Monday, November 28, 2011

युरेनियम साठ्यावर बसलेले भुजंग - ख्रिश्‍चन मिशनरी

एस. गुरुमूर्ती ( लेखक हे राजकीय विश्लेषक आणि विख्यात विचारवंत आहेत. )
गेल्या काही आठवड्यांपासून  कुडनकुलम च्या अणुवीज केंद्राच्या विरोधातले आंदोलन टीव्हीवरच्या रिऍलिटी शोप्रमाणे सुरू आहे. सतत बातम्यांच्या शोधात असणार्‍या दृकश्राव्य माध्यमांनी, १३ हजार कोटी रूपये खर्चुन पूर्ण झालेले आणि पूर्णत्वास आलेले हे ऊर्जा केंद्र बंद पाडण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला काही माध्यमांनी तर मॅटिनी शोचे स्वरूप आणले आहे. या सार्‍या प्रकारात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भ्रष्ट नक्कल केली जात आहे. आणि माध्यमे त्यातले नाट्य वाढवायचा प्रयत्न करीत आहेत. इथली जनता हतबल झाली असून ती जगण्याचा हक्क मागत आहे, असे माध्यमांकडून दाखवले जात आहे.

टीव्हीवर दिसणारे आणि पडद्याआडच्या सर्व कलाकारांना आणि बातम्या लिहिणार्‍यांना या हक्काच्या मागणीने भुरळ घातली आहे. पण या सर्वांनाच कदाचित हे माहीतही नसेल की कोडान्कुलमचे हे आंदोलन एकटे नाही. या आंदोलनामागचे मनसुबे आणि हेतू गेल्या २० वर्षांपासून भारताच्या सुदूर प्रदेशातल्या मेघालयातल्या खासी टेकड्यात युरेनियम उत्खनन विरोधी सुरू असलेल्या आंदोलनाशी मिळत्या जुळत्या आहेत. भारतातला कोडान्कुलम अणुऊर्जा प्रकल्प रोखला जावा, हे ते मनसुबे आहेत. या सार्‍या नाट्याचे दिग्दर्शक कोण आहेत ? हे पाहण्यासाठी अणुऊर्जा भारतासाठी काय आहे, हे पाहिले पाहिजे.
भारताला अण्वस्त्रे आणि अणुऊर्जा या दोन्हींचीही नितांत आवश्यकता आहे. जगात सध्या २२ हजार अणुबॉंब आहेत. त्यातले ८ हजार अणुबॉंब परस्परांच्या दिशेने प्रत्यक्षात रोखण्यात आले आहेत. चीनने भारताच्या रोखाने २४० अणुबॉंब लावून ठेवलेले आहेत तर पाकिस्तानने ८० बॉंब भारताच्या दिशेने रोखले आहेत. भारताकडे केवळ १०० अणुबॉंब आहेत. भारताला अण्वस्त्र सज्जतेकडे अजीबात दुर्लक्ष करुन चालणार नाही, अशी ही स्थिती आहे. अणुऊर्जेचीही उपेक्षा करून चालणार नाही पण या दोन्ही बाबतीत फार दिवस परदेशातून होणार्‍या अणुइंधनावरही विसंबून भागणार नाही. आपल्या देशाची लोकसंख्या १२० कोटी आहे म्हणून भारत हा मानवी जातीच्या एक षष्ठांश इतका भाग आहे. मानवतेचा एवढा मोठा हिस्सा अण्वस्त्रसज्जतेअभावी धोक्यात आहे ही शरमेची बाब आहे. ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या इंधन तेल, कोळसा आणि गॅस या तिन्ही आवश्यक गोष्टी आपण
आयात करीत असतो. या निर्यातीवर आपण दरसाल १ हजार अब्ज डॉलर्स खर्च करीत असतो. त्यातल्या कोळशाच्या आयातीवर ५ अब्ज डॉलर्स खर्च होतो. हा खर्च २०२० साली ४५ अब्ज आणि २०५० साली २५० अब्ज डॉलर्स होईल. सध्या आपली वीजनिर्मिती १ लाख ५० हजार मेगावॅट एवढी आहे. ती २०३० साली ९ लाख ५० हजार मेगावॅट एवढी होण्याची गरज आहे. एवढी ऊर्जानिर्मिती आयात केलेल्या इंधनावर होणे अशक्य आहे. तिच्यासाठी देशात उपलब्ध असलेले इंधनच वापरले गेले पाहिजे. त्यातून प्रामुख्याने अणुऊर्जाच तयार होणे आवश्यक आहे आणि शक्यही आहे.
आता कोळसा जाळून तयार होणारी औष्णिक वीज आणि अणुवीज यांच्या पर्यावरण आणि जिविताला असलेल्या धोक्यांची तुलना करू. तज्ञांचे असे ठाम मत आहे की अणुऊर्जेपेक्षा औष्णिक वीज अधिक विनाशक आहे. एक हजार मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती मुळे होणार्‍या हवामानाच्या बदलामुळे आणि प्रदूषणामुळे दरसाल ४०० जण मृत्यूमुखी पडतात. अणुऊर्जेमुळे असे घडत नाही. गेल्या ६० वर्षात केवळ ४ वेळा अणुऊर्जा प्रकल्पात अपघात झाले आहेत. त्यातून प्रत्यक्षपणे ६६ जण तर अप्रत्यक्षपणे ४ हजार मृत्यू झाले आहेत. विमान अपघातात जगात दरवर्षी हजारावर लोक मरतात. रस्त्यावरच्या वाहनांच्या अपघातात तर एकट्या २००७ या वर्षात केवळ भारतात १ लाख १४ हजार लोक मारले गेले आहेत. एवढे मृत्यू होतात म्हणून आपण कोळशाची आयात, विमाने किंवा रस्त्यांवरची वाहतूक बंद करण्याची मागणी कधी करतो का ? मग त्या सर्वांपेक्षा कमी जोखमीचे असूनही अणुवीज प्रकल्प मात्र बंद करण्याची मागणी करीत आहोत. आपण भारताला अण्वस्त्र सज्ज किंवा अणुऊर्जा परिपूर्ण कसे करू शकू हे पाहू.
सध्या आपल्या आण्विक कार्यक्रमांसाठी यूरेनियम वापरले जाते. मेघालयातल्या खासी टेकड्या, झारखंडातील जादुगुडा आणि आंध्रप्रदेशातील तुम्मलपल्ली या तीन ठिकाणी युरेनियमचे साठे आहेत. युरेनियमचा जागतिक पुरवठा न्यूक्लीयर सप्लाईज ग्रुप (एन.एस.जी.) या गटातल्या देशांच्या नियंत्रणात आणि राजकारणप्रेरित आहे. जे देश आपल्या अणुभट्‌ट्‌यांवरचे या गटाचे नियंत्रण आणि पर्यवेक्षण मान्य करतील, अशा निवडक देशांनाच हा गट युरेनियमचा पुरवठा करीत असतो. भारताने या गटाकडून युरेनियम मिळवले आहे आणि त्या बदल्यात अमेरिकेशी, अण्वस्त्र बनवणार नसल्याचा करार केला आहे. सध्या भारतात २२ अणुप्रकल्प आहेत. त्यातले १४ प्रकल्प जागतिक नियंत्रणाखाली आहेत. ८ प्रकल्प नियंत्रणाखाली नाहीत. त्यामुळे त्या प्रकल्पात अण्वस्त्रे तयार करता येतात. एन.एस.जी. गटाकडून मिळणार्‍या युरेनियमवर आपण काही प्रकल्प चालवत आहोत पण भारतासारख्या मोठ्या देशासाठी युरेनियमची ही आयात ही तात्पुरती सोय ठरते; कायमचा उपाय ठरत नाही. प्रचंड मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांना लागणारे इंधन सातत्याने तसेच नियंत्रणमुक्त असण्याची गरज आहे. ती पुरवण्यासाठी इंधनाबाबत स्वावलंबन हाच एकमेव उपाय आहे. सुदैवाने भारतात थोरियमचा साठा जगात सर्वात जास्त आहे. तो युरेनियमला पर्याय आहे. थोरियमपासून अणुऊर्जानिर्मिती करावयासाठीचे तंत्रज्ञानही आपण विकसित करीत आहोत. त्यात यश येईपर्यंत युरेनियमबाबत स्वावलंबन साधलेच पाहिजे.
वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी आता खासी टेकड्यातल्या आणि कोडान्कुलमच्या आंदोलनामागे जे लोक आहेत ते भारत विरोधी आहेत हे दिसून येईल. कोडान्कुलमच्या आंदोलनामागे ख्रिश्‍चन मिशनरी आहेत, हे उशिराने का होईना पण सिध्द झाले आहे. हे आंदोलन करणारा एस. पी. उदयकुमार हा इडन्तकेरी येथील पॅरिश धर्मगुरू फादर जयकुमार याच्यासोबत रहातो. फादर जयकुमार याने या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे. कोडान्कुलमचा धर्मगुरू फादर थोडपूज, ओव्हरी गावाच्या सेंट अँटनी चर्चचा फादर एस.पीटर हे या आंदोलनात केवळ पाठींबाच देतात असे नाही तर त्यात सहभागी असलेल्यांना मदतही करतात. उपलब्ध माहितीनुसार हे लोक वाहतूक, पैसा आणि आंदोलकांना फूस लावण्यासाठीही हे सारे धर्मगुरू बिर्याणीपासून फळांपर्यंत अनेक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. लोकांनी अणुऊर्जा प्रकल्पावर दगडफेक करावी, म्हणून हेच लोक त्यांना चिथावणीही देत आहेत. या आंदोलनातून चर्च ला काढा आंदोलन संपेल.
आता मेघालयातल्या युरेनियम साठ्यावर बसलेले भुजंग कोण आहेत हे बघू. मेघालयात भारताच्या एकूण युरेनियम साठ्याचा सहावा हिस्सा उपलब्ध आहे. १९९० पासून या भागातून एक किलोसुध्दा युरेनियम काढण्यात आलेले नाही. कारण तिथे खासी टेकड्यांतील विद्यार्थी २० वर्षांपासून सतत आंदोलन करीत आहेत. मेघालयातील ख्रिश्‍चन मिशनरी त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांना संघटित करीत आहेत. हिंसक घटना, रास्ता रोको, निदर्शने, मोठे मोर्चे, सरकारी कार्यालयांवर हल्ले, जाळपोळ आणि अशा घटना नित्य घडत आहेत. सरकार या आंदोलनाशी चर्चा करते तेव्हा त्यांच्या वतीने हेच ख्रिश्‍चन धर्म प्रसारक चर्चेत पुढे येतात. झारखंडातही युरेनियम आहे आणि ते आदिवासी पट्‌ट्‌यात आहे. या आदिवासींवर ख्रिश्‍चन मिशनर्‍यांकडून चालवल्या जाणार्‍या स्वयंसेवी संघटनांचाच प्रभाव आहे. त्यामुळे तिथलाही युरेनियमचा साठा धोक्यातच आहे.विशेष नोंद : कोडान्कुलम आणि मेघालयात सुरू असलेल्या आंदोलनाचे कर्ते करविते एकच आहेत आणि त्यांना एकाच ठिकाणावरुन पैसा मिळत आहे. त्या दोन्हींची प्रेरणा तिथलीच आहे, जे देश आणि शक्ती भारताला अण्वस्त्रसज्ज पाहू इच्छित नाहीत.लेखक हे ख्यातनाम राजकीय आणि आर्थिक विश्‍लेषक आहेत.
( साभार : विवेक विचार
)
अनुवाद- अरविंद जोशी

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी