Thursday, February 21, 2013

नरेंद्र मोदी फुकटचा लाभ उठवत आहेत…

* भाऊ तोरसेकर यांचा लेखहिंदू व्होटबॅन्क कशी निर्माण होत आहे?साभार - भाऊंचा ब्लॉग  
कालच्या म्हणजे बुधवार दिनांक १३ फ़ेब्रुवारी २०१३ च्या ‘महाराष्ट्र टाईम्स’ दैनिकातली ही बातमी आहे. कुठल्या वाहिनीवर ही बातमी बघितल्याचे तुम्हाला आठवते का? मोहन भागवत किंवा आसाराम बापू त्यांच्या खाजगी कार्यक्रमात काय बोलले; त्याबद्दल आकाशपाताळ एक करणार्‍या वाहिन्यांना ही सनसनाटी बातमी का वाटली नाही? मूळ बातमी जशीच्या तशी वाचा आणि तुम्हीच ठरवा.


अलीगढ युनिव्हर्सिटीत भारत मुर्दाबाद
'अफझल तेरी याद में रो रही ये जमीं, रो रहा आसमाँ... अफझल के वारिस जिंदा है... आय एम अफझल, हँग मी टू इंडिया... वी ऑल आर अफझल... भारत मुर्दाबाद...
भारताविरोधातील ही घोषणाबाजी पाकिस्तान, चीन किंवा भारताच्या कुणा शत्रू राष्ट्रात झालेली नाही; तर भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील आहे. तीही दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनासाठी. भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या संसदेवर आत्मघाती हल्ला घडवून आणणारा खरतनाक दहशतवादी अफझल गुरूचा कैवार घेत सोमवारी शेकडो मुस्लीम विद्यार्थ्यांनी सोमवारी अलीगढ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जोरदार मोर्चा काढला. 'शहीद मिस्टर अफझल गुरू' अशा आशयाचे बॅनर, पोस्टर या विद्यार्थ्यांच्या हातात होते. अफझलला फाशी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. 'यू किल्ड वन अफझल अँड गेव बर्थ टू हंड्रेड अफझल...' अशा धमकीवजा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी साध्वी प्रज्ञासिंह व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशी देण्याची मागणीही करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या निदर्शनाकडे विद्यापीठ प्रशासनाने पूर्ण कानाडोळा केला.
   वाहिन्यांना ही बातमी का वाटू नये? असे फ़क्त उत्तरप्रदेशच्या एका विद्यापिठात झालेले नाही. असेच वातावरण काश्मिर खोर्‍यात आठवडाभर आहे. पण कोणी स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणारे त्याबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. इतके मुस्लिम तरूण श्रीनगरपासून अलिगडपर्यंत स्वत:ला अफ़जल गुरू म्हणवून घेतात, त्याचा अर्थ काय होतो? त्यांना त्याने संसदेवर हल्ल्यात घेतलेला सहभाग हा गुन्हा वाटत नाही, असाच त्याचा अर्थ होतो ना? आपणही अफ़जल गुरू आहोत आणि आपल्यालाही फ़ाशी द्या, असे सांगणारा आपण भारतप्रेमी वा राष्ट्रवादी आहोत याची साक्ष देत असतो की आपणही अफ़जलसारखे जिहादी आहोत, अशी घोषणा करत असतो? आणि हे विद्यापिठात चालते, तेव्हा सेक्युलर मंडळींना घातक का वाटत नाही? कुणा मुस्लिम विचारवंत वा नेत्यांना त्यात धोका का दिसत नाही? की सेक्युलॅरिझम म्हणजेच अफ़जल गुरूने केलेले कृत्य असे त्यांना वाटते आहे? असे शेकडो प्रश्न आज सामान्य भारतीयांच्या मनात घोंगावत आहेत आणि त्याची उत्तरे द्यायला कोणी मुस्लिम नेता वा सेक्युलर नेता, विचारवंत पुढे आलेला नाही. मग अशा भारतीयांना काय वाटत असेल? त्यांना संसदेवरचा हल्ला किंवा तत्सम घटनांचे समर्थक कोण वाटत असतील? त्यावर त्यांना कोणता उपाय सुचू शकतो? यावर कोण उपाय देऊ शकतो; असे या भारतीयांना वाटेल? आपण अशा प्रश्नांची उत्तरे शोधली; तर मग नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दंगलीचे आरोप त्यांच्यावर करूनही का वाढतेय, त्याचे उत्तर मिळू शकते. मोदी यांचा जो मुस्लिम विरोधी चेहरा आहे; तोच अशा सेक्युलर थोतांडावरचा उपाय लोकांना कशामुळे वाटू लागला आहे, त्याचे उत्तर अशा प्रश्नांच्या उत्तरामध्ये लपलेले आहे. आणि त्याचे सुत्र मोदी यांनी लपवून ठेवलेले नाही. मोदी यांची लोकप्रियता इस्लामी दहशतवादाची प्रतिक्रिया आहे. आणि जितक्या अशा घटना घडत जाणार आहेत व पाठीशी घातल्या जाणार आहेत; तेवढी मोदींची लोकप्रियता वाढतच जाणार आहे, मग ते कोणाला आवडो किंवा नावडो. त्याला पर्यायच नाही.

   जयपुरच्या भाषणात अकारण गृहमंत्री शिंदे यांनी भगव्या दहशतवादाची भाषा केली. अकारण एवढ्यासाठी म्हणायचे, की त्यात तथ्य अजिबात नव्हते. पण तशी अकारण सुद्धा नव्हती. ती भाषा मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याला खुश करण्यासाठी वापरली होती. त्यावर इतकी संतप्त प्रतिक्रिया उमटेल; अशी कॉग्रेसची अपेक्षा नव्हती. पण मग त्यावर थातुरमातूर उपाय योजण्याच्या घाईत नंतर हिंदू मतांना खुश करण्याचा मुर्खपणा करायची नामुष्की ओढवली. त्यासाठीच मग घाईगर्दीने अफ़जल गुरूला फ़ासावर लटकवण्याची वेळ आली. पण त्यातून साधायचा परिणामही उलटला. कारण आपला मुस्लिमधार्जिणेपणा जयपूरला दाखवला, त्याने शिरजोर झालेले कडवे मुस्लिम अफ़जल गुरूच्या समर्थनासाठी घराबाहेर पडले. त्यांच्यावर लाठ्य़ा चालविण्याचीही हिंमत यांच्याकडे उरलेली नाही. म्हणजे जयपूरच्या भाषणातून मुस्लिमांना खुश करण्याचे प्रयास वाया गेलेच. पण उलट त्यातून अशी स्थिती आणली गेली, की अफ़जलचे समर्थन करणार्‍यांना रोखता येत नसल्याचेही दिसून आले. बिचार्‍या अफ़जलचा बळी मधल्यामधे गेला आणि हिंदूंनाही खुश करता आले नाही, की मुस्लिमांनाही खुश ठेवता आलेले नाही. सहाजिकच दोन्हीकडून मोदी व त्यांच्या हिंदुत्वाच्याच पथ्यावर सगळा डाव पडला आहे. जयपूरच्या मुर्खपणानंतर कॉग्रेसवाले शांत बसले असते तरी जितके नुकसान कॉग्रेसचे झाले नसते; तेवढे आता गुरूच्या फ़ाशीने झाले आहे. कारण त्यामुळे मुस्लिमांमध्ये नाराजी आलेली आहे, ती दु्र करणे शक्य नाही आणि हिंदूंना खुश करायचे, तर तेही अशा मुस्लिम खुल्या देशविरोधी निदर्शनांनी अधिकच विचलित झालेले आहेत. मग कॉग्रेसने साधले काय? मोठमोठ्याने मोदी इफ़ेक्ट संपला असे सांगितले जात होते, तो कितीसा संपला? आजघडीला गुरूच्या फ़ाशीनंतर कोणी मतचाचण्या घेतल्या तर मोदींच्या बाजूने लोकमताचा ओढा अधिक वाढल्याचे दिसून येईल. कारण श्रीनगरपासून अलिगढपर्यंत मुस्लिमांनी अफ़जलचे केलेले  समर्थन हिंदू व भारतीयांना जास्तच विचलीत करून गेले आहे. आणि असा विचलित हिंदू वा भारतीय; हेच मोदी यांनी आपले लक्ष्य ठेवलेले आहे. आधी त्यांनी आपली मुस्लिम विरोधी प्रतिमा बनण्यास सेक्युलर लोकांचा मस्तपैकी वापर करून घेतला होता. आता अफ़जल समर्थनाबद्दल सेक्युलर गोटात शांतता व मौन असल्याने मोदींचा दुसरा डाव यशस्वी झाला आहे. जिहादीच नव्हेत तर सेक्युलरही देशासमोरचा धोका आहे; असे लोकांना वाटू लागण्याची प्रक्रिया गुरूच्या फ़ाशीनंतर सुरू झाली आहे. त्यातून मोदी समर्थक चहात्यांमध्ये मोठीच भर पडणार आहे. अशाच लोकांना आपली व्होटबॅन्क बनवण्याचा खेळ मोदी गेली काही वर्षे अत्यंत धुर्तपणे खेळत आहेत. अजाणतेपणी किंवा उतावळेपणने सुशीलकुमार शिंदे व कॉग्रेसने त्याला किती हातभार लावला आहे बघा. तेच नाहीत अफ़जल समर्थनाच्या बातम्या आल्यावर सेक्युलर माध्यमे, पत्रकार, पक्ष व सेक्युलर नेते यांचे त्याबद्दलचे मौन त्यांच्याच बाबतीत जनमानसात शंका निर्माण करणारे आहे. त्याचा लाभ कोणाला मिळू शकतो?

   मुस्लिम आक्रमकता व आता तर उघड अफ़जल गुरूचे समर्थन, ज्यांना विचलित करून गेले आहे; असे लोक भाजपाचे वा संघाच्या हिंदूत्वाचे पाठीराखे नाहीत. पण त्यांची सहानुभूती कुठल्या बाजूला झुकेल, याचा विचार केला तर मोदींचे पारडे का जड होते, त्याचा अंदाज येऊ शकेल. एक दंगलीनंतर गुजरातमध्ये मोठे काही घडलेले नाही. पण दहा वर्षात तिथे खुप विकास, प्रगती झालेली आहे. दुसरीकडे देशभर खुलेआम अफ़जल गुरूचे समर्थन व पाकनिष्ठ निदर्शेने होत असताना गुजरातमध्ये मात्र तसे काही घडू शकले नाही. घडू शकले नाही, कारण मोदी यांची दहशत अशीच गुजरातबाहेरच्या लोकांची समजूत आहे. मग लोकांना ती मोदींची दहशत उपाय वाटला तर नवल आहे काय? कुणाच्या का दहशतीमुळे स्थानिक मुस्लिम देशविरोधी भूमिका घेणार नसतील; तर लोक अशा माणसाला, नेत्याला पाठींबा द्यायला पुढे येणारचा ना? असे लोक देशावर प्रेम करणारे असतात. पण हिंदूत्ववादी नसतात. सेक्युलर विचार व भूमिका देशविघातक जिहादींची पाठराखण करत असेल; तर मग देश वाचावण्यासाठी हिंदूत्ववादी असेल त्याच्या बाजूने उभे रहाण्याखेरीज दुसरा पर्याय देशप्रेमी असेल त्याला उरतच नाही. आणि अशी स्थिती मोदींनी नव्हे; तर सेक्युलर मुर्खपणाने आणली आहे. मुस्लिमांच्या लांगुलचालन व त्यासाठी मुस्लिमांच्या फ़ुटीरवृत्तीची सेक्युलर पाठराखण करणार्‍यांनी अशी स्थिती निर्माण केली आहे. तिचा फ़ुकटचा लाभ मोदी उठवत चालले आहेत. आठवडाभरात श्रीनगर वा भारतात अन्यत्र जिथे जिथे म्हणून अफ़जल समर्थनाची मुस्लिम निदर्शने झाली व ज्यांनी पाहिली; त्यांना तेवढ्या एका घटनेने मोदींचा मतदार बनवले आहे. मोदींचे काम सोपे केले आहे. त्यातूनच मोदींची हिंदू व्होटबॅन्क उभारली जात आहे.  ( क्रमश:)
 भाग   ( ८५ )    १४/२/१३

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी