Saturday, November 10, 2012

आमिरखान सत्याच्या नावावर धंदा करत होता...


भाऊ तोरसेकर यांचा लेख 
   आमिरखान या लोकप्रिय अभिनेत्याने सहा महिन्यांपुर्वी प्रथमच छोट्या पडद्यावर आगमन केले. तसे त्याच्या आधी बहुतेक लोकप्रिय अभिनेत्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण आमिरखान आपल्या नेहमीच्या स्टाईलने वेगळेपणा दाखवण्यात चतूर आहे. तेव्हा त्याने नेहमीच्या कथाप्रधान मालिकेपेक्षा वेगळे रूप घेऊन पदार्पण केले. त्याने ‘सत्यमेव जयते’ नावाची एक मालिका स्वत:च निर्माण केली. त्यातून आजच्या भारतीय समाजाला भेडसावणार्‍या विविध समस्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून मोठीच खळबळ माजली होती. कारण तशा त्या समस्या सर्वांना माहिती असल्या तरी त्याचे भयंकर रूप आमिरने कथानकाच्या आकर्षक पद्धतीने सादर केले. कथा नेहमी नायक व खलनायक अशी फ़िरत असते. त्यात नुसता नायक असून चालत नाही. खलनायक नसला तर नायकाचे मोठेपण फ़िके पडत असते. म्हणूनच त्या समस्या मांडताना प्रथमच आमिरने काही व्यावसायिकांना खलनायकाच्या रुपात पेश केले. लगेच तो आपल्या देशातला महान समाजसुधारक बनून गेला. आता जणू त्याने मांडलेल्या समस्या कायमच्या सुटणार अशीच हवा निर्माण झाली होती. त्यात स्त्रीभृणहत्या, औषधांच्या धंद्यातील लुटमार, डॉक्टर मंडळींकडून होणारी फ़सवणूक, पर्यावरण असे अनेक विषय त्याने हाताळले. मनोरंजक स्वरूपात विषय मांडला मग तो लोकांना जाऊन भिडतो यात शंकाच नाही. आमिरने ते काम यशस्वीरित्या पार पाडले. पण तिथेच न थांबता त्याने त्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया मागवून त्यावर आधारित तक्रारी व अर्जही सादर केले होते. आज सहा महिने उलटून गेल्यावर त्यापैकी कोणत्या समस्या सुटल्या आहेत? त्यापैकी कोणत्या समस्या निदान मार्गी लागल्या आहेत? कुठल्या समस्येवर निदान उपाय शोधण्याचे काम वेगाने सुरू झालेले आहे? आणि कोणाकोणाला न्याय मिळू शकला आहे? सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे मोठीच जनजागृती झाली; असा त्यावेळी बहुतेकांचा दावा होता. मी त्या एकूणच कार्यक्रमाबद्दल उलट तपासणी सदरातून शंका घेतल्याने अनेक वाचक नाराज झालेले होते. निदान आमिर प्रयत्न करतो आहे, जनजागृती होते आहे, त्याला अपशकून करून मी काय साधू बघतो, असेही अनेक वाचकांनी फ़ोन करून मला खडसावले होते. अजून मी लिहितोच आहे आणि आमिरखान वा त्याचा सत्यमेव जयते किती लोकांना आज आठवतो आहे? त्यातून जी जनजागृती झाली, त्याने काय साध्य झाले, तेवढे मला अडाण्य़ाला अजून समजू शकलेले नाही. कोणी माझ्या ज्ञानात भर घालील काय?

   उगाच नाचगाण्य़ाचे भंपक कार्यक्रम न करता आमिरने महत्वाच्या विषय समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधले ही त्याची कामगिरी मी कधीच नाकारणार नाही. त्याचे श्रेय त्याला द्यावेच लागेल. पण ते करताना त्याच्याकडून मोठीच समाजसुधारणा होईल; अशा ज्या अपेक्षा निर्माण करण्यात आल्या होत्या, त्याचे काय? त्या अपेक्षांचे काय झाले? लोकांनी एसएमएस केले आणि आमिरने उत्तम धंदा केला. वर्षभर खपून चित्रपटातून जितके पैसे त्याला मिळाले नसते, तेवढे त्याने या तेरा भागांच्या मालिकेतून मिळवले. पण त्यामुळे त्याने लोकांच्या अपेक्षा ज्या वाढवल्या त्यांचे काय? जे काम सत्ता व अधिकार हाती असून सरकार करू शकलेले नाही, ते शिवधनुष्य आमिर उचलणार याची त्याच्या सत्यमेव चहात्यांना पुर्ण खात्री तेव्हा पटलेली होती. त्यांच्याकडे उत्तर आहे काय? मी त्यांना दोष देणार नाही, की गुन्हेगार वा मुर्खही म्हणत नाही. असेच होणार याची मला तेव्हाही खात्री होती. आज लोकांना झुलवणार्‍या केजरिवाल यांच्याकडूनही काहीच होणार नाही, याचीही मला तेवढीच खात्री आहे. कारण ते उद्धारकाचा आव आणत असले तरी प्रेषित नाहीत; एवढे मला नेमके ठाऊक आहे. पण त्यांच्यापाशी लोकांच्या सामुहिक भावनेशी खेळायचे कौशल्य जरूर आहे. त्यामुळेच ते सांगतात ते लोकांना सत्य आहे असे वाटू शकते. त्यामुळेच त्यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हटल्यावर लोकांचा त्यावर लगेच विश्वास बसत असतो. कारण अशी माणसे लोकांना सत्य सांगत नसतात, तर आवडेल असे सत्य सांगत असतात. आपोआप लोकांना त्यांनी कथन केलेले सत्य वाटू लागते. लोक त्या सत्याच्या प्रेमात पडतात. त्यांना सत्य सांगायची गरजच नसते. ते सांगतील ते सत्य असते. ते दिसायची वा सिद्ध करण्याची गरज नसते.

   आठवते तर बघा आठवून. आमिरखानने लोकांना कुठले उत्तर दिले नव्हते, तर सोपा उपाय दिला होता. त्यातून समस्या सुटणार असा आभास निर्माण केला होता. फ़ार काही करण्याची गरज नाही रस्त्यावर येऊन लढण्याचीही गरज नाही. नुसता एक एसएमएस पाठवा. किती सोपा उपाय होता ना? किती लाख लोकांनी एसएमएस पाठवले, त्याच्या पत्त्यावर आणि फ़ोनवर? आपण काहीतरी केल्याचे पोकळ समाधान तेवढ्या सर्वांना त्याने मिळवून दिले ना? घडणार काहीच नव्हते आणि घडलेही नाही. बाल लैंगिक शोषणावर त्याने एक भाग दाखवला होता. आज रोजच्यारोज अनेक शहरातुन अल्पवयिन मुलींवर सामुहिक बलात्काराच्या बातम्या येत आहेत. मग कुठल्या सत्याचा विजय झाला? स्त्रीभृणहत्येच्या केसेस चालूच आहेत ना? डॉक्टर पेशातले व औषध धंद्यातले वाकडे उद्योग थांबलेले आहेत काय? मग आमिरच्या त्या मालिकेने साधले तरी काय? त्याच्या खिशात काही कोटी रुपये पडण्यापलिकडे नेमके काय साध्य झाले? त्याने मनोरंजन करून पैसे कमवू नयेत, असा माझा अजिबात दावा नाही. सलमान किंवा अमिताभ यांच्याप्रमाणे त्यानेही आपला धंदा करावा. त्याबद्दल माझा आक्षेप असण्याचे काही कारण नाही. माझा आक्षेप होता तो केवळ त्याने धंद्याला समाजसेवेचा फ़सवा मुखवटा चढवण्याला. पण ते सत्य किती लोकांना पचवता आले? मी सत्य सांगत होतो. पण ते लोकांना आवडणारे नव्हते. आणि आमिरखान सत्याच्या नावावर धंदा करत होता, तर त्याला लोकांनी डोक्यावर घेतला होता. यालाच सामुहिक मानसिकता म्हणतात. विनाविलंब आमिरखान त्या लोकभावनेचा धंदा करू शकतो. त्या समुह भावनेशी खेळू शकतो. त्याच्या आधारे लोकांच्या मनावर आपले अधिराज्य निर्माण करू शकतो.

   सामान्य माणसाची अगतिकता व गरज यांचा वेध घेऊन तुम्ही त्यांच्या अपेक्षा व कल्पनाशक्तीला गवसणी घालू शकलात; तर तुम्हाला झुंडीची मानसिकता निर्माण करता येते आणि त्या बळावर जमावाकडून वाटेल ते करून घेता येत असते. तुम्ही नुसते आमिरचे कार्यक्रम बघत नव्हता. तर त्याच्यामध्ये आपल्या पिडलेल्या नाडलेल्या जीवनाचा उद्धारक शोधत होता. मग त्याने आवाहन केले म्हणून एसएमएस पाठवत होता. त्यातून समस्या सुटणार नाहीत, हे तुम्हालाही कळत असते. पण लॉटरी लागावी अशी जी खुळी अपेक्षा असते, तसेच आपण वागत असतो. कोणीतरी येऊन आपला उद्धार करावा, ही सामान्य माणसाच्या सुप्त मनातील इच्छा असते, त्याच्यावर स्वार होण्याची कुवत ज्यांच्यापाशी असते; तेच नेतृत्व करू शकतात. त्याचे कारण लोकांना आपल्या वतीने निर्णय घेणारा व आपल्यावर निर्णय लादणारा आवडत असतो. कधी तो आमिरचे रुप घेऊन समोर येतो कधी तो निर्मल बाबाच्या रुपाने अवतरतो. जोपर्यंत अशी सामुहिक अगतिकता लोकसंख्येमध्ये असणार आहे; तोपर्यंत लोकशाही, समता वगैरे गोष्टी झुट असतात. कोणीतरी आपल्यावर राज्य करतो, कोणीतरी आपल्यावर हुकूमत गाजवतो, कोणीतरी आपल्यावर त्याची मते लादत असतोच. त्यापासून सुटका नसते. कारण आपल्याला आपले असे मत नसते किंवा आपल्या आयुष्यातले निर्णय घेण्याचीही क्षमता आपल्यात नसते. आपण स्वत:ला इतके अगतिक व गरजवंत करून ठेवलेले असते, की आपल्याला उद्धारकाचा शोध घ्यावाच लागत असतो.

   म्हणूनच सत्यमेव जयते असे म्हणतात, तेव्हा सामान्य माणसाचे सत्य आणि आपल्यावर विविधप्रकारे सता गाजवणार्‍यांचे सत्य; यात जमिनअस्मानाचा फ़रक असतो. ज्या कारणास्तव तुम्हाआम्हाला मुख्यमंत्री भेटही नाकारतो, त्याच कारणास्तव आमिरखानला सवड काढून मुख्यमंत्री त्याची प्रतिक्षा करतात. सत्य असे बदलत असते. आदर्शची फ़ाईल भराभरा पुढे सरकते आणि आपल्या फ़ाईलवरची धुळही झटकताना वर्षे उलटतात. वड्राची फ़ाईल एका दिवसात अनेक ऑफ़िसातून फ़िरते; पण तुमचीआमची फ़ाईल एकाच ऑफ़िसमधल्या या टेबलवरून दुसर्‍या टेबलवर जाताना आयुष्य संपून जाते. ही किमया त्यांना साधते त्यामागे आपलीच सामुहिक ताकद असते, आमिरखानच्या कार्यक्रमाची लोकप्रियता त्याला बळ देत असते. आपली सामुहिक म्हणजे कळपाची मानसिकताच त्याचे बळ असते आणि तीच तर आपली दुर्बळता असते. आपण झुंड असतो आणि आपल्या झुंडीची विध्वंसक शक्ती दाखवूनच आमिर वा अन्य कुणी त्यांचे हेतू साध्य करीत असतात. तिथे त्यांच्या सत्याचा विजय होतो आणि आपले सत्य पराभूत होते. म्हणूनच आपण झुंड का आहोत व झुंड म्हणून का जगतो त्याचा विचार आपणच करायला हवा आहे.    ( क्रमश:)
भाग   ( १६ )    १०/११/१२
http://bhautorsekar.blogspot.in/2012/11/blog-post_7905.html 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी