Wednesday, March 20, 2013

विराटाची साधना : भारतमातेची उपासना

तारीख: 3/14/2013 11:38:24 AM

- मुकुल कानिटकरश्रीरामकृष्ण परमहंसांना काशी विश्‍वनाथाच्या दर्शनाची इच्छा झाली. पूर्ण तयारीने ठाकूरांबरोबर काही शिष्य आणि त्यांचे प्रबंधक मथुरबाबू रेल्वेने काशीला निघाले. एका डब्ब्यात ठाकूर आणि भक्तगण व शेजारी दुसर्‍या डब्ब्यात प्रसादाची सामग्री मथुरबाबूंनी घेतली होती. फळं, मिठाई अशा अनेक गोष्टी होत्या.देवघर स्थानकावर गाडी खूप वेळ थांबते. ठाकूर बाहेर फलाटावर पाय मोकळे करायला उतरले. ही बहुदा १८६८ ची घटना असावी. बंगालमध्ये दुष्काळी परिस्थिती होती.
स्थानकावर अनेक उपाशी लोक होते. जे मिळेल ते खाण्यासाठी धडपड करणारे.अशाच एक-दोन लोकांच्या डोळ्यात बघताना श्रीरामकृष्ण स्तब्ध झाले.अचानक भावातिरेकाने नाचू लागले. मथुर बाबूंना हाक मारली, ‘‘बघ बघ स्वत: काशी विश्‍वनाथ आपणास दर्शन देण्याकरिता इथवर चालून आलाय्.’’त्यांना प्रसादासाठी घेतलेली सामग्री उतरवायला लावली.सगळ्या दुष्काळग्रस्त बुभुक्षितांना स्वत: वाढले. हाच खरा देव आणि हाच खरा नैवेद्य. श्रीरामकृष्णांना आता बनारसला जाण्याची गरजच नव्हती. त्यांना तर विश्‍वनाथाचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते.
 एके दिवशी वैष्णव सम्प्रदायाबद्दल चर्चा चालली होती. वैष्णवांच्या अनेक धारणांपैकी एक जीवदया हा चर्चेचा विषय होता.अचानक ठाकूर ‘जीवे दया, जीवे दया’ असे पुटपुटत भावसमाधीत गेले. खूप वेळ तसेच बसून होते. डोळ्यातून अश्रुधारा चालल्या होत्या. थोड्या वेळाने अर्धवट जागृत होत जोरजोरात म्हणू लागले, ‘‘जीवे दया नाही. आम्ही स्वत: क्षुद्र कृमी कीटक, आम्ही कोणावर दया करणार. तो ईश्‍वरच सर्वरूपात साकार झालाय्. त्याच्या ज्ञानानीच जिवाची सेवा करता येईल. जीव दया नाही शिवभावे जीव सेवा.’’नरेन्द्रला नवीन मंत्रच मिळाला - सेवेची साधना. निराकाराची साधना करून त्याने अत्त्युच्च अनुभूती मिळविली होती.साकार साधनेचा कळस म्हणजे चिन्मय दर्शनही झाले.पण अध्यात्माचा महामेरू प्रत्येक जिवात शिवाचे दर्शन घेण्याचा धडा आता मिळत होता. ही साधनेची पराकाष्ठा.
 भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण प्रत्येक योगाचा चरम हाच सांगतात. कर्मयोग असो की ज्ञानयोग, भक्तियोग असो की आत्मसंयमयोग, परमोच्च उपलब्धी हीच - सर्वभूत हिते रत: - सगळ्या जिवांच्या सेवेत रमलेला. आत्मवत सर्वभूतेषू - आपणासारिखेच सर्व प्राणिमात्रास जाणणार तोच खरा ज्ञानी, तोच प्रिय भक्त आणि आदर्श कर्मयोगी. स्वामी विवेकानंदांनी विराटाच्या उपासनेच्या या साधनेला वैज्ञानिक घडण दिली.‘विराट’पुरुषाचे सर्व चराचर अंगच आहेत.या उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाला सेवाकार्याचे व्यावहारिक तंत्र स्वामीजींनी दिले.ते म्हणत-‘मी त्या ईश्‍वराची पूजा करितो ज्याला अज्ञानाने मानव म्हटले जाते.’हा केवळ व्यक्तिगत स्तरावर साधनेचा मार्ग म्हणून त्यांनी सांगितला नाही.त्यांनी अध्यात्माला नवीन जाण दिली. सामूहिक मुक्तीची साधनाच खरी साधना, असे प्रतिपादन केले.
 त्यांचे शिष्य शरदचंद्र चक्रवर्तींशी बोलताना ते म्हणाले- ‘व्यक्तिगत मुक्ती शक्यच नाही. चहूबाजूला लोक अज्ञानात, कष्टात पीडित असताना फक्त आपलीच मुक्ती शक्य आहे असा कुणाचा भ्रम असेल तर मला त्याची कीव येते.’तेव्हा शरदचंद्रने शंका व्यक्त केली. त्याच्या मते,सामूहिक मुक्तीची संकल्पना तर नवीनच दिसते. स्वामीजींनी त्याला हटकले - ‘तू सगळी शास्त्र वाचलीच आहेत जणू?’ सेवेशिवाय साधनेला पर्याय नाही असे स्वामीजींनी आवर्जून सांगितले. त्यांनी रामकृष्ण मठाच्या संन्याशांना रामकृष्ण मिशनच्याद्वारे सेवा कार्य करावयास लावले.श्रीरामकृष्णांच्या अनेक शिष्यांनी प्रथमत: त्यांना विरोध केला.पण स्वामीजींचा ठाम विश्‍वास होता की हाच खरा ठाकूरांचा मार्ग. मॉ सारदांच्या पूर्ण पाठिंब्याने संशयाचे वादळ शमले आणि संघटित सेवेच्या सामूहिक आध्यात्मिक साधनेचा मार्ग सुरू झाला.
 स्वामीजींनी जरी शरदला स्पष्ट केले नसले, तरी या मार्गाला शास्त्रीय आधार आहेच.स्वामीजींच्या प्रत्येक वाक्याचा पाठपुरावा उपनिषदात सापडतो.विराट साधनेचा मार्ग छांदोग्य उपनिषदात् औषस्तिपादऋषींनी सांगितला आहे.यास त्यांनी वैश्‍वानर साधना म्हटले आहे.
 ब्रह्मांडी सतत प्रवाहमान प्राण प्रत्येक जीवात वैश्‍वानर रूपाने प्रज्वलित असतो.म्हणून जिवाची सेवा करणे म्हणजे त्या वैश्‍वानराची उपासना होय. हीच निष्काम सेवेची साधना गीतेच्या कर्मयोगातही आहे.स्वामी विवेकानन्दांना विराटाची प्रचीती त्यांच्या भारत परिक्रमेत झाली. १८८६ ते १८९२ पर्यंत हिमालयापासून थेट कन्याकुमारीपर्यंत परिव्राजक म्हणून यात्रा करताना ते पूर्णपणे समाजाधारित होते. पुढचे जेवण कुठे होईल याची त्यांनी कधी चिंता केली नाही.भारताच्या धर्मप्राण समाजाने त्यांना वैश्‍वानराच्या जागृत स्वरूपाचे दर्शन करविले. कन्याकुमारीच्या श्रीपाद-शिलेवर २५ ते २७ डिसेंबर १८९२ ला त्यांनी केलेल्या ध्यानात त्यांना भारतमातेच्या जागृत स्वरूपाचे दर्शन झाले आणि ही विराट-उपासना त्यांचे जीवनव्रत बनले. भारतमाता ही जागृत देवता आहे हा स्वामीजींचा साक्षात अनुभव होता.म्हणून त्यांनी मद्रासला युवकांना आव्हान केले-‘आगामी ५० वर्षांकरिता तुमच्या सर्व ३३ कोटी देवता आणि दुसर्‍यांकडून उधार घेतलेल्या आणखीण तीन-चारशे देवांना लाल बासनात बांधून माळ्यावर ठेवून द्या! आणि एकाच देवतेची उपासना करा- ती म्हणजे ही आपुली भारतमाता. सर्व तिचेच आहे. तिचेच शिर, तिचेच हाथ, तिचेच चरण. तिची सेवा हीच तुमची खरी पूजा होऊ द्या.’ सेवेचे सुव्यवस्थित तन्त्र स्वामीजींनी प्रतिपादित केले.
 त्याबद्दल पुढच्या आठवड्यात पाहू. सध्या या विराटाच्या दर्शनाचा प्रयत्न सुरू करूया. त्यासाठी एकच मार्ग-नित्य सेवा २४ तासापासून कमीत-कमी एक तास नि:स्वार्थ सेवेकरिता देणे. काहीही मोबदला न मागता सेवा करणे. हीच विराट-उपासना खरी भारतमातेची पूजा आहे.

 ९४०५७७४८२०

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी