Friday, April 5, 2013

रिद्धपुरात मंदिर व मशिदीचा वाद उफाळला

 मंदिरालगतच्या मशिदीमागे असलेल्या याच शासकीय जागेवरून वाद आहे

तभा वृत्तसेवा
शिरजगाव बंड, ३ एप्रिल

महानुभाव पंथियांची काशी मानल्या जाणार्‍या श्री क्षेत्र रिद्धपूरमध्ये दोन धर्मस्थळांच्या वादातून बुधवार, ३ रोजी जातीय तणाव निर्माण झाल्याने प्रचंड तणावाचे वातावरण आहे. संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याने त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.


रिद्धपूर येथे महानुभाव पंथियांचे प्राचीन मंदिर आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यात व संवर्धनात रिद्धपूरचे मानाचे स्थान मानले जाते. चक्रधर स्वामींच्या मंदिराला लागूनच एक मशीदही आहे. मंदिर व मशीद एकाच आवारात असल्याने आजवर अनेकदा छोटे-मोठे वाद झाले आहेत. मशिदीला लागूनच महानुभावांचा राजमठ असून पश्‍चिमेकडे शासकीय जागा आहे. ही जागा खुली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी रात्री काही असामाजिक गुंडांनी मंदिराकडे जाणारा मार्ग बंद करून टाकला. या मागार्र्वर टीनाचे शेड उभारले. हे अतिक्रमण बुधवारी दुपारी १ वाजता पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले.

अतिक्रमण हटवल्यानंतर हळूहळू दोन्ही गटाचे लोक एकमेकांसमोर उभे झाले. या घटनेची भनक लागताच शिरखेड आणि मोर्शी येथून ग्रामीण पोलिसांचा ताफा रिद्धपूर येथे पोहचला. तोपर्यंत संतप्त जमावाने एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू केली होती. दोन्ही जमावांना पांगवण्याच्या प्रयत्नात निलेश रिठे आणि किरण बांबल नामक दोन पोलिस दगडफेकीत जखमी झाले. त्यांना मोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावर जबरदस्त बंदोबस्त लावल्यावर अनूचित प्रकार घडला नसला तरी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळावर अमरावती, मोर्शी, चांदूरबाजार येथून पोलिस कुमक बोलवावी लागली. जिल्हा ग्रामीण पोलिस उपअधीक्षक अविनाश बारगळ, मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सागर पाटील, उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, तहसीलदार अनुप खांडे, शिरखेडचे ठाणेदार गणेश ठाकरे, मोर्शीचे ठाणेदार विजय पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी घटनास्थळावर ताफ्यासह दाखल झाले.

मोर्शीचे तहसीलदार, सरपंच, ग्रामसेवक आणि गावातील प्रमुख मंडळींनी मध्यस्थता करून दोन्ही समाजाच्या लोकांना एकत्र बसवून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करून पाहिला. सदर रस्त्याचा वाद तीन वर्षांपासून न्यायप्रविष्ठ आहे. औरंगाबाद वक्फ बोर्डाने या जागेवर दावा सांगितला आहे. औरंगजेबाच्या शासनकाळापासून ही जागा मुस्लिम समाजाच्या ताब्यात असल्याचे त्या समुदायाचे म्हणणे आहे. मात्र, मंदिरात जाणार्‍या लोकांना हे मान्य नाही. परिणामी शांतता समितीची सभा आज निष्फळ ठरली. या बैठकीला महानुभाव संप्रदायाचे अनेक मान्यवर महंत उपस्थित होते. वरवर शांतता भासत असली तरी रिद्धपुरात मात्र तणावाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी