Monday, December 15, 2008

कसाबचे कैवारी


कसाबचे कैवारी
काय संतापजनक अवस्था आली आहे पाहा, पाकिस्तानातून 25 अतिरेकी बॉंब, बंदुका घेऊन थेट मुंबईत शिरतात. 10 मारले जातात 15 गायब होतात. मुंबईतच काय देशातील कोणत्याही शहरात त्यांना प्रेमाने आश्रय देणारे कमी नाहीत. एकजण जिवंत सापडला त्याचे कबुलीजबाब सविस्तर प्रसिद्ध होत आहेत. मेलेल्या 10 अतिरेक्यांचे दफन करण्यास मुस्लिमांनी नकार दिला तर कसाब नावाच्या मानवी कसायाचे वकीलपत्र घेण्यास मुंबईच्या वकिलांनी नकार दिला. या दोन्ही घटना देशप्रेमाचे दर्शन घडवत असताना काहीजणांच्या पोटांत कायद्याच्या राज्याचा मुरडा झाला आहे. या मुरडा झालेल्यात एकेकाळी पाकिस्तानातून जीव वाचवण्यासाठी भारतात निर्वासित म्हणून आलेल्या राम जेठमलानींसारखा माणूसही कसाबला कायद्याची मदत मिळाली पाहिजे, असे ठासून सांगतो तेव्हा 1947 साली सिंध प्रांतात जे हजारो हिंदू कापले गेले त्यात हे का नव्हते, असा विचार येतो. निर्वासित म्हणून आलेल्या या इसमास दुजाभाव न दाखवता देशाचा कायदामंत्री केले, त्याचे चांगले पांग या इसमाने फेडले. आधी देश महत्त्वाचा; तो शिल्लक राहिला तर देशाचा कायदा राहतो. देशाच्या मुळावर आलेल्यांना कसला कायदा? या कसाबला गेट वे ऑफ इंडिया समोरच हजारोंच्या उपस्थितीत जाहीरपणे फाशी द्यावी, अशी सामान्य नागरिकांची इच्छा आहे. हा प्रकार रानटी वाटला तरी शठम्‌ प्रति शाठ्यम्‌ या न्यायाने दहशतवाद अणि दहशतवादी यांचा रानटीपणानेच नि:पात केला पाहिजे. कायद्याने जाऊन महंमद अफजल हा फाशी न जाता तिहार तुरुंगात रोज मटन-बिर्याणी खातोय आणि त्याच्या हातून मारल्या गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना अद्याप पुरेसा आधार मिळालेला नाही. कायद्याचे पालन केल्यानंतर कायद्याचेच असे धिंडवडे निघतात. त्यापेक्षा रानटीपणाने प्रकरण संपवण्यात काय गैर आहे?
कॉंग्रेसच्या कृपेने एक अफझल रोज बिर्याणी खायला घालून गेली 5 वर्षे आपण पोसतच आहोेत. आता त्यात कसाबची भर पडेल की काय, असे वाटते. कायद्याने जाऊन त्याला फाशी झाली तरी तो अफझलच्या शेजारच्या कोठडीत जाऊन बसेल. असे आणखी हल्ले होतील. निर्वासित जेठमलानींच्या म्हणण्यानुसार खटले होतील. फाशी होईल. असे फाशीचे 4-5 कैदी झाले की एखादे विमान पळवले जाईल किंवा 200-250 मुलांच्या बालवाडीवर हल्ला करून 250 बालकांना ओलीस ठेवून या 4-5 जणांची मुक्तता होईल. तो अफझल हा कसाब, हे सर्व मसूद अझहरसारखे भारतीय तुरुंगातून सुटून थेट पाकव्याप्त काश्मीरमधील अड्ड्यावर जातील. नव्या हल्ल्याची योजना आखू लागतील. पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्या जेठमलानी यांना हेच हवे आहे का? कायद्याचे राज्य आणि न्यायव्यवस्था यांच्यावर जेठमलानी यांचा विश्वास आहे, ही गोष्टच विनोदी आहे. कायदामंत्री असताना सर्वोच्च न्यायालयाशी खालच्या पातळीवर जाऊन भांडणे आणि या अक्षम्य अपराधाबद्दल वाजपेयींकडून मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे असा प्रकार जेठमलानींच्या बाबत घडला. तेच जेठमलानी आज कसाबचा कळवळा येऊन बोलतात यात त्यांचा बुद्धीभ्रम झाला आहे. मुंबई बार असोसिएशनला "रबिश' अशी शिवी देणाऱ्या जेठमलानी यांचे कायद्याचे ज्ञान उतु जात असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा. ते स्वत: आणि त्यांच्यासारख्या लाखो सिंधी लोकांची घरे, वहाने, शेतवाडी, दुकाने, बॅंकेतील पैसे पाकिस्तानातच आहे. पाकिस्तानकडून प्रत्येक सिंधी निर्वासिताला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जेठमलानी यांनी प्रयत्न करावेत. कसाबचा कळवळा येणे ही गोष्ट सवंग प्रसिद्धीसाठी आहे. जेठमलानीच काय मुंबईतील आणखी एका वकिलाने असेच भंपक विधान केले. कसाबचे वकीलपत्र घेऊन मिळणारी प्रसिद्धी हा त्यामागचा हेतू आहे. असले दळभद्री लोक आपल्यात आहेत हे दुर्दैव.
कसाब हा पाकिस्तानी नागरिक असून, त्याचा अपराध असा आहे की, भारतीय कायद्याचा त्याला उपयोग होऊच शकत नाही। त्याचा खटला विशेष न्यायालयात चालवून फार तर पाकिस्तानी वकिलाकडून त्याचा बचाव व्हावा. कोणी पाकिस्तानी वकील तयार होतो का हेही दिसेल. सद्दाम हुसेन याच्यावरील खटल्याचे जसे जगभर प्रक्षेपण होत होते तसे या खटल्याचेही जगभर प्रक्षेपण व्हावे. त्यातून दहशतवादाचे मूळ पाकिस्तानच आहे हे साऱ्या जगाला कळाले पाहिजे. पाकिस्तानच्या संदर्भात सौहार्दता, सुसंस्कृतपणा दाखवणे आता बास करावे. त्या 10 अतिरेक्यांची मढी जे.जे. शवागारात दोन आठवडे पडून आहेत. मढं सांभाळायाचे म्हणजेही खर्च आहे. त्यांना पाकिस्तान घ्यायला तयार नाही, देशातील मुस्लिम दफनाला तयार नाहीत. दफन झाल्याशिवाय त्यांना जन्नत मिळणार नाही. त्यांचा गुपचुप कोठेतरी दफनविधी उरकला जाण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या या शत्रूंना 80 गज काय अर्धा गजही जमीन मिळता कामानये. एक तर त्यांचे दहन करावे किंवा ज्या गेट वे मधून ते आले त्याच गेट वे मधून त्यांचे मृतदेह बाहेर काढून खोल समुद्रात फेकून द्यावेत. मानवाधिकार कायदा या गोष्टी येथे उपस्थित न करता कसाब प्रकरण हाताळावे. तथाकथित कायदे पंडितांनी कसाबचा कैवार न घेता थोबाड बंद ठेवावे. हा कसाब म्हणजे दुसरा अफझल होऊ नये याची आतापासूनच काळजी घ्यायला हवी.

अग्रलेख , १६ दिसम्बर २००८, तरुण भारत सोलापुर

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी