Monday, June 24, 2013

हनुमंत उपरे यांची चळवळ निव्वळ थोतांड

'कर्मकांडा'ला सरसकट विरोध करण्याचे आवाहन, हे थोतांडच
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्यशोधक ओबीसी परिषद धर्मातर करण्यासंबंधी अभियान चालवत आहे. 'ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर' या अभियानांतर्गत पाचवी जनजागृती परिषद येत्या २२ सप्टेंबर रोजी नाशकात होईल. पुढील ३६५ दिवस एकही धार्मिक कर्मकांड करायचे नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांच्या नेतृत्वाखाली चाललेली ही चळवळ निव्वळ थोतांड आहे, असे म्हणायला पुरेसा वाव आहे.

पहिला मुद्दा, महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक तत्त्वज्ञानानुसार निर्मिकाची संकल्पना मांडली आहे; बौद्ध धम्माची नव्हे! संघटनेच्या नावातच 'सत्यशोधक' हे बिरुद लावणाऱ्या संघटनेने आधीच अस्तित्वात असलेल्या एखाद्या धर्माचा स्वीकार करण्यासाठी आंदोलन करणे म्हणजे एक विनोदच होय.
दुसरा मुद्दा, कर्मकांडाला विरोध करण्याचा. तसे पाहिले तर प्रत्येक संस्कृतीने आपापल्या समाजाला शिस्त लावण्यासाठी कर्मकांडे निर्माण केल्याचे दिसते. ख्रिश्चन समाजात रविवारी मेणबत्त्या जाळाव्यात, विशिष्ट पद्धतीनेच प्रार्थना करावी, पाण्यात उलटी डुबकी मारायला लावूनच धर्मातर करवून घ्यावे, अशी शेकडो कर्मकांड आहेत. इस्लाम धर्मातील लोक विशिष्ट हालचाली करूनच नमाज (प्रार्थना) करतात. भारतीय संस्कृतीतही पूजा, आरती, गंध लावणे, अनुष्ठान, नामजप आदी कर्मकांड आहेत. बौद्ध धम्मही कर्मकांडाला अपवाद नाही. वस्तुत: गौतम बुद्धांनी मूर्तीपूजा नाकारली, परंतु त्यांच्या पश्चात अनुयायांनी त्यांच्या भव्य मूर्ती स्थापून कर्मकांड चालू केल्याचे आपण पाहतो. इतकेच काय जगातील सर्वच देशांच्या राष्ट्रीय जीवनातही कर्मकांडे पाळली जातात. विशिष्ट दिवशी राष्ट्रध्वज फडकवायचे, विशिष्ट पद्धतीनेच ध्वजवंदन करायचे आदी. असे असताना बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या तयारीसाठी ओबीसी बांधवांनी कर्मकांड करू नये, असे सांगणे हास्यास्पद नाही काय?
मानवी मूल्यांना नख लावणारी, माणसाला निष्क्रिय बनवणारी कर्मकांडे त्यागली पाहिजेत याविषयी कोणाचेच दुमत नाही. मानवी मनाला सुसंस्कृत करण्यासाठी, मेंदूसोबतच हृदयाचाही विकास करण्यासाठी, समाजाचे अभिसरण करण्यासाठी काही मर्यादेपर्यंत कर्मकांडे आवश्यकच ठरतात. इमानेइतबारे विविध परिषदा आयोजित करण्याचे कर्मकांड निष्ठेने करणारे हनुमंत उपरे ही बाब समजून घेतील का, हा खरा प्रश्न आहे. ओबीसी समाजात काहीही पत नसताना 'सत्यशोधक' विचारांचा बुरखा पांघरून हिंदू धर्मावर सतत आघात करणे हे उपरे यांचे कर्मकांडच ठरते. तसे नसते तर त्यांच्या विविध परिषदा यशस्वी करण्यासाठी त्यांनी इस्लामी मूलतत्त्ववाद जपणाऱ्या संघटनांशी सलगी केलीच नसती. कट्टरपंथी लोकांशी हातमिळवणी करणे कोणत्या 'सत्यशोधक' तत्त्वात बसते?
प्रा. देवल बुक्क, सोलापूर.
साभार - लोकसत्ता 
http://www.loksatta.com/sampadkiya-news/pilgrim-should-think-135430/

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी