Friday, February 22, 2013

अनुभूती निराकाराची


साभार / तरुण भारत 

तारीख: 2/21/2013 11:29:14 AM
 नरेंद्रची विवेकानंद होण्याची प्रक्रिया आम्हा सगळ्या तरुणांना अत्यंत प्रेरणादायक आहे. काही श्रद्धाळू स्वामीजींना देवाचा अवतार म्हणतात. सोपे आहे ना! एकदा त्यांना अवतार ठरवले की आमची जबाबदारी संपली. ते अवतार, आम्ही सामान्य. मग आम्ही फक्त पूजा करणार. त्यांच्यासारखे जीवन घडवण्याचा प्रयत्न कशाला करायचा?पण स्वामीजी स्वत: वेगळ्या विचारांचे होते. त्यांच्या मते प्रत्येक जीव हा अव्यक्त बह्मच.ईशत्व सगळ्यांचे ठायी वास करते.त्याची अभिव्यक्ती हीच खरी माणुसकी.

 आपणा सर्वांतले देवत्व प्रगट होण्यासाठी उसळी मारत असते. आपण आपल्या व्यापात त्याकडे दुर्लक्ष करतो. अपुर्‍या मार्गदर्शनामुळे प्रयत्न करणारेही निराश होतात आणि अर्ध्यातच मार्ग सोडून देतात. स्वामी विवेकानंदांच्या चरित्राची घडण अभ्यासताना आपल्याला ती व्यावहारिक सूत्रे मिळतात,ज्यायोगे आपण आपले दिव्यत्व प्रगट करू शकतो. या प्रक्रियेच्या तयारीचे तीन प्रमुख टप्पे आपण गेल्या तीन सदरांत पाहिले.
 जीवनाचे उद्दिष्ट शोधण्याचा ध्यास, श्रद्धा व प्रयोग या तीन पायर्‍या चढून नरेंद्र्रला गुरू लाभले. अवघ्या पावणे सहा वर्षांतच त्या समर्थ गुरूने नरेंद्र्रला परिपूर्ण विवेकाचा आनंद करून टाकले. आपणाला तर ते विवेकानंदच पुरे.त्यांच्या जडणघडणीचा अभ्यासच आपला गुरू बनेल. पाश्‍चात्त्य विचारकांना कोळून प्यालेला नरेंद्र तसा नास्तिकच होता. ब्राह्म समाजाच्या संपर्काने निराकार साधनेची ओढ लागली. बालपणी शिवाच्या मूर्तीपुढेे ध्यानाचा खेळ खेळणारा नरेंद्र तरुणाईत पोहोचता पोहोचता साकार पूजेला नुसते थोतांड मानायला लागला. पूजापाठ,मंदिर व उपासना या सगळ्याला तो याच दृष्टीने पाहू लागला.अशा नरेंद्रास गुरू लाभले ते दक्षिणेश्‍वराच्या भवतारिणी कालीचे कट्टर पुजारी श्रीरामकृष्ण परमहंस. त्यांच्याकरिता कालिमाता केवळ काळ्या दगडाची सुंदर कोरीव मूर्ती नव्हती.ते तिचे साक्षात चिन्मय दर्शन करीत. पण ठाकुरांची साधना एकांगी नव्हती. त्यांनी स्वत:ला समस्त भारतीय साधनांची प्रयोगशाळाच बनवून टाकले होते.
 अनेक गुरू स्वत: श्रीरामकृष्णांच्या दारी येत आणि त्यांना साधनेचा नवा मार्ग शिकवीत.असेच अद्वैत वेदांती गुरू तोतापुरी दक्षिणेश्‍वराला आले. ठाकुरांना पाहून प्रभावित झाले आणि म्हणाले - ‘बच्चा तुम्हारी आँखे कहती है कि तुम उँचे साधक हो
क्या ये मूर्ति के चक्कर में फसा है? अद्वैत का साधन कर, वहीं सबसे उँचा हैं|’ श्रीरामकृष्ण तयारच होते,पण आईची परवानगी तर हवी ना? तोतापुरीला वाटले आपल्या जन्मदात्या आईला विचारणार असेल. पण ठाकूर तर कालीच्या गर्भगृहात पोहोचले. मातेला विनवणी केली एक नवी साधना शिकून घेतो. आईची परवानगी मिळाली आणि तोतापुरीच्या सांगण्याप्रमाणे निराकार ध्यान सुरू. मोठमोठ्या साधकांना अनेक तप ज्या साधनेला लागतात ती निर्विकल्प समाधी ठाकुरांना लगेच लागली. तीन दिवस तसेच समाधिस्थ राहिले. तोतापुरी इतके प्रभावित झाले की, त्यांनीच श्रीरामकृष्णांना आपले गुरू मानले. नरेंद्रासारख्या युवकांना मार्गदर्शन देण्याकरिताच ती ठाकुरांना असे विविध अनुभव देत होती.कारण नरेंद्र थेट साकार भक्तीत कसा जाणार? तर्काने डोक्यात घातलेले थैमान देवापुढे समर्पित कसे होऊ देणार? म्हणून ब्राह्मो समाजाचे निराकार पूजन आकर्षित करायचे. तरी एक पोकळी होतीच. लहान वयापासूनच त्याचे ध्यान सहजगत्या लागायचे. पण पुढे प्रगती काही होत नव्हती. श्रीरामकृष्णांनी पहिल्या-दुसर्‍या भेटीतच प्रश्‍न विचारला - ‘झोपण्याआधी डोळे मिटल्यावर निळा प्रकाश दिसतो का?’ नरेंद्रचे उत्तर मोठे मजेदार होते -‘का? सगळ्यांना असा प्रकाश दिसत नाही का?’ खरेच किती निरागस मन. स्वत:चा मोठेपणा नाहीच कुठे. पण खरेच आहे ना. डोळे मिटल्यावर सगळ्यांनाच भुवयांच्या मध्ये प्रकाशवलय दिसतात. कोणाला लाल, पिवळी, तांबडी, सोनेरी तर कोणाला पांढरी. अगदी खूपच तामसी कोणी असेल तर प्रकाश अस्पष्ट असतो.पण दिसतो प्रत्येकालाच. बस आम्ही त्याकडे लक्षच देत नाही.ठाकुरांच्या सांगण्याआधी नरेंद्रालाही या प्रकाशाचे महत्त्व कळले नव्हते. हाच तर गुरूचा महिमा. शिष्याच्या स्वभावाप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणे.
जगात क्वचितच कुणी असेल ज्याच्या मनात ईश्‍वराच्या असण्याबाबत प्रश्‍न आले नसतील.तारुण्याच्या जोशात बहुतेक सगळेच शिक्षित युवक काही काळासाठी का होईना नास्तिक विचारांकडे आकर्षित होतात.पुढे चरितार्थाच्या स्पर्धेत असल्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होते एवढेच. आजच्या शिक्षणात तर्कबुद्धीलाच जास्ती महत्त्व असल्यामुळे प्रत्येक प्रश्‍नाचे तर्कशुद्ध उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. ईश्‍वराला पण तर्काने समजण्याचा प्रयत्न आपण करतो. मग अनेक कल्पना सुचतात- जगाच्या या सगळ्या व्यापामागे काम करणारी अदृश्य शक्ती,निराकार सर्वव्यापी अस्तित्व अशा काही कल्पना बुद्धीला पटतात. हो आणि का पटू नयेत? निराकार निर्विकार ईशस्वरूप तर आहेच ना खरे. बस एकच गडबड असते या विचारात. फक्त निराकारच रूप खरे आणि साकार मूर्तिपूजा म्हणजे थोतांड. हे अनुभूतीच्या अभावाचे लक्षण आहे. खरे तर आपण निराकाराचे पण कुठे दर्शन केलेय्? मग जर दर्शन न करता आपण त्यावर विश्‍वास करतो तर मग तसाच विश्‍वास कुणी श्रद्धेच्या पोटी साकारावर केला तर त्याला का कमी लेखायचे?श्रीरामकृष्णांनी नरेंद्रच्या साधनेला पूर्णता प्रदान करण्याचे पहिले पाऊल त्याला निराकाराची अनुभूती करवण्याने उचलायचे ठरवले.त्यांच्या मार्गदर्शनात नरेंद्रने या साधनेचा शास्त्रीय सराव सुरू केला. तासन्‌तास ध्यान लावण्याची सवय त्याला लहानपणापासून होतीच. पण, योग्य पावले कशी उचलायची त्याचे मार्गदर्शन ठाकुरांनी करणे सुरू केले. पहिले प्राणायामाचा अभ्यास. मात्र, श्‍वासोच्छ्वासावर नियंत्रणच नव्हे तर त्या माध्यमातून शरीर, मन, बुद्धीतून कार्य करणार्‍या जीवनी शक्तीचा, प्राणाचाच प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा. फक्त अनुभवच नाही तर हळूहळू त्याच्या प्रवाहावर नियंत्रण प्राप्त करायचे. नरेंद्र्रने सामान्यत: कठीण वाटणारे हे टप्पे लीलया पार केले. पुढचा टप्पा धारणेचा. निराकार अद्वैताची ज्याला साधना करायची त्याला हे थोडे कठीण आहे. मनाची धारणा कशातरी अवलम्बावर करणे सापेक्ष, सोपे पडते पण निराकार साधनेत तर कुठला अवलंब नाही. रूप किंवा ध्वनीची सहायता घेतल्याशिवाय प्रत्यक्ष मनावरच मनाची धारणा करायची. ठाम निर्धार असल्याखेरीज हे अशक्यच आहे. पण नरेंद्र तर निश्‍चयाचा महामेरूच. त्याने हे टप्पेही थोड्या प्रयत्नातच पार केले. साधकाचा प्रयत्न धारणेपर्यन्तच असतो. एकदा धारणेचा सराव झाला की पुढचे ध्यान लागणारच. प्रयत्न सुटतो तेव्हा ध्यान लागते. मी करतोय् याचे भानच रहात नाही ना. मी पणा सुटला की मग साधनेची खरी सुरुवात. मीपणाच्या पूर्ण विसर्जनाची स्थिती म्हणजे समाधी.धारणेच्या विषयाचे किंचितही भान उरले असेल, तर ती सविकल्प समाधी. जेव्हा विषयही पूर्ण विसर्जित होतो आणि पूर्ण निराकाराची अनुभूती होते,तेव्हा ती निर्विकल्प समाधी. अद्वैत साधनेची सर्वोच्च उपलब्धी. नरेंद्रने काही महिन्यांच्या अभ्यासातच ही ब्रह्मानंदाची प्राप्ती केली. ज्या दिवशी प्रथमत:नरेंद्रला निर्विकल्प समाधी लागली त्यावेळेस तो तीन तासाच्या वर ठोकळ्यासारखा ध्यानमग्न बसून होता.गुरूबंधूंना काळजी वाटली.ते ठाकुरांकडे गेले आणि सांगू लागले पहा नरेंद्रास काय झाले? ठाकूर हसले, म्हणाले, काही काळजी करू नका. त्याला एकटे सोडा. किती दिवसांपासून माझ्या मागे लागला होता.
 आज तो सोनियाचा क्षण आलाय्. चित्ताचा मोगरा फुललाय्. त्याचा दरवळ आता पूर्ण विश्‍वास व्यापणार.समाधीतून जागृत नरेंद्र अवर्णनीय आनंदात होता. नाचतच आपल्या गुरुमाउलीकडे गेला. म्हणू लागला, आज तर परमानंद मिळाला. अशी कृपा करा की हा आनंद चिरस्थायी होऊ दे. मी सतत या ब्रह्मानंदात राहू इच्छितो. पण गुरूला माहीत होते हे अंतिम गंतव्य नव्हे.हा तर जीवनव्रताच्या तयारीचा मात्र एक पडाव. त्यांनी शिष्याची कानउघाडणीच केली - ‘‘धत् नोरेन! तू इतका क्षुद्र विचार कसा करू शकतोस? इतका स्वार्थी? केवळ स्वत:च्या मुक्तीचा विचार तू कसा करतोस? तुला तर डेरेदार वडासारखे व्हायचेय्. पसरायचेय्. कित्येक साधकांचा आश्रय बनायचेय्. मी तुझ्या हृदयाला कुलूप लावलेय्.आता कुंजी मिळेल ती आईचे कार्य केल्यावरच.’’ काय अद्भुत विचार. मुक्ती पण स्वार्थच ना शेवटी. या अनुभवाने दोन गोष्टी घडल्या.एक तर नरेंद्रची व्याकुळता शांत झाली. आता कुठलीही शंका उरली नाही. निराकार निर्विकाराचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडला.श्रद्धेला अनुभवाची सांगड मिळाली आणि ती अभेद्य झाली.दुसरी गोष्ट म्हणजे हे स्पष्ट झाले की हा अंतिम अनुभव नव्हे. अजूनही खूप काही जाणायचेय्, करायचेय्. पुढचे प्रश्‍न मिळाले. आईचे कार्य कुठले? आणि हो कुठल्या आईचे काम? पण ते उलगडायला अजून वेळ होता. अजून ईश्‍वराचे दोन प्रकारचे साक्षात्कार व्हायचे होते.
 युवा मित्रांनो तुम्हीही हे अनुभव घेऊ शकता, पण त्याकरता हवी नरेंद्रसारखी जिद्द. सुरू तर करू या. रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटल्यावर कुठल्या रंगांचा प्रकाश दिसतो ते तर पाहू या.जरा ७ दिवस पहा आणि मग आम्हाला कळवा.प्रारंभी वेगवेगळे रंग दिसतील पण हळूहळू १-२ वर स्थिरावतील आणि प्रयत्न सोडला नाहीत तर मग तुमच्या स्वभावाचा रंगही दिसेल. चला मग मिटा डोळे आणि सुरू करा निराकाराची यात्रा!
 मुकुल कानिटकर
 ९४०५७७४८२०

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी