Friday, April 5, 2013

महास्वार्थी व्हा! सेवा करा !!

सार्ध शतीच्या निमित्ताने सर्वत्र स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा पाठपुरावा होत आहे.आपणही या सदरात नरेंद्रच्या नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या घडणीच्या अद्भुत प्रक्रियेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. युवा मनात हा विचार यायला हवा की, हे कशासाठी? काळ बदलला, परिस्थितीही बदलली. स्वामीजींच्या समाधीलाही १११ वर्षे झाली, मग त्यांच्या आयुष्याचा आज मला काय उपयोग? हा प्रश्‍न उद्धटपणाचा नाही. अत्यंत आवश्यक आहे. जोवर आपण स्वत:चा संबंध या विवेचनाशी जोडत नाही, तोवर हे सगळे निष्फळच. म्हणूनच सेवेच्या तंत्राचा विचार करण्याआधी आज हा विषय काढला.

 स्वामी विवेकानंदांनी स्वत:च सांगितलंय् की आपण स्वत: आपले जीवन घडवू शकतो. प्रत्येकाचे भवितव्य त्याच्या हातात आहे. लेखकाचा विश्‍वास आहे की आम्हा प्रत्येक युवकात विवेकानंद दडलेला आहे. म्हणूनच तो आम्हा प्रत्येकास इतका आकर्षित करतो. शारीरिक कार्याची आवड असणार्‍यांसाठी असो की बौद्धिक रुचीवाल्यांसाठी, आध्यात्मिक अभिप्सा असणार्‍यांना असो की आर्थिक महत्त्वाकांक्षा राखणार्‍यांना स्वामीजींच्या जीवनात आणि विचारात सगळ्यांनाच मार्ग मिळतो. म्हणून स्वामीजींच्या जीवनाला इतिहास दृष्टीने न पाहता जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा एक मार्ग म्हणून पाहावयास हवे.
 आपण आजवर पाहिले की श्रीरामकृष्णांनी नरेंद्रची साधना सर्वार्थाने पूर्ण केली. ईश्‍वराचा सर्वांगीण साक्षात्कार त्याला घडवला. निराकार, साकार आणि विराट तिन्ही रूपांत दिव्यत्वाची प्रचीती घेतल्याने नरेंद्रची सर्वसमावेशक दृष्टी विकसित झाली. पुढे नेहमी त्यांनी सर्व स्तराच्या लोकांना सहर्ष स्वीकारले आणि प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे त्याचे मार्गदर्शन केले. नरेंद्रची सुरवात जरी निराकार साधनेने झाली असली,तरी पूर्णत्वास प्राप्त केल्यावर त्यांचा भर विराटाच्या साधनेकडे अधिक राहिला. कर्मयोगास ते युगधर्म मानीत. निष्काम सेवा ही व्यक्तिगत साधनेसोबतच सामूहिक हितासाठी अनिवार्य आहे. समाजात फोफावलेल्या विषमता, अज्ञान, निर्धनता असल्या विकारांवर सेवा हेच रामबाण औषध स्वामीजींनी सांगितले.सेवेच्या मंत्रासोबतच तंत्राचेही स्वामीजींनी वैज्ञानिक विवेचन केले.
 ‘‘उजव्या हाताने सेवा केली तर डाव्या हाताला कळायला नको, तेव्हा ती खरी सेवा.’’सेवेचे प्रदर्शन केल्यास त्यात सेवा भावना उरतेच कुठे. स्वामीजी तर या पुढे जातात. ‘‘सेवा करणार्‍याने अस समजू नये की आपण सेवा घेणार्‍यावर उपकार केलेत. सेवा करणार्‍याने धन्यता मानावयास हवी की त्याला सेवेची संधी मिळाली.’’सेवा करताना आपण मनुष्य रूपात प्रगटलेल्या ईश्‍वराची पूजा करतो आहे, असा भाव ठेवणे म्हणजे खरी सेवा. असा क्रांतिकारी मंत्र स्वामीजींनी दिला. सेवेचा उद्देष पवित्र असायला हवा. थोडाही मोबदला मग तो नावाच्या रूपाने का असेना मिळावा अशी मनात अपेक्षा बाळगून केलेले कार्य सौदेबाजी होय. ती सेवा कशी होणार? सेवा म्हणजे विराट वैश्‍वनराची पूजा, ही गोष्ट स्वामीजींनी आधुनिक भाषेत पटवून दिली. अगदी अमेरिकेत सुद्धा त्यांनी या गोष्टीला रुजवले.
 अमेरिकाचा सगळ्यात श्रीमंत असामी रॉकफेलर स्वामीजींना भेटायला आला. आपल्या संपत्तीचा अभिमान दाखवू लागला. स्वामीजींनी लक्ष दिले नाही.त्याने आपल्या व्यापाराचे अजून वर्णन केले.शेवटी स्वामीजी म्हणाले,‘‘भारतात माणसाला आदर तो किती कमावले यावरून मिळत नसतो तर काय दिले यावरून मिळतो. त्यागालाच आदर देण्याची आमची परंपरा आहे.’’स्वामीजींच्या या प्रेरणेनेच रॉकफेलर फाऊण्डेशनची स्थापना झाली. सेवेसाठी संस्थेची निर्मिती केल्यावर रॉकफेलर पुन्हा स्वामीजींना भेटायला आला. कोरा चेक पुढे ठेवून वाटेल ती रक्कम दान द्यायची तयारी दाखवली. स्वामीजींनी त्यालाच रक्कम टाकायला सांगितली. देणार्‍याची भावना महत्त्वाची, त्याने ती दानाच्या माध्यमातून व्यक्त करायची असते, ही शिकवण दिली. सवयीप्रमाणे रॉकफेलर म्हणाला की आता तुम्ही मला धन्यवाद देऊ शकता. स्वामीजींनी ताबडतोब उत्तर दिले, ‘‘धन्यवाद तुम्ही मला द्या. दानाची, सेवेची प्रेरणा आणि संधी दिल्याबाबत.’’ दान देणार्‍याने विनम्रतेने धन्यता मानावी हीच खरी सेवेची भावना.उपकार केल्याच्या भावनेने केलेले दान अथवा कार्य सेवा होऊच शकत नाही.
 सेवेचे प्रकार पाहण्याआधी आजच्या तरुणांच्या मनात येणार्‍या प्रश्‍नावर विचार करूया. सेवा का करायची? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्‍न.कारण काहीही करण्याआधी आपण विचारतो मला काय मिळणार? प्रत्येक बाबतीत काहीतरी प्राप्त व्हावे ही वृत्ती आजचा स्वभाव झालाय्. खरे तर त्यात काहीच वावगे नाही. स्वार्थी तर प्रत्येक जण असतोच पण स्वामीजी सांगतात शूद्र स्वार्थी होण्यापेक्षा उदात्त स्वार्थी होऊया. प्रत्येक गोष्ट मिळवताना ती का हवी असे विचारले, तर काय उत्तर मिळेल? आपली कुठलीही छोटीशी इच्छा पूर्ण झाली तर आपणास काय मिळते? समाधान, संतुष्टी, आनंद. हो ना! मग ज्या गोष्टीतून सर्वाधिक समाधान, आनंद मिळणार असेल, ती करायला हवी की नाही?निष्काम भावनेने केलेल्या छोट्याशा सेवेच्या आनंदाची तुलना ब्रह्मांडात दुसर्‍या कुठल्याही आनंदाशी होऊ शकत नाही. स्वामीजी सांगतात, ‘कणभर नि:स्वार्थता मणभर ताकद देते.’ नि:स्वार्थता म्हणजे उदात्त स्वार्थ. हाच सेवेचा खरा भाव. ज्या ज्या उद्देशासाठी आपण जगतो त्याचे अंतिम समाधान सेवेमुळे लाभते. म्हणून हा महास्वार्थ.
 सेवेतच मूळ संवेदना आहे. स्वदृष्टी आणि परदृष्टी दोन्ही मध्ये ही संवेदना जागृत करावयास हवी.स्वत:कडे संवेदनेने पाहू लागल्यास आपल्याला कळते की किती लोकांवर आपले जीवन अवलंबून आहे. जेवण्याआधी भोजन मंत्र म्हणा किंवा नका म्हणू पण हा विचार अवश्य करायला हवा की हे जे अन्न माझ्या ताटात आले त्यात किती लोकांचे श्रम लागले आहेत? पाककर्त्या माउलीपासून सुरू करून मागे जात विचार केला तर शेतकर्‍यापर्यंत कित्येक लोकांच्या श्रमाचे प्रसाद स्वरूप हे सुपाच्य अन्न आपणास लाभते.अशा संवेदनक्षम विचाराने स्वत:च्या जीवनास पाहू लागल्यास मनात कृतज्ञता जागृत होते. किती जणांत आपण जगतो आहे ते कळते. मग समजू लागते की कितीही प्राप्त केले तरी या ऋणातून उणे झाल्याखेरीज जीवनात खरे समाधान मिळूच शकत नाही. मग सेवा आपला स्वार्थच आहे हे कळते. आणि सहज सेवेकरिता आपण प्रस्तुत होतो. हेच स्वार्थाचे उदात्तीकरण आहे.
 जगाकडे पाहण्यात देखील हीच संवेदना जागी होऊ लागते. आपल्या दु:खांचा विचार करण्याआधी जगात किती दु:ख आहे ते दिसू लागते. रस्त्यावर चालताना कडेला पशुवत जीवन जगण्यास विवश बंधूंना पाहून त्यांच्यासाठी काही करण्याचा विचार जागा होतो.स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून त्यांच्या कष्टाची कल्पना आपण करू लागलो की मग आत्मीयता जागृत होते.मग आर्त-विपन्नांसाठी सेवा करणे आपल्या मन:शांतीसाठी आवश्यक होऊन जाते.चहुओर दु:खितांची गर्दी असताना त्यांच्यासाठी काही केल्याशिवाय एकटे आपण कसे सुखी होणार,असा विचार येऊन माणुसकी जागी होते.पाणी भरलेल्या खळग्यातून डुकराच्या पिल्लाला वाचविण्यासाठी आपले कपडे घाण करणार्‍या अब्राहम लिंकनची थट्‌टा त्याचे वकील मित्र डुक्कर प्रेमी म्हणून करू लागले.लिंकनने स्पष्ट केले की मला डुकराच्या पिल्लावर प्रेम नाहीये पण मला माझी झोप प्रिय आहे. जर मी त्या पिल्लाला तसेच सोडले असते,तर मला रात्री निवांत झोप लागली नसती. स्वदृष्टी व विश्‍वदृष्टी दोन्हीत संवेदना जागृत झाल्यानेच स्वार्थ महास्वार्थ होऊ शकतो. सेवा केल्याने ही संवेदना जागृत होते. म्हणून चला संकल्पपूर्वक सेवेत लागू या, स्वार्थी नव्हे महास्वार्थी होऊया!
 मुकुल कानिटकर
 ९४०५७७४८२०
साभार - तरुण भारत 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी