Saturday, June 11, 2011

दलित राजकारण आणि शरद पवार

महाराष्ट्रात कधी नव्हे एवढे महत्त्व आज दलित राजकारणाला आले आहे. दलित नेते रामदास आठवले यांनी भीमशक्ती शिवशक्तीच्या मागे उभी केली आहे. यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण करणा-यांच्या मक्तेदारीला मोठा हादरा बसला आहे. आणि स्वाभाविक गोचीही झालीय.

9 जून रोजी मुंबईत भीमशक्ती शिवशक्तीचा महामेळावा झाला. दुस-या दिवशी मुंबईतच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाचे निमित्त करून समता हक्क परिवर्तन परिषदेच्या नावाने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत गेल्याने राष्ट्रवादी पूर्णत: गडबडून गेल्याचे मेळाव्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या देहबोलीतून दिसून आले.

स्वार्थाच्या साठमारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत समाजात जातीभेदाचे विष आणखी जहरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेबांचे विचार समाजात दरी निर्माण करण्यासाठी आपल्या सोयीने सांगीतले जात आहे. बुद्धीभेद केला जातोय. रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपशी जवळीक साधून बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचे सांगण्याचा प्रयत्न होतोय. वस्तुस्थिती अशी आहे काय? डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रकाशात या विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

महापुरुषांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांचा कधीही तुकड्या-तुकड्यांत विचार करायचा नसतो. तसे केल्याने नुकसानच होण्याची अधिक शक्यता असते. महापुरुषांचे जीवनविचार समग्रतेने समजून घ्यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक होते. संपूर्ण समाज एकसंध व्हावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. स्पृश्यास्पृश किंवा दलित सवर्ण भेद मिटावा यासाठी बाबासाहेबांनी सतत प्रयत्न केला. त्यावेळच्या सवर्णांच्या हेकटपणामुळे आणि अविचारामुळे बाबासाहेबांनी याच मातीत जन्मलेल्या बुद्ध धर्माचा स्वीकार केला. दलित समाजात परिवर्तन येण्यासाठी विष्णू, शिव, राम, कृष्ण आदी देवतांना आता स्थान नको असे सांगितले. अंध रुढींच्या जोखडातून बाहेर काढण्याच्या दृष्टीनेही अनेक नियम सांगीतले. या कृतीमागे वर्षानुवर्षे गावकुसाबाहेर राहिलेल्या समाजाला सन्मान मिळवून देण्याचा बाबासाहेबांचा उद्देश होता, समाजातील दरी अधिक रूंद करणे नव्हे.
बाबासाहेब म्हणतात, '' ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बौद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. ''
या उद्गारातून बाबासाहेबांचे एकसंध समाजाबद्दलचे विचार समोर येतात. बाबासाहेब म्हणतात, '' ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही. माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या दुवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही. ''
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांचे वक्तव्य पाहा. दलितांनी शिव, गणेश, देवी, राम, कृष्ण यांची पूजा अर्चा करू नये, असे बाबासाहेबांनी म्हटल्याचा दाखला पवारांनी दिला. शिवसेनेशी अनेकदा जवलिक करण्याचा प्रयत्न केलेल्या पवार यांनी केवळ राजकारणासाठी समाजातील दरी वाढविण्याचा प्रयत्न करवा, हे दुर्दैवी आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर हा गाढला गेलेला वादही वाढविण्याचा प्रयत्न पवारांनी केला.
गेल्या 60 वर्षात कॉंग्रेसने दलितांच्या भौतिक उन्नत्तीसाठी काय केले ? या प्रश्नाचे उत्तर निराशाजनक आहे. अलीकडच्या 25/30 वर्षांत भाजप शिवसेनेसारख्या पक्षांना जातीयवादी ठरवून दलित समाजाचा केवळ स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यात आला नाही काय ?
हिंदुत्ववादी हे जातीयवादी आहेत, हे गृहितकृत्यही फोल ठरले आहे. आकडेवारी काढून पाहा... दलितांवर जेवढे अत्याचार झाले आहेत त्यामागे बहुतेक वेळा कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक असणारेच गावगुंड असल्याचे दिसून येते. जातीभेद पाळणारे बहुतेक रुढीवादी लोक कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक असणारे असतात, अशी कबुली अनेक दलित कार्यकर्ते खासखीत देतात. मुस्लिमांविषयी देशाचे काय धोरण असावे, याबद्दलचे डॉ. बाबासाहेबांची विचारसूत्रे काढून पाहा. कसाब-अफजल गुरूसारख्या प्रवृत्तींना पाठिशी घालणा-या प्रवृत्तींबद्दल बाबासाहेबांनी कधीच सावध करून ठेवल्याचे दिसेल.

बाबासाहेब म्हणतात, '' हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे. सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते. ''

बाबासाहेबांनी दलितांना सावध करून ठेवले आहे. बाबासाहेब म्हणतात, '' कॉंग्रेस जळते घर आहे, त्यात जाऊ नका. '' या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांच्या निर्णयाकडे पाहिले पाहिजे. हिंदुत्व विचाराच्या पक्षांना त्यांच्या पाकिस्तान आणि मुस्लिम लांगुलचालनविरोधी भूमिकेबद्दलच जातीयवादी संबोधण्याची फॅशन आहे. या संदर्भात आंबेडकरप्रेमींची अडचण असण्याचे काहीही कारण दिसत नाही. शिवसेना भाजपला भीमशक्तीसोबत यायला संकोच नसेल तर हे सामाजिक बदलाचे सुचिन्ह मानून स्वागत करावे की विरोध हे सर्वस्वी ६० वर्षे 'दलितच' राहिलेल्या समाजाला ठरवायचे आहे.

आपले मत

तुम्हाला काय वाटतं ? रामदास आठवले यांनी चूक केली आहे ? सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून बाहेर पडून पुन्हा त्यांच्या आश्रयाला जाणार्या पवारांनी आठवले यांना सल्ला देणे योग्य वाटते ? या विषयावरील तुमची मते पुढील चौकटीत अवश्य लिहा.

Wednesday, June 8, 2011

नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे

मूळ मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. काळ्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यासाठी सुरू झालेल्या स्वामी रामदेव यांच्या आंदोलनाला मूळ मुद्दयावरून दूर नेण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकार काळ्या पैशाच्या मुद्दयावर कचखाऊ भूमिका घेत आहे, त्यावरून काँग्रेस भोवतीचा संशय अधिक गडद होताना दिसत आहे. काळ्या पैशावरून या आधीच गांधी परिवाराकडे संशयाची सुई वळल्यामुळे आणि अण्णा- बाबा या मुद्दयावर अधिक आक्रमक झाल्याने काँग्रेस चवताळली आहे. यातून सुटण्याचा अन्य कोणताही मार्ग काँग्रेसपुढे शिल्लक नाही हे आता आणखीनच स्पष्ट झाले आहे.
काळ्या पैशावर चर्चा होत रहाणे काँग्रेसच्या सोयीचे नाही. त्यामुळे काँग्रेसने रामदेव बाबा, त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण, सुषमा स्वराज, आरएसएस यांच्यावर बेछूट आरोप करणे चालू ठेवले. त्यात चप्पल उगारल्याची घटनाही काँग्रेससाठी जणु वरदान ठरली. आणि याने उत्साहित झालेल्या दिग्विजय सिंग यांनी आचार्य बालकृष्णन यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अत्यंत शेलक्या शब्दांत त्यांचा उद्धार करणे सुरू केले. दरम्यान आचार्य बालकृष्ण प्रकट झाले आहेत. माझा जन्म भारतात झाला. माझे आई वडील नेपाळचे आहेत. परंतु माझे शिक्षण भारतात झाले आहे. मी भारतातच सेवा करतोय. मी मरेपर्यंत भारतातच राहीन, असे आचार्य बालकृष्ण यांनी सांगीतले आहे. आता काँग्रेसने हे प्रकरण ताणले तर काँग्रेसच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सांस्कृतिक दृष्टया आणि आध्यात्मिक दृष्टया भारत-नेपाळ एकच आहेत. देशांच्या सीमा ध्यानात घेऊन बोलायाचे तर आज नेपळमधे ४३ लाखाहून अधिक भारतीय आहेत आणि भारतात ७० लाखापेक्षा अधिक नेपाळी भारतीय नागरिक आहेत. तिबेट गिलंकृत केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून चीन नेपाळमध्ये भारतविरोधी विष कालवत आहे, अशा वेळी क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी राजकारणी नेत्यांनी नेपाली नगरिकत्वाचा मुद्दा काढून नेपळला भारतापासून दूर लोटण्याचे पाप केले आहे. बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरीविरुद्ध मात्र गठ्ठा मतांसाठी हे राजकारणी जनतेची दिशाभूल करीत असतात हेही ध्यानात घेणे आवश्यक आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या सर्वेसर्वा यांच्या नागरिकत्वासंबंधीची तथ्ये अधिक गंभीर आहेत. नागरिकत्वाच्या मुद्दयावर आचार्य बालकृष्ण यांची बाजू सोनिया गांधी यांच्यापेक्षा उजवी आहे. कारण इंग्रजांमुळे नेपाळ प्रांताला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळालेला असला तरी नेपाळ सांस्कृतिकदृष्ट्या भारताला अतिशय जवळचा आहे. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान असताना १९५३ साली नेपाळने भारतात विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली होती, हे उल्लेखनीय. भारतातून नेपाळात आणि नेपाळातून भारतात यायला जायला पारपत्र लागत नाही ते यामुळेच. पशुपतीनाथासारखी तीर्थक्षेत्रे भारतीयांसाठी श्रद्धेय आहेत. इतकेच नाही तर पशुपतीनाथाचे पुजारी हे परंपरेने भारतीय आहेत. अशी सांस्कृतिक नाळ असल्यामुळे बालकृष्ण नेपाळी वंशाचे असल्याचा मुद्दा तसा भारतीयांच्या दृष्टीने गौण आहे. घटनेतल्या तरतुदीनुसारही आचार्य बालकृष्ण हे भारताचे नागरिक ठरतात. परंतु सोनिया गांधी यांच्याबाबतीत अशी स्थिती आहे काय.
इटलीचे राजदूत यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्रातून 27 एप्रिल 1983 रोजी लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी केलेली फसवणूक उघड केली आहे. अ‍ँटोनिया नाव बेमालूमपणे बदलून सोनिया नाव कसे लावले गेले ते या पत्रातून उघडे पडले आहे. पाहा... http://www.janataparty.org/annexures/ann05p32.html
सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढविताना जी कागदपत्रे सादर केली आहेत, ती खोटी ठरली आहेत. त्यांनी शिक्षणाबद्दलची दिलेली माहितीही खोटी ठरली आहे. अर्थातच या गोष्टींची भरपूर चर्चा झाली आहे. याचे ठोस पुरावेही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. स्वीस बँकेशी आणि रशियन गुप्तचर संस्थेशी असलेले संबंध, पोप आणि व्हॅटिकनशी असलेले सोनियांचे संबंध आणि त्यांचा नागरिकत्वाचा मुद्दा या साऱ्याच गोष्टी काँग्रेसला अडचणीच्या ठरू शकतात. परंतु काँग्रेसला अडचणीच्या ठरतील अशा मुद्दयांवर खुबीने बगल देण्याची कला अवगत आहे. त्यामुळे या मुद्दयावर काँग्रेस कायम मूग गिळून असते. आता दिग्विजय सिंग यांनी आचार्य बालकृष्ण यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा काढला आहे की जो काँग्रेसने अधिक ताणला तर काँग्रेसच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेला येणे, ही गोष्ट काँग्रेसला फायद्याची नाही. त्यामुळे आचार्य बालकृष्ण यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा काँग्रेस अधिक ताणणार नाही. त्याऐवजी रामदेव बाबा यांच्यामागे अनेक तपासण्यांचा ससेमिरा लावून हैराण करेल याची शक्यता अधिक आहे.


स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी















Sunday, June 5, 2011

स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी



काळा पैसा भारतात आणण्यातला सर्वात मोठा अडसर सोनिया गांधी यांचा आहे, हे काही आता लपून राहिलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह आणि निपक्षपाती म्हणून मान्यता असलेल्या दोन स्त्रोतांनुसार सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचा स्वीस बॅंकेत प्रचंड पैसा आहे. सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर केले आहे. स्वीत्झर्लंडमधील सर्वाधिक खपाचे आणि लोकप्रिय असलेल्या "Schweizer Illustrierte या नियतकालिकेने 11 नोव्हेंबर 1991च्या अंकात याचे रहस्योद्‌घाटन केले होते. स्व. राजीव गांधी यांच्या गुप्त खात्यात 2.2 बिलियन डॉलर असल्याचे त्यात म्हटले आहे.

दुसरी विश्वासार्ह संस्था आहे केजीबी. ही रशियाची गुप्तचर संस्था आहे. केजीबीच्या कागदपत्रांवर आधारित संशोधन पुस्तिकेत रशियन पत्रकार युवेजिना अल्बटस्‌ यांनी म्हटले आहे की, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते (1985) तेव्हा त्यांनी गांधी कुटुंबावर आर्थिक कृपा केल्याबद्दल केजीबीकडे कृतज्ञता व्यक्त केली होती.

विख्यात स्तंभलेखक ए.जी. नूरानी यांनी पहिल्यांदा 1988 मध्ये ही बाब समोर आणली होती. नंतर 2001 मध्ये जनता पार्टीच्या संकेतस्थळावर सुब्रमण्यम्‌ स्वामी यांनी या संदर्भातील पुरावे प्रसिद्ध केले. न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये यावर 2009 मध्ये विस्तृतपणे छापून आले आहे. इंडिया टुडे या भारतातील प्रसिद्ध नियतकालिकेत राम जेठमलानी यांनी यावर विस्तृतपणे लिहिले आहे. आजवर भारतात आणि भारताबाहेर कुठेही गांधी कुटुंबाने लेखक, प्रकाशक यांना कोर्टात खेचले नाही किंवा बदनामीचा खटला दाखल केला नाही.

(मोरारजी देसाई यांनी वयाच्या 87व्या वर्षी 50 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा अमेरिकेत दाखल केला होता. ते सीआयए या अमेरिकी गुप्तचर खात्याचे एजंट असल्याचे सेमर हेर्ष या लेखकाने आपल्या पुस्तकात लिहिले होते. आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यामुळे देशाची आणि मोरारजींची अब्रू वाचली.)

2008 साली सोनिया गांधी या अमेरिका भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी द न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकेतील प्रतिष्ठित दैनिकात एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. अनिवासी भारतीयांनी दिलेल्या त्या जाहिरातीत सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचे स्वीस बॅंकेत खाते असल्याचे नमूद केले होते. यामुळे व्यथित होऊन परदेशस्थ कॉंग्रेसप्रेमींनी 100 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला, परंतु नंतर काही दिवसांनी खटला मागे घेण्यात आला. अशा स्थितीत कांग्रेसचा कुणी नेता सोनिया गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे शक्यच नाही. कांग्रेसचे अस्तित्वच धोक्यात येईल अशी भीती कांग्रेसच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. अन्य पक्षीय नेत्यांचा काहीच काळा पैसा नाही असे कोणी म्हणणार नाही, परंतु अन्य पक्षांनी उघडपणे काळ्या पैशाला राष्ट्रिय संपत्ती घोषित करायला पाठिंबा दर्शविला आहे.

4/5 जूनच्या मध्यरात्री रामलीला मैदानावर केंद्र सरकारने पोलीस बळाचा वापर केला. त्यामुळे स्वामी रामदेव यांनी सुरू केलेले काळा पैसाविरोधी आंदोलन चिघळले आहे. रामदेव बाबा यांनी आंदोलन चालूच राहील अशी घोषणा ऋषीकेष येथून केली आहे. या आंदोलनाला आणीबाणी विरोधी आंदोलनासारखे रूप येईल की आंदोलन विरून जाईल, या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे.

एक लाख 80 हजार कोटी रुपयांच्या टू जी भ्रष्टाचाराविरोधात एका अक्षरानेही लेखणी न झिजवणारे पत्रकार रामलीला मैदानावर आंदोलनाच्या तयारीसाठी 14 कोटी खर्चले म्हणून गळा काढताना दिसले. रामदेवबाबा यांच्यामागे आरएसएस आहे. ते महाठग आहेत. अशा आरोपांची मालिकाच कॉंग्रेसचे महासचिव आणि लादेनचा उल्लेख 'ओसामाजी' असे करणाऱ्या दिग्विजय सिंग यांनी केल्याचेही देशाने पाहिले. रामदेव बाबांच्या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबद्दल अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आणि पोलीस कारवाईनंतर अण्णा हे बाबांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसले. साध्वी ऋतंभरा यांच्या रामलीला मैदानावरील उपस्थितीला आक्षेप घेण्यात आला. सर्व पंथ संप्रादायाचे धार्मिक नेते रामदेव बाबांच्या समर्थनार्थ रामलीला मैदानावर आले. शाहरूख, सलमानसारखे नट उत्स्फूर्तपणे बाबांच्या विरोधात समोर आल्याचेही दिसले. कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मौन आणि शेवटी रामदेव बाबा यांनी त्यांच्यावर केलेला आरोप असा घटनाक्रम समोर आला.

स्वीस बँक आणि अन्य ठिकाणी भारतीय नेत्यांनी प्रचंड काळा पैसा दडवला आहे. त्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी यासाठी स्वामी रामदेव यांनी देशात सुमारे 1 लाख किलोमीटरचा प्रवास केला. गेल्या दोन वर्षात जागतिक स्तरावर निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती आणि स्वीस बँकेच्या नव्या भूमिकेमुळे भारतीयांचा काळा पैसा भारताला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा मोक्याच्या वेळी रामदेव बाबा यांनी आंदोलन हाती घेतल्याने लोकांच्या मनात एक आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे साधारण जनमानस रामदेव बाबा यांच्या मागे आहे. अशा वेळी आश्चर्यकारकपणे माध्यमांत प्रभावी असणारा एक गट रामदेव बाबा यांनी फक्त योगच शिकवावे, त्यांनी राजकारणात उतरू नये असा सूर लावताना दिसतो आहे. शेवटी सोनिया गांधी यांच्यावर बाबा यांनी आरोप केल्याने 'पहा बाबांच्या मागे संघ परिवार आहे' हे आतातरी सिद्ध झाले की नाही असाही सूर उमटत आहे.



गेल्या दोन तीन वर्षातील घटना पाहा. सुरूवातीला 2 जी स्पेक्ट्रममध्ये घोटाळा नाहीच, अशी भूमिका कांग्रेसने घेतली. सर्वोच्च न्यायालयाने फटकारून हस्तक्षेप केल्यानंतर मग कुठे कारवाई होताना दिसते. राष्ट्रकुल घोटाळ्याचेही असेच झाले. आता काळ्या पैशाचा मुद्दयावर सरकारने रामदेव बाबांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. समिती वगैरे नेमून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. बाबा बधले नाहीत तेव्हा बलप्रयोग करण्याशिवाय कांग्रेसपुढे पर्यायच राहिला नाही. कपिल सिब्बल किंवा दिग्विजय सिंग हे प्यादे आहेत, याची रामदेव बाबांना पूर्ण कल्पना आहे. सोनिया गांधी यांचे नाव येते तेव्हा भले भले पत्रकारही मौन धारण करतात. भारताचे माजी गुप्तचर प्रमुख अजित दोवल यांच्या नेतृत्त्वाखालील टास्क फोर्सने काळ्या पैशावर प्रकाशित केलेल्या शोध अहवालात संशयाची सुई सोनिया गांधी यांच्याकडे जाताना दिसते. त्या अहवालाला रामदेव बाबांच्या ताज्या आरोपामुळे बळ मिळणार आहे. आता विषय सोनिया गांधींपर्यंत आल्यानंतर ते येथेच थांबेल, अशीच अधिक शक्यता आहे. रामदेव बाबांसारख्या केवळ 45 वर्षीय योग्याला राजकारणाची ही दलदल कितपत झेपेल, हे काळच ठरवेल. त्यासाठी काही काळ प्रतिक्षा मात्र करावी लागणार आहे.



राष्ट्रपुनरुत्थानाच्या युद्धात रामदेव बाबा विजयी योद्धा संन्याशी म्हणून आर्य चाणक्यासारखे उदय पावतील की हुतात्म्यांच्या मालिकेतील एक तेजस्वी योगी म्हणून इतिहासाच्या पुस्तकात राहतील हे आजच्या घडीला सांगणे खूप अवघड आहे. जनता जनार्धनाचा कल काय राहील यावरच हे अवलंबून असेल कारण लोकशाहीमध्ये जनतेच्या लायकीनुसारच त्यांना राज्यकर्ते मिळतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. जनतेचे मन संस्कारित करण्याचे ऐतिहासिक कार्य केल्यासाठी मात्र ते सदैव लोकांच्या स्मरणात राहतील, हे निश्चित.



आपले मत

तुम्हाला काय वाटते... काळा पैसा देशात आणण्यात रामदेव बाबांना यश येईल ? आन्दोलन विरून जाईल की ...? तुमचे मत अवश्य मांडा.

Sunday, May 22, 2011

तरुण भारतकडून निरोप




दै. तरुण भारतमध्ये ७-८ वर्षे पत्रकारिता केल्यानंतर आता मी भास्कर ग्रुपच्या ‘दिव्य मराठी’त जात आहे. त्यानिमित्ताने रविवार दि. २२ मे २०११ रोजी मला दै. तरुण भारतने समारंभपूर्वक निरोप दिला. माजी पेट्रोलियम मंत्री आदरणीय रामभाऊ नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Sunday, April 17, 2011

भगवान महावीरांचे विचार

जीवनातली सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती स्वत:ची ओळख करून न घेणे ही
होय. आत्मपरिचय करून घेऊनच ती दुरुस्त करता येते.

संयम आणि शांती म्हणजेच अहिंसा होय.

प्रत्येक आत्मा हा स्वतंत्र आहे; कोणीही कोणावर अवलंबून नाही.

देवाचे वेगळे असे अस्तित्वच नाही. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास
प्रत्येकजण देवत्व प्राप्त करू शकतो.

प्रत्येक जीव हा मूळत: सर्वज्ञ आणि आनंदमय आहे. आनंद हा बाहेरून येत नसतो.

जीवमात्रांप्रती मनात करुणा असू द्या. घृणा आणि द्वेषाचा मार्ग हा विनाशाकडे जातो.

प्रत्येकाप्रती आदरभाव याचाच अर्थ आहे अहिंसा.

स्वत:शीच झगडा करा, बाहेरील शत्रूंशी कशाला? जो स्वत:वर विजय मिळवतो
त्यालाच आनंदप्राप्ती होते.

मनुष्य हा जळणार्‍या जंगलाने वेढलेल्या झाडावर बसला आहे. सर्व जीव-जंतु
मृत्युमुखी पडताना तो डोळ्यांनी पहातोय, पण थोड्याच वेळात आपलीही तीच गत
होणार आहे, हे त्याला उमजत नाहीय. हा मनुष्याचा मूर्खपणा नाही काय?

Monday, March 21, 2011

"तरुण भारत'चा दृष्टिकोन सर्वव्यापी : शिंदे







सोलापूर (खास प्रतिनिधी) - वृत्तपत्रांनी नि:पक्षपातीपणे टीका-टिप्पणी केलीच पाहिजे, तो वृत्तपत्रांचा धर्मच आहे. काही वृत्तपत्रे पक्षीय दृष्टिकोन ठेवून काम करतात पण, दैनिक तरुण भारतचा दृष्टिकोन मात्र सर्वव्यापी आणि नि:पक्षपाती असल्याचे गौरवोद्‌गार केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
"तरुण भारत'च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या स्नेहमेळाव्यानिमित्त रविवारी सायंकाळी तरुण भारतच्या प्रांगणात आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तरुण भारतचे अध्यक्ष विवेक घळसासी यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी तरुण भारतवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सुशीलकुमार शिंदे आणि तरुण भारतच्या फोर कलर छपाई यंत्राचे उद्‌घाटन, याविषयी बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले असेल. पण, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. तरुण भारतच्या याच भूमिकेतून त्यांचा निपक्षपातीपणा स्पष्ट होतो, असे सांगून शिंदे पुढे म्हणाले की, रा. स्व. संघाचे कट्टर विचारवंत असलेले तरुण भारतचे ज्येष्ठ स्तंभकार मा. गो. वैद्य यांच्याशी 1976 पासून आपला परिचय आहे. मा. गो. वैद्य यांच्या तत्त्ववादी व परखड लेखनाची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
वैचारिक मतभेद असले तरी समर्थ भारतासाठी आपण साऱ्यांनी मिळून कार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. विवेक घळसासी यांच्यासारख्या विचारवंताचे नेतृत्व तरुण भारतला लाभले असल्याबद्दल शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. आज वृत्तपत्र हा व्यवसाय झाला आहे. असे असताना तत्वे अर्थात धर्म सांभाळत व्यवसाय करणे हे कौशल्याचे म्हणावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर संपादक नारायण कारंजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर आरिफ शेख, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक प्र. रा. बावस्कर, रा. स्व. संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे, पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, मनपा स्थायी समिती सभापती शिवलिंग कांबळे, आ. दिलीप माने, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर महेश कोठे, मनपा सभागृह नेते देवेंद्र भंडारे, परिवहन सभापती बसवराज म्हेत्रे, माजी महापौर यू. एन. बेरिया, शहर कॉंग्रेस अध्यक्ष धर्मा भोसले या मान्यवरांचा सत्कार विवेक घळसासी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी तरुण भारतचे संगणकीय सजावट करणारे महेश दिड्डी व अवधूत कुलकर्णी यांचाही खा. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरुण भारतचे उपसंपादक सिद्धाराम पाटील यांनी कले.
वि. दा. सावरकरांचे
शिंदे यांनी केले
असेही स्मरण

"हेडलबर्ग फोर कलर प्रिंटींग मशिन'ची पूजा करताना मी पादत्राणे काढून ठेवली होती. कारण कोणतीही पूजा करताना पादत्राणे काढण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. मात्र यंत्राचे बटन दाबताना मी आवर्जून पादत्राणे घातली. कारण, हा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा विज्ञानानिष्ठ दृष्टिकोन आहे, असे सांगत केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विज्ञाननिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ वि. दा. सावरकरांचे स्मरण केले. आपल्याला भारतीय संस्कृतीचा सन्मान करीतच विज्ञानाची कास धरून पुढे जायचे आहे, असेही ते म्हणाले.

Sunday, March 20, 2011

मा. गो. वैद्य यांचा लेख

श्री अडवाणी यांचे चुकीचे मूल्यांकन

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी परत एकदा, ६ डिसेंबर १९९२ ला जो बाबरी ढाचा पाडण्यात आला, तो त्यांच्या जीवनातील सर्वाधिक क्लेशदायक दिवस होता, असे जाहीर केले आणि वर असेही म्हटले की, त्यामुळे, भाजपाच्या विश्‍वासार्हतेला तडा बसला. यावेळी, हे वक्तव्य करण्याचे कारण काय होते, हे तेच जाणोत. सर्वोच्च न्यायालयाने, या प्रकरणात, त्यांना नोटीस पाठविल्यामुळे, त्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी असे निवेदन केले असेल, तर धीरोदात्त व गंभीर व्यक्तित्व ही जी त्यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा आहे, तिला त्यांनी छेद दिला, असेच म्हणावे लागेल. हे खरे आहे की, ६ डिसेंबर १९९२ ला, बाबरी ढाचा पाडण्याची कसलीही योजना नव्हती. काही लोक, कारस्थानाचा (कॉन्स्पिरसी) आरोप करतात. पण कारस्थान करण्याकरिता लाखावर लोकांना एकत्र करावे लागत नाही. त्यासाठी जाहीर आवाहनही करावे लागत नाही. कारस्थान गुप्तपणे केले जात असते आणि त्या योजनेत ४-५ जण पुरेसे असतात. तेव्हा ६ डिसेंबरला, तो ढाचा पाडण्याचे कारस्थान होते, हा आरोप इतका ठिसूळ आहे की, त्याची गांभीर्याने दखल घेण्याचीही आवश्यकता नाही. तात्पर्य हे की, त्या दिवशी ढाचा पाडण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची कोणतीही गुप्त वा प्रकट योजना नव्हती, हे शंभर टक्के सत्य आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजे ७ डिसेंबर १९९२ ला, तत्कालीन सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांनी जे वक्तव्य प्रकाशित केले, त्यातही ही बाब स्पष्ट करण्यात आली होती.शोकाचे कारण काय?मात्र, तो ढाचा पाडला गेला, याचे दु:ख, एक अडवाणी वगळता, कुणाला झाल्याचे दिसले नाही; जाणवलेही नाही. ज्यांचा राजनीतीशी अजीबात संबंध नाही, अशा लोकांनीही, या घटनेचा आनंद प्रकट केला. अनेक कॉंग्रेसजनांनीही आपापल्या परीने, राजनीतीच्या मर्यादा सांभाळीत, आपला आनंद प्रकट केला होता. आणि खरेच, बाबरी ढाचा पडल्याचे किंवा पाडल्याचे दु:ख कशाला करायचे? वस्तुत:, सांप्रदायिक गुंडगिरीचे एक चिन्ह त्या दिवशी मिटले होते; त्याचा आनंद मानायचा की दु:ख? श्री. अडवाणी यांनी १९९० मध्ये सोमनाथवरून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली होती. कशासाठी? अयोध्येला जाण्यासाठीच ती का काढली? श्रीनगरला किंवा कन्याकुमारीला जाण्यासाठी का काढली नाही? त्या यात्रेचा एवढा गाजावाजा तरी का करण्यात आला? कारण, शतकांपासून हिंदू-मनाला डाचत असणारे एक शल्य त्यांना नाहीसे करावयाचे होते. अयोध्या ही प्रभू रामचंद्राची जन्मभूमी आहे. तेथे त्यांचे एक मंदिर होते. पवित्र मंदिर. राजवाडा नव्हे. बाबराच्या आज्ञेने ते पाडण्यात आले; आणि त्या ठिकाणी एक मशीद उभी करण्यात आली. हा इतिहास आहे. अडवाणीजी, हा इतिहास खरा आहे की खोटा? मी, स्वत:, तो ढाचा बघितलेला होता. त्याच्या खांबांवर मूर्ती कोरलेल्या होत्या. कोणत्या मशिदीच्या खांबांवर मूर्ती खोदलेल्या असतात? बरे, बाबराचे कृत्य अपवादात्मकही नव्हते. पश्‍चिम आशियातून किंवा मध्य आशियातून आलेल्या सर्वच इस्लामी आक्रमकांची ही नीती राहिलेली आहे की, इस्लामहून अन्य धर्मावलंबियांची पवित्रस्थळे भग्न करावयाची. पवित्र कुराणात मूर्तिपूजेचा निषेध केला आहे. त्या शिकवणुकीला धरूनच, इस्लामी आक्रमक आणि राज्यकर्ते वागत आलेले आहेत. बाबराच्या पूर्वी गुजरातमधील सोमनाथचे मंदिर, गजनीच्या महमदाने पाडले होते की नाही? महमदाने ते का पाडले? पैशासाठी पाडले म्हणावे तर हिंदू लोक त्याला पाहिजे तेवढा पैसा द्यावयाला तयार होते. पण तो प्रस्ताव त्याने स्वीकारला नाही. त्याला मूर्तिविक्रेता बनायचे नव्हते. मूर्तिभंजक व्हावयाचे होते. कारण, पवित्र कुराणाच्या शब्दावर त्याची श्रद्धा होती, विश्‍वास होता. सोमनाथचे कब्रस्थान म्हणजे महमदाच्या सांप्रदायिक गुंडगिरीचे एक प्रतीक होते. म्हणून तर सरदार वल्लभभाई पटेलांनी ते हटविले व तेथे आजचे भव्य सुंदर मंदिर उभे केले. सोमनाथचा हा स्फूर्तिदायक प्रसंग अडवाणींच्या मनोविश्‍वात नक्कीच ठसलेला असला पाहिजे. एरवी, आपली रथयात्रा, सोमनाथपासून आयोजित करण्याचे कारण काय? सोमनाथ, किंवा अयोध्या हे गजनी किंवा बाबराचा सेनापती मीरबाकी, यांच्या वैयक्तिक वेडेपणाची चिन्हे नव्हती. ती एका धर्मवेडाने निर्मिलेल्या असभ्य, असंस्कृत, असहिष्णू, अहंकाराची प्रतीके होती. हे केवळ हिंदुस्थानातच घडले असे नाही. स्पेनमध्येही घडले होते. तेथे साडेतीनशे वर्षे मुसलमानांचे राज्य होते. त्या काळात, तेथील सर्व कॅथेड्रलांचे रूपांतर मशिदीत झाले होते. गजनीचा महमद आणि बाबर यांचाच कित्ता औरंगजेबाने गिरविला, आणि काशी व मथुरा येथील मंदिरांचा विध्वंस करून मशिदी उभ्या केल्या. त्या मशिदी आक्रमणाची चिन्हे आहेत. ती कायम राहावी, असे म्हणता येईल काय? खरे म्हणजे, कारणे कोणतीही असोत, त्या सांप्रदायिक गुंडगिरीचे अयोध्येतील चिन्ह मिटले गेले, याचा आनंद मानायचा की दु:खाने छाती पिटायची?परिणामांसाठी तयारी हवीहां, असे म्हणता येईल की, विद्यमान कायद्याचे उल्लंघन झाले. अडवाणी किंवा त्यावेळी उपस्थित असलेल्या कोणत्याही मान्यवराने ढाचा पाडण्यासाठी चिथावणी दिली नव्हती. पण सरकार म्हणते की, अडवाणी प्रभृती मंडळींच्या चिथावणीमुळे कायद्याचे उल्लंघन झाले, तर त्याची शिक्षा भोगायची तयारी असली पाहिजे. गांधीजीही कायदा मोडीत असत. त्यांच्या अभियानाचे नावच उर्ळींळश्र ऊळीेलशवळशपलश (म्हणजे शांततेच्या मार्गाने कायद्याचे उल्लंघन) असे होते. त्याबद्दल ते शिक्षा भोगीत. अडवाणी प्रभृतींनी, तो ढाचा पाडण्यासाठी लोकांना चिथावले नाही, हे खरे आहे. म्हणून खालच्या न्यायालयाने त्या आरोपातून त्यांची सुटका केली. सर्वोच्च न्यायालय काय ठरविते, ते दिसेलच. आपण कल्पना करू की, ते या सर्वांना दोषी ठरवील आणि शिक्षाही सुनावेल, तर ती शिक्षा भोगायला तयारी असली पाहिजे. विचार हा असला पाहिजे की, जे झाले ते चांगले झाले की, वाईट झाले? राममंदिर उभारण्याच्या उद्दिष्टाला ते पूरक ठरले की घातक ठरले? आम्ही असे समजतो आणि सारा देशही हेच समजतो की, राममंदिराला विध्वंसून मशीद बांधण्यात आली होती. जेव्हा ढाचा पाडला गेला, तेव्हा तेथे मशीदही नव्हती. एक ढाचा तेवढा होता. १९३४ पासून तेथे नमाज पढला गेला नव्हता. १९४९ पासून त्या ढाचात रामललाची मूर्ती विराजमान होती. त्या मूर्तीची नियमित पूजा-अर्चा होत होती. आमची अशी समजूत की, अडवाणींना या जागेवरच राममंदिराची उभारणी अभिप्रेत होती. ही समजूत चूक असेल, तर तसे अडवाणींनी सांगावे. आणि त्याच बरोबर राममंदिर कुठे उभारायचे त्यांच्या कल्पनेत होते, तेही स्पष्ट करावे.प्रश्‍नाचे उत्तर हवेअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय आला आहे की, तेथे मंदिर होते. या न्यायालयाने दिलेला संपूर्ण निकाल समाधानकारक आहे, असे नाही. पण जेथे रामलला सध्या विराजमान आहे, तेथे मंदिर होते, हे तिन्ही न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितले आहे. या तिघांमध्ये एक न्यायमूर्ती इस्लामधर्मीयही होते. त्यांनीही मशिदीच्या रचनेत, ‘भग्न’ मंदिराचे अवशेष वापरले गेले, हे मान्य केले. ते ‘भग्न’ मंदिर कोणते तरी पूर्वीचे, अगोदरच भग्न झालेले होते, एवढेच परन्तुक त्यांनी जोडले आहे. या न्यायालयाचा हा जो निकाल लागला, त्याला कारणीभूत, या ढाचाच्या खाली जे उत्खनन करण्यात आले, त्या उत्खननातून मिळालेली प्रमाणे आहेत. तो ढाचा उभा असता, तर उत्खनन करता आले असते काय? आणि त्यातून प्रमाणे हाती तरी आली असती काय? ढाचा पाडण्याचा, तुमच्या अभियानाचा उद्देश असो की नसो, तो पडला म्हणून तर उत्खनन होऊ शकले आणि मंदिराच्या पूर्व-अस्तित्वाची प्रमाणे हाती आली. मग त्या ढाचा पडल्याच्या किंवा पाडल्याच्या कृत्याचे, अभिनंदन करायचे की, त्यासाठी जाहीर अश्रुपात करावयाचा? विश्‍वासार्हता वाढलीअडवाणी म्हणतात की, ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेमुळे, भाजपाच्या विश्‍वासार्हतेला तडा गेला आहे. ही खोटी गोष्ट आहे. अडवाणींचे हे मूल्यांकन चूक आहे. या कालखंडात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला जे यश मिळाले, ते याचा पुरावा आहे. १९८९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला ८५ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी अडवाणींची रथयात्रा निघाली नव्हती. ती १९९० मध्ये निघाली. १९९१ च्या निवडणुकीत पक्षाच्या जिंकलेल्या जागांची संख्या १२० झाली. म्हणजे ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. १९९२ च्या डिसेंबरात ढाचा पडला. त्यानंतर तीन-सव्वातीन वर्षांनी म्हणजे १९९६ मध्ये भाजपाने १६१ जागा जिंकल्या. पहिल्यांदा आपल्या राजकीय वाटचालीत भाजपा, लोकसभेत सर्वात मोठा पक्ष बनला. हे विश्‍वसनीयता वाढल्याचे की कमी झाल्याचे चिन्ह समजावे? भाजपाने विनाकारण सत्ता ग्रहण करण्याची घाई केली; आणि केवळ तेरा दिवसांमध्ये भाजपाचे सरकार कोसळले. तेव्हाच, विरोधी पक्षात बसण्याचे त्याने ठरविले असते, तरीही कुणाचेही सरकार टिकले नसते आणि पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती तरी भाजपालाच सत्ताग्रहणाची संधी मिळाली असती. अटलबिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेगौडा आणि गुजराल यांची अल्पकालीन सरकारे सत्तेवर आली. ती टिकणारी नव्हती आणि टिकलीही नाहीत. १९९८ साली परत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. त्याला १८० जागा मिळाल्या. या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या जाहीरनाम्यात, अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण करण्याचे आश्‍वासन होते, म्हणून अशी वृद्धी झाली. लगेच एक वर्षाने पुन: निवडणूक आली. कारण, एका क्षुल्लक मुद्यावरून जयललिता यांच्या अद्रमुकने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढला आणि एका मताने सरकार पडले. १९९८ साली, सत्ता ग्रहण करण्यासाठी, जो कार्यक्रम स्वीकारला, त्यात भाजपाच्या घोषणापत्रातील राममंदिराचा तसेच पक्षाचे अन्य वैशिष्ट्यपूर्ण जे मुद्दे होते, त्यांना तिलांजली देण्यात आली. तथापि, रामरथयात्रा काढणारे अडवाणी मंत्रिमंडळात आहेत, गृहखात्यासारखे महत्त्वाचे खाते, त्यांच्याकडे आहे, तेव्हा ते यातून नक्कीच काही तरी मार्ग काढतील, अशी लोकांची समजूत होती. १९९९ साली पुन: निवडणूक आली आणि त्या निवडणुकीसाठी पक्षाचा वैशिष्ट्यपूर्ण जाहीरनामा बाजूला ठेवण्यात आला. सामूहिक जाहीरनामा स्वीकारण्यात आला आणि त्यात राममंदिराचा मुद्दा अधिकृत रीत्या वगळण्यात आला. त्यामुळे भाजपाच्या लोकसभेतील संख्येत खूप वाढ झाली, असे दिसले नाही. फक्त दोनने संख्या वाढली. हे सरकार पाच वर्षे टिकले, पण राममंदिर निर्माण करण्यासाठी एक पाऊलही ते पुढे सरकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने अविवादित जमिनीसंबंधी जे मतप्रदर्शन केले होते, त्याचे अध्ययन करून, अविवादित भूमी तिच्या पूर्वमालकांना दिली गेली असती, तरी लोकांचे समाधान झाले असते. यासाठी संसदेच्या ठरावाची आवश्यकता नव्हती. केवळ सरकारचा आदेश पुरेसा ठरला असता. पण तेवढेही सरकारने केले नाही. लोक हेच समजले आणि अजूनही असे समजणार्‍यांची प्रचंड संख्या आहे की, केवळ सत्तेसाठी भाजपाने राममंदिराचा मुद्दा अंगीकारला होता. त्यासंबंधी त्याला मनापासून आस्था नाही.विश्‍वसनीयतेला तडाया काळात तर अडवाणीजी उपप्रधानमंत्री झाले होते. पण त्यांनीही काही हालचाल केली नाही. आपल्या तथाकथित सेक्युलर सहयोगी पक्षांच्या सोबतीने त्यांनाही त्या छद्म सेक्युलॅरिझम्‌चे आकर्षण कदाचित वाटले असेल. यानंतरच्या म्हणजे २००४ च्या निवडणुकीच्या काळात ‘चमकणारा भारता’चा (इंडिया शायनिंग) उदोउदो झाला. मदरशांमध्ये इतक्या संख्येत मुसलमानांना नोकर्‍या दिल्या जातील, अशी घोषणा झाली. राममंदिर, समान नागरी कायदा, हे पक्षाचे खास मुद्दे बाजूला पडले. परिणामी, भाजपाला आस्थेने व अग्रक्रमाने मतदान करणारा वर्ग तटस्थ बनला. त्याचा परिणाम २००४ च्या निवडणुकीत दिसून आला. कोणत्याही सर्वेक्षणाने भाजपा पुन: नंबर दोनवर फेकला जाईल असे भाकीत केले नव्हते. सर्वांचे हेच भाकीत होते की, भाजपाच पुन: सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. पण भाजपा आपल्या पूर्वक्रमांकावर फेकला गेला. या ‘सेक्युलर’ बनण्याच्या नादात, त्याने आपला परंपरागत मतदार गमाविला आणि नवे काय मिळाले? बहुधा काहीच नाही. एक मार्मिक सुभाषित आहे की,यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं हि निषेवतेध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च॥

अर्थ- जो स्थिर गोष्टींचा त्याग करून चंचल गोष्टींच्या मागे पळतो, त्याच्या स्थिर गोष्टी नष्ट होतात आणि चंचल तर हाती लागतच नसते. २००४ मध्ये भाजपाची अशीच स्थिती झाली. २००४ च्या निवडणुकीनंतर, त्या वर्षाच्या मे महिन्यात मी उत्तरप्रदेशात होतो. दोनदा भाजपाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या खासदाराला मी प्रश्‍न केला की, १९९९ साली, कल्याणसिंग भाजपाच्या विरोधात गेलेले असतानाही व त्यांच्या पक्षाने भाजपा-उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले असतानाही, भाजपाने ८० पैकी २९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी म्हणजे २००४ मध्ये, कल्याणसिंग पक्षात परतले असताना व त्यांनी पक्षासाठी प्रचारात सक्रिय भाग घेतला असतानाही भाजपाला अवघ्या दहाच जागा का जिंकता आल्या? त्यांचे तात्काळ उत्तर होते, ‘‘अटलबिहारींनी किसनगंज येथे केलेल्या भाषणात, मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या केलेल्या घोषणांनी सारे वातावरणच बदलून गेले. पक्षाचा प्रचार करण्याचा आमचा उत्साहच संपला. लोक मतदानाला गेलेच नाहीत. प्रत्यक्ष अटलजींच्या लखनौ मतदारसंघात फक्त ३६ टक्के मतदान झाले होते.’’ अडवाणीजी, भाजपाच्या या नीतीने पक्षाच्या विश्‍वासार्हतेला तडा गेला. ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेने नव्हे. म्हणून ज्या उ. प्र.त एका वेळी भाजपाचे ५२ खासदार लोकसभेत निवडून आले होते, तेेथे २००४ मध्ये आणि २००९ मध्ये त्याचे फक्त १० उमेदवार विजयी झाले.जिनाप्रशंसा भोवली२००९ साली तर आणखी कहर झाला. तोही अडवाणींच्या कडून. २००५ साली, त्यांनी देशाच्या फाळणीसाठी जबाबदार असलेल्या बॅ. महमदअली जिनांची चक्क प्रशंसा केली! बॅ. जिनांच्या मनात काय होते, पाकिस्तानसंबंधी त्यांचे कोणते धोरण होते, त्यांच्या पाकिस्तानच्या संविधानसभेतील भाषणाचे संदर्भ कोणते, हे सारे सामान्य माणसाने लक्षात घेण्याचे प्रयोजनच नव्हते. भारताची फाळणी करणारा, त्यासाठी डायरेक्ट ऍक्शनचा फतवा काढून हजारो निरपराध हिंदूंच्या रक्ताने कत्तकत्त्याच्या सडका लांछित करणारा, पाकिस्तानचा गव्हर्नर जनरल बनल्यानंतरही हिंदूंच्या क्रूर कत्तलीसाठी, त्यांच्या महिलांच्या घोर विटंबनेसाठी आणि संपूर्ण हिंदू समाजाच्या निर्वासनासाठी जबाबदार असलेला मतांध नेता हीच जिनांची प्रतिमा भारतीय मनावर अंकित आहे. अडवाणी किंवा जसवंतसिंग यांच्या जिनास्तोत्रांनी ती मिटावयाची नाही. पाकिस्तानचे राज्यकर्तेच त्यांची नवी छबी प्रस्तुत करू शकतात,पण ते त्याविषयी मौन बाळगून आहेत. मग त्यांचे काम आपण करण्याचे कारण काय? अडवाणीजी, आपल्या जिनाप्रशंसेने पक्षाच्या विश्‍वासार्हतेला प्रचंड तडा दिला. भाजपाने आपणांस आपला भावी प्रधानमंत्री म्हणून समोर केले. परिणाम जो होणार होता तोच झाला. भाजपाच्या लोकसभेतील जागा आणखी कमी झाल्या. कोण होते, २००९ च्या निवडणुकीत अडवाणींच्या प्रचारयंत्रणेची धुरा सांभाळणारे? श्री. सुधींद्र कुळकर्णी. त्यांचा हिंदू, हिंदुत्व, राममंदिर, समान नागरी संहिता- यावर विश्‍वासच नाही. हे त्यांनी लपवूनही ठेवले नाही. २००९ च्या पराभवानंतर, त्यांनी केलेल्या विश्‍लेषणात त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे.भाजपाची भूमिका कोणती?मी ‘सेक्युलर’ शब्दाचा उल्लेख केला आहे, पण तो आज स्वत:ला ‘सेक्युलर’ समजणारे पण जे एका विशिष्ट संप्रदायाला समोर ठेवून राजकारण करीत आहेत, त्यांच्या संदर्भात आहे. त्यांना खर्‍या सेक्युलॅरिझम्‌शी कसलेही देणेघेणे नाही. त्यांच्या दृष्टीत ‘सेक्युलॅरिझम्’ म्हणजे अल्पसंख्यकांचा अनुनय आणि बहुसंख्य हिंदूंचा वेळी-अवेळी अपमान, हेच बिंबलेले आहे. हिंदूंच्या म्हणा, हिंदुत्वाच्या म्हणा विचारधारेत राज्य सेक्युलर म्हणजे पंथनिरपेक्षच असले पाहिजे, हेच तत्त्व आहे. आपल्या संविधानालाही हेच अभिप्रेत आहे. आपले संविधान १९४९ मध्ये पारित झाले. तेव्हा त्याच्या प्रस्थापनेत (प्रि-ऍम्बल्) ‘सेक्युलर’ शब्द नव्हता. तो १९७६ साली घालण्यात आला. तेव्हा तत्पूर्वीच्या २७ वर्षे काय आपले राज्य ‘सेक्युलर’ नव्हते? पण ‘सेक्युलर’ याचा जगात कुठेही वापरात नसलेला ‘विशिष्ट संप्रदायांची खुशामत’ हा अर्थ आपल्या देशात रूढ झाला आहे. तो आम्हाला मान्य नाही. राज्य पंथनिरपेक्षच असले पाहिजे आणि तरी सर्व पंथसंप्रदायांना आपापली उपासना करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असेच राज्य पंथनिरपेक्ष राहील, अशी आमची मूलभूत धारणा आहे. कारण, आम्ही विविधतेचा सन्मान करणारे आहोत.आम्ही असेच समजतो की, श्री. अडवाणी यांनी व्यक्त केलेली दु:खभावना त्यांची एकट्याची असावी. ती कशी अनाठायी आहे, हे वरील विवेचनात पुरेसे स्पष्ट झाले आहे. ६ डिसेंबरच्या घटनेबाबत भाजपाचे अधिकृत मत काय आहे, हेही जनतेला कळले पाहिजे. मौन पाळून चालावयाचे नाही. सध्या सत्तारूढ असलेला कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपांनी असा काही ग्रस्त आहे की, पुढे येणार्‍या निवडणुकीत त्याला यशाची आशा नाही. कॉंग्रेसचा पर्याय भाजपाच असू शकतो. आहेही. त्याची भूमिका राष्ट्रजीवनाशी संबंधित असलेल्या मूलभूत मुद्द्यांसंबंधी निश्‍चित आणि नि:संदिग्ध असली पाहिजे. म्हणून तिचे प्रकटीकरण अपेक्षित आहे. ते झाले नाही आणि तथाकथित सेक्युलरवादाने तेही ग्रस्त असलेले दिसले तर स्वबळावर सत्ता प्राप्त करण्याची संधी हातून निसटण्याचा धोका आहे.

मा. गो. वैद्य
साभार : तरुण भारत, सोलापूर.

आत्मविश्‍वास देणारी संस्था - तरुण भारत

रामदेव बाबा यांच्यासमवेत सिद्धाराम पाटील(स्वत:), माजी संपादक अरुण करमरकर आणि विजयकुमार पिसे. (छाया: शिवकुमार पाटील)

तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. रामदेव बाबा सोलापुरात आले होते. त्यांचे शिबीर सुरू होते. दुपारी आम्ही त्यांच्या भेटीस गेलो होतो. संपादक अरुण करमरकर आणि आम्ही सहकारी पत्रकार रामदेव बाबांना भेटलो. त्यांनी खूप आनंद व्यक्त केला.रामदेव बाबा म्हणाले,

Tuesday, March 15, 2011

सर्व ब्लॉगर्सना नम्र आवाहन

नमस्कार,

महोदय/महोदया...

मी सिद्धाराम भैरप्पा पाटील, दै. तरुण भारत, सोलापूर येथे उपसंपादक आहेआणि सोलापूर विद्यापीठात पत्रकारितेचे पदव्यत्तर शिक्षण घेत आहे. अभ्यासक्रमात एक विषय लघुशोधनिबंधाचा आहे. त्याअंतर्गत मी मराठी ब्लॉगचाअभ्यास करीत आहे. मराठी ब्लॉगलेखकांकडून मला एक प्रश्नावली भरून हवी आहे. कृपया पुढीलप्रश्नावली भरून मला माझ्या संशोधनात सहकार्य करावे ही विनंती.

1. स्वत:चे पूर्ण नाव :.....................

2. ब्लॉगचे नाव :....................

3. वय :.........

4. शिक्षण-व्यवसाय : .................

5. कोणत्या विषयावर ब्लॉग लिहिता?............

6. वाचकांचा प्रतिसाद कसा वाटतो?

अ) समधानकारक आ) बरा इ) असमधानकारक ई) महित नाही.

4. ब्लॉगिंगला सुरुवात करण्ङ्माआधी लेखन करीत होता का? अ) होय आ) नाही

5. किती वर्षांपासूक ब्लॉगिंग करीत आहात?...........

6. ब्लॉगिंगच्ङ्मा भवितव्ङ्माबद्दल आपले मत सांगा............

कृपया शक्य तेवढ्या लवकर ही प्रश्नावली भरून पाठवावे ही विनंती.

मला 9325306283 या क्रमांकावर एसएमएस करून किंवा तुमचा मोबाईल क्रमांकपाठविलात तरी मी फोवरून माहिती घेईन.उत्तराच्या प्रतिक्षेत.

सिद्धाराम पाटीलpsiddharam@gmail.comधन्यवाद.

Friday, February 25, 2011

अडवाणींच्या कथित माफिनाम्याची कथा

लालकृष्ण अडवाणी यांनी मागितली सोनियांची माफी, "लोहपुरुष' बनला मेणाचा पुतळा, अडवाणींचा माफीचा डाव, संघपरिवाराच्या अंतर्गत चाललेल्या साठमारीला छेद, अशा विविध मथळ्यांखाली गेल्या आठवड्यात बातम्या आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. सोनिया आणि राहुलची तळी उचलणाऱ्या आणि मराठीतील सर्वात अधिक खपाचा दावा करणाऱ्या एका वृत्तपत्राने क्षमा मागणे हे शूरांचे लक्षण आहे वगैरे तत्त्वज्ञान सांगत अडवाणींनी क्षमा मागितली हे बरे झाले; अन्य हिंदुत्ववाद्यांनाही तशी बुद्धी यावी असे म्हटले आहे, परंतु या सर्व बातम्या आणि लेखांत या प्रकरणाचे मूळ काय? अडवाणींनी खरीच क्षमा मागितली का किंवा क्षमा मागितली तर कशाबद्दल? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्या निमित्ताने या प्रकरणाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
गुपित फोडणं म्हणजे बातमी. गुपित जेवढे संवेदनशील तेवढी बातमी शॉकिंग. स्वीस बॅंकेतील काळ्या पैशासंदर्भात टास्क फोर्सने दिलेल्या अहवालाबद्दल अडवाणी यांनी मागितलेल्या तथाकथित माफीची बातमी अर्थातच ब्रेकिंग न्यूज होती. ही कथित माफी भाजपासाठी धक्कादायक, तर कॉंग्रेससाठी आनंददायक आणि मीडियासाठी पर्वणीच होती. अडवाणींनी सोनियांना लिहिलेले पत्र वाचले की ध्यानात येते की, टास्क फोर्सने आपल्या अहवालात सोनिया गांधी यांच्या नावाचा समावेश केल्याबद्दल माफी मागितलेली नाही. मीडियाच्या लबाडीला सलाम केला पाहिजे.
अडवाणींच्या कथित माफिनाम्याची कथा अशी आहे. स्वीस बॅंकेतील काळा पैसा पुन्हा भारतात आणण्याचा विषय गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ऐरणीवर आला. त्यावेळी या विषयाच्या संशोधन अभ्यासासाठी एक कृतिदल तयार केले. या कृतिदलातील पहिले नाव - अजित दोवल. भारतीय गुप्तहेर खात्याचे माजी प्रमुख असलेल्या दोवल यांचे चारित्र्य निष्कलंक आहे. आपल्या कर्तृत्वाने कीर्ती चक्र पटकवणारा भारताच्या इतिहासातील हा पहिला पोलीस अधिकारी आहे. आजवरच्या गुप्तचर विभागातील सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. पाकिस्तानात 6 वर्षे भारताचे नेतृत्त्व केलेले अजित दोवल हे पंजाबातून अतिरेक्यांना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेले आहेत. परराष्ट्र संबंध आणि लष्करी धोरण या विषयांतील अधिकारी व्यक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांची ख्याती आहे.
आपल्या भेदक आणि अभ्यासपूर्ण लेखणीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थतज्ज्ञ एस गुरुमूर्ती हे दुसरे नाव. कॉर्पोरेट क्षेत्रात दबदबा असलेल्या गुरुमूर्ती यांनी बोफोर्स, क्वात्रोची या विषयावर लेखन करून सोनिया गांधींचा "परिचय' देशाला करून दिला आहे. याशिवाय कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी आणि आर्थिक विषयातील जाणकार प्रा. वैद्यनाथन हे दिग्गज त्या कृतिदलात होते.
या टास्क फोर्सने दिलेला काळ्या पैशासंदर्भातला 100 पानी अहवाल मीडियाने जनतेपासून लपवून ठेवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह आणि निपक्षपाती म्हणून मान्यता असलेल्या दोन स्त्रोतांनुसार सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचा स्वीस बॅंकेत प्रचंड पैसा आहे. वास्तविक पहाता ही खूप मोठी बातमी व्हायला पाहिजे होती. परंतु झाली नाही. का?
देशाच्या राजधानीत सर्व "मोठ्या' पत्रकारांसमक्ष टास्क फोर्सचा हा अहवाल 1 फेब्रुवारी 2011 रोजी जाहीर करण्यात आला होता, परंतु वाचक बंधूंनो तुम्हाला या अहवालाविषयीची बातमी वाचायला किंवा पाहायला मिळाली होती का आठवा. त्या अहवालाबद्दल अडवाणींनी तथाकथित माफी मागितली अशा बातम्या मात्र सुपारी घेतल्यागत प्रसिद्ध झाल्या. जणु सेन्सॉर केल्यागत सर्वच माध्यमांनी सोनिया गांधी यांचे नाव वगळून टास्क फोर्सच्या अहवालाची बातमी दिली होती आणि गम्मत म्हणजे टास्क फोर्सच्या अहवालाने जे साध्य केले नाही ते तथाकथित माफिनाम्याच्या पत्राने साध्य केले आहे. स्वीस बॅंकेत सोनियांचे खाते असल्याची माहिती दडवून ठेवण्याचा जो प्रयत्न झाला तो आता तथाकथित माफिनाम्यावरील चर्चेमुळे समोर येतो आहे. "टास्क फोर्समध्ये काळ्या पैशासंदर्भात सोनियाचे नाव आहे म्हणून माफी' असा संदर्भ मीडियाला द्यावा लागतोय.
सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर केले आहे. स्वीत्झर्लंडमधील सर्वाधिक खपाचे आणि लोकप्रिय असलेल्या "Schweizer Illustrierte या नियतकालिकेने 11 नोव्हेंबर 1991च्या अंकात याचे रहस्योद्‌घाटन केले होते. स्व. राजीव गांधी यांच्या गुप्त खात्यात 2.2 बिलियन डॉलर असल्याचे त्यात म्हटले आहे.
दुसरी विश्वासार्ह संस्था आहे केजीबी. ही रशियाची गुप्तचर संस्था आहे. केजीबीच्या कागदपत्रांवर आधारित संशोधन पुस्तिकेत रशियन पत्रकार युवेजिना अल्बटस्‌ यांनी म्हटले आहे की, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते (1985) तेव्हा त्यांनी गांधी कुटुंबावर आर्थिक कृपा केल्याबद्दल केजीबीकडे कृतज्ञता व्यक्त केली होती.
विख्यात स्तंभलेखक ए.जी. नूरानी यांनी पहिल्यांदा 1988 मध्ये ही बाब समोर आणली होती. नंतर 2001 मध्ये जनता पार्टीच्या संकेतस्थळावर सुब्रमण्यम्‌ स्वामी यांनी या संदर्भातील पुरावे प्रसिद्ध केले. न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये यावर 2009 मध्ये विस्तृतपणे छापून आले आहे. इंडिया टुडे या भारतातील प्रसिद्ध नियतकालिकेत राम जेठमलानी यांनी यावर विस्तृतपणे लिहिले आहे. आजवर भारतात आणि भारताबाहेर कुठेही गांधी कुटुंबाने लेखक, प्रकाशक यांना कोर्टात खेचले नाही किंवा बदनामीचा खटला दाखल केला नाही.
(मोरारजी देसाई यांनी वयाच्या 87व्या वर्षी 50 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा अमेरिकेत दाखल केला होता. ते सीआयए या अमेरिकी गुप्तचर खात्याचे एजंट असल्याचे सेमर हेर्ष या लेखकाने आपल्या पुस्तकात लिहिले होते. आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यामुळे देशाची आणि मोरारजींची अब्रू वाचली.)
टास्क फोर्सने अहवालात विचारले आहे की, राजीव गांधी आणि देशाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी मोरारजींचे अनुकरण का करण्यात आले नाही. टास्क फोर्सने अहवालात आणखीन एक गोष्ट नमूद केले आहे. 2008 साली सोनिया गांधी या अमेरिका भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी द न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकेतील प्रतिष्ठित दैनिकात एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. अनिवासी भारतीयांनी दिलेल्या त्या जाहिरातीत सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचे स्वीस बॅंकेत खाते असल्याचे नमूद केले होते. यामुळे व्यथित होऊन परदेशस्थ कॉंग्रेसप्रेमींनी 100 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला, परंतु नंतर काही दिवसांनी खटला मागे घेण्यात आला.
टास्क फोर्सचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी सोनिया गांधी यांनी गुप्त (खुले नाही) पत्र अडवाणींना लिहिले. त्यात टास्क फोर्सच्या अहवालाने आपल्याला दु:ख झाल्याचे व बदनामी झाल्याचे म्हटले. आपल्यावरील आरोप अभद्र असल्याचे म्हटले. (स्वीत्झर्लंडमधील मासिकातील व अल्बटस्‌च्या शोध ग्रंथातील आरोप अभद्र नव्हते काय?)
16 फेब्रुवारी रोजी अडवाणी यांनी सोनियांना पत्र लिहिले. सोनियांनी आरोप नाकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आधीच आरोपांचे खंडन झाले असते, तर कदाचित टास्क फोर्सने याची दखल घेतली असती. शेवटी त्यांनी लिहिले की, तरीही आपल्याला जो मनस्ताप झाला त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो. या शेवटच्या वाक्याकडेच कॉंग्रेसाळलेली मीडिया आनंदाने पाहते आहे. यावरून स्पष्ट होते की, टास्क फोर्सने सोनिया कुटुंबाचे काळ्या पैशाच्या बाबतीत अहवालात उल्लेख केल्याबद्दलचा हा खेद नाही. वैयक्तिक मनस्तापाबद्दल मोठ्या मनाने व्यक्त केलेला खेद ही अशारीतीने राजकीय क्षमायाचना झाली. मीडियाच्या लबाडीला तोड नाही हेच खरे!
टास्क फोर्सच्या लेखकांनी जबाबदारीने अहवाल लिहिला असून, त्यातील प्रत्येक शब्दावर ठाम असल्याचे म्हटले आहे. अहवाल स्वीकारणे अथवा नाकारणे याचे स्वातंत्र्य भाजपाला असल्याचे म्हटले आहे. भाजपाने हा अहवाल स्वीकारून प्रकाशित केला आहे. टास्क फोर्स ही देशहित जपणाऱ्या तज्ज्ञांची स्वतंत्र समिती आहे. या टास्क फोर्सवर स्वार्थी राजकारणासाठी भाजपा किंवा इतरांचा शिक्का मारण्याचे कारणच नाही. गोपनीय पत्र समोर आल्याने टास्क फोर्सचे स्वतंत्र अस्तित्वही समोर आले आणि मीडियाने दडवून ठेवलेली सोनिया गांधी यांचे स्वीस बॅंकेत खाते असल्याबद्दलची माहितीही समाजासमोर आली.

सिद्धाराम भै. पाटील,
संपर्क: 9325306283
लेखासाठी आधार :
1. विकिपिडिया संकेतस्थळ, 2. टास्क फोर्सचा अहवाल, 3. एस. गुरुमूर्ती यांचे द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळावरील लेख

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी