Tuesday, March 26, 2013

पुणेकरांना एक पत्र शालजोडीतून…

मूळचा मराठवाड्यातील असलेला माझा मित्र सुनील सध्या पुण्यात शिक्षण घेतोय. त्याच्याकडे एका पुणेकराचे पत्र आले. पत्रातील दांभिकता आणि शब्दछल करून चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची प्रवृत्ती त्याला खटकली म्हणून त्याने पुणेकराला समजेल अशा भाषेतून अर्थात शालजोडीतून उत्तर दिले. ती दोन्ही पत्रे वाचनीय आणि विचार करायला लावणारी आहेत म्हणून येथे देत आहे…  सिद्धाराम 

----------------------------------------------------
सुनीलने शालजोडीतून दिलेले उत्तर … 

पुणेकरांचा पुण्याबद्दलचा अभिमान वाचून आश्चर्य वाटले नाही, कारण मागील काही दिवसांपासून पुणेकरांच्या बुद्धीमातेला दाद दिली पाहिजे असे मला वारंवार वाटत होते. जी काही पद्धत ते सुरु करतील त्याचे समर्थन ते असे करतात कि त्यानंतर समोरच्याची बोलतीच बंद. त्यामुळे पुणेकरांनी दाखवलेल्या या अभिमानाचे मला विशेष आश्चर्य वाटले नाही.

मागील २ वर्षापासून पुण्यात राहतोय म्हणून या पत्रानंतर जे वाटले ते लिहावे असे वाटले म्हणून लिहिण्याचा प्रयत्न. 
हे लिहित असताना मला कुठेही पुणेकरांना दुखवायचे नाही कारण आम्ही आपली मराठवाड्यातील मानसं, उगाच कुणाला दुखवायचे आम्ही कधी शिकलोच नाही. शब्दांचे खेळ तरी कधी आम्हाला जमणारच नाहीत कारण सर्व साहित्यिक आणि भाषाशुद्धीचे जाणकार पुण्यातच आहेत. पण म्हणून कुणाच्याबद्दल उगाच मनामध्ये असूया निर्माण का व्हावी? आम्हाला प्यायला पाणी नाही आणि पुण्यात मिळतंय म्हणून असूया निर्माण होण्यात कसले शहाणपण? पुणेकरांनी मुंबई मधल्या लोकांशी तुलना करून स्वतःला नशीबवान समजावे तर मग आम्ही पुणेकरांकडे पाहून स्वतःला का नशीबवान समजू नये?

पत्ता विचारल्यास त्याचे पैसे पडतील असे फलक लावण्यास पुणेकरांना अभिमान वाटत असेल तर त्यांचा अभिमान आमच्यात येवू नये हीच प्रार्थना. पत्ता विचारल्यावर तो आम्ही सांगतोच पण शक्य असेल तर त्याला तिथपर्यंत नेवून पण सोडतो कारण आमच्या कडे सांस्कृतिक चळवळ करावी लागत नाही तर ती जगण्याचा प्रयत्न होतो. आम्ही आमच्या भागाला सांस्कृतिक माहेरघर करून संस्कृतीला सासरी पाठवत नाही तर सांस्कृतीला देव मानून तिची पूजा करतो आणि ती जगतो. घरी आलेला प्रत्येक माणूस हा अतिथी असतो असे मानणारी आम्ही मानसं, त्यांची योग्यता ठरवून पाहूणचार करायला तितकी बुद्धी आम्हाला नाही. Each soul is potentially divine असे वाचायचे आणि समोर माणूस आला कि लगेच त्याची योग्यता ठरवायची, इतकी बुद्धी खरेच आमच्याकडे नाही हे मान्य करतो.

पाय मुरगळला  तरी आमच्याकडे घरचेच तेल लावून फक्त एक कप चहामध्ये पाय चोळणारी माणसं अजून आहेत. समजा कुणी नसेल तर शेजाऱ्याकडे जाऊन iodex घ्यायला आम्हाला लाज वाटत नाही कारण त्याच्या घरावर काय करावे आणि काय करू नये याचा फलक लागलेला नाही.

हेवा हा अप्रतिम असतो याचा शोध पण फक्त पुणेकरांनाच लागू शकतो हे मान्यच केले पाहिजे. पण इथे तुमच्या एका मताशी मात्र मी पूर्णपणे सहमत आहे ते म्हणजे तुमची शाखा इतरत्र कुठेही नाही. आणि ती होवू नये अशीच माझी प्रार्थना आहे. ती शाखा इतरत्र नाही म्हणून मला हेवा वाटणार नाही तर मी अपार आनंदी आहे. तशी शाखा इतरत्र होवू लागली तर सर्वत्रच चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची पद्धत सुरु होईल. माझी दगडू शेठ चरणी प्रार्थना आहे कि, पुण्याची शाखा इतरत्र खरेच होवू नये.

 (असे प्रत्यत्तर देणे कदाचित चुकीचे असेल पण आपला अभिमान व्यक्त करताना दुसर्याला नावं ठेवण्याची आवश्यकता नसते असे मानणार्यातला मी आहे. असूया, अप्रतिम हेवा आणि योग्यता हि शब्दावली  खटकली म्हणून हे लिहिण्याचे धाडस. हे लिहिण्याची माझी योग्यता नाही हे माहित असूनही केलेल्या साहसाबद्दल क्षमस्व. खरे तर पुण्यातल्या अनेक गोष्टींचा मलाही अभिमान आहे; पण पुणेकराने त्याच्या पत्रात सांगितलेल्या गोष्टींचा नव्हे. अभिमान वाटाव्या अशा अनेक गोष्टी पुण्याकडे आहेत…)

- सुनील 9371934407

*****************

पुणेकराचे हेच ते पत्र


Subject: Fwd: Fw: Punekar punekar punekar



पुणेकरांना आपल्या शहराबद्दल वाजवीपेक्षा जरा जास्तच अभिमान आहेअसा एक सूर उर्वरित महाराष्ट्रातील लोक लावतात. त्यात थोडी असूया असते. मग आपापल्या परीने ते पुण्याला दूषणे देण्याचा माफक प्रयत्न करतातपण त्यात काही अर्थ नाही. कोणी म्हणे पुण्यातले लोक आळशी असतात. दुपारी झोपतात. दुकानं दुपारची बंद असतात. असे आरोप करणाऱ्यांना पुणेकरांचा अप्रतिम हेवा वाटत असतो. त्या भरात त्यांच्या हे लक्षात येत नाहीकी दिवसभर धावत राहणे याचा अर्थ तुम्ही कामसू आहात असा होत नाही. आता हे मुंबईकर बघा ना. सकाळी सातला घराबाहेर पडतातबसमध्येलोकलच्या डब्यात दीड-दोन तास घालवून कसे बसे ऑफिसला पोहोचतातअर्धमेल्या अवस्थेत. पुन्हा घरी परतताना तेच हाल. भरीला ट्रॅफिक जॅम्स वगैरे आहेतच. अशा रीतीने आयुष्याचा बराच काळ त्यांची लटकलेली वटवाघळं झालेली असतात. पण त्यांना असं वाटतं की या हालअपेष्टा म्हणजेच काम. पुण्यातल्या लोकांना त्यांच्याविषयी खूप सहानुभूती वाटते. परंतु पुणेकरांची दिनचर्या तशी नाही. जुन्या पेन्शनर पुणेकरांचा तर प्रश्नच नाही. खरंतर तेच भल्या पहाटे उठून पर्वती किंवा वेताळ टेकडी वगैरे चढून उतरून त्यांच्या अड्डय़ावर गप्पा टाकत असतात. त्या गप्पांमध्ये ओबामाने काय करायला हवे इथपासून भाजणीच्या थालीपीठाचे शरीराला होणारे फायदे इथपर्यंत सर्व विषयांचा अंतर्भाव असतो. पण हे चित्र तर कुठेही बघायला मिळतं. शिवाजी पार्कपासून रंकाळ्यापर्यंत. पण आमच्या मन्या परांजपेसारखी लाइफ स्टाईल दुसरीकडे दाखवा. शक्यच नाही.  
मन्या परांजपे सकाळी पाच वाजता उठतो. हसऱ्या चेहऱ्यानी. सायकल घेतो आणि रपेट मारायला जातो. चांगले तीस चाळीस किलोमीटर. मग 'रूपालीवर येतो (रूपाली म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ उप्पीट मिळणारे उपाहारगृह). तिथे त्याचा एक 'क्रॉसवर्डसोडवणारा ग्रुप आहे. वाफाळत्या उप्पीटइडलीकॉफीबरोबर मनाची मशागत झाली की तो घरी जातो. तयार होऊन ९ वाजता त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. ताजातवानाउत्साहानी मुसमुसलेला. कारण घर ते ऑफिस हा प्रवास १५ मिनिटांचा. ९ ते १ कामाचा फडशा पडला की घरी जेवायला परत. डबेवालाथंड जेवण वगैरे तडजोडी नाहीत. तव्यावरची पोळीताजा भात या किमान अपेक्षा आहेत त्याच्या. जेवण झालं की मन्या बायकोला सांगतो, 'प्रियेमला अनास्थेशिया (भूल) दे'. असे म्हणून तो पलंगावर झोपण्याच्या तयारीत बसता होतो. इकडे त्याची बायको चितळे बंधूंच्या दुकानातून आणलेला शुद्ध तुपातला मोतीचुराचा लाडू घेते आणि एका बाउलमध्ये चार चमचे साजूक तुपात तो लाडू ठेवते. मग मायक्रोवेव्हमध्ये गरम करून हा संपृक्त लाडू मन्याला खायला देते. मन्या हा लाडू खाताच त्याच्यावर जणू अनास्थेशियाचा अंमल होतो आणि तो झोपी जातो. ३ वाजता त्याला जाग येते तेव्हा तो रिचार्ज झालेला असतो. ३ ते ७ पुन्हा कामावर. कामाचा फडशा. की ७ वाजता तो बिलियर्ड्स खेळायला मोकळा. नंतर बायकोबरोबर झाकीर हुसेन ऐकायला नाहीतर नाटक बघायला आवर्जून उपस्थित. इतर शहरातील लोकांनी निंदा व वंदा पण हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. 
आता अनेकदा वऱ्हाडी लोकांच्या आदरातिथ्याच्या भ्रामक कल्पना पुढे करून पुणेकरांवर अनाठायी आरोप केला जातो कीते माणूसघाणे असतात. पण हे साफ खोटं आहे. याउलट दारी आलेल्या पाहुण्याची 'त्याच्या योग्यतेनुसारउठबस करणं हा पुणेकरांचा स्वभाव आहे. कामाशिवाय उगीच येणाऱ्या आगंतुकाला चहा वगैरे देणे म्हणजे पाहुणचार नव्हे. उलट आपल्या अमूल्य वेळेचा अपव्यय करणाऱ्या प्रवृत्तींना दाराबाहेरच ठेवणे बरे हे धोरण पुणेकर जाणतात. त्यामुळे असा आरोप करणाऱ्यांनी आपल्याबद्दल समोरच्याला काय वाटते हे समजून घ्यावे. अनेकदा पुण्यातल्या हॉटेलात पाटय़ा असतात- 'कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. राजकारणाविषयी चर्चा चालणार नाहीत.हे तर काहीच नाही. आमच्या एका मित्राने घराच्या दारातच मोठा आरसा लावला आहे. त्याला विचारले की बाबा रेयाचे प्रयोजन कायतेव्हा तो वदला, 'येणाऱ्या व्यक्तीला एकदा स्वत:चे प्रतिबिंब दाखवावे म्हणजे तो आत्मपरीक्षण करेल की या घरात जायला मी पात्र आहे अथवा नाही. आणि अनुभव असा की बरेच लोक आल्यापावली परततात.हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. 
कोल्हापूरकडची राजेशाही मंडळी म्हणतात कीपुणेकर चिक्कू असतात. पण उधळपट्टी न करणं हा चिक्कूपणा कसा होईलआता हेच पहा ना- समजा आपला पाय मुरगळला तर आपण काय करतोआपण मलम लावतो. दोन दिवस वाट पाहतो. जर दुखणं थांबलं नाही तर डॉक्टरकडे जातो. मग तो देईल ते औषध आणि करेल ते उपचार. आपल्या मनानी आपण काहीही करत नाही. याचाच अर्थ असा कीमलम हा एक तात्पुरता उपाय अहे. मग असे असताना आपण मलमाची अख्खी बाटली कशाला आणायचीती वायाच जाणार. आपल्या मनातल्या या प्रश्नाची जाणीव होऊनच पुण्यातल्या एका औषधाच्या दुकानावर बोर्ड झळकला-'आमचे येथे सुटे आयोडेक्स मिळेल.या दुकानात गेल्यानंतर आपण एक रु पया दिला की दुकानदार झाकण काढून बाटली समोर धरत असे. आपण बोट घालून मलम घ्यायचे. बोट वाकडे करायचे नाही. तसे केल्यास दुकानदार एक रु पया जास्त घेत असे. हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. 
पुणेकर मंडळींबद्दल आणखी एक मत म्हणजे ते विक्षिप्त असतात. होअसतात. नाही कोण म्हणतंयपण या विक्षिप्तपणातच संशोधककाळाच्या पुढे असणारे विचारवंत आणि असामान्य बुद्धीचे नमुने दडलेले असतात. रूढार्थानं ते वेडे असतीलही पण अगदी थोडक्यात ज्यांचं नोबेल हुकलंय असे अनेक चक्रम पुण्यातच भेटतात. आता आमचा काका गोखले असाच झंगड होता. त्यानं विविध प्रयोग केले. पण त्याच्या संशोधनाचं चीज झालं नाही. उदाहरणार्थ त्यानं एका रेकॉर्ड-प्लेयरच्या वायरिंगमध्ये असे फेरफार केले की तबकडी उलटय़ा दिशेनं फिरू लागली. मग त्या तबकडीवर सुई ठेवली की ती उलटी- म्हणजे आतून बाहेरच्या बाजूला प्रवास करू लागली. त्यामुळे त्या रेकॉर्डमधून चित्रविचित्र आवाज येऊ लागले. काकानं त्या आवाजांचा अभ्यास केला आणि असा निष्कर्ष काढला की या उरफाटय़ा रेकॉर्ड प्लेयरवर मराठी गाण्याची तबकडी लावली की ती उर्दूत ऐकू येते. हा असा शास्त्रज्ञ निर्माण होण्यासाठी तसंच वातावरण असावं लागतं म्हणून. हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. 
आणि होएक लिहायचं राहिलं कीजे पुण्यात होऊ शकतं ते फक्त पुण्यातच होऊ शकतं. कारण 'आमची इतरत्र कुठेही शाखा नाही.'

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी