Friday, April 5, 2013

जर बाबरी मक्का-मदिनात असती तर...

सौदी अरब तो देश आहे, जेथे पैगंबर हजरत मोहम्मद साहाब यांचा जन्म झाला होता. पवित्र मक्केत इस्लाम धर्माचा पाया रचला गेला. हे तेच शहर आहे, जेथे पवित्र कुराण लिहिले गेले. यासाठी हे शहर मुस्लिमांसाठी सर्वांत पवित्र आणि धर्माच्या दृष्टीने सर्वोच्च मानले जाते. दरवर्षी आयोजित होणारी हज यात्रा याच मक्का शहरात होते. यासाठी मक्का हे शहर व्हॅटिकन आणि हरिद्वारसारखेच जगविख्यात आहे. मक्केत घडणार्‍या घटनांना जगाच्या पाठीवर वसलेल्या मुसलमानांसाठी आदर्श म्हणून मानले जाते.

सध्या सौदी अरबमध्ये वहाबी पंथाच्या राजघराण्याची सत्ता आहे. ते केवळ कुराण आणि सुन्नत यालाच महत्त्व देतात. म्हणून त्यांच्या लेखी इस्लामशी जुळलेल्या अन्य परंपरा आणि आदर्शांना स्थान नाही. त्यांचे मत आहे की, इस्लामशी जुळलेली अन्य कोणतीही वस्तू असो, त्यांच्या लेखी महत्त्वाची नाही. अशा वस्तूंचा सन्मान किंवा त्यांच्याशी जुळवून घेणे एक प्रकारे मूर्तिपूजेसारखेच आहे. अशा वस्तूंमध्ये आस्था ठेवणे हे इस्लामच्या मूळ सिद्धांताच्या विरोधात आहे, असे सौदी सत्तेचे ठाम मत आहे. हे त्यांचे केवळ मतच नाही, तर अशा कोणत्याही बाबीला ते मान्यताही देत नाहीत. सौदी अरबच्या भूमीवर कुणी मुसलमान इस्लामच्या मूळ सिद्धांताच्या विरोधात आचरण करताना आढळला, तर सरकार त्याला दंडित करते. सौदी सरकारचा हा धाक संपूर्ण देशात असल्याने हज यात्रेच्या वेळीही याविरुद्ध पाऊल टाकण्याची हिंमत यात्रेला येणारा एकही मुसलमान करीत नाही. कारण, तेथे जाणार्‍या मुसलमानाला हे माहीत आहे की, आपण जर असे वर्तन केले, तर सौदी सरकार आपल्याला सोडणार नाही. सौदी सरकार जर इस्लामी बाबींबाबत सर्वोच्च आहे, तर त्याचे अनुकरण करणे जगभरातील मुसलमानांसाठी अनिवार्य आहे.
मक्का येथेच एका जगविख्यात मशिदीचे निर्माण केले गेले होते, जी मक्केत अल् हरम नावाने प्रसिद्ध आहे. या प्राचीन मशिदीच्या सभोवताल पुरातत्त्व महत्त्व असलेले खांब आहेत. पण, काही दिवसांपूर्वी सौदी सरकारच्या आदेशावरून यातील काही खांब पाडून टाकण्यात आले. इस्लामी बुद्धिजीवी वर्गाचे म्हणणे आहे की, याच मशिदीजवळून पैगंबर साहाब यांचे, बुर्राक (पंख असणारा घोडा)वर स्वार होऊन ईश्‍वराचा साक्षात्कार करण्यासाठी स्वर्गातून आगमन झाले होते. ही ऐतिहासिक पार्श्‍वभूमी पाहता, इस्लामिक रीसर्च फौंडेशननेसुद्धा सौदी सरकारच्या प्राचीन मशिदीसोबत केलेल्या छेडछाडीवर टीका केली असून या कृतीला अनुचित म्हटले आहे. अल् हरम मशीद ही अतिप्राचीन असून, तिचे क्षेत्रफळही फार मोठे आहे. असे सांगितले जाते की, अल् हरम मशीद ही ३५६ हजार ८०० चौरस मीटरमध्ये व्यापली आहे. हजरत इब्राहिम यांनी या मशिदीचे निर्माण केले होते. या मशिदीच्या पूर्वेला जे खांब आहेत, ते तोडण्यात येत आहेत. इतिहासाच्या दृष्टीने या खांबांचे महत्त्व यासाठी आहे की, येथे हजरत मोहम्मद आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांना अरबी भाषेत अंकित करण्यात आले आहे. सौदी सरकारच्या या निर्णयामुळे मुस्लिम उत्तेजित होऊ नयेत म्हणून सर्व काम अतिशय गोपनीय पद्धतीने सुरू आहे. या मशिदीच्या ऐतिहासिक खांबांना तोडण्यासाठी सौदीतीलच बिन लादेन या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी प्रिंस चार्ल्सने सपत्नीक या मशिदीला भेट दिली असता, या ऐतिहासिक वास्तू तोडण्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले होते. सौदी सरकारने या खांबांना तोडण्याचा विषय मशिदीच्या विस्तारित योजनेशी जोडला आहे. परंतु, विश्‍व प्राचीन वास्तू जतन समितीशी जवळून संबंध असलेले प्रिंस चार्ल्स यांनी असे म्हटले आहे की, हा केवळ एक बहाणा आहे. वस्तुस्थिती ही आहे की, ही मशीदच तोडण्याचा मनसुबा यामागे आहे.
सौदी सरकारने कुणा मशिदीला तोडण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. काबे (हरम)च्या विस्तारीकरणाच्या नावावर अशा घटना नेहमीच घडत असतात. जगातील हजारो मुसलमान तेथे येतात आणि हा विध्वंस आपल्या डोळ्यांनी पाहतात, पण याला विरोध करण्याची कुणाचीही बिशाद नाही. सौदी सरकार केवळ मक्केतच ही तोडफोड करीत आहे असे नव्हे, तर मदिनेतही हेच काम सुरू आहे. मदिनेत जन्नतुल बकीअ नावाच्या कब्रस्तानात इस्लामचे मोठे खलिफा आणि पैगंबर साहेबांच्या कुटुुंबीयांच्या कबरीबाबतही सरकारचे हेच धोरण कायम आहे. कबरीवर फातेहा पढताना जर कुणी वाकून कबरीला ओठाने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यास तेथे सरकारचे पोलिस कोड्यांनी मारतात. विचित्र घटना अशी की, ज्या घरी पैगंबर मोहम्मद साहाब यांचा जन्म झाला होता, त्या बेतुल मवलीदलाही ध्वस्त करून तेथे पुस्तकालय उभारण्यात आले आहे. पैगंबर मोहम्मद साहाब ज्या दारूल अकरममध्ये लोकांना इस्लामची शिकवण द्यायचे, ते स्थळही उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
हे सर्व होत असताना, त्याचा सौदी सरकारला जाब विचारण्याची हिंमत कुणातच नाही. सौदी सरकार इस्लामच्या बाबतीत अतिशय कट्टर आहे. हे सरकार केवळ इस्लामी आदेश आणि सिद्धांतावरच विश्‍वास ठेवते. ऐतिहासिक स्थळांशी त्यांना काहीही घेणेदेणे नाही. वहाबी लोकांचे म्हणणे आहे की, अशा स्थळांबाबत सहानुभूती आणि सन्मान दर्शविणे हे एकप्रकारे त्यात आस्था असण्यासारखेच असून ज्याचे स्वरूप पूजापाठ करण्यासारखे आहे. यापूर्वीही सौदी सरकारने मक्केतील बिलाल मशीद तोडून तेथे शाहच्या महालाचा विस्तार केला होता. याचा अर्थ, मशिदींचेसुद्धा वहाबी सौदी सरकारच्या लेखी कोणतेच स्थान नाही. वाचकांनी हे लक्षात घ्यावे की, बिलाल एक हब्शी होते, ज्यांच्या आवाजात अतिशय ओज आणि माधुर्य होते. पैगंबर साहेबांच्या काळात बिलाल हेच नमाजाच्या आधी अजान (बांग) चा पुकारा देत होते. जगातील अनेक मुसलमान जेव्हा सौदीला भेट देतात आणि हा सर्व विध्वंस पाहतात तेव्हा ते अतिशय व्यथित होतात. पण, हा भारत नाही, जेथे वाट्टेल तसा विरोध करून आपल्या मनाप्रमाणे सरकारला वाकवता येईल.
देवबंदी विचारसरणीचे मुसलमान सौदी अरबच्या विचारसरणीशी सहमत असू शकतात. पण, भारतातील ८० टक्के मुसलमानांना सौदी सरकारची ही दादागिरी पसंत नाही. सौदीची सत्ता राजाजवळ एकवटली असल्यामुळे ते कोणतीच टीका-टिप्पणीही करीत नाहीत. पण, सौदी अरबमधील मक्केचे इमाम, जे वेळोवेळी भारतात येतात आणि आपले वर्चस्व सांगतात, अशा इमामांवर भारतीय मुसलमान बहिष्कार घालून सौदी सरकारला धडा जरूर शिकवू शकतात. मुंंबईमधील जाकीर नाईक दरवर्षी अशा सौदी इमामांना बोलावून आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन घडवीत असतात. जर मुंबईमधील सामान्य मुसलमान या अरब इमामांविरुद्ध उभा ठाकला, तर सौदी सरकारला मोठा झटका दिला जाऊ शकतो. हज यात्रा दरवर्षी केली जाते. त्यामुळे तेथे जाऊन सरकारविरोधात काही बोलणे केवळ अशक्य आहे. परंतु, इराणने वेळोवेळी सौदी सरकारविरुद्ध आंदोलन चालवून सौदी सरकारचे डोके ठिकाणावर यावे, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मुसलमानांना हे आठवतच असेल की, काही वर्षांआधी सौदी सरकारचा विरोध दर्शविण्यासाठी काही अतिरेक्यांनी काबा या पवित्र स्थळात शिरून हे स्थळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. अन्य देशांतील मुसलमानांनीही सौदी तानाशाही दूर करण्यासाठी संकल्प केल्यास तेथील उर्वरित प्राचीन वास्तूंचे रक्षण केले जाऊ शकेल. या प्रश्‍नाचे उत्तर तर मुसलमानांनाच द्यायचे आहे की, जर सौदी सरकार काबा येथे तोडफोड करू शकते, तर मग भारतातील हिंदू आपल्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यासाठी आंदोलन का करू शकत नाही? मुसलमानांची पवित्र काबामध्ये जी आस्था आहे, अगदी तशीच आस्था हिंदूंची राममंदिरात आहे. दु:ख याचे आहे की, सौदी सरकारला अल् हरम मशिदीचे खांब तोडून तेथे मोठा व्यापारिक मॉलचा विस्तार करायचा आहे. भारतात राममंदिराच्या निर्माणासाठी बाबरीला अन्यत्र स्थानांतरित करण्याची मागणी होत आहे. केवळ स्थानांतरण करायचे आहे, मॉल बनविण्याची मागणी नाही. भारतीय मुसलमानांनी या वस्तुस्थितीचे शांतपणे चिंतन केले पाहिजे.
मुझफ्फर हुसेन 
साभार -  तरुण भारत 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी