Friday, September 19, 2014

असे होते विवेकानंदांचे हिंदुत्व

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या काळातही अशीच स्थिती होती. आज ज्या ज्या कारणांसाठी हिंदुत्वाला बदनाम करण्यात येत आहे, त्याच कारणांसाठी शंभर वर्षांपूर्वीही केले जात होते. स्वामी विवेकानंदांनी तेव्हा अतिशय प्रभावीपणे हिंदुत्व आणि देशहित यावर आघात करणार्‍यांना उघडे पाडले होते. यातील काही प्रमुख मुद्द्यांवर स्वामी विवेकानंदांची काय भूमिका होती हे त्यांच्याच शब्दांत पाहणे उचित होईल.

प्रस्तावना
स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची ध्वजा त्रिखंडात फडकवली होती. ज्यांनी कधी स्वामी विवेकानंदांच्या वाङमयाची चार पानेही वाचलेली नाहीत, असे लोक स्वामी विवेकानंदांनी ‘वेगळा’ हिंदू धर्म सांगितला असे सांगत आहेत.
ज्यांनी आपले जीवन स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन देशकार्यासाठी समर्पित केले. घर, दार, अंगण, वैयक्तिक संसाराचा होम करून पीडित आणि वंचित देशबांधवांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले, त्या हजारो तरुणांवर सातत्याने जातीयवादाचा शिक्का मारला जात आहे. सर्वसामान्य माणसासमोर सातत्याने हिंदुत्वाबद्दल एक नकारात्मक मांडणी करण्यात येत आहे. अशा वेळी हिंदुत्वाशी संबंधित काही प्रमुख मुद्द्यांवर स्वामी विवेकानंदांची काय भूमिका होती हे त्यांच्याच शब्दांत पाहणे उचित होईल.

# # #

१. हिंदुत्वाचा प्रखर अभिमान

 आकाशातून पडणारे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते त्या प्रमाणे कोणत्याही ईश्‍वराची केलेली उपासना एकाच ईश्‍वराला पोहोचते, असे हिंदू धर्म सांगतो. सर्वच धर्म सत्य आहेत यावर हिंदू धर्मियांचा विश्‍वास आहे. ही विचारधारा अर्थात वेदान्त जगात शांती आणू शकेल आणि वेदान्त हाच भावी जगासाठी उपयुक्त असेल असे विचार स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेच्या जगप्रसिद्ध भाषणांतून मांडले.
इस्लामच्या आक्रमणाने स्वत:चा धर्म वाचवण्यासाठी पळून आलेल्या पारसी लोकांना हृदयाशी धरणार्‍या आणि रोमन लोकांच्या अत्याचाराने देशोधडीला लागलेल्या यहुदी लोकांना त्यांच्या धर्मासह आश्रय देणार्‍या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी अभिमानाने सांगितले.
आत्मविस्मृत झालेल्या हिंदूंमधील स्वाभिमान जागवण्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘माझे हे शब्द स्मरणात असू द्या : ‘हिंदू’ हा शब्द उच्चारताच अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात. ‘मी हिंदू आहे’ असे जो बांधव म्हणतो तो लगेच तुमचा परमप्रिय, परमनिकट आप्त झाला पाहिजे. मग तो कोणत्याही देशातून आलेला असो. तो तुमची भाषा बोलत असो वा अन्य भाषा बोलत असो. कोणत्याही हिंदूची वेदना स्वत:च्या वेदनेइतकीच तुमचे हृदय व्यथित करत असेल तरच तुम्ही ‘हिंदू’ आहात.’’
‘‘आपण हिंदू आहोत. ‘हिंदू’ या शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित करावयाचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळामध्ये सिंधूच्या एका बाजूला राहणारे ते हिंदू इतकाच त्याचा अर्थ होता. जे आपला द्वेष करीत आले त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिकटविला असेल. पण त्याचे काय ! हिंदू या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा; अथवा जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडविले गेलेले आहे, जे दैन्यवाणे आहे अशाचा बोध व्हावा हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकांत अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊया.’’
# # #
२. मुस्लिमांबद्दल स्पष्ट भूमिका
हिंदूने चांगला हिंदू होण्याचा, मुसलमानाने चांगला मुसलमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदूने मुसलमान किंवा मुसलमानाने हिंदू होण्याची आवश्यकता नाही, असे स्वामी विवेकानंद आवर्जून सांगतात. परंतु याचवेळी तलवारीच्या जोरावर जगाला मुसलमान करणार्‍या प्रवृत्तीवद्दल हिंदूंना सावधही करतात.
पासाडेना, कॅलिफोर्निया येथील एका भाषणात स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘प्रत्येक युगात, प्रत्येक राष्ट्रात जे थोर पुरुष आणि स्त्रिया होऊन गेल्या त्यांना आदराने वंदन करा. चैतन्याची - दिव्यत्वाची साक्षात अनुभूती जेव्हा येते तेव्हा मन विशाल होते. सर्वत्र त्या एकाच ईश्वराचे प्रकाशमय दर्शन होऊ लागते. मुसलमानांच्या मनात ही धारणा विकसित झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यात धर्मांधता आणि कडवेपणा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची घोषणा हीच की, ‘अल्ला एकच आहे आणि महंमद हाच त्याचा प्रेषित आहे.’ एवढेच सत्य. यावेगळे जे जे आहे ते केवळ त्याज्यच नव्हे, तर चिरडून नष्ट करून टाकले पाहिजे. जे कोणी काफर आहेत त्यांच्या कत्तली केल्या पाहिजेत. या उपासनापद्धतीहून वेगळ्या उपासनापद्धती तोडून मोडून फेकून दिल्या पाहिजेत. याहून वेगळे सांगणारा प्रत्येक धर्मग्रंथ जाळून टाकला पाहिजे. अशी ही धर्मांधता आहे. प्रशान्त महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत या धर्मांधांनी पाचशे वर्षे रक्ताचे पाट वाहविले ! इस्लाम हा असा आहे ! (समग्र वाङ्‌मय, खंड ४)
# # #
३. ख्रिश्‍चन मिशनर्‍यांची गंभीर दखल

स्वामी विवेकानंदांनी युरोप आणि अमेरिकेत अनेक चर्चमध्ये व्याख्याने दिली. येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या मानवी मूल्यांचा गौरव केला. जगाच्या पाठीवर आजवर झालेल्या सर्व महापुरुषांमध्ये मानवी विकासाचा समान धागा असल्याचे दाखवून दिले. परंतु याच वेळी संपूर्ण जगाला ख्रिश्‍चन करण्याच्या धर्मवेडाने पछाडलेल्या धर्मगुरूंवर प्रहार करायला ते मागेपुढे पाहिले नाहीत. बायबलमधील उदात्त तत्त्व सांगितले त्याप्रमाणे बायबलमधील ‘मनुष्य पापी आहे’ असे सांगून माणसाला मेंढी बनवणार्‍या या शिकवणीचा धिक्कारही केला. माणसाला पापी म्हणणे हेच पाप असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात येऊन हिंदूंना बाटवून ख्रिस्ती करणार्‍या पाद्य्रांविषयी स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘येशू भारतात आला आहे आणि आकाशातल्या बापाचा आदेश लौकरच फळाला येणार आहे !’ असे डंके पिटणार्‍यांनो, तुम्ही उघड्या कानांनी ऐका. जीझस्‌ही इथे आलेला नाही आणि येहोवा त्याहून आलेला नाही. ते येण्याची सुतराम शक्यताही नाही. आपापल्या चुली सांभाळताना त्यांना इथे यायला उसंत देखील होणार नाही !
इथे तो पुरातन शिवसम्राटच पूर्ववत् आसनस्थ आहे. रुधिरप्रिया कालीमातेचीच इथे समारंभपूर्वक पूजा होत आहे. तो यशोदानंदन गोपाल आपली मोहक मुरली वाजवितो आहे. या शिवाने एकदा वृषभावर आरूढ होऊन डमरूचा रुद्रनाद करीत सुमात्रा, बोर्निओ, सेलेबर, जपानपासून सैबेरियापर्यंत आपली मुद्रा उमटविली होती. आजही उमटवीत आहे. कालीची पूजा चीन आणि जपानमध्ये आजही चाललेली आहे. ख्रिश्‍चनांनी तिचे रूपांतर माता मेरीमध्ये केले आहे. ख्रिस्तमाता म्हणून ते तिची पूजा करतात.
हिमालयाची ती उत्तुंग शिखरे पाहा ! उत्तरेला शिवाचे निधान कैलास आहे. दहा तोंडाचा आणि वीस हातांचा महाबलाढ्य रावणसुद्धा ते शिवसिंहासन हलवू शकला नाही. मग बिचार्‍या मिशनर्‍यांचा काय पाड ? या भरतभूमीत भगवान शिवांचा डमरू सतत रुद्रनाद करीतच राहील. कालीमातेला पशुबली दिले जातच राहतील आणि गोपालकृष्ण त्याची भुवनमोहिनी मुरली वाजवीतच राहील ! हिमालयाइतकेच ते दृढ अचल आहेत. ख्रिस्ती किंवा आणखी कोणा धर्मप्रचारकांनी आकशपाताळ एक केले तरी ते त्यांना झळ पोहचू शकणार नाहीत.
तुम्हाला जर ही दैवते सोसत नसली तर रामराम ! तुमच्यासारख्या मूठभर करंट्यांसाठी काय या देशाने दम उखडावा आणि मुलखाचे नीरस जीवन पत्करावे ? एवढे जग तुमच्यापुढे पडले आहे. शोधा की तुम्हाला सोयीचे कुरण मनमुक्त चरायला ! पण हे मूठभर करंटे असे गुण्यागोविंदाने जातील थोडेच ! तसे करायलाही हिंमत लागते. ते शिवाच्या या भूमीतच पोटे भरून घेतील, पण शिवाचीच बदनामी करतील आणि कुठल्यातरी परक्या प्रेषिताचे गोडवे गातील !’’

# # #


४. धर्मांतराचा धोका ओळखला


हिंदू समाज सहिष्णू आहे. परंतु जगाच्या पाठीवर त्याचे अस्तित्व अबाधित राहिले तर या सहिष्णूतेला अर्थ आहे. संपूर्ण जग माझ्याच धर्माचे झाले पाहिजे या एकांगी विचारातून जगभर सुरू असलेल्या धर्मांतराचा धोका स्वामी विवेकानंदांनी शंभर वर्षांपूर्वीच ओळखला होता.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘हिंदूत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या केवळ एकाने कमी करतो, एवढेच नव्हे तर शत्रूची एकाने वाढवितो.’’
सिन्हाजी नामक शिष्यासोबतचा स्वामी विवेकानंदांचा संवाद खूपच बोलका आहे. ‘‘सिन्हाजी, तुमच्या आईचा कुणी अपमान केला तर तुम्ही काय कराल ?’’
‘‘मी त्याच्यावर तुटून पडेन स्वामीजी, आणि चांगला धडा शिकवीन त्याला.’’
‘‘बरोबर बोललात. तुम्ही आपल्या धर्माला आईइतकेच मानत असाल, तर कोणाही हिंदू बांधवाने ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला तर ते पाहून तुम्हाला मरणप्राय दु:ख व्हायला हवे. हे तर प्रतिदिनी घडताना तुम्ही पाहात आहात आणि त्याचे काहीच सोयरसुतक तुम्हाला नाही ? कुठे गेली तुमची श्रद्धा ? कुठे गेली तुमची देशभक्ती ? रोज ख्रिस्ती प्रादी तुमच्या तोंडावर तुमच्या धर्माची निंदा करतात. पण तुमच्या कोणाचेच रक्त तापत कसे नाही ? तुम्ही हिंदुधर्माच्या रक्षणासाठी उभे का राहात नाही ?’’

# # #


५. शत्रूलिखित खोट्या इतिहासाची जाणीव

आर्य दुसर्‍या देशातून आले, असा काल्पनिक समज रूढ करून हिंदू समाजात आर्य आणि अनार्य अशी दुही निर्माण करण्याचे कुटील षडयंत्र स्वामी विवेकानंदांनी ओळखले होते. आज शंभर वर्षानंतरही परकीयांच्या या खोट्या प्रचाराला बळी पडलेले भारतीय बुद्धीजीवी ‘मूलनिवासी’कल्पना उराशी कवटाळून समाजात दुहीची बिजे पेरताना दिसत आहेत. स्वामी विवेकानंद याबद्दल म्हणतात, ‘‘जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्‍या तद्दन खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना शिकविली जात आहेत ! पॅरिसच्या परिषदेत मी हे म्हणणे प्रखरपणाने मोडून काढले. माझे तुम्हाला सांगणे आहे की, आपले जुने धर्मग्रंथ स्वत: अभ्यासा आणि मग निष्कर्ष काढा.
युरोपीय लोकांना जेव्हा जेव्हा संधी मिळली, तेव्हा तेव्हा त्यांनी, ते जातील तिथल्या मूळच्या रहिवाशांना नेस्तनाबूत केले आणि तेथे ते आरामात राहू लागले. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तेच केले असेल ! पण याला पुरावा काय ? युरोपीय पंडितांनो, हे सारे तुमचे तर्कटच ना ? मग ते कृपा करून गुंडाळी करून तुमच्या बासनातच ठेवून द्या कसे !’’
स्वामीजींनी याविषयावर विस्तृत विवेचन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपसमज निर्माण करणार्‍या शत्रूलिखित इतिहासाचेही स्वामीजींनी प्रभावीपणे खंडन केले होते. स्वामीजींनी शिवाजी महाराजांवरील बखरींचा आवर्जून अभ्यास केला होता. गुरु गोविंद सिंग, शिवाजी महाराज यांच्याविषयी स्वामीजींनी वेळोवेळी अतीव आदरपूर्वक उल्लेख केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. स्वामी विवेकानंद हे शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याने प्रभावित झाले होते.

# # #


६. घरवापसीचा आग्रह


घरवापसीबद्दल स्वमीजींनीही सखोल विचार केल्याचे दिसते. १८९९ साली प्रबुद्ध भारत या नियतकालीकेत स्वामीजींची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. धर्मांतरितांना निसंशय पुन्हा हिंदू धर्मात घेतलेच पाहिजे असे सांगून मुलाखतीत स्वामीजी म्हणतात, ‘‘तसे केले नाही तर दिवसेंदिवस आपली संख्या कमी होत जाईल. फरीस्ता हा प्राचीन मुसलमान इतिहासकार सांगतो की, मुसलमान पहिल्याने या देशात आले, त्यावेळी हिंदूंची संख्या साठ कोटी होती. आज आपण अवघे वीस कोटी उरलो आहोत.
मुसलमान किंवा ख्रिश्‍चन धर्मान्तरितांपैकी बहुतेकांना तलवारीच्या जोरावर बाटविले गेलेले आहे. आजचे धर्मान्तरित हे त्यांचेच वंशज आहेत. अशांना दूर लोटणे केव्हाही हिताचे होणार नाही. तुम्ही विचाराल की, जे निखालस परजातीचे, परधर्माचे असतील त्यांचे काय ? भूतकालात असे कित्येक परजातीय आपल्या धर्मात स्वीकारले गेले आहेत. अजूनही हा प्रघात आहेच. आत्तापर्यंत आपल्या सीमेवरच्या अनेक रानटी टोळ्यांना आपण आत्मसात केले. मुसलमानांपूर्वीच्या सर्व परकीय आक्रमकांनाही आपण आत्मसात केले आहे.
स्वेच्छेने परधर्मात गेलेले जर परत स्वधर्मात येऊ इच्छित असतील तर त्यांना शुद्ध करावे हे ठीकच आहे. पण काश्मीर आणि नेपाळमध्ये झाले तसे परक्यांच्या स्वार्‍यांमध्ये, आत्याचारांमुळे ज्यांना धर्म बदलावा लागला असे जे मूळचे हिंदू आहेत त्यांना; वा जे रक्तानेच परधर्मीय आहेत त्यांना हिंदू धर्मात प्रवेश करताना कोणतेही प्रायश्‍चित्त असू नये.’’

# # #


७. राष्ट्रीय चैतन्याचे प्राणपणाने जतन (मंदिर पुनर्निर्माण)


मंदिरे ही आपल्या समाजाच्या अभिसरणाची केंद्रे होती. मंदिरे ही सामन्य जणांसाठी शक्तीकेंद्रे होती. भगवान प्रभू राम, श्रीकृष्ण आणि भगवान शिव या महापुरुषांशी संबंधित श्रद्धाकेंद्रे असलेल्या अयोध्या, मथूरा, काशी, सौराष्ट्र येथील मंदिरे पाडून तिथे मशिदी करण्यात आल्या. अनेकदा हिंदूंनी पुन्हा या मंदिरांचे पुनर्निमाण केले. या संबंधामध्ये स्वामी विवेकानंदांनी याविषयी अतिशय मार्मिक टिपण्णी केली आहे.
ते म्हणतात, ‘‘आपण आपल्या राष्ट्रीय चैतन्याचे प्राणपणाने जतन केले, त्यासाठी सर्वस्व समर्पण केले, म्हणूनच शतकानुशतके होत आलेले आघात आपण सोसू शकलो. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी सारे काही सोसले. अगदी मृत्युसही कवटाळले. आपले धर्मचैतन्य सांभाळले. परकीय आक्रमणांच्या बेबंद लाटेखाली मंदिरान्मागून मंदिरे कोसळत होती. पण ती लाट परतून जाताच त्याच मंदिरांचे कलश पुन्हा एकदा उन्नत मस्तकाने उभे राहिले.
दक्षिण हिंदुस्तानातील काही मंदिरे आणि गुजराथेतील सोमनाथाचे मंदिर आपल्याला खूपच काही शिकवून जातात. पुस्तकांच्या राशी वाचून हिंदू वंशाच्या इतिहासाबाबत जी समज येणार नाही, ती केवळ सोमनाथाकडे पहिल्याने येईल...’’
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील कलंक दूर करण्याचे राष्ट्रीय कार्य म्हणून रामजन्मभूमी चळवळीकडे पाहण्याची आवश्यकता आहे.

# # #


८. मूर्तीपूजेविषयी स्पष्टता


मूर्तीपूजकांचा धर्म म्हणून हिंदू धर्माची ओळख आहे. परंतु केवळ मूर्तीपूजा म्हणजे हिंदू धर्म नव्हे. असे असले तरी मूर्तीपूजेची हेटाळणी करून चालणार नाही. स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारे आणि एकांतिक धर्माचे उत्साही प्रचारक मूर्तीपूजा म्हणजे जणू पापच अशी मांडणी करत असतात. यासंबंधात अतिशय तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वामी विवेकानंदांनी मांडल्याचे दिसते.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘सर्व जगात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे तरी मूर्तिपूजन सुरू आहे असे तुम्हाला दिसेल. काहीजण मनुष्यरूपातील देवाची आराधना करतात. तो सर्वोत्तम मार्ग आहे. मला जर सगुणभक्ती करायची असेल तर देव एखाद्या प्राण्याच्या, वस्तूच्या किंवा अन्य कोणत्यातरी रूपात पाहण्यापेक्षा मनुष्यरूपात पाहणे मला जास्त आवडेल.
एका संप्रदायाला परमेश्वराचे जे सगुण रूप प्रिय आहे ते दुसर्‍या संप्रदायाला प्रिय वाटणारही नाही. परमेश्वर कबूतराच्या रूपाने दिसला तर तो ख्रिश्चनांना भावतो. मात्र हिंदूंच्या धारणेप्रमाणे त्याने मत्स्यावतार धारण केला की मात्र ती अंधश्रद्धा ठरते ! एक पेटिका आहे, तिच्यावर दोन देवदूत बसलेले आहेत आणि त्या पेटिकेवर एक पवित्र पुस्तक आहे असे परमेश्वराचे रूप ज्यूंना मानवते. पण तोच परमेश्वर स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या रूपात पूजिला गेलेला पाहणे त्यांना भयंकर वाटते. नमाज पढताना मुसलमान लोक काबा मशिदीचे आणि त्यातल्या काळ्या दगडाचे चित्र मन:चक्षूंपुढे आणतात ते चालते; पण ईश्वर चर्चमध्ये असलेला कोणाला दिसला तर ते मात्र त्यांना नामंजूर असते.
मूर्तिपूजेमध्ये हाच मोठा दोष आहे. तरीही ईश्वराकडे जाण्याची ती एक पायरी म्हणून मात्र तिची आवश्यकता वाटते.’’
(भक्तियोग, समग्र वाड्‌मय, खंड ४)

# # #


९. धर्मग्रंथांकडे पाहण्याची दृष्टी दिली

हिंदू धर्म हा केवळ एका धर्मग्रंथावर आधारलेला नाही. परंतु वेद, पुराणे, रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांचे हिंदू धर्मातील स्थान मोलाचे आहे. हिंदू धर्मीयांचा तेजोभंग करण्यासाठी अनेकदा पुराणातील पात्रांचा सोयीने अर्थ लावला जातो. तसेच शेकडो वर्षांच्या गुलामीमुळे धर्मशिक्षणाची व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे या धर्मग्रंथांचे आकलन करून घेण्यात अडचण निर्माण होते. स्वामी विवेकानंदांनी यासंबंधी कालसुसंगत विचार मांडले आहेत.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘राम प्रत्यक्ष होऊन गेला की नाही हे महत्त्वाचे नाही. चारित्र्याचे जे उत्तुंग आदर्श रामायणाने निर्माण केले ते महत्त्वाचे. रामायण आणि महाभारत हे श्रेष्ठ नीतिमूल्यांचे आविष्कार आहेत. प्रत्यक्षात राम किंवा कृष्ण नामक कोणी व्यक्ती होत्या की नव्हत्या, यावर या महाकाव्यांची श्रेष्ठता अवलंबून नाही, ती स्वयंभू आहे.
आपले तत्त्वज्ञान हे कोणा प्रेषिताच्या सापेक्ष नाही. भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला काही नवीन सांगितले नाही. श्रुती वा अन्य धर्मग्रंथांत नाही असे रामायणात काहीच नाही. ख्रिस्तपंथ ख्रिस्ताशिवाय अस्तित्वातच असू शकत नाही. मुस्लिम संप्रदाय महंमदाशिवाय असूच शकत नाही. बौद्धपंथ हाही संपूर्णतया बुद्धकेंद्रित आहे. पण हिंदुत्व हे कोणाही विशिष्ट व्यक्तीच्या आधाराशिवाय उन्नत माथ्याने उभे आहे. म्हणून पुराणांमध्ये सांगितलेल्या सत्याच्या समर्थनार्थ त्या पुराणांतल्या व्यक्ती प्रत्यक्ष होऊन गेल्या किंवा नाही असा प्रश्‍नच उपस्थित होत नाही. पुराणे ही लोकशिक्षणासाठी उत्पन्न झाली. पुराणे ज्या ऋषींनी लिहिली त्यांनी इतिहासकाळातील काही चरित्रे घेतली. त्यांना अभिप्रेत असलेली सर्व दैवी किंवा आसुरी गुणसंपत्ती त्यांनी त्या व्यक्तींच्या ठायी आरोपीत केली आणि मनुष्यजातीकरिता नीतीचे नियम घालून दिले. रामायणात वर्णन केलेला दशमुखी रावण प्रत्यक्षात होता की नाही याच्याशी आपल्याला काय कर्तव्य आहे ! रामायण हा ज्या शाश्वत मूल्यांचा आविष्कार आहे ती शाश्वत मूल्ये आपण जाणून घेतली पाहिजेत. पुराणात रंगविला आहे त्यापेक्षा अधिक उदात्त रंगात तुम्ही कुष्णाला तुमच्या लेखणीने रंगवू शकता, तुम्हाला कोणते सत्य आविष्कृत करायचे आहे त्यावर ते अवलंबून आहे. पण पुराणातील तत्त्वदर्शन हे व्यक्तींच्या पलीकडचे आहे.’’
(‘हिंदू’ मद्रास. फेब्रु. १८९७ मधील एका मुलाखतीतून)

# # #


१०. हिंदू रक्ताचे दोष विसरू नका


पाश्‍चात्य देशांमध्ये स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माच्या महान तत्त्वाचा प्रसार केलेला असला तरी भारतात त्यांनी हिंदू धर्मात शिरलेले दोष दूर करण्यासाठी कठोर प्रहार केले आहेत. त्याचवेळी ‘भारताची अवनती झाली ती धर्मामुळे नव्हे तर धर्मतत्त्वांचे नीट पालन न केल्यामुळे. भारताचा प्राण येथील धर्मात आहे.’ असेही त्यांनी सांगितले आहे.
‘‘उगाच अंधश्रद्धेच्या मागे लागू नका. त्यामुळे अवनती आणि मृत्यू यांची वाट चालण्यापेक्षा तुम्ही सरळ नास्तिक झालात तरीसुद्धा तुमचे आणि या समाजाचे भले होईल. जगातल्या हिडीस समजुतींची स्पष्टीकरणे देत, त्यासाठी तर्‍हेतर्‍हेच्या भाकडकथा शोधून काढण्यात जे आपला मोलाचा वेळ वाया घालवतात त्यांचा खरोखर धिक्कार असो. तुम्ही निर्भय व्हा. त्या भोळसर समजुती झिडकारून टाका.
या समजुती म्हणजे आपल्या देशाच्या शरीरावर उमटलेली गळवे आहेत. ती निर्धाराने काढून टाकली पाहिजेत. त्यामुळे आपला धर्म, आपले राष्ट्रीय जीवन, आपले अध्यात्म यांना मुळीच धक्का पोहोचणार नाही. आपल्या धर्माचे प्रत्येक तत्त्व हे चांगले खणखणीत आहे. ते भोळसट समजुतीचे काळे डाग आपण त्यांच्यावरून जेवढ्या लवकर काढू, तेवढी ती मूळच्या तेजाने तळपू लागतील.’’
ज्याला आपल्या देशासाठी काही करायचे आहे, त्यांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे याविषयी स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘आपल्या देशबांधवांमध्ये तुम्हाला हजारो दोष आढळतील पण ते हिंदू रक्ताचे आहेत हे विसरू नका. या देवांचे पूजन तुम्हाला प्रथम करावे लागेल. त्यांनी तुमच्यावर सर्व प्रकारचे आघात केले. शिव्याशाप दिले, तरी तुम्हाला त्यांच्याशी प्रेमानेच बोलावे लागेल. त्यांनी जर तुम्हाला घालवून दिले तर त्या शक्तिमान पुरुषसिंहाप्रमाणे - गुरु गोविंदसिहांप्रमाणे विजनवास पत्करा आणि शांत चित्ताने मृत्यू स्वीकारा. गुरूंचा आदर्श आपल्यापुढे असला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे वागणारा मनुष्यच ‘हिंदू’ म्हणवून घेण्यास योग्य आहे.’’
 ‘‘कोणतेही कार्य तीन अवस्थांमधून पुढे जात असते. उपहास,विरोध आणि स्वागत. काळाच्या पुढे पाहणार्‍या द्रष्ट्यांचा नेहमी उपहास होतो. म्हणून विरोध, छळ या सर्वांचे स्वागतच आहे. मात्र आपण स्थिर असले पाहिजे, शुद्धचरित्र असले पाहिजे आणि आपल्या मनात परमेश्वराच्या ठायी नितांत श्रद्धा पाहिजे. विरोधाच्या वावटळी या श्रद्धेने पाहता पाहता विरून जातील.’’

# # #


११. तरुणांवर विश्‍वास


स्वामी विवेकानंदांचा तरुणा पिढीवर विश्‍वास होता. ते म्हणतात, ‘‘सुशिक्षित तरुणांमध्ये कार्य करा, त्यांना एकत्रित आणा, त्यांची संघटना करा. श्रेष्ठ त्यागातूनच श्रेष्ठ कार्य उभे राहते. माझ्या शूर, गुणी मुलांनो ! आपल्या योजनांवर काम करण्यासाठी स्वत:ची सर्व शक्ती वेचा ! नाव, कीर्ती किंवा असल्या क्षुद्र गोष्टींच्या मागे लागू नका. झोकून देऊन काम करा. लक्षात ठेवा. ‘सुके गवत जेव्हा दोरखंडात गुंफले जाते तेव्हा त्यामध्ये पिसाट हत्तीलासुद्धा बांधून ठेवण्याचे सामर्थ्य येते.’
आधुनिक हिंदूंनो, या मोहनिद्रेतून जागे व्हा ! ते कसे व्हायचे याचा मार्ग आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आहे. आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घ्या. इतरांना करून द्या. आपल्यातल्या सुप्त आत्मशक्तीला आवाहन करा. मग पाहा ती कशी जागृत होऊन उठते ते ! ही सुप्त आत्मशक्ती जागृत कार्यशक्तीच्या रूपाने प्रकट झाली म्हणजे प्राप्त होणार नाही असे काय आहे? सामर्थ्य येईल, वैभव येईल, सद्गुण येतील, शुचिता येईल ! जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे ते सारे येईल !
मृत्यूच्या जबड्यात प्रवेशतील, अथांग सागर पोहून पार करतील असे बुद्धिमान आणि धैर्यशील युवक मला हवेत ! ध्यासपूर्तीची धग त्यांच्या हृदयात हवी ! असे शेकडो युवक आणि युवती पाहिजेत. या एका ध्यासाने वेडे व्हा. हेच वेड अनेकानेकांना लागू द्या. आणि मग त्यांची घडण, त्यांचे उदात्तीकरण आपण आपल्या पद्धतीने करू. ठिकठिकाणी केंद्रे उघडा आणि आपल्या कार्यात अधिकाधिक व्यक्तींना समाविष्ट करून घ्या.
 पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल हृदयात अपार करूणा असलेले सहस्त्रों युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल.’’

# # #


१२. खरा धार्मिक कोण ?


धार्मिकतेच्या नावाखाली निष्क्रियता जोपासणार्‍यांचा स्वामी विवेकानंदांनी अतिशय प्रखर शब्दांमध्ये धिक्कार केला आहे.
स्वामीजी म्हणतात, ‘‘वीरपुरुषच पृथ्वीतलावरची सुखे भोगतात. तुमचे पौरुष दाखवा; साम, दाम, दंड आणि भेद, तसेच खुले युद्ध या सर्वांचा उपयोग करून तुमच्या विरोधकांवर मात करा, विजयी व्हा आणि जगातील सुखांचा आस्वाद घ्या - तरच तुम्ही धार्मिक आहात.
अपमान मुकाट्याने गिळून, लोकांच्या लाथा खात जगणे हे शरमेचे जिणे होय. तो साक्षात नरक होय असे शास्त्रांचे म्हणणे आहे. स्वधर्म हे सत्यांचे सत्य आहे. माझ्या धर्मबांधवांनो, माझे तुम्हाला हेच सांगणे आहे. अन्याय करू नका. कोणाला अकारण दुखवू नका. इतरांचे जेवढे भले करता येईल तेवढे करा. पण दुसरे कोणी अत्याचार करत असतील, तर ते मुकाट्याने सहन करणे हे गृहस्थधर्माच्या दृष्टीने मोठे पाप होय. ठकाशी तिथल्या तिथे महाठकच झाले पाहिजे. गृहस्थाश्रमी लोकांनी खूप प्रयत्न करून उत्साहाने संपत्ती मिळवली पाहिजे. आपल्या कुटुंबाचे आणि इतरांचे उत्तम पोषण केले पहिजे. त्यांच्या सुखसोयींकडे लक्ष दिले पाहिजे. शक्यतो लोकहिताची कामे केली पाहिजेत. एवढेही तुम्ही करू शकला नाहीत तर मग स्वत:ला माणूस कसले म्हणवता ? तुम्ही साधे गृहस्थधर्मी सुद्धा नाही; मग मोक्षाच्या पोकळ गोष्टी कशासाठी ?’’

# # #


१३. हिंदुस्थानचे ऐक्य


उपनिषदे हे आपले धर्मग्रंथ आहेत. हिंदुस्थानातला कोणताही पंथ असो : त्याला अखेर उपनिषदांमध्येच कोठेतरी आधार शोधावा लागतो. तसा त्याने शोधला नाही तर तो पाखंडी ठरेल. म्हणून या देशातल्या आधुनिक हिंदूला जर कोणते अभिधान योग्य असेल तर ते ‘वैदिक’ किंवा ‘वेदान्तिन्’ हे होय. आणि याच अर्थाने मी नेहमी ‘वेदान्त’ हा शब्द वापरत असतो.
अगदी बौद्धांच्या आणि जैनांच्या धर्मग्रंथामध्येसुद्धा श्रुतीचा आधार नाकारलेला नाही. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या काही शाखांमध्ये आणि बहुतेक सर्व जैन ग्रंथांमध्ये वेदप्रामाण्य स्वीकारलेले आहे. ‘हिंसक श्रुती’ हा मात्र त्यांनी अपवाद ठेवला आहे. या श्रुतींमध्ये ब्राह्मणग्रंथांची काही सरमिसळ आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
कोणी द्वैती असतील, कोणी विशिष्टद्वैती असतील, कोणी अद्वैती असतील. कोणी शैव असतील, कोणी वैष्णव असतील, कोणी पाशुपत असतील. परंतु आपणा सर्व हिंदूंना आपण कोणत्याही संप्रदायाचे असला तरी वंद्य असलेली अशी काही समान तत्त्वे आहेत. ती स्मरून आपल्यातील बारीक-सारीक मतभेद आणि भांडणे यांना आपण तिलांजली दिली पाहिजे.
हिंदुस्थानचे ऐक्य म्हणजे त्यांच्या विखुरलेल्या आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य, ज्यांच्या हृदयांचे स्पंदन एकाच आध्यात्मिक लयीत होत आहे, अशा सर्वांचे ऐक्य म्हणजेच हिंदुस्थानचे राष्ट्रीय ऐक्य !

# # #


१४. संघटनेचा मूलमंत्र

सार्‍या विश्‍वाला शांतीचा संदेश देणारी वेदान्ताची विचारधारा हिंदूंकडे आहे. परंतु त्यासाठी हिंदूंनी आधी स्वत: आपल्यातील दोष दूर केले पाहिजेत आणि संघटित झाले पाहिजे.
ते म्हणतात, ‘‘हिंदूंना परस्परांचे गुणग्रहण करावयास शिकविणारी, परस्परांना साहाय्य करावयास शिकविणारी संघटना फार आवश्यक आहे.’’
संघटनेचा मूलमंत्र देत असताना मानवी स्वभाव ध्यानात घेऊन त्यासाठी योग्य मार्गदर्शनही स्वामीजी करतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘संप्रदाय वा संघटना यांना असलेला मोठा अभिशाप असा की, त्यात एखाद्याचे मत जरा वेगळे पडेल की, तो ताबडतोब आपला स्वतंत्र पंथ काढतो. त्याला वाट पाहण्याइतका धीर नसतो. म्हणून तुमच्या संघाविषयी तुम्हाला परम आदर असला पाहिजे. येथे अवज्ञेला जागाच नाही. येथे कोणीही विश्वासघातकी असता कामा नये. तुम्ही आकाशासारखे विशाल आणि कुत्र्यासारखे आज्ञांकित असले पाहिजे.
अशी यंत्रणा निर्माण करा की, जी व्यक्तिसापेक्ष नाही. अमूक आला किंवा तूमक एक गेला यामुळे ती यंत्रणा कोसळता कामा नये.
आपण भारतीय स्थिर संघटना करू शकत नाही याचे कारण आपल्या अधिकारात कोणी वाटेकरी आलेला आपल्याला खपतच नाही.
आणि
आपण गेल्यानंतर या यंत्रणेचे काय व्हायचे, ती कोण, कशी चालवणार याचा आपण कधी विचारच करत नाही.
हिंदुस्थानात चार माणसे पाच मिनिटे एकत्र काम करू शकत नाहीत. प्रत्येकजण सत्तेसाठी हपापलेला असतो आणि काही काळाने सारी संघटनाच मरगळून पडते. देवा, देवा, देवा ! एकमेकांचा मत्सर करण्याचे आम्ही कधी सोडणार !
अशा देशात परपस्परांपासून कोणत्याही कारणासाठी तुटणार नाही अशी शपथ घेऊन, परस्परांवर अमिट प्रेम करणार्‍या माणसांचा संघ उभा राहिला तर ती अद्भूत आनंददायी गोष्ट नव्हे काय ?
हा संघ वाढत जाईल. उदारमतवाद आणि अथक उमेद यांच्या बळावर तो हिंदुस्थान व्यापेल. त्याने हिंदुस्थानच्या नसानसांत चैतन्याचा संचार घडविला पाहिजे. आणि समाजाच्या सर्वांगात स्फुरण उत्पन्न केले पाहिजे.
गुलामांच्या या देशात अज्ञान, दारिद्र्य, घृणा, जातीयता, पुराणमतवाद आणि मत्सर ही सर्व भुते आहेत. पण त्यांना गाडून या संघाने यशस्वी झाले पाहिजे.’’



सिद्धाराम भै. पाटील -
८८०६५५५५८८


# नोंदी सिद्धारामच्या

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी