हिंदुस्थानचा बुधवारचा दिवस खेददायकच होता! एकाच दिवशी दोन जणांनी खेद प्रकट केला! या खेदाला ना चेहरा ना मोहरा, ना आगा ना पिछा, ना अर्थ ना अनर्थ, ना शील ना सुशील, ना समोरून ना कॅमेरून! असला खेद काय कामाचा? विनाकारण रस्त्याने जाणार्या सभ्य माणसाला शिवी द्यायची अन् प्रकरण अंगलट येऊ लागले की खेद प्रकट करायचा. निरपराध माणसांना गोळ्या घालायच्या. मुडदेफर्रासाप्रमाणे शेकडो सामान्य माणसांचे निर्घृण मुडदे पाडायचे आणि नंतर कित्येक वर्षांनी शहाजोगपणे खेद प्रकट करायचा. असा हा खेदजनक खेद आहे. बदमाशांना पळवाट काढून देणारा महाबदमाश! ज्यांच्या हातात पोलिस आहेत, ज्यांच्या हातात राक्षसी सत्ता एकवटली अशा दोन मगरूर सत्ताधीशांनी आपल्या मस्तीत आदी प्रमाद केले. सामान्य माणसांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशा प्रकारे वर्तन केले आणि नंतर शहाजोगपणे खेद व्यक्त करून नामानिराळे होण्याचा त्यांचा इरादा आहे. या बदमाशांना कोण माफ करणार? खेदाची पळवाट काढून पळून जाऊन नंतर इस्त्रीच्या कडक कपड्यावर कॉलर ताठ करत जगात मगरूरपणे जणू काहीच घडले नाही अशा टेचात फिरणार! यांना पावलोपावली जाब विचारत आपल्या हाताला काळे न लावता यांची तोंडे काळी केली पाहिजेत. खेदाची पळवाट महाग पडणारी आणि पुन्हा एका नव्या खड्ड्यात घेऊन जाणारी आहे, असे यांना जाणवले पाहिजे.
सुशीलकुमार शिंदे यांंनी एक महिन्यापूर्वी जयपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनात बोलताना रा. स्व. संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या शिबिरांत दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते, असा धडधडीत आरोप केला. हे भाषण संपताच पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती करताच, शिंदे गडबडले आणि त्यांनी आणखी एक अपराध केला. त्यांनी आपल्याला भगवा दहशतवाद म्हणायचे होते, असा खुलासा केला. कोणा ऐर्यागैर्याने हा आरोप केला असता, तर लोकांनी त्याकडे लक्ष दिले नसते. मात्र, देशाचे गृहमंत्रीच अशा प्रकारचा आरोप करतात हे थक्क करणारे होते. देशातील सर्व गुन्हेगारीविषयक कारवायांची अधिकृत माहिती गृहमंत्र्यांकडे असते. त्यामुळे गृहमंत्री जे विधान करतात ते जबाबदारीने करत असतात, असा समज आहे. त्यात सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिमा वेगळी आहे. शिंदे यांच्याच भाषेत सांगायचे, तर सुशीलकुमार यांचा राजकीय जीवनातला मंत्र आहे जी हुजूर! हायकमांडसमोर लोटांगण घालायचे बस्स! स्वतःच या आपल्या लाचारीचे निर्लज्ज वर्णन करणारा हा माणूस आहे. त्यामुळे शिंदे यांनी दहशतवादी असा आरोप करणे म्हणजे अधिकृत माहिती किंवा जाणीवपूर्वक कॉंग्रेसच्या हायकमांडने कट करून शिंदेंच्या तोंडून केलेला आरोप! निश्चित माहितीच्या आधारे भारतीय जनता पक्ष आणि रा. स्व. संघ यांच्याबाबत दहशतवादाचा आरोप होेणेच शक्य नाही. संसदेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षावर आणि देशात हजारो नि:स्वार्थ, समर्पित, देशभक्त कार्यकर्ते आणि हजारो सेवाप्रकल्प उभे करणार्या संघावर दहशतवादी असा घाणेरडा आरोप करणारी माहिती मिळणेच अशक्य, दुरापास्त! मग दुसरी शक्यताच जास्त. काहीतरी कारणाने ठरवून कॉंग्रेसच्या हायकमांडने कट करून माउथपीस शिंदेंच्या तोंडून हा आरोप संघ, भाजपावर केला! मुंबईवर हल्ला करणारा खतरनाक नराधम अजमल कसाब आणि संसदेवर हल्ला करणारा आधुनिक अफजलखान यांना फाशी देताना देशातील अल्पसंख्यकांचा राग आपल्यावर येईल, अशी भीती वाटत असल्याने त्याचे परिमार्जन करण्यासाठी असला घाणेरडा आरोप संघ-भाजपावर करण्याची अक्कल जर या लोकांनी पाजळली असेल, तर यांची कीव करावी तितकी थोडी आहे. ज्या राजकीय पक्षाचा नेता देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होता आणि उद्या होऊही शकतो, ज्या पक्षाची सरकारे देशातील ९ राज्यांत विराजमान आहे, अनेक राज्यांत ज्या पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते आहेत, ज्या पक्षाचे कार्यकर्ते संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेते आहेत, त्या पक्षावर दहशतवादाचा घाणेरडा आरोप करण्याची हिंमत कटकारस्थान शिजल्याशिवाय होणे अशक्य! ज्या संघावर देशातील कोट्यवधी लोक आपल्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवतात, ते हे संघाचे लोक देशभक्त, प्रामाणिक, शिस्तबद्ध, सेवाभावी आहेत म्हणून! फाळणी, अपघात, युद्ध, भूकंप, वादळे, पूर अशा प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी आपला जीव धोक्यात घालून देशबांधवांची सेवा केल्याचे देशाने प्रत्येक वेळी पाहिले आहे. असे सेवाभावी कार्यकर्ते देशात दहशतवादाची कृती करतील अशी शक्यताच नाही, हे देशातील सर्वसामान्य लोक जाणतात. पावती, नोंद याशिवाय लक्षावधी रुपये संघाच्या ध्वजासमोर गुरुदक्षिणेच्या रूपात समर्पित केले जातात, ते कोणत्या विश्वासाने? हे सगळे माहीत असूनही केवळ राजकीय फायद्यासाठी, घाणेरड्या कटकारस्थानासाठी देशाचा गृहमंत्री धडधडीतपणे भाजपा आणि संघावर दहशतवादाचा आरोप करतो हे संतापजनकच होते. या विधानामुळे पत्रकार अंगावर आल्यावर या सुमार बुद्धीच्या माणसाने खुलासा करताना आणखी मोठा अपराध केला. हजारो वर्षांच्या त्याग, तपस्या, बलिदानाच्या मूल्यांवर आधारलेल्या हिंदू परंपरेला भगवा दहशतवाद अशी शिवी या माणसाने अगदी सहजपणे देऊन टाकली! शिंदे यांच्या एका निर्बुद्ध विधानाने दधिचीपासून संभाजीराजांपर्यंत बलिदानाची, समर्पणाची सगळी परंपरा दहशतवादी होऊन गेली! सगळे ऋषी, सगळे संत, सगळे बलिदानी पुरुष, जौहर करणार्या माता सगळे एका फटक्यात दहशतवादी! या अपराधाबाबत शिंदे यांनी आणि ते ज्यांना जी हुजूर करतात त्या त्यांच्या मालकांनी हजार वेळा माफी मागितली, तरी पापाचे परिमार्जन होेणे नाही! संसदेतील विरोधी पक्षनेत्या आता संसदेच्या अधिवेशनात आम्ही दहशतवादी असलो तर संसद तहकूब करा अशी टीका करतील, वाट अडवतील अशी भीती वाटल्याने या बिनकण्याच्या सत्तालोलुपांनी घूमजाव केले. तेही माफी मागण्यासाठी नव्हे, तर खेद प्रकट करण्यासाठी!
याच दिवशी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून भारतात आले. शंभर वर्षांपूर्वी भारत पारतंत्र्यात असताना ज्या जालीयनवाला बागेत निरपराध लोकांचे निर्दयी हत्याकांड घडविले गेले, त्या जागेला त्यांनी भेट दिली. जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा जालीयनवाला बागेचा प्रसंग समोर येईल, तेव्हा या लोकशाहीच्या गप्पा करणार्या इंग्लंडच्या टोपीकर शहाण्यांना शरमेने मान खालीच घालावी लागेल. मात्र, सुंभ जळाला तरी पीळ कायम रहातो, अशी ही जात. एकेकाळी यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. आता यांच्या साम्राज्यात सूर्य थांबत नाही. मात्र, अजून यांची बदमाशी संपलेली नाही. यांचा कावेबाजपणा तसूभरही कमी झाला नाही. जालीयनवाला बागेला भेट दिल्यानंतर त्या नीच हत्याकांडाबाबत या माणसाने फक्त खेद प्रकट केला. फक्त खेद! कारण, कॅमेरून यांना पंजाबी मते हवी आहेत. यांच्या या खेद प्रकट करण्याने त्या शंभर वर्षांपूर्वी मरण पावलेल्या हजारो निरपराध हुतात्म्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे, तेथे शहीद झालेल्या जीवनमूल्यांचे जे नुकसान झाले, ते कसे काय भरून निघणार? जेव्हा काहीच करता येत नाही आणि माफी मागण्याशिवाय पर्याय उरलेला नाही हे पाहून सरळ सरळ माफी न मागता आपली मगरुरी कायम ठेवत खेद प्रकट करण्याची पळवाट शिंदे आणि कॅमेरून यांनी निवडली आहे. यांनी शोधलेली ही पळवाट त्यांची सुटका न करता त्यांना आणि त्यांच्या येत्या काही पिढ्यांतील वंशजांना याद राहील अशी शिक्षा या लोकांना हिंदुस्थानातील सामान्य जनतेने दिली पाहिजे. यांच्या निर्लज्जपणाला, यांच्या निर्ढावलेपणाला, यांच्या कटकारस्थानाला माफी नामंजूर! नामंजूर!!
अग्रलेख तरुण भारत / २२/०२/१३
No comments:
Post a Comment