Wednesday, March 20, 2013

जेसुइट पोप

मल्हार कृष्ण गोखले 

-नवा पोप निवडण्याची कार्डिनल मंडळींची बैठक पूर्ण होऊन तिथून अखेर जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ यांच्या नावाची निश्‍चिती झाली आहे. बर्गोग्लिओ हे ब्यूनोस आयर्सचे आर्चबिशप आहेत. ब्यूनोस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आहे. अशा प्रकारे अखेर पोप पदाचा सन्मान दक्षिण अमेरिका खंडाकडे गेला आहे. बर्गोग्लिओ हे मूळचे इटालियनच आहेत. सर्वात महत्त्वाची आणि अभ्यासकांच्या भुवया उंचावणारी गोष्ट म्हणजे ते जेसुइट आहेत.
रोमन कॅथलिक या ख्रिस्ती संप्रदायाच्या मुख्य पंथामध्ये अनेक गट आहेत. शतकानुशतकांमध्ये हे गट निर्माण होत गेले आहेत. फ्रान्सिस्कन किंवा ग्रे फ्रायर्स, डॉमिनिकन्स, कार्मेलाईट किंवा बेगिंग फ्रायर्स, ऑगस्टिन, थिएटिन्स किंवा कापुचिन्स ही त्यांच्यापैकी काही नावं. त्यातलाच एक गट म्हणजे जेसुइट किंवा पॉलिस्टिन्स.

जेसुइट हा फार प्राचीन गट नाही. त्याचा उगम सोळाव्या शतकात झाला. इनिगो लोपेझ डि रिकाल्डे हा एक स्पॅनिश शिपाई होता. सन १५२१ मध्ये पाम्पेनुला इथल्या फ्रेंचांविरुद्धच्या लढाईत तो जबर जखमी झाला आणि फ्रेंचांचा युद्धकैदी बनला.
कैदेत असताना त्याने ख्रिश्‍चन धर्मग्रंथांचे सखोल वाचन केले आणि तो एकदम धर्माकडे वळला. त्याने सैनिकी पेशा सोडून दिला. मॉंतसेरा या ठिकाणी असलेल्या कुमारी मातेची यात्रा त्याने केली आणि या पुढील आयुष्य तिचा सरदार म्हणून व्यतीत करण्याची त्याने प्रतिज्ञा केली. मग त्याने प्रथम जेरुसलेम आणि रोम या ख्रिश्‍चन धर्मस्थळांची यात्रा केली. नंतर त्याने स्पेनमध्येच बार्सिलोना, अल्काला आणि सालामान्का इथल्या ख्रिश्‍चन विद्यालयांमध्ये ख्रिश्‍चानिटीचा कसून अभ्यास केला. मग तो उच्च धार्मिक शिक्षणासाठी पॅरिसला गेला. तिथे त्याने सात वर्षे ख्रिस्ती धर्मशिक्षण घेतलं.
मग पॅरिसमध्येच त्याने सन १५३४ मध्ये ‘सोसायटी ऑफ जीझस’ या गटाची स्थापना केली. या गटाच्या अनुयायांनी दारिद्र्यात रहावं, येशूची भक्ती करावी आणि आज्ञापालन (धर्माचं) करावं, असं अपेक्षित होतं. म्हणजे नेमकं काय? तर सोसायटी ऑफ जीझसच्या अनुयायांनी इतर गटांच्या पाद्र्यांप्रमाणे मानमरातब, प्रतिष्ठा, सत्ता, विलासी राहणी यांच्यामागे लागून सुखासीन न बनता, धर्महीन लोक आणि पाखंडी लोक यांच्यामध्ये येशूच्या धर्माचा जोरदार प्रचार करावा, असं अपेक्षित होतं. तत्कालीन पोप पॉल तिसरा याने इनिगो लोपेझच्या या ‘सोसायटी ऑफ जीझस’ गटाला आणि त्याच्या ध्येयधोरणांना सन १५४० मध्ये मान्यता दिली. रोमन कॅथलिक संप्रदायाची अधिकृत भाषा लॅटिन आहे. त्यामुळे सोसायटी ऑफ जीझस किंवा ‘जेसुइट’ हा शब्द निघाला.
इनिगो लोपेझ सन १५५६ मध्ये मरण पावला. सन १६२२ मध्ये तत्कालीन पोप ग्रेगरी पंधरावा याने लोपेझला ‘संत’ पद बहाल केलं. तो मुळात लोयोला या गावचा होता. त्यामुळे त्याचा उल्लेख सेंट इग्नेशस ऑफ लोयोला या नावाने होऊ लागला.
जेसुइट पंथ आणि भारत यांचा फार जवळचा संबंध आहे. याला कारण सेंट झेवियर. सेंट झेवियर याच्या नावाने मिरवणार्‍या शाळेत अथवा कॉलेजात आपल्या पोराला प्रवेश मिळाला म्हणजे भारतातल्या बहुसंख्य हिंदू आई-बापांना आपल्या बेचाळीस पिढ्या स्वर्गात गेल्यासारखा आनंद होतो. हा सेंट झेवियर म्हणजे मूळचा फ्रान्सिस झेवियर, हा देखील स्पेनचाच होता. त्याचे वाडवडील झेवियर या गावचे जहागीरदार होते. फ्रान्सिस मात्र सैन्यात न शिरता धर्मशिक्षणासाठी पॅरिसला आला. तिथे याला इनिगो लोपेझ (भावी इग्नेशस ऑफ लोयोला) भेटला. दोघे चांगले मित्र बनले. लोपेझच्या सोसायटी ऑफ जीझसचा फ्रान्सिस झेवियर हा देखील सुरुवातीपासूनचा सदस्य होता.
युरोपात या सर्व घडामोडी सुरू असतानाच इकडे भारतात पोर्तुगीजांनी भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावर हातपाय पसरायला सुरुवात केली होती. आज पोर्तुगाल आणि स्पेन हे युरोपातले दोन शेजारी आणि स्वतंत्र देश असले, तरी इतिहासकाळात पोर्तुगाल हा कधी स्पेनच्या राज्यात असे, तर कधी स्पेनपासून स्वतंत्र असे. सन १४९८ मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामा हा केरळात कालिकत (मूळ मल्याळी नाव कोळिकोड) इथे पोहोचला. पुढे पोर्तुगीजांनी सन १५०५ मध्ये अंजदीव आणि कॅनानोर, सन १५१० मध्ये गोघन, सन १५२१ मध्ये चौल, सन १५३४-३५ मध्ये वसई आणि दीव, सन १५५९ मध्ये दमण, सन १५६८ मध्ये होन्नावर, सन १५६९ मध्ये बसरूर ही ठिकाणं जिंकली. ती जिंकणार्‍या पोर्तुगीज दर्यावर्दींबरोबर फ्रान्सिस्कन गटाचे पाद्री होते. त्यांनी या सर्व ठिकाणी भरपूर बाटवाबाटवी केली.
पण पोपला तो आकडा समाधानकारक वाटेना. त्यामुळे इग्नेशस लोयोलाच्या नव्या जेसुइट गटाची या कामावर खास नेमणूक झाली. खुद्द फ्रान्सिस झेवियर हिंदुस्थानकडे निघाला. ६ मे १५४२ या दिवशी झेवियर गोव्यात पोहोचला आणि मग बाटवाबाटवीचा हाहाकार सुरू झाला. सन १५५२ साली झेवियर मेला. सन १६२२ सालीच इग्नेशससोबतच त्यालाही ‘संत’ पद देण्यात आलं.
गोव्यात कदंब राजांनी बांधलेली आणि उत्तर कोकणात म्हणजे आजच्या वसई-मुंबईत शिलाहार राजांनी बांधलेली असंख्य सुंदर सुंदर देवळं जेसुइटर पाद्र्यांनी उद्ध्वस्त केली. कान्हेरीच्या बौद्ध गुंफा आणि मंडपेश्‍वरच्या शैव गुंफा उद्ध्वस्त करून तिथल्या भिख्खूंना आणि वैराग्यांना जबरदस्तीने बाटवण्यात आलं.
सन १६६८ साली गोव्याचा विजरई म्हणजे व्हाईसरॉय जुवांव नुनिस द कुंज (याला कोंदी दे सां व्हिसेंती म्हणजे काऊंट ऑफ सेंट व्हिन्सेंट अशी पदवी होती) याने एक फतवा काढून सर्व बिगर ख्रिश्‍चनांना गोव्यात राहण्यास मनाई केली. हा फतवा राजकीय नसून धार्मिक होता. गेली शंभर-दीडशे वर्षे आपण गोवा पूर्णपणे ख्रिश्‍चन करण्यासाठी आकाश-पाताळ एक करतो आहोत; पण हे हलकट हिंदू, हे नीच ‘हीदन्स’ हे हरामखोर ‘पेगन्स’, हे सैतानाचे अनुयायी ‘इनफायडेल्स’ लेकाचे संपतच नाहीत; यामुळे संतापलेल्या जेसुइट पाद्र्यांनी व्हाइसरॉयला वरील फतवा काढण्यास फूस दिली होती. पोर्तुगीजांच्या दुर्दैवाने प्रत्यक्ष शिवाजी महाराज या वेळी गोव्याच्या सरहद्दीवर बारदेश भागात होते. गोव्यातल्या त्रस्त हिंदूंनी साहजिकच त्यांच्याकडे धाव घेतली. महाराजांनी आपलं एक पथक पाठवून चार जेसुइट मिशनरी पकडून आणले. गोव्यातल्या सर्व हिंदूंनी धर्मांतर करावं याच हेतूने आपण व्हाइसरॉयकरवी हा फतवा काढल्याचं या पाद्र्यांनी मान्य केलं. महाराजांनी या चारही पाद्र्यांचा तत्काळ शिरच्छेद केला आणि ही वार्ता व्हाइसरॉयपर्यंत पोहोचली. या जमालगोट्याचा त्वरित उपयोग झाला. व्हाइसरॉयने फतवा मागे घेतला.
मात्र, महाराजांचा संपूर्ण गोवाच जिंकण्याचा गनिमी काव्याचा डाव याच व्हाइसरॉयने मोठ्या हुशारीने उधळून लावला. ऑक्टोबर १६६८ मध्ये त्याने गुप्तपणे गोव्यात शिरलेले पाचशे मराठे सैनिक पकडले आणि महाराजांकडे पाठवून दिले. या घटना घडत असताना हा व्हाईसरॉय गंभीर आजारी होता आणि पुढच्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबर १६६८ मध्ये तो गोव्यातच मरण पावला.
नवे पोप महाराज जॉर्ज बर्गोग्लिओ यांच्या अर्जेंटिना देशाची कथा अशीच म्हणजे बाटवाबाटवी आणि कत्तली यांनी भरलेली आहे. सन १५१५ मध्ये स्पॅनिश दर्यावर्दी जुआन डायझ डि सोलिस याने अर्जेंटिना शोधून काढला. स्पॅनिश ज्यांना ‘इंडियन्स’ म्हणत अशा ताम्रवर्णी स्थानिक टोळ्यांचं तिथे राज्य होतं. दक्षिण अमेरिकेतल्या इंका, माया, ऍझटेक यांच्या सारखेच हे ‘रेड इंडियन’ होते. स्पॅनिश लोकांनी प्रथम त्यांच्या भीषण कत्तली केल्या. प्रचंड लूट केली. जबर बाटवाबाटवी केली आणि मग तिथेच स्थायिक होऊन, स्थानिक मुलींशी जबरदस्तीने लग्न लावून आपली प्रजा वाढवायला सुरुवात केली. आज अर्जेंटिनात मूळ स्थानिक इंडियन टोळीवाले जवळजवळ नामशेष झाले आहेत. स्पॅनिशांच्या संकटातून उद्भवलेली प्रजा हीच आज तिथे बहुसंख्य आहे. स्पेनच्या पाठोपाठ मूळ इटालियन असलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे. त्यानंतर फ्रेंच, ब्रिटिश आणि जर्मनांचा क्रम लागतो. अर्जेंटिनाची राजधानी असणार्‍या ब्यूनोस आयर्सचे आर्चबिशप जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ हे अशाच प्रकारे मूळ इटालियन आहेत. ते आता ‘पोप फ्रान्सिस’ या नावाने पोप पदावर आरूढ होत आहेत.
दिनांक १३ मार्च २०१३ रोजी परंपरेनुसार सिस्टिन चॅपेलच्या चिमणीतून पांढरा धूर सोडून नव्या पोपची निवड झाल्याचं सूचित करण्यात आलं. पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या राजीनाम्यामुळे नव्या पोपची निवड करण्यासाठी जगभरच्या ११५ कार्डिनल्सची बैठक व्हॅटिकनमधल्या सिस्टिन चॅपेल या चर्चमध्ये सुरू होती. या वेळी आशिया खंडातला कार्डिनल हा पोप म्हणून निवडला जाईल, अशी जोरदार हवा होती. जगभरातून हजारो वार्ताहर व्हॅटिकनमध्ये जमा झाले होते. कार्डिनल बैठकीत त्यांना किंवा अन्य कुणालाच प्रवेश नव्हता.
दोन दिवसांच्या तणावपूर्ण प्रतीक्षेनंतर सिस्टिन चॅपेलच्या चिमणीतून पांढरा धूर दिसला. सेंट पीटर्स कॅथिड्रलची घंटा घणघणू लागली. पाठोपाठ रोममधल्या सगळ्याच चर्चेसमधून घंटानाद सुरू झाला. सेंट पीटर चौकात जमलेल्या हजारो लोकांनी ‘हेवेमस पापाम’ म्हणजे ‘आम्हाला पोप मिळाले’ असा गजर करीत एकच जल्लोष केला. इतिहास प्रथमच एक जेसुइट किंवा जेसुइट पाद्री ‘पॉंटिफिक्स मॅक्झिमस’ म्हणजेच पोप या सर्वोच्च दावर आरूढ होत आहे.
// साभार / तरुण भारत 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी