Wednesday, May 6, 2015

भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते गोधन विशेषांकाचे प्रकाशन

डावीकडून केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, भाऊ तोरसेकर, प्रा. डाॅ. रवींद्र चिंचोलकर व सिद्धाराम.

वाचकांकडून चांगल्या मजकूराचा आग्रह आवश्‍यक
भाऊ तोरसेकर
सोलापूर,  : सर्वच क्षेत्रात नैतिकता घसरत चालली आहे. त्यामुळे चांगले वाचावयास मिळत नाही. वाचकांनी मात्र चांगल्या मजकूरचा आग्रह माध्यमांकडे धरावा असे मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी मांडले.

विवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक असलेल्या विवेक विचारच्या विमर्श व्याख्यानमालेत रविवारी श्री. तोरसेकर यांनी माध्यमे : घडविणारी, बिघडवणारी या विषयावर मार्गदर्शन केले. ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात त्यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोळकर होते. यावेळी व्यासपीठावर विवेकानंद केंद्राचे संचालक दीपक पाटील, विवेक विचारचे संपादक सिद्धाराम पाटील होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विवेक विचारच्या गोधन विशेषकांचे प्रकाशनही करण्यात आले.

श्री. तोरसेकर म्हणाले, पत्रकारिता हा शब्दांचा खेळ असतो. आपण माध्यमांतून येणाऱ्या बातम्या वाचतो पण समजून घेत नाही. गेल्या काही वर्षांत माध्यमांचे स्वरूप बदलत आहे. पूर्वीच्या काळात विचारांची लढाई विचारांनी होत असे. एखादा विचार, मुद्दा पटला नाही तर त्याचे खंडन अभ्यास करून केले जात असे. अनुल्लेखाने मारणे अशी पळवाट तेंव्हा नव्हती.

अनेकदा इतरांना हितोपदेश करणारे माध्यमकर्मी स्वत: तसे वागतात की नाही याबद्दल शंका असते. पत्रकारांना कोणी काही बोलले तर काही पत्रकारांना राग येतो. परंतु पत्रकाराकडूनच चूक घडली तर मात्र राग येत नाही. चांगल्या गोष्टी समाजाला समजाविणे हे पत्रकारांचे काम असते. समाजात घडणाऱ्या चांगल्या बाबी जनतेसमोर आल्या तर राष्ट्र उभे राहते. परंतु अनेकदा अर्धवट माहितीवर वृत्तवाहिन्यांवर चर्चा होत राहतात. ग्रीक संस्कृती महान होती. परंतु त्या संस्कृतीतील स्वत:ला तत्वज्ञानी म्हणवणाऱ्यांनी चिकीत्सेच्या नावाखाली संस्कृतीतील रूढी, परंपरांची खिल्ली उडविण्यास प्रारंभ केला. परिणामी भविष्यात ग्रीक संस्कृतीचा ऱ्हास झाला. माध्यमांच्या माध्यमातून सध्या अशाच प्रकारच्या बाबी आपल्या अंर्तमनात बिंबविण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडलेल्या रिंकू पाटील हत्येनंतर आलेल्या शाहरूख खानच्या बाजीगर, डर, अंजाम या चित्रपटात एकतर्फी प्रेम करून तरूणींना त्रास देणाऱ्या पात्रास नायक म्हणून समोर आणले गेले. त्यातून शाहरूख खान सुपरस्टार झाला. परंतु एकतर्फी प्रेम करणे हे चुकीचे आहे हे तत्कालीन माध्यमांनी समाजाला सांगणे आवश्‍यक होते. परंतु तसे न झाल्यामुळे चित्रपटांत दाखविण्यात येणारे महिलांवरील अत्याचार आपल्याला सवयीचे झाले आहेत. ही बाब खूपच गंभीर असल्याचे श्री. तोरसेकर म्हणाले.
विमर्श कार्यक्रमात श्रोते

शिवचरित्राला हवी सद्यस्थितीची जोड
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. परंतु शिवचरित्र सद्याच्या काळाशी कसे सुसंगत आहे हे व्याख्यानांतून खूप कमी प्रमाणात सांगितले जाते. सोलापूरातील शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या व्याख्यानात शिवचरित्र सद्यस्थितीशी कसे जोडता येईल हे उत्तमप्रकारे सांगितले असे श्री. तोरसेकर म्हणाले. 

भाऊ तोरसेकर

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी