अप्रतिहत प्रज्ञेचा धनी
पृथ्वीवर जन्म घेणार्या प्रत्येकच
व्यक्तीला कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावेच लागते. मात्र, जी व्यक्ती
समाजकार्य, धर्मकार्य आणि राष्ट्रसेवा करताना आपले ऋण समाजबांधवांवर ठेवून
जाते, त्या व्यक्तीचे जाणे लौकिकार्थाने यशस्वी झाले, असे मानले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक कुप्प. सी. सुदर्शनजी यांचा
मृत्यूही त्याच कसोटीवर नोंदला जायला हवा. सुदर्शनजींच्या मृत्यूच्या
निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या मालिकेतील पाचवी
कडी काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांच्या मृत्यूने संघपरिवार आणि
हिंदुत्वाचे मूल्य जाणणारे सारेच देशबांधव शोकसागरात बुडाले आहेत. प्रथम
सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी, तृतीय
सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि चतुर्थ सरसंघचालक रज्जूभय्या यांच्या
पावलावर पाऊल टाकत सुदर्शनजी यांनी संघाची प्रगतीची रेषा दशदिशांनाच नव्हे,
तर सातासमुद्रापार पोहोचवली. १० मार्च २००० रोजी नागपुरातील अ. भा.
प्रतिनिधिसभेत रज्जूूभय्या यांनी, त्यांचा उत्तराधिकारी संघाची ध्येयधोरणे
निष्ठेने आणि प्रामाणिकतेने राबविणारा राहील, याची खात्री पटल्यानेच
संघाच्या मुशीतून तयार झालेल्या सुदर्शनजी यांची नियुक्ती केली होती. संघ
ही निव्वळ देशभक्तांचीच संघटना नसून, संघ हा एक सर्वसमावेशक विचार आहे,
जीवन जगण्याची पद्धती आहे, हे पूर्वसूरींनी आखून दिलेले सूत्र सुदर्शनजी
यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत कायम ठेवले. ‘चरैवेति चरैवेति’ या मंत्राचा
त्यांनी अखेरपर्यंत विसर पडू दिला नाही. काल, १५ सप्टेंबरला सकाळी त्यांची
प्राणज्योत मालवण्यापूर्वीही ते सकाळी फिरायला जाऊन आले आणि त्यानंतर
प्राणायाम सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुठल्याही व्यक्तीची
या जीवनाची अखेर इतर कुणालाही; अगदी घरच्या व्यक्तीलाही कुठल्याही प्रकारचा
त्रास न होता व्हावी, अशी इच्छा असते. सुदर्शनजी यांचीही तशीच इच्छा होती
आणि ती त्यांनी जीवनात बालपणापासून केलेल्या तपश्चर्येमुळे पूर्ण झाली.
सुदर्शनजी यांचा जन्म १८ जून १९३१ रोजी
रायपूर येथे झाला. कर्नाटकमधील म्हैसूर जिल्ह्यातील कुप्पहळ्ळी हे त्यांचे
मूळ गाव. वडील वन विभागाच्या सेवेत असल्याने वारंवार बदल्या होत असत.
त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण रायपूर, मंडला, दमोह या निरनिराळ्या
ठिकाणी झाले. विदर्भातील चंद्रपूर येथे त्यांनी उच्च माध्यमिक परीक्षा
उत्तीर्ण केली. नंतर जबलपूर येथे दूरसंचार विषयात अभियांत्रिकीची पदवी १९५४
मध्ये घेतली. शिक्षण पूर्ण होताच सुदर्शनजी संघाचे प्रचारक म्हणून काम करू
लागले. समाजाशी तेव्हापासूनच जुळलेली त्यांची नाळ अखेरपर्यंत कायम होती.
संघ म्हणून केवळ हिंदू समाज, हिंदू नेते आणि स्वयंसेवक यांच्यापुरतेच ते
मर्यादित राहिले नाहीत. जीवनाच्या सर्व स्तरांतील आणि भिन्नधर्मीय
नेत्यांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले. अगदी लहानात लहान शिशु
स्वयंसेवकाच्या घरी जाऊन त्याची वास्तपुस्त करणे त्यांना मनापासून आवडत
असे. इंग्रजीमधील उरींलह ींहशा र्ूेीपस ही म्हण त्यांनी आपल्या जीवनात
आचरून दाखवली. प्रचारक जीवनाची त्यांची सुरुवात मध्यप्रदेशातील रायगड
जिल्ह्यातून सुरू झाली. १९६४ मध्ये त्यांना मध्य भारताचे प्रांत प्रचारक
म्हणून आणि पुढे १९६९ मध्ये अ. भा. शारीरिक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात
आले. त्यांनी या जबाबदार्या अतिशय कटाक्षाने निभावल्या आणि संघ
स्वयंसेवकांवर आपल्या कार्याचा अमिट असा ठसा उमटविला. रा. स्व. संघापुढे
असलेली अनेक आव्हाने त्यांनी लीलया पेलून धरली. एखादी गोष्ट जशी ते
प्रेमाने पटवून देत असत, त्याचप्रकारे ती गोष्ट पटवून सांगण्यासाठी ते
कुणाचा कान धरायलाही कमी करीत नसत, याची प्रचीती संघ परिवातील अनेकांना
आली. सत्य कितीही कटु असले, तरी ते मांडण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला
नाही. यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात टीकादेखील सहन केली.
पूर्वांचलातील समस्येमुळे देशातील अंतर्गत सुरक्षा धोक्यात आल्याचे संघाने
फार पूर्वीच ओळखले होते. बांगलादेशी मुस्लिमांची घुसखोरी, ख्रिश्चनांचा
धर्मांतरणाचा डाव, विघटनवादी कारवाया या राष्ट्रीय समस्यांचे महत्त्व जाणून
त्याविरोधात जनजागृती करण्यासाठी सुदर्शनजी यांनी पूर्वांचलातच नव्हे, तर
सर्वदूर वनवासी भागात, दुर्गम पहाडी क्षेत्रात सातत्याने प्रवास केला.
कानडी मातृभाषा असलेल्या सुदर्शनजी यांचे संस्कृत, आसामी, बंगाली, मराठी,
हिंदी आणि इंग्रजी भाषांशिवाय निरनिराळ्या बोली भाषांवरही प्रभुत्व होते.
स्थानिक बांधवांशी ते त्यांच्या भाषेत संवाद साधून त्यांची मने जिंकून घेत.
१९७९ मध्ये त्यांच्यावर अ. भा. बौद्धिकप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात
आली. १९९० मध्ये ते सहसरकार्यवाह झाले. त्यांच्यातील संघकार्याची तडफ
जाणूनच रज्जूभय्यांनी त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले. सरसंघचालक
म्हणून कार्य करताना शाखाविस्तारावर त्यांचा अधिक भर राहिला. सलग नऊ वर्षे
त्यांनी जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे सरसंघचालक पद भूषविले. मात्र, ज्यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे
कार्य करणे कठीण होत असल्याचे ध्यानात आले, तेव्हा पदाचा आणि मानमरातबाचा
कुठलाही मोह न ठेवता आपल्या कार्याची धुरा डॉ. मोहनजी भागवत यांच्या
खांद्यावर सोपवून संघ स्वयंसेवकांच्याच नव्हे, तर या समाजातील सर्व
घटकांपुढे नेतृत्वाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला.
सुदर्शनजी आपल्या भाषणात नेहेमी सांगत,
‘जगात हिंदू चिंतन सर्वात आगळे असून, ते अन्य कुठल्याही समाजाजवळ नाही.
मानवजातीच्या संदर्भात पाश्चिमात्यांचे चिंतन केवळ त्याचे शरीर, मन आणि
बुद्धीपर्यंतच पोहोचू शकले आहे. त्यांनी जी मानवी सभ्यता विकसित केली आहे,
त्यात प्रतिस्पर्धा असून त्यांचे अंतिम लक्ष्य आधिपत्य गाजवण्याचेच राहिले
आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजनैतिक आदी क्षेत्रांत अग्रेसरत्व
मिळवण्याच्या आग्रहापायी पाश्चिमात्यांनी जगावर आतापर्यंत दोन महायुद्धे
थोपली असून, आज त्यांच्याच महत्त्वाकांक्षेपायी आणि विस्तारवादी व
साम्राज्यवादी धोरणांपायी जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे.’
त्यांचे हे विचार चिंतनीय आणि जगाला मार्गदर्शक असेच आहेत.
अस्खलित आणि धाराप्रवाही वक्तृत्वाची दैवी
देणगी त्यांना लाभली होती. त्यांची अनेक संस्मरणीय बौद्धिके आणि भाषणे संघ
स्वयंसेवक आणि अन्य लोकांच्या आजही स्मरणात आहेत. आसाम समस्या, पंजाब
समस्या, महाराष्ट्रातील सवर्ण-दलित दुरावा, मुस्लिम समस्या; या व
अशासारख्या अनेक विषयांना निश्चित वैचारिक दिशा देण्यात त्यांचा सिंहाचा
वाटा आहे. अप्रतिहत प्रज्ञेचे धनी असलेल्या सुदर्शनजी यांचा अनेक विषयांचा
गाढा व्यासंग होता. इस्लाम पंथ, हदीस, कुराण, बायबल यांचेही त्यांनी विशेष
अध्ययन केले होते. इस्लामवर ते बोलू लागले की, एखादा इस्लामी पंडित बोलतो
आहे की काय, असे वाटावे इतके त्यांचे या विषयावर प्रभुत्व होते. राष्ट्रीय
मुस्लिम मंचच्या उभारणीतही त्यांचे मोठे योगदान होते. अनेक ख्रिश्चन
धर्मगुरू व नेत्यांशीही त्यांची चर्चा होत असे. विभिन्न समुदायांतील कटुता व
बोचरेपणा कमी व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. शारीरिकप्रमुख म्हणून
संघात नियुद्धाचा अंतर्भाव करण्याचे श्रेय जसे त्यांना जाते, तसेच
सरसंघचालक झाल्यानंतर आग्रहाने ग्रामविकास हा स्वतंत्र पैलू संघाच्या
कामाला जोडण्याचा मानही त्यांच्याकडेच जातो.
आयुष्याच्या अखेरीस शरीर खंबीरपणे उभे
होते, तरीही स्मृती मात्र तितकीशी साथ देत नव्हती. त्यामुळेच सुमारे
महिनाभरापूर्वी म्हैसूर मुक्कामी ते काही तास बेपत्ता झाल्याचाही प्रकार
घडला होता. आठवण राहत नसे, त्यामुळे कधी कधी बोलण्यात पुनरुक्तीही होत असे,
तरीही शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याप्रमाणेच त्यांचे निरंतर मार्गदर्शन
समाजाला व कार्यकर्त्यांना लाभत होते. ‘आपली शवयात्रा जात असताना संघाची
शाखा सुरू असताना दिसली, तर आपण यमराजाला विनंती करू की, त्याने पाच मिनिटे
थांबावे. मी प्रार्थना करीन आणि मग पुढील प्रवासाला निघेन,’ अशा प्रकारची
उत्कट आणि हृद्य भावना त्यांनी सरसंघचालक पदाचा त्याग करताना व्यक्त केली
होती. स्वयंसेवकत्व अंगी मुरणे म्हणजे काय असते याचेच ते दर्शन होते.
‘त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयं’ या सर्व संघ स्वयंसेवकांच्या
आकांक्षेप्रमाणेच प्रदीर्घ व कृतार्थ जीवन व्यतीत करून एखाद्या
कर्मयोग्याप्रमाणे सुदर्शनजी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.
हिंदुत्वासाठी अर्थात भारतीयत्वासाठी, लोककल्याणासाठी, जगद्कल्याणासाठी,
मानवकल्याणासाठी आयुष्यभर झटणार्या या महामानवाला काळाने आपल्या उदरात
ओढून नेले आहे. त्यांच्या स्मृतीला तरुण भारत परिवारातर्फे शतशत नमन!
तरुण भारत संपादकीय
तरुण भारत संपादकीय
No comments:
Post a Comment