Monday, September 16, 2019

भाजपातील मेगाभरतीकडे तुम्ही कसे पाहता ?


कांॅग्रेस आणि राष्ट्रवादी कांॅग्रेस या पक्षांचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अर्थातच ही स्थिती अभूतपूर्व आहे. या प्रकाराकडे पाहायचे कसे याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. ज्या मंडळींनी सदैव भाजपावर टीका टिप्पणी करण्यात धन्यता मानली, त्यांच्यासाठी हा धक्का फार मोठा आहे. या धक्क्यातून सावरायला त्यांना आणखी काही दिवस तरी लागतीलच. इतकेच काय जे भाजपाच्या विचारधारेचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्यासाठीही हे अनपेक्षित आहे. त्यामुळे यावर कसे व्यक्त व्हावे, हा आकलनापलीकडचा विषय बनला आहे.
ज्यांनी कालपर्यंत कांॅग्रेसमध्ये राहून सत्तेची फळे चाखली, त्यांना भाजपात घेऊन निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करणे सुरू असल्याची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. सदैव भाजपाच्या विचारधारेचा दुश्वास करणारी मंडळीही असे मत व्यक्त करण्यात आघाडीवर आहेत.
पण मला वाटतं की... जे चालले आहे ते चांगले चालले आहे....
आऊट आॅफ बाॅक्स जाऊन काही विचार केलं गेलंय असं मला वाटतं...
माझ्या मते ९९ टक्के राजकारणी मंडळींना (नेत्यांना) विचारधारेशी फार देणे - घेणे असत नाही. आपण निवडून येणे आणि सत्तेत वाटा मिळवणे, हेच त्यांचे ध्येय असते. ते स्वाभाविकही आहे. अर्थातच याला कोणताही पक्ष अपवाद नाही. हे वास्तव आहे.
येथे दोन उदाहरणे पाहा...
दोन आठवड्यापूर्वी अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील शिर्पनहळ्ळी या गावी कांॅग्रेसचे आमदार श्री. सिद्धाराम म्हेत्रे गेले. त्यांनी ग्रामस्थांची एक बैठक घेतली. मी भाजपात जावं म्हणतोय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पाठिशी असाल ना? त्यावर गावकऱ्यांनी सकारात्मक माना डोलावल्या. ते म्हणाले, समजा भाजपात उमेदवारी नाही मिळाली तर मात्र मी कांॅग्रेसमधूनच उभारेल. तेव्हाही तुम्ही सहकार्य करा. त्यावरही बहुतेकांनी माना डोलावल्या. पण तेथे उपस्थित भैरीनाथ बिराजदार या तरुण शेतकऱ्याने वेगळा विचार मांडला. साहेब, या गाववाल्यांवर विश्वास ठेवू नका. भाजपातून उभारलात तरच मते पडतील. कांॅग्रेसकडून उभारलंत तर गावातून किती मते पडतील हे परवाच्या लोकसभा निवडणुकीतून तुमच्या ध्यानात आले असेलच. या तरुण शेतकऱ्याला म्हेत्रे यांनी दाद दिली. त्यांना समजायचे ते समजले.
दुसरे उदाहरण कांॅग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचे. शिवसेनेत जाण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सरळ सांगून टाकलं की येत्या किमान १५ वर्षात तरी कांॅग्रेस पुन्हा येण्याची शक्यता नाही. मग पक्षात राहून करायचं काय?
हा व्यवहारी विचार आहे. ज्याने व्यवहाराकडे पाठ फिरवली, तो कुठल्याच कामाचा राहात नाही. कांॅग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते व्यवहारी विचार करून भाजपा व सेनेत दाखल होत आहेत. त्यांच्यासमोर पर्यायच नाही. अर्थातच याला लोकांची बदललेली विचार करण्याची पद्धत कारणीभूत आहे.
माझ्या मते सामान्य जनतेला या मेगाभरतीचे वावडे नाही.
कांॅग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांप्रमाणे तुम्ही वागू नका इतकीच अपक्षा जनतेची आहे.
भाजपा - सेनावाले या अपेक्षेला किती खरे उतरतात यासाठी काही काळ जावा लागेल.
थोडक्यात,
लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे नेते मिळतात. लोकांची समज वाढू लागली की नेतेही चांगले निपजू लागतील.
मराठा मूकमोर्चा, भीमा कोरेगाव या दोन्ही घटना/विषय खूप ज्वलंत, स्फोटक होत्या. भाजपा नेतृत्वाने हे विषय अतिशय मॅच्युरिटीने हाताळले. यात थोडीशीही चूक झाली असती तर महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी हानी ठरली असती.
जातींच्या आडून क्षुद्र राजकारण करणारे, हिंदू धर्माच्या प्रतिकांचा सतत द्वेष करणारे, तोंडी सतत शाहू-फुले-आंबेडकर या महापुरुषांची नाव घेत, सेक्युलॅरिझमचा जप करत स्वार्थाचे राजकारण करणारे दूर फेकले गेले आहेत. मेगाभरती आणि मेगागळतीच्या या गदारोळात समाजाच्या ऐक्याला नख लावू पाहणारे घटक शेवटच्या घटका मोजत आहेत. एकवेळ व्यवहारी नेते परवडले पण समाजात विष पसरवून स्वार्थ साधू पाहणाऱ्या शक्ती निस्तेज झाल्या आहेत. ती विषवेल उखडून टाकण्याचे मोठे काम मेघाभरतीतून झाले आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी