभमेळ्यात लोक गेलेच. उलट वाढत्या संख्येत गेले. फेसबुक, ट्विटरवर नव्या पिढीने कुंभमेळ्याविषयी टाकलेले ‘पोस्ट’ प्राचीन काळापासून असलेली लोकांची आस्था आजही कायम असल्याची ग्वाही देणारेच होते. देशाच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचा हा प्रवाह आहे. या जनसागराचा अधिक विधायक दिशेने कसा उपयोग करून घेता येईल, एवढा प्रयत्न मात्र आपण निश्‍चितच ठेवला पाहिजे.
 शिवराय कुळकर्णी
 ९८८१७१७८२७

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी