Monday, March 21, 2011

"तरुण भारत'चा दृष्टिकोन सर्वव्यापी : शिंदेसोलापूर (खास प्रतिनिधी) - वृत्तपत्रांनी नि:पक्षपातीपणे टीका-टिप्पणी केलीच पाहिजे, तो वृत्तपत्रांचा धर्मच आहे. काही वृत्तपत्रे पक्षीय दृष्टिकोन ठेवून काम करतात पण, दैनिक तरुण भारतचा दृष्टिकोन मात्र सर्वव्यापी आणि नि:पक्षपाती असल्याचे गौरवोद्‌गार केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
"तरुण भारत'च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या स्नेहमेळाव्यानिमित्त रविवारी सायंकाळी तरुण भारतच्या प्रांगणात आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तरुण भारतचे अध्यक्ष विवेक घळसासी यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी तरुण भारतवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सुशीलकुमार शिंदे आणि तरुण भारतच्या फोर कलर छपाई यंत्राचे उद्‌घाटन, याविषयी बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले असेल. पण, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. तरुण भारतच्या याच भूमिकेतून त्यांचा निपक्षपातीपणा स्पष्ट होतो, असे सांगून शिंदे पुढे म्हणाले की, रा. स्व. संघाचे कट्टर विचारवंत असलेले तरुण भारतचे ज्येष्ठ स्तंभकार मा. गो. वैद्य यांच्याशी 1976 पासून आपला परिचय आहे. मा. गो. वैद्य यांच्या तत्त्ववादी व परखड लेखनाची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
वैचारिक मतभेद असले तरी समर्थ भारतासाठी आपण साऱ्यांनी मिळून कार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. विवेक घळसासी यांच्यासारख्या विचारवंताचे नेतृत्व तरुण भारतला लाभले असल्याबद्दल शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. आज वृत्तपत्र हा व्यवसाय झाला आहे. असे असताना तत्वे अर्थात धर्म सांभाळत व्यवसाय करणे हे कौशल्याचे म्हणावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर संपादक नारायण कारंजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर आरिफ शेख, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक प्र. रा. बावस्कर, रा. स्व. संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे, पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, मनपा स्थायी समिती सभापती शिवलिंग कांबळे, आ. दिलीप माने, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर महेश कोठे, मनपा सभागृह नेते देवेंद्र भंडारे, परिवहन सभापती बसवराज म्हेत्रे, माजी महापौर यू. एन. बेरिया, शहर कॉंग्रेस अध्यक्ष धर्मा भोसले या मान्यवरांचा सत्कार विवेक घळसासी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी तरुण भारतचे संगणकीय सजावट करणारे महेश दिड्डी व अवधूत कुलकर्णी यांचाही खा. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरुण भारतचे उपसंपादक सिद्धाराम पाटील यांनी कले.
वि. दा. सावरकरांचे
शिंदे यांनी केले
असेही स्मरण

"हेडलबर्ग फोर कलर प्रिंटींग मशिन'ची पूजा करताना मी पादत्राणे काढून ठेवली होती. कारण कोणतीही पूजा करताना पादत्राणे काढण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. मात्र यंत्राचे बटन दाबताना मी आवर्जून पादत्राणे घातली. कारण, हा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा विज्ञानानिष्ठ दृष्टिकोन आहे, असे सांगत केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विज्ञाननिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ वि. दा. सावरकरांचे स्मरण केले. आपल्याला भारतीय संस्कृतीचा सन्मान करीतच विज्ञानाची कास धरून पुढे जायचे आहे, असेही ते म्हणाले.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी