भारत ठरला जगातील एकमेव देश
वृत्तसंस्था / विशाखापट्टनम्, २० मार्च
भारताने आज पाणबुडीवरून मारा करणार्या ‘ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरातून यशस्वी चाचणी घेऊन नवा इतिहास रचला आहे. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची पाण्याखालून चाचणी घेणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. २९० किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
या क्षेपणास्त्राची ही पहिलीच चाचणी असून ती पूर्णपणे यशस्वी राहिली आहे, अशी माहिती ‘ब्राह्मोस’ प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवथानू पिल्लई यांनी वृत्तसंस्थेला दिली.
जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशाने आजवर पाण्याच्या खालून सुपरसॉनिक कू्रझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली नाही. चाचणीनंतर या क्षेपणास्त्राने संपूर्ण २९० किलोमीटरचा प्रवास केला. चाचणीच्या काळात क्षेपणास्त्राची कामगिरी अगदी अचूक राहिली. असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी या क्षेपणास्त्राची जमिनीवरील चाचणीही यशस्वी राहिली होती. आता पाण्याखालूनही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र लष्करासोबतच भारतीय नौदलाच्या सेवेतही तैनात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
साभार / तरुण भारत
No comments:
Post a Comment