Saturday, February 23, 2013

महाकुंभात भारतमातेचे दर्शन





साभार / तरुण भारत 
 पायात चप्पल नाही, डोक्यावर कपड्यांचे गाठोडे, नातवंडांची बोटं हातात धरलेली आजी (अम्मा) लगबगीने निघालेली आहे संगमाकडे कुंभस्नानासाठी. त्यांच्या डोळ्यांना केवळ त्रिवेणी संगमाची आस लागलेली दिसत आहे. मुलांचे आजोबा (दादा) आणि आई-वडिलांजवळील झोळ्यांत काही खाण्याच्या वस्तू व थोडेफार कपडे... एका हातात चप्पल घेऊन आजी अनवाणी पायानेच लगबगीने त्रिवेणी घाटाच्या दिशेने निघालेली... मार्गात चिखल, धूळ, डोक्यावर तापता सूर्य आणि आजूबाजूला लाखो लोकांची गर्दी असे दृश्य. पण त्यांना यातील कशाचेच भान नाही. ते फक्त महाकुंभासाठी येथे दाखल झाले आहेत. ते रेल्वेत कसे बसले असतील? तत्पूर्वी तिकीट काढण्यासाठी त्यांना किती वेळ रांगेत उभे राहावे लागले असेल? प्रयाग स्थानकावर कच्च्या-बच्च्यांना सुखरूप गाडीबाहेर उतरवण्यासाठी कसकसे प्रयत्न करावे लागले असतील? प्रचंड गर्दीत शेजार-पाजारच्या प्रवाशांचा भार त्यांनी आपल्या खांद्यांवर आणि बाहूंवर कसा झेलला असेल? प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडण्यासाठी त्यांना काय कष्ट पडले असतील? आणि तेथून बाहेर रस्त्यावर आल्यानंतर विचारच-विचारत ते त्रिवेणी संगमावर पायी-पायी कसे पोहोचले असतील? याची कल्पनाच न केलेली बरी. या लोकांना त्यांच्या गावापासून संगमापर्यंत पोहोचण्यासाठी काय हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या असतील, याची कल्पना ‘कुंभमेळ्यात आपले स्वागत आहे’, अशी वाक्ये लिहिलेली, आपल्या नेतेगिरीची झलक दाखवणारी फलके ठिकठिकाणी झळकवणार्‍या नेत्यांना येण्याची शक्यताच नाही. सत्य हे आहे की, ते सारे लोक बेईमान आहेत. कुंभ मेळ्यात आलेल्या भाविकांचे स्वागत करण्याशी त्यांचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. यांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपली बिघडलेली प्रतिमा मीडियापुढे चमकवणे आणि त्यात सुधारणा आणणे, एवढाच हेतू साध्य करायचा आहे. साधी रिझर्व्हेशनची सोय नसताना, राहण्यासाठी कुठलाही तंबू नसताना, जगातील सर्व समस्यांना शरण न जाता, जी आजी धाडसाने आपली मुले, सुना आणि नातवंडांना घेऊन त्रिवेणी घाटापर्यंत पोहोचते, तिलाच महाकुंभाच्या खर्‍या स्नानाचा लाभ होतो. कुणी भारतमातेचे दर्शन घेतलेले नसेल, तर कुंभात डुबकी मारण्यासाठी आलेल्या या मातेचे चरणस्पर्श करावे, तेथेच भारत स्नानाचा आनंद तुम्हाला मिळून जाईल.
कुंभात स्नान करण्यासाठी कोण कुठून आला, कोणत्या जातीचा आहे, त्याचा रंग कोणता, पंथ कोणता, याची माहिती कुणाला असण्याचे कारणच काय? कोणी तामिळनाडूचा आहे, तर कुणी अरुणाचल किंवा गुजरातचा. कोणी अंदमानहून आलेला, तर कोणी नेपाळ, अमेरिकेतून दाखल झालेला... तो ब्राह्मण आहे की ठाकूर, यादव आहे की वाल्मीकि आणि तांंग आहे की मिझो किंवा मणिपूरचा आहे की बस्तरच्या जनजातींचा, कुणाला काहीच ठावूक नाही. त्रिवेणी सार्‍यांना पवित्र स्नान घडवते. समरसतेचा सर्वात मोठा संगम मंत्र त्रिवेणीतच मिळतो. आपण किती श्रीमंत आहात आणि किती गरीब याचे येथे कुणालाच देणेघेणे नसते. तुम्ही चित्रपट कलाकारांसोबत कुंभस्नान करण्यासाठी अलिशान अशा स्वीस तंबूंमध्ये मुक्काम ठोकला आहे की त्रिवेणी घाटाच्या आसपास सतरंजी अंथरून धर्मादाय तंबूंमध्ये रात्रभर भजन-कीर्तन करून, पुण्य कमावण्यासाठी दंग झाला आहात, हे विचारायला येथे कुणाला फुरसत नाही. हे पाहून त्याचे विश्‍लेषण करेल, एवढा वेळदेखील कुणाजवळ नाही. चीन, जपान, कोरिया अथवा अमेरिकेतून आलेले छायाचित्रकार छायाचित्रे काढत असतील, तर त्यांना ती काढू द्यात. संन्यासी व्यक्तींचे अर्धनग्न व्हिडीओ ते काढत असतील तर तेदेखील त्यांना करू द्या. कोणाच्या दृष्टीला काय नोंदवून घ्यायचे आहे, हे आपण काय जाणावे? कुंभात आलेल्या कोट्यवधी हिंदूंकडे कोण कोणत्या भावनेने बघत आहे, हे स्वतः त्याचा परमेश्‍वरच जाणू शकतो. आम्ही तर केवळ आमची गंगामाता, आमचे सीताराम, आपले शिवशंकर भोलेनाथ यांची प्रार्थना करण्यातच मग्न आहोत. येथील कुंभ हेच आमचे विश्‍व आहे आणि हाच कुंभ आमच्या हृदयात सामावलेला आहे. तो प्रत्येक यात्रेकरू, जो श्रद्धेने येथे आला तो स्वतःच कुंभ होऊन जातो, भारतमय होऊन जातो.
हजारो वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. त्या परंपरेनुरूप प्रगत झालेल्या या भारत देशात वेद आहेत, पुराणे आहेत, माता जानकी आहे, वनवासी राम आहे, गोवर्धनधारी कन्हय्या आहे आणि शरीरावर भस्म लावलेले जटाधारी पिनाकपाणि भोलेनाथदेखील आहेत. याच मातीतून बुद्ध आणि महावीरांनी जसा जन्म घेतला, तसाच तो आदिशंकरांनीही घेतला. याच मातीत तुम्हाला वाल्मीकिंचे जसे दर्शन होते तसेच ते अहंकारी ब्राह्मणाचे गर्व हरण करून, कृष्णाला भिंत तोडून दर्शन देण्यास भाग पाडणार्‍या कनकदासाचेही दर्शन होते. येथे जसे चांडाल आणि श्‍वानात त्याच गोविंदाचा वास असल्याची मान्यता असणारे शंकराचार्यांची परंपरा मानणारे संतपुरुष आढळतात, तसेच येथे गुरुनानक आणि तीर्थंकरदेखील आढळतात. येथे मंथन आहे, चिंतन आहे, जिज्ञासा आहे आणि त्यावरील उत्तरेदेखील येथेच मिळतात. येथे यमाचे सत्य जसे अस्तित्वात आहे, तसेच त्या सत्याला आव्हान देणार्‍या नचिकेताचे वीर वैराग्यदेखील बघायला मिळते. येथे भारताला भारत बनविण्यासाठी आवश्यक असलेले सारे काही आढळते. भारताचे भारतीयत्व हेच कुंभाचे अंतिम सत्य आहे. येथे जो येतो तो पावन होऊन जातो, ज्याचे येथे येणे जमत नाही, त्याने केवळ मनात आणून स्मरण जरी केले तरी त्याला पापक्षालनाचे सुख मिळते. ज्याने केवळ श्रद्धेने कुंभ पाहिला त्यालादेखील सत्त्व प्राप्ती झाली म्हणून समजा; आणि ज्याने केवळ निधार्मिक कुतुहलापोटी कुंभ पाहिला, तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी, त्याच्या हिश्श्याला जेवढे सत्त्व येणे निर्धारित होतेे, ते त्याला प्राप्त झाले म्हणून समजा.
सरकारची पूर्णतः अनुपस्थिती असती तरी कुंभ होण्याचे काही टळले नसते आणि तो नेहेमीसारखाच झालाही असता. वर्षानुवर्षांपासून तो कुणाची मदत असो वा नसो, नेमाने वाजतगाजतच होत आला आहे. आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात रेल्वे सोडल्या, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावला, तंबूंची व्यवस्था केली, ही सुविधा दिली, या सोयी केल्या, अशी फुशारकी मारणारे किती गर्विष्ठ, क्षुद्र, संकुचित आणि खुजे राजकारणी आहेत, हे कळून चुकले. हिंदू श्रद्धाळू तुम्ही केलेल्या घोषणा आणि सोयी-सुविधांंना भुलून थोडीच कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येतात? ज्याप्रकारे हजारो वर्षांपासून भारताची माती आणि हवा कुठलाही खंड न पडता हे महाप्रचंड आयोजन करत आहे, त्याप्रकारचे कृत्रिम आयोजन सार्‍या जगातील सरकारे आणि शक्ती एकत्र आल्या तरी त्यांना ते जमणार नाही.
ही हिंदूंची शक्ती आहे. ही त्या भारताची शक्ती आहे, जो सनातन धर्मी आहे. सेक्युलरवादाच्या भेसळयुक्त प्लास्टिक-पॉलिथिन पिशव्यांच्या विषाक्त चकाकीपासून दूर असलेल्या गंगा, यमुना आणि सिंधूची संस्कृती जगणार्‍या जमिनीची ही ताकद आहे. आपले वाद, विवाद, चर्चा आपल्यालाच लखलाभ होवोत. आपल्या झेंड्यांबद्दल आपल्याला शुभकामना. आम्ही तर संगमावर स्नान करायला निघालो.
चारही बाजूंना अखिलेश यादव यांचे होर्डिंग्ज दिसत होते. गर्वाने फुललेला चेहेरा आणि गर्विष्ठ घोषणा. कुंभात सहभागी होणार्‍या भाविकांचे स्वागत करणारी मोहम्मद आझम खान यांची फलकेसुद्धा ठिकठिकाणी उभारलेली दिसत होती. दोन्ही हातांत उन्हाचा गॉगल पकडलेला आणि नजर कुणीकडे हे समजायला मार्ग नाही, अशी त्या फलकांवरील आझम खान यांची स्टाईल असंयुक्तिकच म्हणायला हवी. आम्हीदेखील या भावपूर्ण स्वागतात न्हाऊन निघालो. ते हिंदूच असू शकतात, ज्यांच्या एखाद्या मोठ्या आयोजनाचा सरकारी प्रभारी कोणी ख्रिश्‍चन अथवा कुणी मुसलमान असला, तरी ते संगमाच्या दिशेने असे मार्गक्रमण करतात, जणुकाही आम्हाला तुमच्या सरकारी प्रभाराशी काय घेणे देणे आहे? असेच त्यांना म्हणायचे आहे. तुम्ही कुणालाही प्रभारी करा आम्ही गंगा स्नानाला जाणार म्हणजे जाणारच. या सार्‍या बाबी राजकारणाच्या फाईल्ससाठी असतात, कुंभाचा त्याच्याशी काहीएक संबंध नसतो. कुंभामध्ये ते त्यांची छायाचित्रे लावतात, ती त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, त्याने कुंभाला थोडेच काही लाभ होतो?
आम्हीदेखील महाकुंभाचे स्नान करून आलो. १४४ वर्षांनंतर हा महाकुंभ आला आहे. पुढच्या १४४ वर्षांनी जेव्हा हा महाकुंभ होईल, त्यावेळी आम्हाला भारतवासी म्हणूनच जन्म देशील, अशी प्रार्थना आम्ही गंगामय्याला करून आलो. एखाद्या पारड्यात सार्‍या जगातील सुख, समृद्धी, विद्या आणि सैन्यशक्ती एकीकडे ठेवावी आणि दुसरीकडे आपल्या भारतातील हे पाणी, ही हवा आणि आपल्या परंपरेचे हे सनातन सुख ठेवावे, तेव्हा ते समसमान होईल. आपल्या भारताच्या मातीचाच कण इतर सार्‍या जगाच्या पुढे असल्याचे आढळून येईल. जे येथे आहे, ते इतरत्र कुठेही आढळणार नाही. जे येथे नाही त्याची आम्हाला आसदेखील नाही. ही विराटता, जी भारताच्या आईच्या डोळ्यात बघायला मिळते, ती इतरत्र कुठे बघायला मिळणार?
कुंभाला जमा झालेल्या गर्दीला मतदानाच्या तराजूत तोलण्याचा प्रयत्न करणारे, भाविकांचा भाव समजू शकण्यास असमर्थ आहेत, त्यांना अपरिपक्व आणि खुजेच म्हणायला हवे. यंदा कुंभामध्ये इतकी अव्यवस्था होती की विचारायलाच नको. मनात विचार आला पण चुकून देवाने अशी परिस्थिती आणू नये. एखादे मुस्लिम सरकार जरी असते, तर त्यानेदेखील यापेक्षा कितीतरी चांगली व्यवस्था कुंभमेळ्यासाठी केली असती. सार्‍या शहरात कचर्‍याचे ढीग साचलेले दिसत होते. जो प्रयागचा कुंभ सम्राट हर्षवर्धनाच्या दानशूरतेने सुगंधित झालेला बघायला मिळत असे, आज त्याच सम्राटाची प्रतिमा प्रयागचे सर्वात घाणेरडे स्नानकेंद्र अशी होऊन गेली आहे. सम्राटाच्या भुजा गुंडाळून पोलिसांसाठी निगराणी चौकी स्थापन करण्यात आली आहे. कुंभनगरीत ठिकठिकाणी कचरा आणि चिखल साचलेला दिसत आहे. कधी कोणत्या पुलावरून भाविकांचे आवागमन बंद केले जातेय् तर कधी कुठल्या पुलावरून. पण एकाही वीर पोलिसाजवळ याची माहिती नाही वा त्याबाबतचे साधन नाही की दुसर्‍या पुलावरून वाहतूक कधी सुरू होणार, हे तो सांगू शकेल. १४ नंबरच्या किंवा १६ नंबरच्या पुलावर चालले जा, कदाचित ते पूल सुरू असण्याची शक्यता आहे, एवढेच उत्तर त्यांच्याकडून मिळत असे. पण याने भाविकांचा प्रश्‍न थोडीच सुटणार आहे? धुळीने माखलेले, त्रस्त झालेले आणि उन्हात तापलेले यात्रेकरू शांततेत पुढे चालले जात. रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत ३६ भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर थोडीबहूत सुरक्षा आणि साहाय्यता व्यवस्था दिसू लागली. १२ वर्षांपूर्वीच माहिती होते की या तारखेला, या दिवशी कुंभमेळा होणार आहे, मग तेव्हापासून त्याची तयारी का केली गेली नाही? हिंदूंच्या जगातील सर्वात मोठ्या उत्सवाच्या आयोजनाला हिंदुबहूल देशात सर्वोच्च स्थानी ठेवण्यात आले आहे, असे वाटणारी कोणतीही व्यवस्था सरकारतर्फे केली गेली नाही, याबद्दल खेद वाटतो. यापेक्षा जास्त गांभीर्याने हे लोक सैफेई महोत्सव आणि कॉंग्रेस अधिवेशन साजरे करून टाकतात.
भारतावर सेक्युलरवादी प्रहार करण्याची ही मानसिकता आहे. ज्यांच्या विराट रूपाने सहस्रो वर्षांपूर्वी तिरस्कार चिरडून टाकून, अमानुषतेने विजेते झालेल्यांचा दर्प ठेचून काढण्याची शिकवण दिली, त्याच हिंदूंना हे लोक सेक्युलरवाद शिकवायला निघाले आहेत. ज्यांनी प्रयागचे नाव इलाहाबाद होताना पाहिले आणि तेही दृश्य सहन केले ज्यावेळी इलाहाबादचे नामकरण पुन्हा प्रयाग ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला गेला, तेव्हा त्या प्रस्तावाचा याच सेक्युलरवाद्यांनी, असे केले तर मुसलमान नाराज होतील म्हणून विरोध केला. या भारतात आणखी काही काळ या आत्मदैन्य आणि दास्यत्वाच्या मानसिकतेच्या सेक्युलर राजांचे राज्यसुद्धा सहन केले जाईल, ते या विराट भारताच्या सनातनकाळाच्या प्रवाहात अणूच्या सहस्रांशापेक्षाही कमी आणि नगण्य राहील.
 तरुण विजय
(लेखक राज्यसभा सदस्य आहेत)
 अनुवाद : चारुदत्त कहू

1 comment:

  1. पेशवाई संबंधित अण्णासाहेब खाजगीवाले आणि चांदीचा प्याला (फुलपात्र) ही कथा श्रुतीतून शोधून वाचकांपुढे सादर करावी विनंती...

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी