Saturday, August 3, 2013

जपानमध्ये हिंदू संस्कृती

आर्य नावाच्या उंच, गौरवर्णीय, परक्या लोकांनी भारतावर स्वारी करून इथल्या मूळ रहिवाशांना दास बनवलं, हा खोटा सिद्धांत ब्रिटिश हस्तक पंडित फ्रेडरिक मॅक्समुल्लरने मांडला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी तो भारतीयांच्या जाणिवेतच काय, नेणिवेतही प्रयत्नपूर्वक रुजवला.

गेली दीड-पावणेदोन शतकं दृढमूल झालेल्या त्या असत्याला आता प्रचंड हादरे बसू लागले आहेत. परदेशात तर तो सिद्धांत मोडीतच निघालाय्. हिंदुस्थानात मात्र तो अजून जीव धरून आहे. याला कारण आपली गुलामी मनोवृत्ती, अंगात भिनलेले विद्वान आणि भाडोत्री संपादक, पत्रकार.
श्रीकांत तलगेरी यांच्यासारख्या राष्ट्रीय वृत्तीच्या अभ्यासकांनी तर वरील असत्य सिद्धांताला हादरा देताना आक्रमक सत्य मांडलंय्. तलगेरी म्हणतात की, आर्य नावाचे कुणी लोक बाहेरून भारतात आलेलेच नाहीत; उलट भारतातलेच लोक उत्कर्षाच्या नव्या वाटा शोधण्यासाठी बाहेर गेले. जिथे जिथे गेले तिथल्या स्थानिकांची लूट नि कत्तल न करता, त्यांना त्यांनी आपली संस्कृती दिली. अंगच्या गुणवत्तेने त्यांनी स्वत:ची, स्थानिक लोकांची आणि त्या प्रदेशाचीही भरभराट घडवून आणली.
डोनाल्ड मॅकेंझी हे विद्वान प्राचीन जपानसंबंधी संशोधन करीत आहेत. त्यांना असं आढळलं की, जपानवर हिंदू-बौद्ध संस्कृतीची दाट छाया आहे. इंद्राला जपानी भाषेत तैशाकू असं म्हणतात. याचा शब्दश: अर्थ देवराज शक्र असा होतो. त्याचप्रमाणे गणपती, शेषनाग, वरुण, सरस्वती, शिव या देवतांना अनुक्रमे शोतेन, रुजीन, सुई तेन, बेन तेन आणि दाईकोकू अशी जपानी नावं आहेत. जपानमध्ये कापसाची लागवड एका भारतीय माणसाने सुरू केली, असं समजलं जातं. हा माणूस एका फुटलेल्या गलबतातून वाहून इ. स. ७९९ मध्ये जपानमधल्या ऐची किनार्‍याला लागला होता. जपानच्या होरयूनी या पवित्र नि प्राचीन मंदिरात काही पोथ्या जपून ठेवलेल्या आहेत. त्या अगदी निवडक लोकांनाच वाचता येतात. मॅकेझींना असं आढळलं की, त्या पोथ्या अकराव्या शतकात प्रचलित असलेल्या बंगाली लिपीत लिहिलेल्या आहेत.
एके काळी संपूर्ण जगाला भारतानेच धर्म आणि संस्कृतीची देणगी दिली होती. भावी काळात भारताला तेच कार्य करायचं आहे; तेच त्याचं दैवदत्त कार्य आहे, असं खुद्द स्वामी विवेकानंद आणि श्रीअरविंद म्हणाले आहेत. सध्याच्या भारताची स्थिती मात्र कस्तुरी मृगासारखी आहे. सुगंधी कस्तुरी त्याच्याच बेंबीत आहे आणि तो मात्र युरोप-अमेरिकेत गवत हुंगत हिंडतोय्. भारतीय आया आपापल्या पोरांना कॉन्व्हेंटात कोंबून साहेब बनवू पाहातायत आणि भारतीय बाप घरादारासकट ग्रीनकार्ड मिळवण्याच्या खटपटीत आहेत.
 मल्हार कृष्ण गोखले
साभार :  तरुण भारत 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी