ज्यावेळी पाकिस्तानातील हिंदूंचा एक जत्था
भारतात येऊ पाहत होता, त्या वेळी; ते भारतात गेले तर बदनामी होईल, या
भीतीने वाघा सीमेवर त्यांना रोखण्यात आले. नंतर एक बातमी आली की, भारतात
जाऊन पाकिस्तानची बदनामी करायची नाही, असे वचन घेऊन पाकिस्तानी
अधिकार्यांनी त्यांना वाघा सीमा ओलांडून भारतात जाऊ दिले. ही चांगली बाब
म्हणावी लागेल. कारण प्रत्येकच इसम आपली प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी झटत
असतो. पाकिस्तानसारख्या देशाजवळ स्वतःची प्रतिमा मलिन होण्यापासून
रोखण्यासाठी उरले तरी काय आहे? हे तेथील अधिकार्यांनाही माहीत असताना, जर
हा देश प्रतिमा जपण्याच्या गोष्टी करत असेल, तर मात्र ती गोष्ट गंभीर आहे,
असे समाजायला हवे.
कोणतीच व्यक्ती आपले घर-दार, जमीन,
संपत्ती आणि आपल्या शहराचा सहजासहजी त्याग करीत नाही. जमीन म्हणजे काही
मातीचे ढिगारे आणि घर म्हणजे फक्त विटांच्या भिंतींवरील छत असू शकत नाही.
ती जमीन मनुष्याच्या जगण्यामरण्याच्या संबंधांशी, पूर्वज आणि पिढ्यांच्या
आठवणींच्या गंधाशी, आनंद आणि दुःखाच्या गीतांचा आणि जीवनाच्या प्रवाहाला
परिभाषित करणारे वाक्प्रचार आणि म्हणींशी जुळलेली असते. जेथे आमच्या
पूर्वजांनी वास्तव्य केले, ज्यांच्या प्रथा-परंपरांचे रक्षण करून आम्ही
आमच्या पिढीच्या भविष्याची स्वप्नं रंगविली, ती जमीन आपल्या आस्थेशी
जुळलेली असते. त्या जमिनीला आपण मंदिराचा दर्जा देत नसलो, तरी त्या जमिनीशी
आपले शरीराचे आणि आत्म्याचे नाते असते, जसे आपल्या शरीराचे नखे आणि
बोटांशी आणि चेहर्याचे डोळ्यांशी नाते असते.
एखादी व्यक्ती एखादी जागा कधी आणि कोणत्या
कारणासाठी सोडण्यास मजबूर होते? ज्या वेळी तिचे सर्व काही- पैसा-अडका,
जमीन-जुमला नाहीसा झालेला असेल तेव्हा. नवी स्वप्ने पाहताना त्याचे मन
तुटून गेले, की तो जमीन सोडण्यास मजबूर होऊन जातो. तो निर्णय करतो, की
येथील जमिनीशी असलेले आपले नाते आता संपलेले आहे. तो विचार करतो, चला आता
अशा जागेच्या शोधार्थ जाऊ, जेथे भलेही आपल्याला कुणी ओळखणारे नसेल, ज्या
जमिनीशी आपले काही नाते नसेल, पण भीक मागून का असेना पोटाची खळगी भरता
येईल. कमीत कमी तेथे आपली मुले, आपला परिवार आणि आपला धर्म तर शाबूत राहील.
दिल्लीतील सेक्युलर राजकारणी आणि
मीडियातील लोक हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होताच
तालिबानींसारखे निर्मम होऊन जातात. हिंदू परिवार आपल्या आया-बहिणी आणि
छोट्या-छोट्या मुलाबाळांसह कपड्यांचे गाठोडे बांधून भारतात शरणार्थी म्हणून
येण्यास का येऊ इच्छितात, याबाबत विचार करण्याचीही त्यांना गरज वाटत नाही.
ज्या परिवारातील १३ वर्षाची मुलगी
अत्याचाराला बळी पडली असेल, त्या परिवारावर कोणता प्रसंग गुदरला असेल, याचा
आपण विचारही करू शकत नाही. सिंधमध्ये नुकतेच मनीषा कुमारी नामक बालिकेचे
अपहरण झाले. तिला दिवसाढवळ्या भर बाजारातून उचलण्यात आले. तिचे
जोर-जबरदस्तीने धर्मांतरण करून तिच्या मनाविरुद्ध तिचा निकाहदेखील लावून
देण्यात आला. तिचे आई-वडील कुठे जाऊन रडत असतील? त्यांना झोपा तरी लागत
असतील का? मुलीच्या आठवणीने त्यांच्या पोटात अ़न्नाचा कणतरी जात असेल का?
राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी मला प्रचंड प्रयत्न करावे लागले.
आधी सांगितले गेले की, हा मुद्दा विदेशाशी संबंधित आहे. नंतर चर्चा झाली
की, हा जातीयवादी विषय आहे. त्यामुळे पुन्हा या मुद्याला बगल देण्याचा
प्रयत्न झाला. नंतर ज्या वेळी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेऊन
हा मुद्दा उपस्थित केला, त्या वेळी सार्याच राजकीय पक्षांच्या
लोकप्रतिनिधींनी या मुद्यावर आपापली मते व्यक्त करून, त्याबद्दल चिंता
प्रकट केली. अखेर या संवेदनशील मुद्यावर पाकिस्तानकडे विचारणा करण्यात
येईल, असे आश्वासन विदेश मंत्री एस. एम. कृष्णा यांना सभागृहाला द्यावे
लागले. पण, आजपर्यंत या विषयावर ना सरकारतर्फे काही कार्यवाही झाली ना
संसदेला याबाबत काय सुरू आहे, याची माहिती देण्यात आली.
भारत सरकार आणि येथील काही राजकीय पक्षांची नेतेमंडळी
श्रीलंका, मालदिव, तिबेट, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका तथा म्यानमार आदी
देशांच्या अंतर्गत मुद्यांवर जाहीरपणे विचार व्यक्त करतात. त्यांची दखलही
घेतली जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मुद्दे उचललेही जातात. यावेळी
त्यांना आपण विदेशी मुद्दे उपस्थित करीत आहोत, याचे भानदेखील राहत नाही. पण
त्यांना बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भूतानमधील हिंदूंच्या
मानवाधिराच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करण्यास सांगताच त्यांची बोलती
बंद होऊन जाते.
भारताची संसद, सरकार, सुरक्षा संस्था,
लष्करी संघटना, मानवाधिकार आयोग आदींमध्ये हिंदू बहुसंख्येने नोकरीला आहेत.
जास्तीतजास्त राजकीय पक्षांचे नेते बहुतांशी हिंदूच आहेत. पण, सर्व राजकीय
पक्षांमधील हिंदू नेते एकत्र येऊन एकाद्या मुद्यावर एकसुरात बोलत आहेत असे
दृश्य आजवर कधी आढळले नाही. सर्व राजकीय पक्षांमधील हिंदू नेत्यांच्या
शिष्टमंडळाने आजवर कधीच गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हिंदूंच्या
मानवाधिकाराच्या उल्लंघनाची तक्रार केली नाही. असे कधीच होऊ शकत नाही. पण,
काही दिवसांपूर्वी कोक्राझारमध्ये झालेल्या दंगलींच्या संदर्भात सर्व
पक्षांच्या मुस्लिम नेत्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे
नापसंती व्यक्त केली. पण यावर कुणीच आक्षेप घेतला नाही, उलट हे कार्य
सेक्युलर असल्याची त्यांनी मान्यता देऊन टाकली.
काही दिवसांपूर्वी भूतानहून एक शिष्टमंडळ
भारतात आले होते. पण, त्यांच्या देशातून २० हजार हिंदूंना निर्वासित का
व्हावे लागले, असा मुद्दा त्यांच्याकडे कुणीही उपस्थित केला नाही. नेपाळचा
संवैधानिक हिंदू राष्ट्राचा दर्जा समाप्त झाला, तेव्हा येथील धर्मनिरपेक्ष
मंडळींनी आनंद साजरा केला. काश्मीरमधून पाच हिंदूंना हाकलण्यातच आले नाही,
तर तेथील अमरनाथ यात्रेतही अडथळे आणले जात आहेत. तिचा कालावधी घटवण्यात आला
आहे. कोक्राझार येथील हिंदू आदिवासी जनजातींच्या कत्तली तर ताज्या आहेत.
त्याबद्दल वेगळे सांगण्याची गरजच नाही.
कराची ते काश्मीर आणि काश्मीर ते
कोक्राझारपर्यंत फक्त हिंदूंच्याच घरांची राखरांगोळी होत आहे. हिंदूंना
आपल्याच देशात शरणार्थी बनविले जात आहे आणि हा हिंदुबहुल देश या सार्या
घटनांकडे, डोळे मिटून शांतपणे पाहत बसला आहे. जणूकाही हिंदूंच्या
सुख-दुःखाशी याचे काही देणेघेणेच नाही, असे वाटून राहिले आहे. यापेक्षा
अधिक आत्मदैन्य अजून काय असू शकते? प
तरुण विजय
(लेखक राज्यसभेचे सदस्य आहेत)
अनुवाद : चारुदत्त कहू
No comments:
Post a Comment