Friday, March 29, 2013

नव्या पोपना चर्चची पापं थांबवता येतील ?

गेल्या मंगळवारी व्हॅटिकन सिटीत २६६ वे कॅथॉलिक ख्रिश्‍चन धर्मगुरू म्हणून पोप फ्रांसिस यांनी अधिकृत रीत्या पदभार सांभाळला. ते प्रथम लॅटिन अमेरिकन तर आहेतच, शिवाय जवळजवळ एक शतकानंतर युरोपबाहेरचे ते प्रथम पोप ठरले आहेत. पोप पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर अधिकृतपणे त्यांच्या कार्यकाळाचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळेच साहजिकच कॅथॉलिक जगतच नव्हे, तर संपूर्ण विश्‍वच त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे.
पोप फ्रांसिस ज्या रूढिवादी विचारसरणी व परंपरेशी संबंधित आहेत ते पाहू जाता, चर्च आज ज्या विकृतींना बळी पडत आहे त्यापासून त्याची मुक्तता करण्यात ते कितपत यशस्वी होतात, याबद्दल संशयच आहे. आपल्या रूढिवादी विचारसरणीमुळेच पोप फ्रांसिस अर्जेंटिना सरकारचे प्रखर विरोधक होते. सन २०१० मध्ये अर्जेंटिनाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर दृष्ट्या मान्यता दिली होती. हा निर्णय घेणारा तो पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरला आहे. परंतु, तेव्हा वर्तमान पोपनी त्या कायद्याला कडाडून विरोध केला होता. कृत्रिम गर्भधारणा आणि संततिप्रतिबंधक उपायांबाबतही अर्जेंटिना उदारमतवादी आणि पुरोगामी दृष्टिकोन बाळगणारा आहे, तर दुसरीकडे पोप फ्रांसिस यांचा या सर्वच बाबींना प्रखर विरोध आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, हे सर्व राक्षसी कृत्य आहे.
मूळच्या अर्जेंटिनानिवासी धर्मगुरू जॉर्ज मारियो बरगोगलियो यांनी पोपचा कार्यभार सांभाळल्यानंतर आपले नाव फ्रांसिस असे ठेवले आहे. १२ व्या शतकातील फ्रांसिस असीसी यांच्याप्रमाणेच त्यांनी गरिबांकडे अधिक लक्ष देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. फ्रांसिस असीसी हे गरीब आणि वंचितांचे संरक्षक, बाललैंगिक शोषण आणि चर्चमध्ये सिस्टर्ससमवेत होणार्‍या भेदभावाचे प्रखर विरोधक होते. या तीन विकृतींसाठीच चर्च संपूर्ण विश्‍वात कुख्यात आहे.
आपले पाद्री आणि नन हे नेहमीच ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारे असतात, असा दावा चर्च करीत असते. मात्र, शारीरिक वासनांची पूर्ती होऊ न शकल्यामुळेच व्यभिचार होतो, हीच चर्चची वस्तुस्थिती आहे. बाललैंगिक शोषणापासून तर समलिंगी संबंध हे तर नेहमीचेच आहे. ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नॉर्वे, बेल्जियम, अमेरिका, आयर्लंड या देशांसह जगातील अन्य भागातील चर्चमधील पाद्र्यांकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण होण्याच्या बातम्या नेहमीच येत असतात.
परंतु, या घटनांवर व्हॅटिकन सिटी केवळ पांघरूणच घालते असे नव्हे, तर प्रचंड धनसंपत्तीच्या बळावर पीडित व्यक्तीचे तोंड बंद करण्याचे कामही करते. शारीरिक गरजांची पूर्ती आणि विश्‍वाचे सातत्य नाकारून कॅथॉलिक चर्चने नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सुधारणावादी व प्रगतिशील समाजाकडून वेळोवेळी या बाबींना विरोध झाला आहे. मात्र, चर्चच्या हटवादीपणामुळे बहुतांश कॅथॉलिक पाद्री आपल्या वासनांचे दमन करून विक्षिप्तावस्थेत जगत आहेत. याच दबलेल्या वासनांमुळे जेव्हा लैंगिक शोषणाच्या घटना घडतात तेव्हा वस्तुस्थितीचा-सत्याचा सामना करण्याऐवजी चर्च आपली अब्रू वाचविण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचे धोरण अवलंबून या घटनांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करते.
आपण एका ‘पापी’ आणि ‘जखमी’ चर्चचे नेतृत्व करीत आहोत, हे २०१० मध्ये प्रथमच कॅथॉलिक चर्चचे तत्कालीन पोप बेनेडिक्ट १६ वे यांनी मान्य केले होते. आपल्या ‘पोपशाही’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभात त्यांनी पाद्री, बिशप आणि कार्डिनल यांच्या दुष्कृत्यांबद्दल क्षमाही मागितली होती. मात्र, या विकृतींना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत चर्चकडून अद्यापही कुठलेच संकेत देण्यात आलेले नाहीत. लैंगिक शोषण करणार्‍या पाद्र्याला शिक्षा करण्याऐवजी त्याची अन्य ठिकाणी बदली करून प्रकरणावर पडदा घालण्याचीच अनेक उदाहरणे समोर आली आहेत. चर्च ज्या ‘गोपनीय संस्कृती’च्या आधारे आपल्या अनुयायांना दीक्षा देते, त्यामुळेच अशा असंख्य घटना कधी उघडकीसही येत नाहीत. रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये जेव्हा कार्डिनलची नियुक्ती होते तेव्हा ते पोपच्या समक्ष असे वचन देतात की, जी बाब उघडकीस आल्यास चर्चची बदनामी होईल किंवा त्याला नुकसान पोहोचेल अशी कुठलीही बाब आम्ही गुप्तच ठेवू. याच गोष्टीमुळे लैंगिक शोषणाची घटना उघडकीस आल्यानंतरही चर्चप्रमुख, सत्य दडविणे हेच आपले प्रथम कर्तव्य मानतो. सर्वाधिक जवळच्या आणि आपल्यावर विश्‍वास ठेवणार्‍या भक्तांवरच लैंगिक शोषण करणार्‍या पाद्र्यांचा डोळा असतो. पाद्र्यांवर पूर्ण विश्‍वास ठेवला पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे, अशीच पिढिजात शिकवण या भक्त परिवारांना दिली जाते. चर्चची प्रतिष्ठा सर्वोच्च मानणारे बिशप पीडित कुटुंबीयांच्या डोक्यात ही बाब ठसवतात की, प्रकरण उघडकीस आल्यास लोकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचेल. चर्चने अशा सारख्या प्रकरणात आतापर्यंत कोट्यवधी रुपये नुकसानभरपाई म्हणून खर्च केले आहेत. पीडित व्यक्तीला उपचारांसाठी व आधार देण्याच्या उद्देेशानेच ही रक्कम दिली जाते, असे चर्चचे अधिकारी म्हणतात. मात्र, कुठल्याही परिस्थितीत प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी आणि अन्य पीडित व्यक्ती समोर येऊ नये म्हणूनच अशा प्रकारे पैसा देण्यात येतो, ही वस्तुस्थिती आहे.
महिलांचे लैंगिक शोषण हीदेखील चर्चची मोठीच समस्या आहे. आपल्या लैंगिक अत्याचारांना ‘आध्यात्मिक मिलन’ म्हणणार्‍या पाद्र्यांचे क्रौर्य रोमच्या ‘ला रिपब्लिका’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालामुळेच उघडकीस आले होते. पाद्री, ननला गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास भाग पाडतात, असे २३ देशांतील घटनांचा हवाला देऊन या अहवालात म्हटले आहे. अहवालात एका प्रकरणाचा उल्लेख करून म्हणण्यात आले आहे की, संततिप्रतिबंधक गोळ्या घेऊनही गर्भवती झालेल्या एका ननला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. गर्भपात करते वेळी या ननचा मृत्यू झाला. हा कुठल्या संयमित आणि तपस्वी जीवनाचा पुरावा आहे? आमच्या देशातही चर्चमधील लैंगिक शोषणाच्या घटना वेळोवेळी उघडकीस आल्या आहेत, परंतु हा हिंदुत्ववादी संघटनांचा अपप्रचार आहे, हे सिद्ध करण्याचा आटापिटा अशा वेळी चर्च आणि सेक्युलर मीडियाकडून करण्यात येतो.
चर्चमधील लैंगिक शोषणाच्या घटनांमुळे नागरिकांचा ख्रिश्‍चन धर्मावरील विश्‍वास उडत चालला आहे. कित्येक पाश्‍चिमात्य राष्ट्रांत चर्चचे रूपांतर नाईट क्लबमध्ये होत आहे. वस्तुस्थिती हीच आहे की, युरोपची भौतिक आणि बौद्धिक प्रगती त्याच दिवसापासून सुरू झाली जेव्हा त्याने चर्चच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यास प्रारंभ केला. पाश्‍चिमात्य राष्ट्रातील सर्व राजकीय आणि सामाजिक आंदोलने ख्रिश्‍चन धर्मामुळे नव्हे, तर भौतिकवादी/प्रगतिशील ज्ञान-विज्ञानामुळेच शक्य झाली. या सर्व आंदोलनांचे अध्वर्यू जन्माने तर नि:संशय ख्रिश्‍चन होते, परंतु कर्माने, आचरणाने ते संशयवादी (ईश्‍वर आहे किंवा नाही याबाबत संदेह असणारे), नास्तिक अथवा सर्वत्र ईश्‍वर आहे (ईश्‍वरवाद), असे मानणारे होते. आम्हाला त्या परंपरेचे स्वागत करायला हवे. केवळ ते व्हॅटिकन विरोधी गटाचे समर्थन करतात म्हणून नव्हे, तर ते एक उदारमतवादी चिंतन, मुक्त विचारसरणी आणि मानवेतच्या विजयाचे प्रतीक आहेत म्हणून, ज्यांच्यामुळे मानवी संस्कृती विकसित आणि अग्रेसर झाली.
चर्चमधील आंतरिक विकृतींप्रमाणेच सभ्य समाजाशी त्याचा होणारा संघर्ष त्याच्या कार्यप्रणालीमुळे आहे. आपण दलित-वंचितांच्या उत्थानाचे कार्य करतो, असा चर्चचा नेहमीच दावा असतो. परंतु, वास्तविकता हीच आहे की, धन व अन्य प्रलोभनांच्या बळावर चर्च लोकांच्या श्रद्धेचा व धर्माचा सौदा करीत आहे. कपट, कारस्थानांच्या बळावर आपल्या अनुयायांची संख्या वाढविणे या एकाच गोष्टीवर त्यांचे सारे लक्ष केंद्रित असते. चर्चच्या या विकृतींवर नियंत्रण ठेवणे हेच वर्तमान पोपसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे.
 बलवीर पुंज
(लेखक भाजपाचे राज्यसभा सदस्य आहेत.)
अनुवाद : अभिजित वर्तक
साभार - तरुण भारत 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी