आज एकदा पुन्हा
सिंहनाद होऊ दे ऽऽऽ
मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला।
त्या पार्श्वभूमीवर लिहिलेला हा लेख...
धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या मर्यादा नष्ट होत असता- हे भजन, पूजन, ध्यान आदी काय कामाचे ?
-गुरु गोविंदसिंह
गेल्या दोन महिन्यांपासून हिंदू जनजागृती समितीतर्फे सोलापुरात हिंदू धर्मजागृती सभेच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. सनातन संस्था आणि अन्य समविचारी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते ही धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी दिवस-रात्र एक करून काम करीत आहेत.
दरम्यान, बुधवारी रात्री इस्लामी अतिरेक्यांनी मुंबईवर अतिशय क्रूर हल्ला चढवला. 80 हून अधिक निष्पाप लोक ठार झाले. शेकडो जखमी. सोलापुरात पोलीस आयुक्त राहिलेले अशोक कामटे, विख्यात पोलीस अधिकारी विजय साळसकर, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, शशांक शिंदे यांच्यासह 14 पोलिसांनी अतिरेक्यांशी लढताना आपले प्राण गमावले. राज्यातील सव्वा लाख पोलिसांवर कोसळलेली ही भीषण आपत्ती होती.
सारा देश हळहळला. सारी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांचे तरुण पत्रकार जीव तोडून रिपोर्टिंग करीत राहिले. बुधवार आणि गुरुवारच्या रात्री मुंबईतील थराराच्या बातम्या पाहत कित्येकांनी जागून काढल्या. पोलिसांच्या बाजूने जनमानस उभा राहिला. सोलापुरातील चौकाचौकातून फलकांवर अशोक कामटे आणि अन्य वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोट्यवधी लोकांनी एसएमएस आणि ई-मेल्सच्या माध्यमातून आपल्या तीव्र भावनांचे आदान-प्रदान केले. श्रद्धांजली सभा घेण्यात आल्या. काही भावनाशील लोकांनी हौतात्म्य पत्करलेल्यांचे पुतळे उभारण्याची मागणी केली.
हे सारे स्वाभाविक असले तरी जी गोष्ट केली पाहिजे तीच गोष्ट आम्ही सारे विसरून गेलो. नेहमी नेहमी आपण हीच गोष्ट विसरत आलो आहोत. अतिरेक्यांच्या विरोधात, देशद्रोह्यांच्या विरोधात मानसिकता तर आहे. अन्यायाविरुद्ध, देशद्रोह्यांविरुद्ध युद्ध करून विजय मिळविण्याची इच्छाही सर्व देशवासीयांमध्ये आहे. साऱ्या पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तर ही भावना ओतप्रोत आहे. दुष्ट शक्तींना पराभूत करण्यासाठी रणांगणावर उभा असलेल्या अर्जुनामध्येही अशीच भावना होती, परंतु अर्जुन संभ्रमित झाला होता.
आज आमच्या देशातील बहुतांश लोकांची, तरुणांची, तरुण पत्रकारांची अवस्था अर्जुनासारखीच झाली आहे. युद्ध कोणाविरुद्ध करायचे आहे, याबाबतच त्यांच्या मनात संभ्रम आहे. हा संभ्रम जोवर दूर होणार नाही तोवर युद्ध लढताच येणार नाही. शत्रू ओळखता नाही आला, तर विजय कदापि शक्य नाही. हौतात्म्य पत्कराणाऱ्या वीर जवानांची मालिका मात्र लांबत जाईल.
भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व. स्वामी विवेकानंद म्हणतात, "हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे'.
परंतु आज या देशातील बहुतांश लोक हिंदुत्वावरूनच संभ्रमित आहेत. हिंदुत्व म्हणजे संकुचित काही असेल असे जाणीवपूर्वक ठसविले गेले आहेे. जात आहे. हिंदुत्व म्हणजे लाजीरवाणे, किळसवाणे अशी भावना तयार करण्याचाही सातत्याने प्रयत्न होतो आहे, परंतु सत्य स्थिती वेगळीच आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचे अभ्यासांती म्हटले आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हेही एक कटू सत्य आहे.
तसे पाहिले तर इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांचा उदय होण्यापूर्वी म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी येथील जीवनपद्धतीला सनातन धर्म म्हणून संबोधले जायचे. आपापल्या आवडी निवडीनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य या देशात होते, परंतु इस्लाम आणि ख्रिस्ती या एकांतिक पंथांनी आमचाच धर्म खरा आहे. सारे जग हे ख्रिस्ताला मानणारे किंवा अल्लाला मानणारे असले पाहिजे, असा विचार घेऊन थैमान घालू लागले. ऑस्ट्रेलिया, ऑफ्रिका, अमेरिका येथील कोट्यवधी मूळनिवासी लोकांच्या कत्तली ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी घडवून आणल्या. याला इतिहास साक्षी आहे. मुस्लिमांच्या रानटी टोळ्यांनीही हेच केले. हिंदू धर्म हा या एकांतिक पंथांपेक्षा भिन्न आणि सर्वसमावेशक आहे, हे आपण आधी ध्यानात घेतले पाहिजे.
एक उदाहरण पाहा. एक तुपाचे दुकान चालविणारा मनुष्य "महालक्ष्मी तुपाचे दुकान' हे नाव बदलून "महालक्ष्मी शुद्ध तुपाचे दुकान' असे नामकरण करतो. त्याला अनेकजण विचारू लागतात, तुम्ही नाव का बदलले ? दुकानदार सांगतो की बाजारात वनस्पती तुपाचे आगमान झाल्यामुळे असे करावे लागले. वनस्पती तुपाहून आमचे तूप वेगळे आणि शुद्ध आहे, ही गोष्ट सांगण्याची गरज उत्पन्न झाली म्हणून हा बदल केला. अगदी असाच प्रकार या देशातील जीवनपद्धतीबद्दल आहे.
इस्लाम आणि ख्रिस्ती या एकांतिक पंथांपेक्षा सनातन धर्म वेगळा आहे, हे सांगण्यासाठी हिंदू धर्म हे सर्वमान्य नाव योग्यच आहे. आम्ही भारतीय स्वत:ला काहीही म्हणवून घेतले तरी सारे जग आपल्याला हिंदू म्हणूनच ओळखते, हे ध्यानात घेणे पहिली गरज आहे.
विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, ""जीवनात आव्हानांचे भारी महत्त्व असते. जीवनात आव्हाने नसतील, तर मनुष्य निष्क्रिय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परंतु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील, तर पुढील दोनपैकी एक गोष्ट होऊ शकते...
1) आव्हाने समजून घेतली नाही, तर त्या आव्हानांना बळी पडून नष्ट व्हावे लागते.
किंवा
2) आव्हाने समजून घेऊन त्यांना प्रतिसाद दिला, तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''
जी गोष्ट मनुष्याला लागू पडते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागू पड़ते. त्यामुळे राष्ट्रासमोरील आव्हाने समजून घेणे आवश्यक आहे.
ही आव्हाने समजून घेणार नसू तर...
आपल्याला मेधा पाटकर, अरुंधती रॉयसारखी मंडळी अफझल गुरूसारख्या अतिरेक्यांना फाशी देण्यात येऊ नये यासाठी का धडपडतात हे कळू शकणार नाही ?
हेमंत करकरे यांच्यासारख्या बहादूर आणि धाडसी पोलीस अधिकाऱ्यांसही "काल्पनिक हिंदू दहशतवादाच्या भ्रमात' कसे अडकविले जाते हेही आपल्याला समजणार नाही।
आसाममध्ये दीड महिन्यापूर्वी 90 गावांवर बांगलादेशी घुसखोरांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन हल्ला केला. ही गावं जाळून टाकण्यात आली. तेथील पोलीस अधीक्षक (जो मुस्लिम समाजाचा होता) काहीही कारवाई केली नाही म्हणून त्याला निलंबित केले गेले आहे. आज त्या 90 गावांतील 80 हजारांहून अधिक हिंदू (बोडो) आसामध्ये आपल्याच देशात निर्वासित बनून छावण्यांमध्ये दुर्दैवी जीवन जगत आहेत, आजही ही स्थिती आहे. तेथील ख्रिस्ती जिल्हाधिकाऱ्याची बढती देऊन बदली करण्यात आली. या हल्ल्याचा कट आसामातील महसूलमंत्र्याने (जो बांगलादेशी घुसखोर मुसलमान आहे) रचला होता, परंतु इतके सारे होऊनही वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, मानवाधिकारवाले याविरुद्ध काहीही आवाज उठवत का नाहीत हेही आपल्याला समजणार नाही।
गेल्या महिन्यात सोलापुरातील ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये आमदाराच्या मुलीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. हे कसे काय हेही आपल्याला समजणार नाही।
तिरुपती देवस्थानमच्या पैशाने हिंदूंनाच ख्रिस्ती बनविण्याचा उद्योग मध्यंतरी कसा काय चालला होता, हेही आपल्याला कळणार नाही.
अशी शेकडो उदाहरणे आहेत. पण मूळ मुद्दा असा की, असे प्रश्न आपल्याला जोवर पडत नाहीत तोवर आपण चुकीच्या राजकीय पक्षांना मतदान करीत राहू. म्हणजेच आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारीत राहू.
या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरू आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे.
या साऱ्या आव्हानांना लोकशाही मार्गाने तोंड देण्यासाठीच देशामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहेत. या सभांना समाजातील सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून पाठिंबा मिळत आहे, हे एक सुचिन्हच म्हणावे लागेल.
या धर्मसभांच्या माध्यमातून हिंदूंच्या संघटित शक्तीचे दर्शन होणार आहे. संघटित शक्तीचे रूप पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला एकत्रित यावे लागेल. भारतासमोरील सर्व आव्हानांना एकच उत्तर आहे... "संघटित हिंदू-समर्थ भारत।'
................................
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापुरात
रविवार, दि। 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा।
नॉर्थकोट मैदान येथे हिंदू धर्मजागृती सभेचे
आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने...
-सिद्धाराम भै. पाटील
३० नवम्बर, २००८ , दै। तरुण भारत, आसमंत पान 1