Thursday, May 2, 2013

चीनला एवढी हिंमत येण्यामागे काय कारण ?

बलवीर पुंज
गेल्यावर्षी ४०० हून अधिक आणि यावर्षी आतापर्यंत जवळजवळ १०० वेळा चिनी सैन्याने भारतीय सीमांचे उल्लंघन केले आहे. सीमोल्लंघनाच्या ९० टक्के घटनांची नोंद लडाख क्षेत्रात करण्यात आली आहे. अगदी ताज्या प्रकरणात म्हणजे, १५ एप्रिलच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या दौलत बेग ओल्डी क्षेत्रात भारतीय हद्दीत १० किलोमीटर आत घुसखोरी केली होती. जवळजवळ १७,००० फूट उंचीवर असलेल्या या भागात चिनी लष्कराने तीन अस्थायी चौक्या उभारल्या आहेत. भारताने यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतरही चिनी सैनिक तेथून माघार घ्यायला तयार नाहीत. हा भूभाग आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. चीनला ही एवढी हिंमत येण्यामागे काय कारण आहे? आमचे सरकार चीनला सडेतोड उत्तर देण्यास का घाबरत आहे, हा देखील यक्ष प्रश्‍न आहे.
चीनच्या नवीन नेतृत्वाने सत्ता हाती घेतल्यानंतर आणि भारतासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण करण्याच्या त्याच्या गोष्टी सुरू असतानाच घुसखोरीच्या या घटनांमुळे चीनची साम्राज्यवादी मानसिकताच अधोरेखित होते. चीनचे पंतप्रधान ली कछयांग पुढील महिन्यात भारताच्या दौर्‍यावर येत आहेत. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर ली यांच्या परदेश दौर्‍याची सुरुवात भारतापासूनच होत आहे. त्यानंतर ते पाकिस्तानात जाणार आहेत. भारताशी आपले संबंध अधिक विश्‍वासाचे व मैत्रीपूर्ण करण्यास आपण उत्सुक आहोत, हाच संदेश चीन या दौर्‍याच्या माध्यमातून देऊ इच्छित आहे. यापूर्वी म्हणजे गेल्या महिन्यात दरबान (दक्षिण आफ्रिका) येथे चीनचे राष्ट्रपती शी चिन फिंग यांनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळीही हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. भारताशी असलेल्या संबंधांना प्राथमिकता देण्याची चीनची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. अशी सर्व परिस्थिती असताना चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याची हिंमत केलीच कशी? वस्तुत: चीनचे हे कृत्य त्याच्या उक्ती व कृतीमधील विरोधाभास स्पष्ट करणारे आहे. एवढेच नव्हे, तर यातून चीनची विश्‍वासघाती मानसिकताच अधोरेखित होते.
भारताच्या सरहद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी ही नवीन बाब नाही. चीन भारताच्या हद्दीत घुसून दगडांवर ‘हा चीनचा भूभाग आहे’ असे लिहीत सुटला आहे, भारतीय गुराख्यांना मारहाण करून पळवून लावण्याचे उद्योग करीत आहे, एवढेच नव्हे, तर त्यांच्या निवासी क्षेत्रावर कब्जा करीत आहे. चीन भारताची इंच-इंच भूमी कशी बळकावत आहे याबाबत जम्मू-काश्मीर सरकारने केंद्र सरकारला नुकताच एक अहवाल पाठवून सावध केले आहे. सीमेवर मोठ्या प्रमाणात बंकर्स बांधण्याचे काम सुरू आहे. भारताच्या लडाख आणि उत्तराखंड भागात जमीन आणि हवाई सीमेचे वारंवार होणारे उल्लंघन वस्तुत: १९६२ मध्ये भारताच्या पाठीत खंजीर खुपसणारी चीनच्या विस्तारवादी मानसिकताच स्पष्टपणे दर्शविते. चीनला केवळ आमचा भूभाग हडपून स्वस्थ बसायचे नाही, तर दक्षिण चीन समुद्री सीमेसाठी तो व्हिएतनामशी, तर पूर्व चीन समुद्रातील काही बेटांबाबत तो जपानशी सातत्याने संघर्षाच्या पवित्र्यात आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी सन १९५० मध्येच चीनच्या साम्राज्यवादी मानसिकतेबाबत सावध करून इशारा दिला होता की, तिबेटमध्ये चीनचा हस्तक्षेप म्हणजे भारतातील हस्तक्षेप आहे, असे समजण्यात यावे. सरदार पटेल यांच्याही बर्‍याच आधी प्रखर राष्ट्रवादी योगी अरविंद घोष यांनी सावधानतेचा इशारा देताना म्हटले होते, ‘दक्षिण-पश्‍चिम आशिया आणि तिबेटवर पूर्णपणे वर्चस्व स्थापित करून तो भूभाग कायमचा हडप करण्याचा धोका चीनकडून उद्भवू शकतो आणि भारतीय सीमेपर्यंतचे सारे क्षेत्र बळकवण्यापर्यंत त्याची मजल जाऊ शकते.’
तिबेटवरील चीनचे आक्रमण आणि याबाबत पंतप्रधान पंडित नेहरूंनी घेतलेल्या तटस्थ भूमिकेबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी टिप्पणी करताना म्हटले होते, ‘जर भारताने तिबेटला मान्यता प्रदान केली असती, जशी त्याने १९४९ मध्ये चिनी गणराज्याला प्रदान केली होती, तर आज भारत-चीन वाद न होता तिबेट-चीन सीमावाद झाला असता.’ तिबेट आणि नेपाळला लागून असलेल्या सीमावर्ती भारतीय प्रदेशात चीनी सैनिकांची घुसखोरी सातत्याने सुरूच आहे. भारताच्या जवळजवळ ३८ हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीनचा अवैधरीत्या कब्जा आहे. याबरोबरच तो सीमावादाच्या आडून सीमावर्ती क्षेत्रातील सामरिक महत्त्वाच्या भागावर कब्जा करण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे. मात्र, एवढे होऊनही केंद्रातील सरकार प्रत्येक वेळी चीनच्या या कुरापतींबाबत मौन धारण करते. विडंबना ही आहे की १९६२ च्या युद्धापूर्वी जेव्हा भारतीय सीमेच्या आत घुसून चीनने काही भूभाग बळकावला होता, तेव्हाही पंडित नेहरूंच्या सरकारसाठी तो चिंतेचा विषय नव्हता. तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांच्या मते तर कब्जा करण्यात आलेल्या जमिनीवर गवताची काडीही उगवत नव्हती. वर्तमान केंद्र सरकारचे मौन त्याच ऐतिहासिक चुकीची तर पुनरावृत्ती करीत नाही ना?
हिंद महासागरातही चीनने आपले हातपाय पसरवले आहेत. हिंदी महासागरातील बेटावर वसलेल्या सेशेल्स या देशाने चीनला आपल्या येथे नाविक तळ उभारण्याची परवानगी दिली आहे. सोमालियन सागरी चाचांशी लढण्यासाठी तैनात आपल्या पाणबुड्यांना रसद सामुग्री आणि इंधनपुरवठ्यासाठी आपण हा तळ उभारल्याचे चीन सांगत आहे. पण तो निव्वळ देखावा आहे. भारताभोवतीचा फास आवळणे हाच चीनचा खरा हेतू आहे. भारत सेशेल्सला आपला सामरिक मित्र मानत आला आहे. सन २००५ मध्ये भारताने सेशेल्सला त्याच्या सागरी भागाची निगराणी करण्यासाठी आयएनएस तारामुगली नामक पाणबुडी भेट म्हणून दिली होती. वस्तुत: सेशेल्ससमवेतचे भारताते विशेष संरक्षण संबंध बघता चीन आणि अमेरिका, दोघेही सेशेल्सला आपल्या तंबूत ओढण्यासाठी उतावीळ झाले आहेत. सेशेल्सपासून ६०० किलोमीटर दूर दिएगोगार्सिया बेटावर आधीपासूनच अमेरिकेचा नाविक तळ आहे. सेशेल्सच्या एका भागातून आपल्या पी-३-सी निगराणी विमानांना उड्डाण करण्याची परवानगी अमेरिकेने याआधीच मिळविली आहे. सेशेल्स हा ११५ बेटांवर वसलेला देश आहे. पर्यटन व मासेमारी यावरच येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. येथे हॉटेल उद्योगाला भविष्यात अमाप संधी आहेत; आणि त्यामुळेच चीनचा यावर डोळा आहे.
हिंदी महासागरातील खनिजांचे उत्खनन करण्याचे अधिकार चीनने एवढ्यातच मिळविले आहेत. यावर होणार्‍या अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीला अर्थात साधनसामुग्रीला सुरक्षा प्रदान करण्यासाठीही चीनला प्रबळ नाविक तळ उभारण्याची आवश्यकता होती. आगामी दोन-तीन दशकांचा विचार करूनच चीन प्रत्येक पाऊल उचलत आहे. अर्थात भविष्याचा वेध घेऊनच चीन आपली व्यूहरचना आखत आहे, ही वस्तुस्थिती आहे. पाकिस्तानच्या ‘ग्वादर’ येथे तैनात चिनी क्षेपणास्त्रांची मारक क्षमता एवढी आहे की, मुंबईसारखे शहर त्याच्या टप्प्यात आहे. चिन्यांच्या व्यूहरचनेच्या तुलनेत भारताची निष्क्रियता चिंताजनक आहे.
चीनने भारतीय सीमेपर्यंत रस्ता व रेल्वेमार्गाचे जाळे विणून ठेवले आहे. पाक अधिकृत काश्मिरातील सुकार्दू आणि म्यानमारला लागून असलेल्या कुनमिंगसारख्या सुदूर भागापर्यंत पायाभूत सुविधांचा विकास करून चीन दक्षिण आशियावर आपली पकड मजबूत करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. १९६२ च्या युद्धात चीनने अक्साई चीनवर कब्जा केला होता. अक्साई चीन आणि ल्हासाच्या मध्ये संपर्क मार्ग विकसित करण्यासोबतच चीनने तिबेटच्या उंच व दुर्गम क्षेत्रातही रस्ते बांधले आहेत. भारताच्या सीमेला लागून असलेल्या आपल्या सैन्यापर्यंत आणि सामरिक महत्त्वाच्या तळापर्यंत चीनने सुव्यवस्थित आवागमन आणि वाहतूक व्यवस्था विकसित केली आहे. चीनच्या विस्तारवादी-साम्राज्यवादी मानसिकतेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे १९६२ च्या अपमानास्पद पराभवाला निमंत्रण देणेच होय.

(लेखक भाजपाचे राज्यसभा सदस्य आहेत.)
अनुवाद : अभिजित वर्तक
साभार - तरुण  भारत 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी