Thursday, February 21, 2013

विवेकानंदांच्या विचारांचेऔचित्य

पी. परमेश्‍वरन, राष्ट्रीय अध्यक्ष, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीस्वातंत्र्याला ६५ वर्षे झाली असली तरीही भारत देश हा अजूनही राजकीय गोंधळ, आर्थिक विषमता, सामाजिक अराजक आणि वैचारिक संभ्रम यातून बाहेर पडत नाही. भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असल्याचा दावा आपण करीत असलो तरीही ती प्रत्यक्षात एकाधिकारशाहीच असल्याचे अनेकवेळा अनुभवास येते. आपण आर्थिकदृष्ट्या प्रगती केल्याचे आकडे जाहीर होत असले तरीही गरीब आणि श्रीमंत यातली दरी वाढत चालली आहे. विविध जातींच्या गटांत समाजाचे विघटन होत आहे. देशातल्या विद्यापीठांतून अनेक बुद्धिवंत बाहेर पडत आहेत, पण हे सुशिक्षित तरुण आपला देश, आपली संस्कृती, आपला इतिहास आणि त्याचे जगाच्या इतिहासातले कार्य याबाबत संभ्रमित झालेले असून, दिशाहीन झाले आहेत. संस्कृती, लोकसंख्या, विविधतापूर्ण नैसर्गिक संपदा असे अनेक गोष्टींनी मंडित झालेलो असूनही एक समर्थ देश म्हणून आपण जगातल्या घटनांत आपली अशी एक भूमिका वठवू शकत नाही.

     
   व्यक्तिगत व सामाजिक जीवनातही नैतिक मूल्यांचा वेगाने र्‍हास होत आहे. ज्या देशाची मुळे आध्यात्मिक मूल्यांत रुजलेली आहेत अशा देशात असे अध:पतन होते व मूल्यांचा अभाव जाणवतो तेव्हा हा घातक अध:पात आपले राष्ट्र म्हणून असलेले अस्तित्वच निरर्थक करीत असतो. एक गतिमान सामाजिक, राजकीय, आर्थिक ताकद म्हणून आपण स्थिर होत असतानाच जागतिकीकरणाने आपल्याला घेरले आहे. त्याचा वेग, त्यातून निर्माण झालेल्या मागण्या आणि त्यापोटी निर्माण झालेले अनेक प्रकारचे दबाव यामुळे आपल्या देशाला अपेक्षित त्या पदावर नेण्यास आपले नेते असमर्थ ठरले आहेत. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात प्रकट झालेली इच्छाशक्ती व विचारांतली स्पष्टता यांच्याशी ही असमर्थता विसंगत आहे. ते गुण आणि हा संभ्रम यातली विसंगती दूर झाली पाहिजे. जोपर्यंत ती दूर होत नाही व राष्ट्रीय आत्मविश्‍वास आणि आपल्या ध्येयाची वैभवशाली जाणीव निर्माण होत नाही तोपर्यंत हा संभ्रम दूर होणार नाही व वाटचालीला दिशाही मिळणार नाही. ज्यांचे जीवन व विचार आपल्या देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणादायी ठरले, त्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनाच्या दुसर्‍या शताब्दीत आपल्याला हे सारे मर्मग्राही विचार उत्तेजना देत आहेत. त्या नेत्यांपैकी प्रत्येकाने स्वामीजींची देशाप्रती असलेली बांधिलकी आणि समर्पण याची प्रशंसा केलेली आहे. त्यांनी नि:संदिग्धपणे स्वामीजींच्या त्या प्रेरणेची पावती दिलेली आहे. त्यातली महात्मा गांधी यांची आदरांजली तर संक्षिप्त पण बोलकी आहे. ते म्हणतात, 'मी स्वामीजींच्या विचारांचे अवलोकन केले तेव्हा माझी देशभक्ती हजारपटींनी वाढली.' महात्मा गांधी यांच्यासारख्या श्रेष्ठ नेत्याने अशा प्रभावी शब्दांत केलेल्या या प्रशंसेसारखी आणखी कोणती आदरांजली असू शकेल? चक्रवर्ती राजगोपालाचारी हे तीक्ष्ण बुद्धीचे नेते होते. त्यांनी तर स्वामीजींचे कायर्र् आणि विचार यांचे वर्णन अतिशय समर्पक शब्दांत केले आहे. ते म्हणतात, 'स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म आणि देश वाचविला. आपण त्यामुळे स्वामीजींचे देणे लागतो. ही श्रद्धा आणि स्वामीजींचे धैर्य हेच आपल्याला त्यांनी दिलेला हा वारसा जपण्याची प्रेरणा देणार आहे. यावर कोणीही असा प्रश्‍न विचारील की, या स्वातंत्र्य सेनानींची एवढी बांधिलकी होती तर आज अशी स्थिती का निर्माण झाली आहे? या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला परखडपणाने शोधावेच लागणार आहे. या महापुरुषांनी दिलेली वचने व प्रत्यक्षातली स्थिती यात फरक का पडला? हे आपल्याला शोधावेच लागणार आहे. त्यांनी पाहिलेली स्वप्ने व आपली आजची स्थिती यात तफावत का पडली? याचा पडताळा घ्यावाच लागणार आहे. तो घेतल्यास असे आढळते की, या नेत्यांनी स्वामीजींच्या विषयांना दिलेली मान्यता तेवढी पक्की नव्हती. त्यांच्या समोरच्या आव्हानांना तोंड देण्यास त्यांना सक्षम करील एवढी ती दृढ नव्हती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६० वर्षे पूर्वी स्वामीजींनी आपल्या एका भाषणात बोलताना, आगामी ५० वर्षे आपल्याला सगळ्या देवांचा विसर पडला तरी चालेल, पण केवळ भारतमाता हा एकच देव आपल्या चिंतनात असला पाहिजे, असे म्हटले होते. आपल्या मातृभूमीत स्वामीजी विराट ईश्‍वर दर्शन पाहत होते. कोठेही आपल्याला याच देवाचे चरण, याच देवाचे हात व याच देवाची मूर्ती दिसत असते. एवढा सर्वत्र दर्शन देणारा देव सोडून देऊन बाकीच्या काल्पनिक देवांची पूजा करण्यात काय अर्थ आहे ?या विराटरूपाचे आपण दर्शन घेऊ, त्याचे पूजन करू तरच आपल्या या सार्‍या बाकीच्या देवांची पूजा करता येणार आहे. आपल्या नेत्यांची भारतमातेविषयीची आपली भावना स्वामीजींच्या या कथनाप्रमाणे तीव्र होती का? ती तशी नव्हती म्हणूनच त्यांनी आपल्याच देशातल्या एका गटाच्या दबाव नीतीपुढे गुडघे टेकून देशाची फाळणी स्वीकारली होती की नाही? आपल्या देशातल्या या मान्यवर नेत्यंानी फाळणी स्वीकारून एक मोठी चूक केली, जिचे परिणाम आजही जाणवत आहेत. ही चूक त्यंानी लवकरात लवकर खंडित का होईना परंतु सत्ता आपल्या हाती यावी म्हणून तर केलेली नाही ना, अशी शंका येते. स्वामीजींचा संदेश शंभर टक्के अमलात आणण्याच्या बाबतीत त्यांनी चूक केली म्हणूनच आपल्याला हे परिणाम भोगावे लागत आहेत. एका वाक्यात सांगायचे झाले तर स्वामी विवेकानंद यांची प्रिय मातृभूमीची कल्पना या नेत्यांच्या गळी नीट उतरली नव्हती, त्यामुळे हे अनर्थ घडले. त्यानंतर तर देशाच्या उद्धारासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक मूल्याच्या बाबतीत या नेत्यांनी तडजोडच केली. देशाच्या भवितव्या विषयीच्या आशावादाची जागा निराशेने घेतली आणि ही प्रक्रिया स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षानंतरही जारी राहिली आहे. 

॥2॥
वर्चस्व नव्हे समन्वय
 या ६५ वर्षांच्या काळात नवी पिढी उदयाला आली. जग बदलून गेले. भारत देशातही नवा विचार आणि नव्या कल्पना यांचे वादळ आले. त्यातील अनेक कल्पना परदेशातून आलेल्या आहेत. विवेकानंदांसारख्या मंत्रदृष्ट्या महात्म्याचे तेजस्वी विचार या नव्या कल्पनांपुढे दुय्यम ठरविण्यात आले. वास्तविक त्यांचे विचार आधुनिक भारताच्या उभारणीसाठी निरपवाद आणि मार्गदर्शन ठरणारे आहेत, परंतु त्यांचीही बेदखल करण्यात आली. त्यामुळे समाजामध्ये स्वार्थ, भ्रष्टाचार, सत्तेचे राजकारण, जातीय संघर्ष यांचे थैमान सुरू झाले. आपल्या देशातल्या सरकारने स्वामी विवेकानंदांची जयंती देशभर राष्ट्रीय युवादिन म्हणून पाळण्याची घोषणा केली. या कृतीतून सरकारने स्वामीजींविषयीचा आदर व्यक्त केला खरा, परंतु स्वामीजींचे आदर्श आणि त्यांच्या कल्पना याविषयी समाजाच्या स्तरावर म्हणाव्या तेवढ्या गांभीर्याने जागरण झाले नाही आणि राष्ट्रीय युवकदिन हा एक सरकारी उपचार ठरला. त्यामुळे हा दिवस जाहीर होऊन सुध्दा समाजात बोकाळलेल्या वरील दुर्गुंणाच्या जागी स्वामीजींच्या आदर्शांची प्रतिष्ठापना होऊ शकली नाही. परिणामी मूल्यांच्या संदर्भात निर्माण झालेला संभ्रम या पिढीत सुध्दा कायम राहिला.



स्वामीजी कट्टर राष्ट्रवादी होते. ते आपल्या देशाविषयी आणि त्याच्या महानतेविषयी अतिशय भावपूर्णतेने बोलत असत. एवढेच नव्हे तर जगाचे चित्र बदलण्याच्या बाबतीत भारताची भूमिका काय आहे आणि काय असू शकते? याबाबतही त्यांनी उचित मार्गदर्शन केलेले आहे. स्वामीजींनी आजच्या काळात निर्माण झालेल्या सर्व प्रश्‍नांना सुयोग्य, तर्काधिष्ठित आणि कालसुसंगत अशी उत्तरे देऊन ठेवली आहेत. जागतिकीकरणामुळे राष्ट्रवाद कालबाह्य ठरण्याची काही गरज नाही, असे स्वामीजींनी बजावले आहे. उलट राष्ट्रवाद आहे म्हणूनच जागतिकीकरण आहे असे त्यंानी म्हटलेले आहे. जगातले वेगवेगळे देश स्वत:चे वेगळे अस्तित्व मानतात म्हणूनच त्या प्रत्येक देशांमधला प्रेमाचा धागा बळकट करण्याची कल्पना निर्माण झालेली आहे. देश वेगवेगळे नसते तर त्यातून जगही निर्माण झाले नसते आणि जागतिक विचारही निर्माण झाला नसता. राष्ट्रवादाची कल्पना ही मानवी उत्क्रांतीच्या अवस्थेतली महत्त्वाची अवस्था आहे. ती कल्पना कधीही कालबाह्य ठरणारी नाही. सार्‍या देशांची एक संघटना निर्माण करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक प्रक्रिया राष्ट्रवादामुळेच निर्माण होऊ शकते. हे स्वामी विवेकानंदांनी फार पूर्वीच सांगून ठेवलेले आहे. भारतीय राष्ट्रवादाची कल्पना तर पाश्चात्य देशातल्या राष्ट्रवादाच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पाश्चात्य देशांची ती कल्पना नकारात्मक आहे. पण भारताची राष्ट्रवादाची कल्पना सकारात्मक आणि भावात्मक आहे. स्वामीजींनी हे दाखवून देत असतानाच प्रत्येक राष्ट्र हे एकात्म घटक असल्याचे म्हटले आहे आणि या प्रत्येकाची या मानवतेच्या भवितव्याच्या जडणघडणीमध्ये एक विशिष्ट भूमिका आहे. त्या घटकाच्या स्वभावानुसार ही भूमिका निश्चित झालेली असते. त्या देशाने मानवतेला द्यावयाचा संदेश त्याच्या त्या स्वभावावर ठरलेला असतो. त्यामुळे प्रत्येक देशाने आपली मानवतेच्या इतिहासातली ही भूमिका आधी समजून घेतली पाहिजे. आपले त्यातले स्थान समजून घेतले पाहिजे आणि सारी मानवता एकात्म व्हावी यासाठी बजावावयाची आपली कामगिरी काय आहे, हेही समजून घेतले पाहिजे. ही भूमिका, हे औचित्यपूर्ण करण्यानेच त्या देशाच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होत असतो. अशी प्रत्येक देशाला एक भूमिका आहे. त्यामुळे प्रत्येक देश दोन देशांच्या मधल्या समन्वयामध्ये आणि एकीकरणामध्ये विशिष्ट भूमिका बजावू शकतो. त्यातून मानवी एकात्मतेचा साक्षात्कार घडू शकतो. या साक्षात्काराचे स्वप्न हिंदू विचारवंतांनी पाहिलेले आहे आणि या स्वप्नाला 'वसुधैव कुटुंबकम' या संकल्पनेत बद्ध केलेले आहे. या कल्पनेमध्ये कोणत्याही देशाचे वर्चस्व त्यांनी कल्पिलेले नाही. सर्वांचा समन्वय कल्पिलेला आहे. 

॥3॥

भारताची भूमिका 
मानवी जात आणि तिच्या इतिहासांचा वरवरचा विचार करणारे विचारवंत जागतिकीकरण हीच मानवी एकात्मतेची शेवटची पायरी असल्याचे मानत असतात. कधीकाळी असा एक विचार मांडलाही गेला आहे की सारे जग, सगळे देश आणि सगळ्या संस्कृतीची मिळून अशी एक साधी यंत्रणा निर्माण होईल, पण इतिहासाची साक्ष त्याला दुजोरा देत नाही. कारण मानवी जीवात विविधता आहे. ते जीवन इतके व्यामिश्र आहे की, त्याला एकजिनसीपणा, एकरसता मानवतच नाही. ते त्याचं अंतिम ध्येय किंवा इप्सित होऊ शकत नाही. तसे करण्याचे सगळे प्रयत्न फसले आहेत. राजेशाही, लोकशाही आणि समाजसत्ताशाही या सर्वांना अशा प्रयत्नात तात्पुरते यश आणि शेवटी पतन याच मार्गावरून जावे लागले आहे. त्या सर्वांना अपयश आले असले तरी इतिहास मात्र वाटचाल करीतच आहे. स्वामीजींनी याबाबतीत म्हणून ठेवले आहे की, कोणतीही विचारपध्दती अद्वैताच्या आधारावर उभी राहत नाही तोपर्यंत ती टिकू शकत नाही. मग ती किती का उदात्त असेना, समाजावाद आणि साम्यवाद यांचे उद्दिष्ट समता आणि सामाजिक न्याय असे होते, पण शेवटी हे विचारही टिकले नाहीत. जागतिकीकरण हाही मानवी जीवनाच्या वाटचालीतला मैैलाचा दगड ठरणार आहे. ही प्रक्रिया मानवाच्या इतिहासावर आपला असा एक ठसा उमटविणार आहे, पण त्यालाही मागे टाकून इतिहासाची वाटचाल पुढे सुरूच राहणार आहे. राजेशाही, समाज सत्ताशाही, लोकशाही आणि भांडवलशाही यापैकी कोणालाही राष्ट्रवाद संपवता येणार नाही. मानवी एकात्मता आणि सांस्कृतिक विविधता या राष्ट्रवादाच्या साह्याने साकार होतील.
या सगळ्यात भारताची भूमिका काय असेल? स्वामीजींनी नि:संदिग्धपणे म्हटले आहे, भारताचा आत्मा त्याच्या आध्यात्मिकतेत आहे. आध्यात्मिक विचारांच्या साह्याने स्वत:चा विकास घडविणे आणि वैदिक आदर्शांच्या आधारे मानवतेला मदत करणे हेच भारताचे जागतिक कार्य आहे. आध्यात्मिकता म्हणजे केवळ काही कर्मकांड नव्हे, ती एक जीवनपध्दती आहे. समुत्कर्ष आणि नि:श्रेयस या दोन संकल्पनांचा या जीवनपध्दतीत समावेश होतो. ज्यांचा अर्थ आहे भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक जागृती. स्वामीजींनी भविष्यातला भारत हे एक आध्यात्मिक जागृती झालेले राष्ट्र होईल असे मानले होते. त्यांच्या दृष्टीने भारत हा प्रगत, सामाजिक सद्भाव जागवणारा, तंत्रज्ञान समृध्द असा राष्ट्रीयत्वाच्या भक्कम पायावर उभा राहिलेला पण सार्‍या विश्वाशी सलोखा ठेवणारा देश होणार होता.

॥4॥
धार्मिक संघर्षावर उपाय
स्वामीजींनी सर्व धर्म आणि त्यांचे धर्मग्रंथ यांना मान्यता दिली होती, पण त्यांनी माणसाला या सर्वधर्मांच्या भेदापलीकडे जाऊन एका आध्यात्मिक चेतनेत जागे व्हावेच लागणार आहे, असे आग्रहाने प्रतिपादन केले होते. आपल्याला अशा एका विश्वात जावे लागणार आहे. जिथे वेद नसतील, बायबल नसेल आणि कुराणही नसेल, पण त्यासाठी वेद, बायबल आणि कुराण यांच्यात सौहार्द्र निर्माण करावे लागेल. स्वामीजींच्या मते भारताची भूमिका दुहेरी होती. भौतिक प्रगती केलेल्या देशांना आध्यात्मिकता शिकवणे ही त्यातली एक भूमिका असेल. दुसर्‍या भूमिकेत भारताला पाश्चात्य देशांकडून तंत्रज्ञान, सामाजिक संघटना बांधण्याची कला हे शिकून घेऊन स्वत:चा समतोल आर्थिक विकास घडवावा लागेल. भारतीयांनी पाश्चात्य देशात गुरू म्हणून जावे, भिकेचा कटोरा पसरून काही मागण्यासाठी जाऊ नये, असा त्यांचा आग्रह होता. असे झाले तरच जगात आपला मान वाढेल असे त्यांचे मत होते आणि स्वामीजी स्वत:च असे एका गुरुचे ज्वलंत उदाहरण होते. त्यासाठी आपण आपल्या जीवनपध्दतीविषयी दृढ राहिले पाहिजे. आपण इतरांकडून काही शिकू शकतो. स्वत्व न सोडताही आपल्याला तसे करता येते. शिकागो येथे केलेल्या आपल्या त्या सुप्रसिध्द भाषणातही स्वामीजींनी भारताच्या वैशिष्ट्यूपर्ण शिकवणुकीची जगाला का गरज आहे हेच आवर्जुन सांगितले होते. जगात असे काही धडे आहेत की, जे केवळ भारतच जगाला शिकवू शकतो. स्वामीजींनी हे भाषण दिले तेव्हापेक्षाही आज या विचारांची जगाला जास्त आवश्यकता आहे. शिकागोच्या त्या सर्वधर्म संमेलनाचा उल्लेख करून स्वामीजींचे असे आयोजन हेच मुळात गीतेतल्या तत्वांना पुष्टी देणारे ठरले असल्याचे म्हटले होते. गीतेत श्रीकृष्णाने म्हटलेले आहे की, प्रत्येकाची उपासना पध्दती भिन्न असली तरी शेवटी सर्वांची प्रार्थना मलाच प्राप्त होत असते.
मानवी जातीला हे शिकवावे लागेल की, हे निरनिराळे पंथ म्हणजे एका परमेश्वराच्या प्राप्तीचे निरनिराळे मार्ग आहेत. ज्याला जो मार्ग आवडतो तो त्याने निवडावा, पण शेवटी सार्‍या जगाचा एकच धर्म (रिलिजन नव्हे) असावा असा प्रयत्न करायचाच झाला तर तशी योग्यता केवळ वेदांतातच आहे, कारण तोच एक धर्म सर्व पंथांच्या पल्याड जाणारा आहे. तो पूर्णपणे शास्त्रीय आहे आणि त्यातली तत्वे पडताळून पाहता येतात.

॥5॥
दिशाहीनतेचे एक कारण
स्वातंत्र्यानंतर हिंदू या शब्दाची फार बदनामी करण्यात आली. हिंदू म्हणवून घेणे ही शरमेची बाब आहे, असा विचार काही विचारवंतांनी समाजात रूढ केला. ही बाब स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी विसंगत आहे. स्वामीजींना या देशाला हिंदुराष्ट्र म्हणणे मान्य नव्हते, असा अपप्रचार केला गेला. हिंदुत्व म्हणजे संकुचितपणा, तेव्हा त्यापासून दूर राहिलेले बरे! अशी विचारसरणी रूढ झाली. तिला बर्‍याच उच्चपदस्थांनी दुजोरा दिला. स्वामीजींच्या हिंदुत्वाच्या कल्पनेचा विपर्यास करण्याचा हा सुनियोजित डाव होता. त्यामागे राजकीय हेतू होता. त्यात डावे, पुरोगामी आणि सेक्युलॅरिस्ट सहभागी होते. सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना नष्ट करणे, राष्ट्रीय एकात्मतेची भावना नष्ट करणे, हा त्यामागचा हेतू होता. मोठ्या चतुराईने टाकलेल्या या डावाला सत्ताधार्‍यांची फूस मिळून हिंदू राष्ट्रवादाची भावना अभिमानक्षीण झाला. या सार्‍या गोष्टी स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या विरोधात घडत होत्या. वास्तविक स्वामीजी हे हिंदू राष्ट्रवादाचे आद्य आणि आघाडीचे प्रणेते आहेत. स्वामीजींच्या काळात सुध्दा हिंदुत्वाची लाज बाळगणारे काही आत्मघातकी हिंदू अस्तित्वात होतेच. त्यामुळे स्वामीजींनी तेव्हा आपण हिंदू आहोत याचा आपल्याला अभिमान आहे, असे आवर्जून जाहीर केले होते.
 स्वामीजींच्या पावलावर पाऊल टाकून योगी अरविंदांसारख्या महान नेत्यांनीही भारत हे हिंदुराष्ट्र असल्याचे आणि सनातन धर्म हा त्याचा आत्मा असल्याचे उद्घोषित केले होते. सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म हे त्यांना पटलेले होते. त्यांनी आपल्या लिखाणात आणि भाषणात सातत्याने हिंदू राष्ट्रवाद ही कल्पना प्रतिपादिली होती. त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येत असे म्हटले होते, भारतीय राष्ट्रीयत्वाची निर्मिती म्हणजे भारताच्या विखुरलेल्या आध्यात्मिक मूल्यांचे एकत्रीकरण होय. ज्यांच्या हृदयाचे स्पंदन या आध्यात्मिक मूल्यांसाठीच असते अशा लोकांचे एकत्रीकरण म्हणजेच हिंदुराष्ट्र होय. अशा कल्पनांची नकारार्थी किंवा प्रतिक्रियावादी अशी संभावना केली जाते, पण या कल्पनांत तसे काहीही नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या कल्पनांची तशी बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे देशाचा इतिहास, परंपरा, संस्कृती आणि जगाकडे पाहण्याचा उदात्त दृष्टिकोन याविषयी अनादर वाढला आहे. स्वामीजींनी आपल्या मनी मानसी जोपासलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि स्वत्वाच्या कल्पना त्यामुळे पायदळी तुडवल्या गेल्या आहेत. भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते हा घातक विचार आजचे सुशिक्षित लोक स्वीकारायला लागले आहेत आणि स्वत:ला एक विस्कळीत, बिनबुडाचा समाज समजायला लागले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या दिशाहीनतेचे आणि मूल्यहीनतेचे हे एक कारण आहे. म्हणून स्वामीजींच्या जयंतीचा दिवस हिंदूंसाठी स्वत:लाच शोधण्याची एक संधी आहे.

॥6॥
जागतिकीकरणाचे स्वागतच केले असते...
स्वामीजी आज हयात असते तर त्यांनी जागतिकीकरणातल्या काही गोष्टींचेही स्वागत केले असते. जडवाद आणि बीभत्स उपभोक्तवाद यांनी ग्रासलेल्या जगाला आध्यात्मिक विचार शिकविण्यासाठी भारताला या प्रक्रियेतून संवाद साधने उपलब्ध झाली आहेत. म्हणून त्यांनी त्यासाठी जागतिकीकरणाचे स्वागत केले असते. पूर्वी अनेकदा हा विचारांचा प्रवाह भारताकडून पाश्चात्य जगाकडे गेलेला आहे. तो कसा? हे स्वामीजींनी आपल्या भाषणात वारंवार सांगितलेले आहे.
जगातले विविध देश आता जागतिकीकरणामुळे जवळ येत आहेत, पण पूर्वी वसाहतवाद, धार्मिक प्रचार किंवा व्यापाराच्या निमित्ताने ते जवळ येत होतेच. जेव्हा जेव्हा तसे घडत असे तेव्हा भारताने त्या जवळिकीचा लाभ घेऊन आपले आध्यात्मिक विचार जगाला दिलेले आहेत. तसेच आजही घडणार आहे. भारताचे आध्यात्मिक विचारधन आज जगाच्या कानाकोपर्‍यात सावकाशीने पण दृढपणे पसरायला लागले आहेत आणि त्यांचे परिणामही दिसायला लागले आहेत. हेच काम भारतीयांनी सुनियोजितपणे आणि आत्मविश्वासाने केले पाहिजे. तसे केले असते तर बदलत्या जगावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे त्यांना शक्य झाले असते, पण तसे झाले नाही. सारे जग भारतीय तत्वज्ञानाला शरण जाण्यास आतुरलेले असताना स्वत: भारतीय लोक मात्र आपल्या तत्वज्ञानाबाबत न्यूनगंडाची भावना बाळगून राहिले. आपल्या आध्यात्मिक अधिकाराबाबत ते स्वत:च संकोचत राहिले. सरकार तर या परंपरेपासून चार हात दूर राहण्यातच धन्यता मानत राहिले.
  जागतिकीकरणाने पूर्व-पश्चिम संबंधांना आणखी एक आधार दिला आहे. पूर्व आणि पश्चिम दोन भिन्न संस्कृतींचे प्रतिनिधित्व करीत असतात. स्वामीजींचे याही बाबतीत फार चांगले विश्‍लेषण आहे. पाश्चात्य संस्कृती, माणसाचे यश, त्याच्या कमाईवरुन तो किती सुखोपभोग घेऊ शकतो आणि आनंद घेऊ शकतो यावरून मोजते. पौर्वात्य संस्कृती माणसाचे यश तो किती कमी कमाई करून आनंद घेऊ शकतो, यावरून मोजते. अमेरिका, पाश्चात्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय संस्कृती अपरिग्रहाच्या कल्पनेवर तर अमेरिकी संस्कृती उपभोगाच्या कल्पनेतवर आधारलेली आहे. भारताच्या संस्कृतीत दधिचीचा तर अमेरिकेच्या संस्कृतीत ययातीचा आदर्श मानला जातो. या दोन संस्कृती जवळ आल्या आहेत. त्यातून काही अनिष्ट गोष्टी घडत आहेत, पण भारताचे अपरिग्रहाचे तत्वज्ञान अमेरिकेला शिकविण्याची संधी मिळत आहे.
स्वामीजींनी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे. हिंदू संस्कृतीला आधुनिक विज्ञानाचे काही वावडे नाही, उलट हिंदूंना असे वाटते की, आपल्या पूर्वजांनी आजवर जे जे काही सांगितले आहे, तेच या आधुनिक विज्ञानात जोरकसपणे आणि नव्या पध्दतीने सांगितले आहे. अन्य धर्मीयांना मात्र आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करणे म्हणावे तेवढे सोपे नाही. आजवरचा इतिहास त्याला साक्षी आहे.
या संदेशाचा शेवट आपण ख्यातनाम इतिहासकार ए. एल. बालम यांच्या स्वामीजीं-विषयीच्या विधानाने करणार आहोत. त्यांनी म्हटले होते, स्वामी विवेकानंद यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली, तरी जगाच्या इतिहासात त्यंाच्या कार्याचे योगदान किती, याचे मूल्यमापन करणे कठीण जात आहे. काही इतिहासकारांनी तसा प्रयत्न करून स्वामीजींच्या योगदानाचे मोजमाप केले आहे, पण प्रत्यक्षात ते योगदानापेक्षा जास्त आहे. जसजसा काळ पुढे जाईल, अनेक अनपेक्षित आणि मती गुंग करणार्‍या घटना घडून जातील. शतके पार पडतील तेव्हा स्वामीजींची आठवण आधुनिक जगाला वळण लावणारा शिल्पकार अशी काढली जाईल. आपण स्वामीजींची जयंती साजरी करतो. यानिमित्ताने आपण जागे झाले पाहिजे. जागतिकीकरणाने आपल्यासमोर उभी केेलेली आव्हाने स्वीकारून स्वामीजींनी अपेक्षिलेली भूमिका पार पाडण्यास सज्ज झाले पाहिजे.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी