Thursday, February 7, 2013

सुशीलकुमार शिंदे यांचा खोटारडेपणा


(एस. गुरुमूर्ती यांचा लेख चेन्नईवरून प्रकाशित होणार्‍या
न्यू इंडियन एक्सप्रेसया दैनिकाच्या २४ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. विषय मुख्यत: भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणार्‍या समझौता एक्सप्रेसया गाडीवर, भारतातील पानिपत येथे जो बॉम्ब फेकण्यात आला आणि ज्यासाठी बर्‍याच उशिराने सरकारी तपास यंत्रणेने तथाकथित हिंदू आतंकवाद्यांची धरपकड केली, त्या संबंधी आहे. या लेखाचा अनुवाद ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांनी केलाय... )


दाऊद इब्राहिमची मदत

‘‘२० जानेवारी २०१३ ला, जयपूर येथील कॉंग्रेसच्या तथाकथित चिंतन शिबिरात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समझौता एक्सप्रेस, मक्का मशीद आणि मालेगाव येथील बॉम्बस्फोटासाठी रा. स्व. संघ आणि भाजपा यांना जबाबदार ठरविले होते. शिंदे यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी लष्कर-ए-तोयबाचे नेते हफीज सईद यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तेव्हा सईद यांच्या या मागणीसाठी शिंदे हे साक्षीदार ठरतात. आता आपण या बॉम्बस्फोटाच्या पुराव्यांचा विचार करू.

‘‘राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने २९ जून २००९ ला पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे की, ‘२००७ च्या फेब्रुवारी महिन्यात समझौता एक्सप्रेसवर जो बॉम्बहल्ला झाला त्यासाठी लष्कर-ए-तोयबाचा मुख्य समन्वयक कासमानी अरिफ हा जबाबदार आहे.या कासमानीला दाऊद इब्राहिमने पैसा पुरविला होता. दाऊदने अल् कायदाया अतिरेकी संघटनेलाही पैशाची मदत केली होती. या मदतीच्या मोबदल्यात समझौता एक्सप्रेसवरील हल्ल्यासाठी अल् कायदाने मनुष्यबळ पुरविले होते. सुरक्षा समितीचा हा ठराव राष्ट्र संघाच्या साईटवर उपलब्ध आहे. दोन दिवसांनंतर म्हणजे दिनांक १ जुलै २००९ ला अमेरिकेच्या (युएसए) कोषागार खात्याने (ट्रेझरी डिपार्टमेंट) एका जाहीर पत्रकात म्हटले की, अरिफ कासमानीने बॉम्बस्फोटासाठी लष्कर-ए-तोयबाशी सहकार्य केले. अमेरिकेने अरिफ कासमानीसहित एकूण चार पाकिस्तानी नागरिकांची नावेही जाहीर केलीत. अमेरिकन सरकारच्या या आदेशाचा क्रमांक आहे १३२२४ आणि तोही सरकारी साईटवर उपलब्ध आहे.



पाकिस्तानची कबुली

‘‘राष्ट्र संघ आणि अमेरिका यांनी लष्कर-ए-तोयबा आणि कासमानी यांच्याविरुद्ध कारवाई घोषित केल्यानंतर, सहा महिन्यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी, पाकिस्तानातील आतंकवादी, समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बस्फोटात सहभागी होते, हे मान्य केले. पण त्याला एक परन्तुक जोडले. ते असे की, ले. क. पुरोहित याने पाकिस्तानात राहणार्‍या इस्लामी आतंकवाद्यांना, यासाठी सुपारी दिली होती. (संदर्भ- इंडिया टुडेऑनलाईन, २४-०१-२०१०)

‘‘राष्ट्र संघ किंवा अमेरिका किंवा पाकिस्तानचे गृहमंत्री यांची बात सोडा. पण अमेरिकेत या प्रकरणाचा एका वेगळ्या यंत्रणेने जो तपास केला, त्यातून आणखी माहिती पुढे आली. सुमारे १० महिन्यांनंतर सेबास्टियन रोटेल्ला या शोधपत्रकाराने आपल्या अहवालात म्हटले आहे की, समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बहल्ल्यात डेव्हिड कोलमन हेडली याचाही हात होता. हे त्याची तिसरी पत्नी फैजा आऊतल्लाह हिनेच आपल्या कबुलीजबाबात सांगितले आहे. रोटेल्लाच्या अहवालाचे शीर्षक आहे, ‘२००८ मधील मुंबईतील बॉम्बस्फोटासंबंधी अमेरिकी सरकारी यंत्रणांना सावध करण्यात आले होते.रोटेल्ला पुढे सांगतात की, ‘आपणांस या हल्लाप्रकरणी गुंतविण्यात आले होते, असे फैजाने म्हटले आहे’ (वॉशिंग्टन पोस्ट- ५-११-२०१०). २००८ च्या एप्रिल महिन्यात लिहिलेल्या आपल्या तपासणीच्या पुढील भागात रोटेल्ला लिहितात की, ‘फैजा, इस्लामाबाद येथील (अमेरिकन) दूतावासात गेली होती आणि २००८ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट होतील, अशी सूचनाही तिने दिली होती.



सीमीचा सहभाग

‘‘इ. स. २००७ मध्ये, समझौता एक्सप्रेसवरील हल्ल्याची चौकशी सुरू होत असतानाच, या हल्ल्यात सीमी’ (स्टुडण्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या संस्थेचाही सहभाग होता, असे पुरावे प्राप्त झाले आहेत. इंडिया टुडेच्या १९-०९-२००८ च्या अंकातील बातमीचे शीर्षक होते मुंबई आगगाडी स्फोटात आणि समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा हात : नागोरी’. त्या बातमीत लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तान यांच्या सहभागाचा सारा तपशील दिला आहे. सीमीच्या नेत्यांची जी नार्को चाचणी करण्यात आली, त्यावरून हे स्पष्ट झाले होते. ही नार्को चाचणी, ‘इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सीमीचे महासचिव सफदर नागोरी, त्याचा भाऊ कमरुद्दीन नागोरी आणि अमील परवेज यांच्या नार्को चाचण्या बंगलोर येथे एप्रिल २००७ मध्ये करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचे निष्कर्ष इंडिया टुडेकडे उपलब्ध आहेत. त्यावरून स्पष्ट होते की, भारतातील सीमीच्या कार्यकर्त्यांनी, सीमेपलीकडील पाकिस्तान्यांच्या साहाय्याने, हे बॉम्बस्फोट घडविले होते. एहतेशाम आणि नासीर ही त्या सीमीच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत कमरुद्दीन नागोरीही होता. पाकिस्तान्यांनी, सूटकेसचे वेष्टन इंदूरच्या कटारिया मार्केटमधून खरेदी केले होते. या प्रकरणाच्या चौकशीत हे स्पष्ट झाले की, त्या सूटकेसमध्ये पाच बॉम्ब ठेवले होते आणि टायमर स्विच्ने स्फोट घडवून आणले होते.



खोटारडे एटीएस

‘‘हे पुरावे समोर असताना महाराष्ट्राचे पोलिस खाते, या दिशेने पुढे का सरकले नाहीत, असा प्रश्‍न स्वाभाविकच उत्पन्न होतो. असे दिसून येते की, महाराष्ट्र पोलिस खात्यातील काहींना समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बहल्ल्याचे प्रकरण कसेही करून मालेगाव बॉम्बस्फोटाशी जोडायचे होते. महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस), आपल्या वकिलाच्या मार्फत, विशेष न्यायाधीशाला सांगितले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित यानेच समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्स पुरविले होते. परंतु नॅशनल सेक्युरिटी गार्डया केंद्र सरकारच्या यंत्रणेने सांगितले की, समझौता एक्सप्रेस हल्ल्यात आरडीएक्सचा वापर करण्यात आला नव्हता. पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर या रासायनिक द्रव्यांचा उपयोग करण्यात आला होता. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनीही या विधानाची पुष्टी केली होती. मजेची गोष्ट ही की, त्या दिवशी म्हणजे १७-११-२००८ ला दहशतवादविरोधी पथकाच्या वकिलानेही आपले पूर्वीचे बयाण वापस घेतले. परंतु जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले होते. पाकिस्तानने जाहीर केले की, सचिव पातळीवरील बैठकीच्या वेळी, समझौता एक्सप्रेसवरील हल्ल्ल्यातील कर्नल पुरोहिताच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल. शेवटी, २० जानेवारी २००९ ला दहशतवादविरोधी पथकानेही अधिकृत रीत्या मान्य केले की, समझौता एक्सप्रेसवरील हल्ल्यासाठी कर्नल पुरोहित याने आडीएक्स पुरविले नव्हते. अशा प्रकारे समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बहल्ल्याचे केंद्र, लष्कर-ए-तोयबा आणि सीमीयांच्याकडून कर्नल पुरोहित आणि त्याद्वारे भगव्या रंगाकडे वळविण्यात आले. महाराष्ट्र पोलिस यंत्रणेवर दाऊद इब्राहिमचा प्रभाव आहे की काय, याची आता चौकशी झाली पाहिजे.’’
प्रश्‍न असा की, खरे कोण सांगत आहे? राष्ट्र संघ, अमेरिका, की शिंदे साहेब? शिंदे साहेबांकडून या प्रश्‍नाच्या उत्तराची अपेक्षा आहे.
नितीशजी, आता तुम्हीच मनावर घ्या!

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी