Tuesday, September 11, 2012

बाळासाहेब ठाकरे मुलाखत ४

वाघाची डरकाळी! शिवसेना तेजानं तळपत राहील!!
आई-बाप बदलता का? निष्ठा कायम ठेवा!
प्रेम करण्याच्या लायकीचा असेल तर मी दुश्मनावरही प्रेम करणारा माणूस आहे. सूडाचे राजकारण मला मान्य नाही. कारस्थानांपासून मी सदैव लांब राहिलो. शिवसेनेमध्येही कोणी कुणाशी सूडाने वागू नये!

संजय राऊत
मुंबई, दि. ९ - शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत म्हणजे विचारांचे वादळ. गेले चार दिवस हे वादळ देशात अनेकांना तडाखे देत आहे. मुलाखतीच्या शेवटच्या भागात शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या तडाखेबंद शब्दांत सांगितले, ‘‘मी न्यायाने वागतो, सूडाने नाही. शिवसेनेमध्येही कोणी कुणाशी सूडाने वागू नये.’’
शिवसेनाप्रमुखांनी राष्ट्रीय विचार मांडताना जो मंत्र दिला तो महत्त्वाचा, ‘‘इस्लामशी टक्कर द्यायची असेल तर हिंदू म्हणून एकजूट करावीच लागेल!’’
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय विचार मांडताना अनेकदा जनतेच्या भावनेला हात घातला. ‘‘मी माझ्या लोकांवरती प्रेम करणारा माणूस आहे. मला कोणताही मोह नाही, मला स्वत:ला काही कमवायचे नाही!’’
शिवसेनाप्रमुखांची मुलाखत म्हणजे विचारांची तेजस्वी आतषबाजीच ठरली. पुढचे अनेक दिवस या मुलाखतीचे पडसाद उमटत राहतील!
मुलाखतीच्या ‘फैरी’ अशा झडल्या -
तुमच्या व्यंगचित्रांचं पुस्तक येतंय.
- होय. उद्धव करतोय ती सर्व मांडणी.
तुम्ही शेकडो व्यंगचित्रं काढलीत.
- होय.
तुमच्या व्यंगचित्रांनी महाराष्ट्राला, देशाला, मराठी माणसाला जाग आणली. आज पुस्तकाच्या निमित्ताने तुम्ही ही व्यंगचित्रं काढता तेव्हा तुम्हाला काय वाटतं?
- मला दु:ख एवढंच होतं की, खरोखरच मी ही व्यंगचित्रं काढलीत काय? हे ब्रशचे फटकारे माझे आहेत काय? कारण आज मला डोळे त्रास देताहेत. डोळे माझे जड झालेले असतात. मला नीट दिसत नाही. दुसरं म्हणजे माझा हात थरथरतो. पूर्वीसारखा हात सरळ नाहीय, ही माझी दु:खं आहेत. ज्यावेळेला मी माझा विचार करतो तेव्हा मनात विचार येतो की, हे कसं मला जमलं? मी कशी काढू शकलो ही व्यंगचित्रं? हाच का तो हात? आणि हेच का ते डोकं? हा विचार मला खूप दु:खकारक ठरतो.
तुमच्या व्यंगचित्रांचा वारसा पुढे का नाही गेला?
- कोण नेणार? मला वाटलं राजा नेईल.
तुमची व्यंगचित्रं म्हणजे महाराष्ट्राची वाघनखंच आहेत.
- होय, आहेत ना. म्हणून तर शिवसेनेची डरकाळी महाराष्ट्रात पसरली!
पूर्वी व्यंगचित्र काढण्यालायक चेहरे होते. आज असे चेहरे तुम्हाला दिसतात काय?
- होय. मध्यंतरी गेले होते. ते आता पुन्हा आलेत. त्यामध्ये सोनिया गांधी आहेत. मनमोहन सिंग आहेत. राहुल गांधी आहेत. पृथ्वीराज चव्हाण आहेत. शरद पवार आहेत. बरेच आहेत. आडवाणीसुद्धा आहेत.
पुन्हा कुंचला हातात घेऊन व्यंगचित्रं काढावीत असं वाटतं का?
- वाटतं ना, पण आता वेळच मिळत नाही. आता हे जे काम पडलंय माझ्या अंगावर. व्यंगचित्रांची निवड करतोय मी. सगळीच व्यंगचित्रं काही छापता येणार नाहीत. तसं झालं तर मग आवृत्त्यांवर आवृत्त्या काढाव्या लागतील आणि काही आंतरराष्ट्रीय विषयांवरची व्यंगचित्रे आहेत. ती घेताना त्याचा इतिहास नव्या पिढीस समजून सांगावा लागेल.
महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी ‘लेखणी, कुंचला आणि वाणी’ याला फार महत्त्व होते. आदर होता. आज या गोष्टींना आपल्याकडे आदर राहिला आहे काय?
- आज त्याला बाजारी स्वरूप आलेलं आहे. हे जे संपादक बसलेत नं भडभुंजे. हे विकाऊ आहेत आणि टाकाऊ आहेत. हे राजकीय पक्षांचे चमचे झालेले आहेत. ते त्यांच्या लेखणीतून सरळ सरळ जाणवलेय.
असं कसं म्हणता तुम्ही?
- कसं म्हणता म्हणजे? त्यांच्या वृत्तपत्रांची जी सजावट असते त्यावरून समजतं की, हा या पक्षाच्या बाजूचा आहे. तो त्या पक्षाचा आहे. हे जे पक्षाची बाजू घेऊन टीकास्त्र सोडतात, त्यामुळे त्या लेखणीचे तेजच गेलेले आहे. व्यंगचित्रकार तर आता राहिलेलेच नाही म्हणा. राजकीय व्यंगचित्रकार फार कमी आहेत. जवळजवळ नाहीच. मी आणि लक्ष्मणनी जगवली आणि टिकवली. आता असे दणदणीत विचार देणारे, ज्याला आपण एक खोली म्हणतो ‘डेप्थ’ - राजकीय खोली. ती डेप्थ असलेले राजकीय व्यंगचित्रकार आता कुठेच दिसत नाहीत. बाकी काही बोलूच नका.
आणि वाणी...
- वाणी म्हणजे काय? वाण्यांचा आता प्रश्‍नच आहे.
तुम्ही शेवटचे आहात. ज्यांच्या ‘वाणी’ने महाराष्ट्राचे राजकारण हलत राहिले.
- आता वाण्यांची दुकानं निघाल्यामुळे मूळ वाण्यास कोणी किंमत देत नाही. सगळे वाणी जिकडे तिकडे बसलेले आहेत ‘दुकान’ मांडून. वाणीला अभ्यास लागतो. राजकारणात असाल तर राजकारणाचा अभ्यास लागतो. माईक आहे समोर म्हणून बोलायचं नाही. मग तसं त्या अण्णांच्या वेळेलासुद्धा तो केजरीवाल काय, किरण बेदी काय, फक्त तो शिसोदिया गप्प असायचा. आमची मेधा पाटकरसुद्धा काय! खाजवून घ्यायचे सगळे आपल्या जिभा. ती काय वाणी नव्हे. असंतोष, चीड, संताप व्यक्त करायलासुद्धा एक बैठक लागते. संताप आला म्हणजे काही शिव्याच द्यायच्या? मीही देतो ना? पण त्या शिव्यांनासुद्धा बैठक असली पाहिजे. आधार असला पाहिजे. ए भडव्या...म्हणून नुसतीच शिवी देऊन चालत नाही. त्यालाही कळलं पाहिजे की आपल्याला त्याने हाक मारली आहे.
शिवसेना नेहमीच तेजाने तळपत आली आहे.
- होय, ती तशीच तळपतच राहणार. माझ्या कडवट निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावरच इतकी वर्षं टिकलंय.
मराठी म्हणून पुन्हा सगळ्यांनी एक व्हावे असे वाटते का?
- ते तसे एक आहेत. मोडकळीस आलंय असं नका समजू, पण हे उठाव असतात. विषयांचे उठाव असतात. आता उठाव हा एक प्रकार जरा निराळा आहे. जसं काल-परवा झालं आझाद मैदानावर. तो एक विषय आहे, पण कायम आपण तयारीत राहिले पाहिजे. विषय असो नसो. जनजागृती ही तयार असावी नेहमी. जागृती ही विषयावरती अवलंबून नसावी. सरकारच्या मनामध्ये दबाव असला पाहिजे की, जनता ऐकणार नाही. आपण हा जर निर्णय घेतला तर जनता आपल्याला क्षमा करणार नाही. ही प्रवृत्ती सरकारची आणि आपली अशी असावी, पण आमची जनता सहन करते आहे आणि याचा फायदा सरकारला मिळतो. त्यामुळे सरकार पाच वर्षे, आणखी पाच वर्षे सत्तेवर राहातं. कारण जनतेची मांडणीच काही नाही. ही मेलेली मनं असलेली जनता...सरकारचा तोच मोठा ‘ऍसेट’ आहे.
सत्ता असो अगर नसो. शिवसेनाप्रमुखांनी कायम जनतेच्या हृदयावर राज्य केलं, पण याक्षणी तुमच्या हृदयात काय आहे...
- माझ्या हृदयात काही नाही. मी मोहापासून दूर राहिलो. जे माझ्याकडे असतं ते मी वाटत असतो. मला स्वत:ला काही कमवायचं नाही. सत्तेपासूनही मी दूर राहिलो. मला काहीही होता आलं असतं. महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या मंत्रिमंडळात जाऊन बसलो असतो. त्यापासून मी लांब राहिलो. फार पूर्वी शरद पवारांनी मला ‘जे.पी.’ बनवलं होतं. एका दिवसात मी ती पदवी परत केली. म्हटलं, नाही. या असल्या गोष्टीचा मला मोह नाही. मला परत असल्या गोष्टी देऊ नका. भरीस पाडू नका! विचारा शरद पवारांना. मी या सगळ्या मोहापासून दूर राहिलो आणि हेच लोकांना मोठं आश्‍चर्य वाटतं, की ही एकमेव व्यक्ती आहे हिंदुस्थानमध्ये, असं जनता म्हणते, जी खुर्चीपासून दूर राहिली. हाच माझा ‘ऍसेट’ आहे. हाच माझा आयुष्यातील ठेवा आहे. मी तो जपलाय की, लोकांना होऊ द्या. तुम्ही खुर्चीवर बसा. मी आहे तसाच राहीन. ही माझी नितांत इच्छा आहे. त्यावरती लोक प्रेम करतात.
तुमचं सारं जीवन जनतेसाठी समर्पित आहे, तरीही काही करावं असं राहिलंय वाटतं का?
- मी माझ्या लोकांवरती प्रेम करणारा माणूस आहे. मराठी मराठी मी करतोच. हिंदुत्वाचा खुलासाही मी केलेला आहे. परत परत किती खुलासे करायचे? तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेता आणि बाकीचं टाकून देता, मला झोडण्यासाठी. मग मी कशाला सारखे खुलासे करीत बसू? मी म्हटलंय की आज हिंदुस्थानची अशी परिस्थिती आहे की केवळ मराठी, केवळ पंजाबी, बंगाली, गुजराती करून भागणार नाही; कारण इस्लाम फार जोरात आहे हे आझाद मैदानावरती तुम्हाला दिसलं. असं असताना आपण मराठी म्हणून इस्लामशी एकएकटे लढू शकतो काय? बंगाली किंवा पंजाबी म्हणून एकाकी लढू शकतो काय? तो लाल, बाल, पालचा काळ गेला निघून. मग असं असताना एकच शब्द आहे ना तो हिंदुत्व! हिंदू म्हणून एकजूट झाल्याशिवाय आपण इस्लामशी टक्कर देऊ शकत नाही.
राजकारणात तुम्ही मित्र कमावलेत तसे दुश्मनही कमावलेत.
- होय. राजकारणात कशाला? व्यंगचित्रावरूनही मी दुश्मन्या घेतलेल्या आहेत.
पण दुश्मनांवरही अनेकदा प्रेम केलंय.
- पण दुश्मन प्रेम करण्याच्या लायकीचा असेल तर?
तुम्ही कधी सूडानं वागलात काय? -राजकारणात सूड उगवले जातात.
- नाही. मी कधीच केलं नाही ते. माझ्या रक्तात नाही. मी न्यायानं वागतो. सूडाने नाही. शिवसेनेमध्येही कोणी कुणाशी सूडाने वागू नये. राजकारणात मतभेद असतात, पण शत्रूचा पराभव निवडणुकीत करा. शत्रूलाही वाटले पाहिजे की, मर्द आहेत लेकाचे. मर्दाने माझा पराभव केला. सूड आणि कारस्थानापासून मी सदैव लांब राहिलो. मला ते जमले नाही, जमणार नाही. कारस्थानांमुळे यश मिळवणे मला मान्य नाही. मी नव्या पिढीलाही तेच सांगेन.
तुमच्या अगणित चाहत्यांना काय सांगाल?
- काय सांगणार? निष्ठा कायम ठेवा. निष्ठेमध्ये बाजारू वृत्ती आणू नका. नाही तर आज निष्ठावंतांची ये-जा हल्ली सुरूच असते ना. इकडले कडवट निष्ठावंत त्यांच्यात सामील. त्यांच्यातले कडवट निष्ठावंत आमच्यात सामील. हे...हे धंदे बंद करा. जिथे आहात तिथे निष्ठा ठेवा. आई-बाप बदलता का? नाही ना? मग आई-बाप बदलत नसाल तर मग पक्ष का बदलता? हेच मला सांगायचं आहे.


मराठी म्हणून इस्लामशी एकएकटे लढू शकतो काय? बंगाली किंवा पंजाबी म्हणून एकाकी लढू शकतो काय? तो लाल, बाल, पालचा काळ गेला निघून. मग असं असताना एकच शब्द आहे ना तो हिंदुत्व! हिंदू म्हणून एकजूट झाल्याशिवाय आपण इस्लामशी टक्कर देऊ शकत नाही.

वृत्तपत्रांची जी सजावट असते त्यावरून समजतं की, हा या पक्षाच्या बाजूचा आहे. तो त्या पक्षाचा आहे. हे जे पक्षाची बाजू घेऊन टीकास्त्र सोडतात, त्यामुळे त्या लेखणीचे तेजच गेलेले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकले आहेत. स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढही होणार आहे अशी चर्चा आहे. ही सध्याची परिस्थिती. तब्बल ३१ वर्षांपूर्वी ‘मार्मिक’च्या मुखपृष्ठावरील शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे हे व्यंगचित्र पहा. आजच्या काळातही अर्थपूर्ण वाटते. १८ जानेवारी १९८१ रोजी हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. काळ लोटला पण परिस्थिती कायम आहे. तेव्हाही सामान्य माणूस केंद्र सरकारच्या जुलमी धोरणांमुळे भरडला जात होता आणि आताही त्याची फरफट सुरूच आहे.
(समाप्त)

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी