Saturday, August 3, 2013

जातीयवादाला खतपाणी घालणारी कॉंग्रेस

undefinedइस्लामी जिहादविरुद्धच्या आपल्या संघर्षात भारत यशस्वी होऊ शकतो काय? इशरत जहां चकमकीनिमित्त सरकारने जेथे एकीकडे आपल्याच गुप्तचर संस्थांना एकमेकांच्या विरोधात उभे केले, तेथेच त्या सरकारचा प्रवक्ता एका दहशतवादी संघटनेच्या निर्मितीसाठी गुजरात दंगलींना जबाबदार ठरवत आहे. अशी मानसिकता असल्यास इस्लामी जिहादींपासून सभ्य व सुसंस्कृत समाजाला रक्तरंजित होण्यापासून कसे वाचविता येणार?


कॉंग्रेसचे वर्तमान परराष्ट्रमंत्री जेव्हा उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी होते, तेव्हा ते ‘सिमी’नामक मुस्लिम संघटनेतर्फे न्यायालयात वकिली करीत होते. दहशतवादी कारवायांत सिमीचा सहभाग होता. परंतु, खुर्शीदसह तमाम सेक्युलॅरिस्ट सिमी ही मुस्लिम विद्यार्थ्यांची संघटना असल्याचे सांगून तिचा बचाव करीत होते. राजदचे सर्वोच्च नेते लालूप्रसाद यादव तर सिमीवर बंदी घालत असाल, तर रा. स्व. संघावरही बंदी आणली पाहिजे, अशी मागणी करीत होते. गुप्तचर विभागाने अतिशय भक्कम पुराव्यांच्या आधारावर सिमीच्या दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तान पोषित लष्कर-ए-तोयबाशी असलेले तिचे संबंध उघडकीस आणले. अखेर सिमीवर बंदी टाकण्यात आली. सिमीचे संस्थापक भटकल बंधूंसह अन्य कार्यकर्ते भूमिगत झाले. यानंतर त्यांनी आयएसआयच्या आर्थिक बळाच्या साह्याने ‘इंडियन मुजाहिदीन’नामक दहशतवादी संघटनेची स्थापना केली.

भारताला रक्तरंजित करण्याच्या आपल्या अजेंड्यावर पांघरूण घालणे हाच पाकिस्तानचा इंडियन मुजाहिदीनची निर्मिती करण्यामागे हेतू होता. भारतीय मुसलमानांची जिहादी संघटना स्थापन करून पाकिस्तान जगाला हे सांगू इच्छित होता की, भारतात घडणार्‍या दहशतवादी कारवाया त्याच्या अंतर्गत समस्यांमुळे आहे. १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांना सेक्युलॅरिस्टांनी ज्याप्रकारे बाबरी मशिदीच्या विध्वंसाला जबाबदार ठरविले होते, अगदी त्याच प्रकारे सेक्युलॅरिस्टांच्या टोळीने भारतात घडणार्‍या प्रत्येक दहशतवादी घटनांना आणि दंगलींना आपल्या कुतर्काच्या आधारावर बहुसंख्यकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे सुरू केले. ही केवढी विचित्र परिस्थिती आहे की, इंडियन मुजाहिदीन ही लष्कर-ए-तोयबाचीच निर्मिती असल्याचे गुप्तचर संस्था भक्कम पुराव्यांच्या आधारे सांगत आहेत, ज्या दहशतवादी संघटनेवर २००६ मध्ये मुंबईतील लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट, बंगलोरचे क्रिकेट स्टेडियम, पुण्याची जर्मन बेकरी, वाराणसी मंदिर आणि आता बोधगयेत बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे आरोप आहेत, त्या संघटनेची तळी उचलून धरण्याचे प्रयत्न कॉंग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद विविध तर्कवितर्क लढवून करीत आहेत. कोणत्याही सुसंस्कृत समाजात हिंसेला अजीबात स्थान नाही. गुजरात दंगलींचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिदीनची स्थापना करण्यात आली, याचा अर्थ तिला रक्तपात घडविण्याची परवानगी मिळायला हवी काय? गोधरा नरसंहाराची त्वरित प्रतिक्रिया म्हणून गुजरातममध्ये झालेल्या दंगलींना कुठलाही सुसंस्कृत समाज योग्य ठरवील काय?

जो अजेंडा घेऊन पाकिस्तानची आयएसआय संघटना भारताला रक्तरंजित करण्याच्या उद्योगाला लागली आहे, सेक्युलॅरिस्टांनी त्याच सुरात सूर मिळविणे ही गोष्ट निव्वळ योगायोग आहे काय? मुंबईवर हल्ला करण्यास आलेल्या सर्व दहशतवाद्यांच्या मनगटावर दोरा बांधलेला असणे आणि सगळ्यांच्या कपाळाला टिळा असणे हा एक मोठ्या कारस्थानाचा भाग होता. भारतात सेक्युलॅरिस्टांची जमात आधीपासूनच ‘हिंदू दहशतवादा’चा बागुलबुवा उभी करण्याचा प्रयत्न करीतच होती, पाकिस्तान या वातावरणाचा फायदा घेऊ इच्छित होता. मात्र, अजमल कसाब जिवंत पकडला गेल्यामुळे पाकला यात यश मिळू शकले नाही. एवढे सगळे होऊनही येथील सेक्युलॅरिस्टांनी आपले उद्योग थांबविलेले नाहीत. संघ परिवाराविषयी विविध प्रश्‍न, शंका उपस्थित करून त्यांना संशयाच्या भोवर्‍यात आणण्याचा प्रयत्न या देशातील सेक्युलॅरिस्टांच्या टोळीने सुरूच ठेवला आहेत. ‘हू किल्ड करकरे’ आणि ‘२६/११ : आरएसएसचे कारस्थान’ नामक पुस्तके प्रकाशित झाली. या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी हिंदू आणि संघ परिवाराची प्रतिमा कलंकित करण्याचा घृणास्पद प्रयत्न करण्यात आला.

अमेरिकेचा दांभिकपणा आणि दुटप्पीपणा उघड करणार्‍या ‘विकीलीक्स’या वेबसाईटने कॉंग्रेसचा दुटप्पीपणाही उघडकीस आणला आहे. वेबसाईटने म्हटले आहे की, मुंबई हल्ल्यानंतर कॉंग्रेस नेतृत्वाने धार्मिक आधारावर राजकारण केले होते. वेबसाईटने खुलासा केला आहे की, २३ डिसेंबर २००८ रोजी भारतातील अमेरिकेचे तत्कालीन राजदूत डेव्हिड मलफोर्ड यांनी आपल्या परराष्ट्र मंत्रालयाला पाठविलेल्या आपल्या गुप्त मेलमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की, कॉंग्रेस पक्ष आपल्या स्वार्थासाठी जुन्याच जाती व धर्मावर आधारित राजकारण करण्याच्या उद्योगाला लागला आहे. वाचकांना आठवतच असेल की, मुंबई हल्ल्यानंतर अगदी लगेचच कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते ए. आर. अंतुले यांनी एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूला मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपींना जबाबदार ठरविण्याचे प्रयत्न केले होते. आज कॉंग्रेस आपल्याच पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते शकील अहमद यांच्या प्रतिक्रियेपासून स्वत:ला भलेही अलिप्त ठेवत असेल, परंतु इस्लामी कट्टरवादाला पोषित करणे हेच या पक्षाचे खरे उद्दिष्ट राहिले आहे.

दिल्लीच्या बाटला हाऊस चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांना ते निरपराध असल्याचे सांगून ही चकमक बनावट असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा सेक्युलॅरिस्ट अगदी आताही करीत आहेत. ही कोणती मानसिकता आहे की जी सेक्युलॅरिस्टांना दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीतील पोलिस निरीक्षक शर्मांच्या हौतात्म्याला कलंकित ठरविण्यास प्रेरित करते आणि आजमगढ येथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांची बाजू उचलून धरते. कोईम्बतूर हल्ल्यातील आरोपी अब्दुल नसीर मदनीला पॅरोलवर मुक्त करण्यासाठी जी मंडळी होळीच्या सुट्टीच्या दिवशी केरळ विधानसभेत सर्वसम्मतीने प्रस्ताव पारित करतात, ती स्वामी लक्ष्मणानंदांची क्रूर हत्या आणि आता स्वामी असीमानंद आणि साध्वी प्रज्ञा ठाकूरचा छळ होऊनही गप्प का बसली आहेत? हेमंत करकरेंच्या विधवेच्या भावनांची अवहेलना करून वारंवार करकरे यांच्या हौताम्याचा अपमान का करण्यात येतो? जर कम्युनिस्टांचा बौद्धिक व वैचारिक पाठिंबा मिळाला नसता तर स्वतंत्र पाकिस्तानची महंमद अली जिना यांची मागणी कधीच प्रत्यक्षात साकारली नसती ही गोष्ट खरी नाही काय?

सेक्युलॅरिस्टांकडून पोषित करण्यात येत असलेल्या इस्लामी कट्टरवादामुळेच आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सभ्य समाज रक्तरंजित होत आहे. आखाती (गल्फ कंट्रीज) देशांतून पाठविण्यात येणार्‍या अफाट संपत्तीच्या बळावरच केरळचे वेगाने इस्लामीकरण होत आहे. येथील प्रत्येक निवडणुकीत अब्दुल नासेर मदनीचा पाठिंबा मिळविण्यासाठी कॉंग्रेस आणि माकपमध्ये अक्षरश: स्पर्धा लागलेली असते. बंगलोर बॉम्बस्फोटप्रकरणी दोन वर्षांपूर्वी जेव्हा कर्नाटक पोलिसांची चमू मदनीला अटक करण्यासाठी केली तेव्हा केरळ प्रशासनाने मदनीला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. केरळ सरकारमध्ये मुस्लिम लीगच्या नेत्यांचे प्रभुत्व असल्याने येथे कट्टरपंथीयांचीच नेहमी मुजोरी असते. शेजारच्या तामिळनाडूमध्येही इस्लामी जिहादींची हिम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तेथे जिहादी संघ आणि भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य करीत आहेत. अगदी गेल्या शुक्रवारी भाजपाचे प्रदेश सचिव व्ही. रमेश यांची जिहादींनी क्रूरपणे हत्या केली. गेल्या १२ वर्षांत १२ हिंदू नेत्यांची नृशंसतेने हत्या करण्यात आली आहे.

जर कॉंग्रेस अशाच प्रकारे निव्वळ व्होट बँकेसाठी जिहादी मानसिकतेचे पोषण करीत असेल तर केवळ भारताच्या बहुलतावादी संस्कृतीलाच धोका पोहोचेल असे नसून या देशाचे रक्षण करणारी सुरक्षा दले आणि संस्थांचा आत्मविश्‍वासही खच्ची होईल. कॉंग्रेसने हे स्पष्ट केले पाहिजे की, अखेर तो पक्ष पाकिस्तानच्या देशद्रोही अजेंड्याचा भागिदार का बनत आहे?
बलबीर पुंज,
(लेखक भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.)

अनुवाद : अभिजित वर्तक
साभार : तरुण भारत

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी