Saturday, January 1, 2011

अभ्यास दौऱ्यातील नोंदी





महाराष्ट्राची पर्यटन राजधानी - संभाजीनगर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर. 21 डिसेंबरची रम्य पहाट. झाडींनी नटलेल्या टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या बुद्धलेण्यांचा डोंगर चढून, लेण्या पाहून सोलापूरच्या तरुणाईची पावलं विद्यापीठातील अतिथीगृहाकडे वळलीत.

डोंगर चढण्या-उतरण्यात झोंबणारी थंडी आल्हाददायक वाटू लागलीय. एवढ्यात मयुर गलांडे अन्‌ दयानंद यांच्यातल्या संवादाने माझं लक्ष वेधलं.
""अरे, बाहेर पडल्यानं आपल्याला हे सारं बाहेरचं जग पाहायला मिळालं.''
""हो ना ! हे विश्वची माझे घरं ऐवजी आपण आपल्या घरालाच विश्व समजून बसलो होतो. आता बाहेरच्या जगाची जाणीव झाली.''
""जग किती पुढं गेलंय्‌... टेक्नॉलॉजी काय चीज हाय्‌ हेही कळालं.''
सोलापूर विद्यापीठातील जनसंज्ञापन (पत्रकारिता) विभागाची अभ्यास सहल दि. 15 ते 23 डिसेंबर दरम्यान पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि हैदराबाद येथे गेली होती. यावेळी चित्रपट, टी.व्ही. आणि मुद्रित पत्रकारितेशी संबंधित विविध मान्यवर संस्था आणि व्यक्तींच्या भेटी झाल्या. पाहायला आणि शिकायलाही खूप मिळालं. अनुभव समृद्ध करणाऱ्या या अभ्यासदौऱ्यातील निवडक नोंदी.
पुणे विद्यापीठ - 1 ला दिवस. यूजीसीने पुरस्कृत केलेली "आयुका' ही स्वायत्त संस्था. खगोलशास्त्र आणि ऍस्ट्रोफिजिक्सकडे विद्यार्थ्यांची रुची आणि संशोधक वृत्ती वाढविणे यासाठी काम करते. अरविंद परांजपे या ज्येष्ठ संशोधकाने संवाद साधला. चांद्रयानासह अनेक विषयांची त्यांनी माहिती दिली.
मास कम्युनिकेशन विभागात विभागप्रमुख डॉ. माधुरी रेड्डी, विश्राम ढोले, रोहित पवार यांच्याशी संवाद झाला. डिजिटल इम्बॅलन्सपासून टीव्ही पत्रकारितेशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. या संस्थेत तांत्रिक नव्हे, तर दिग्दर्शनाशी संबंधित शिक्षणावर अधिक भर दिला जातो. तंत्रज्ञान अधिक "यूजर फे्रंडली' होत असल्याने तांत्रिक अडचणी सहसा येत नाहीत.
ईएमआरसी (शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र) ही देशातली नामवंत संस्था आहे. सिनियर प्रोड्युसर विवेक आपटे यांनी स्टुडिओतील बारकावे प्रात्यक्षिकांसह दाखविले. शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रक्रिया याची अतिशय सखोल माहिती दिली. खासकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे कार्यक्रम करताना येणाऱ्या अडचणी, अनुभव आपटे यांनी सांगितले. राष्ट्रीय दर्जाच्या या संस्थेतील आम्हा विद्यार्थ्यांचा अनुभव आणि भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण काम आहे.
"यशदा' भेट - दुसरा दिवस : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था. ज्येष्ठ पत्रकार आणि यशदाचे संचालक राजीव साबडे यांनी "यशदा' करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. यशदाचा 80 टक्के भर ग्रामीण विकासावर आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. लवकरच येथे स्कूल ऑफ गव्हर्नन्सच्या 2 इमारती उभ्या राहतील, असे ते म्हणाले. येथील सुसज्ज ग्रंथालय आणि इतर विभागांचा परिचय झाला.
एफटीआयआय भेट : प्रभात स्टुडिओच्या ठिकाणी पुण्यात 1960 साली स्थापन झालेली ही संस्था चित्रपट क्षेत्रात विख्यात आहे. चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांच्या स्मृतींना उजाळा देत आम्ही ही संस्था पाहिली. प्रभात म्युझियम पाहताना एकप्रकारे चित्रपट सृष्टीचा इतिहास उलगडला. सुभाष घई, नसरुद्दिन शहा, जया भादुरी, संजयलीला भन्साळी, विधुविनोद चोप्रांसारख्या दिग्गजांना घडविणाऱ्या या संस्थेत नवीन खूप काही पाहायला मिळाले. एका अंध तरुणाच्या जीवनाविषयीचे चित्रीकरणही येथे पाहायला मिळाले. येथून जवळच असलेल्या नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडियाला भेट दिली. येथे सुरुवातीपासूनचे दुर्मिळ चित्रपट जतन करून ठेवण्यात आले आहेत. चित्रपटविषयक समृद्ध असे ग्रंथालयही येथे आहे.
तिसरा दिवस : सोलापूर तरुण भारतचे माजी संपादक अरुण करमरकर आणि मकरंद मुळे यांच्या पुढाकाराने ठाण्यात नामवंत पत्रकारांसमवेत एक दिवसाचा अभ्यासवर्ग झाला. लक्ष्मी केशव मंगलकार्यालयात झालेल्या या अभ्यासवर्गात दूरदर्शनचे वृत्तसंपादक नितीन केळकर, आपल्या भेदक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, आशिया मीडिया फोरमचे समन्वयक आणि ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कोकजे तसेच अरुण करमरकर यांच्या व्याख्यानांनी पत्रकारितेतील विविध पैलूंची माहिती मिळाली. या मंडळींनी आपले अनुभवविश्व खुले केले. या अभ्यासवर्गाने आमच्या दौऱ्याला एक वजन प्राप्त झाले. साम टीव्हीचे उपसंपादक आणि आमचा मित्र मिलिंद अवताडे यांची अभ्यासवर्गातील उपस्थिती उत्साहवर्धक राहिली.
यावेळी राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष संतोष पवार यांनी आवर्जून अभ्यासवर्गाला भेट दिली.
चौथ्या दिवशी मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला भेट दिली. माहिती संचालक श्रद्धा बेलसरे यांनी यावेळी संवाद साधला. यानंतर पॅरामिन या जाहिरात संस्थेला भेट देऊन आम्ही दादासाहेब फाळके चित्रनगरीत फेरफटका मारला. गोरेगाव येथे 500 एकर इतक्या विस्तीर्ण भागात पसरलेल्या या चित्रनगरीत 16 स्टुडिओ आहेत. बॉलिवुडचे अनेक चित्रपट इथे तयार होतात. भव्य सेट, ठिकठिकाणी सुरू असलेले चित्रीकरण, सेटची मांडणी वगैरे चित्रपट निर्मितीमागील अजस्र व्याप येथे पाहायला मिळाला.
पाचव्या दिवशी बेलापूरला मिलिंदच्या पुढाकाराने बेलापूरच्या सकाळ भवनची भेट झाली. येथे साम टीव्हीचे कार्यालय आहे. बातम्यांचे थेट प्रक्षेपण कसे होते, याचा अतिशय जवळून अनुभव येथे आला. साम वाहिनीतील विविध विभागांची विस्तृत माहिती मिळाली. मूळचे सोलापूर जिल्ह्यातले "साम'चे वृत्तसंपादक अशोक सुरवसे यांच्याशी मुक्त संवाद झाला. अँकर जयदीप आणि रचना विचारे यांच्याशीही गप्पा झाल्या. मिलिंद अवताडे यांनी "गावाकडची माणसं' म्हणत आमची खूपच चांगली बडदास्त ठेवली. यानंतर आम्ही गेटवे ऑफ इंडिया आणि ताज पाहून संभाजीनगरकडे रवाना झालो.
आमचे विभागप्रमुख प्रा. डॉ. रवींद्र चिंचोळकर सरांच्या व्यापक जनसंपर्काचा परिचय आम्हाला पुणे विद्यापीठ, मंत्रालय आदी ठिकाणी आलाच होता. संभाजीनगर हे सरांचे गाव असल्याने येथे आम्हाला कोणत्याच अडचणींना सामोरे जावे लागले नाही. सहाव्या दिवसाची सुरुवात "बीबी का मकबरा'ने झाली. देवगिरीचा किल्ला (दौलताबाद) आणि वेरूळच्या लेण्या पाहून दै. लोकमतच्या छपाई युनिट आणि नंतर कार्यालयाला भेट दिली. तिथली अजस्र आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री पाहता आली.
सहाव्या दिवशी देवगिरीच्या किल्ल्यातील भारतमाता मंदिरापर्यंतच जाणे झाले होते. देवगिरीच्या अनामिक ओढीने आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा किल्ल्यात दाखल झालो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्तपणे किल्ल्यातील मशीद बनविण्यात आलेल्या मंदिरात भारतमातेच्या मूर्तीची स्थापना केली आहे. स्फूर्ती देणारे हे भव्य मंदिर पाहिलेच पाहिजे. चांदमिनार म्हणवली जाणारी हिंदू वास्तू, तिथल्या भग्न मूर्त्यांचे प्रदर्शन, किल्ल्याभोवतीचे खंदक, भूलभुलैय्या आणि पुढचा गुहेतील दमछाक करणारा मार्ग, गणपती मंदिर, जनार्दन स्वामींचे समाधीस्थान, किल्ल्याच्या शिखरावरील "श्रीदुर्गे' चिन्हांकित तोफ या साऱ्या गोष्टी इतिहासाचा बोध येण्यासाठी आयुष्यातून एकदा पाहिलेच पाहिजे.
वेरूळच्या लेण्यांबद्दल तर काय वर्णावे! अद्यापही पाहिला नसाल तर त्वरा करा! ती अनुभवण्याचीच बाब आहे.
म. गांधी मिशनच्या पत्रकारिता विभागात डॉ. रेखा शेळके (मूळच्या बार्शीच्या) यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचे गुरू असलेले डॉ.वि.ल. धारूरकर व डॉ. जयदेव डोळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
संभाजीनगरहून हैदराबदला पोचणारी पॅसेंजर सकाळी 7 ऐवजी दुपारी 1ला पोचल्याने रामोजी फिल्म सिटी पाहण्याच्या योजनेवर पाणी सोडावे लागले. बिर्ला मंदिरात दर्शन घेऊन नागार्जुन सागरात स्पीड बोटीने जलविहाराचा आनंद लुटला. कोहिनूर हिरा देणारा ऐतिहासिक गोवळकोंडा किल्ला आणि सालारजंग संग्रहालय पाहून सोलापूरकडे रवाना झालो.
शेरो-शायऱ्यांपासून गूँज उठी है हल्दीघाटीची गाणी आणि किस्से यांमुळे सोलापूर कधी आले, हे कळलेच नाही! बार्शीच्या राजा खराडेचा दुसऱ्या दिवशी फोन आला. म्हणे "सगळ्यांची खूप आठवण येतेय्‌.' हे आमच्या अभ्यास दौऱ्याचे यशच नाही का? जीवनात आनंदी क्षण घेऊन आलेला हा अभ्यासदौरा अभ्यासाबरोबरच चारचौघांत मिळून-मिसळून राहावे कसे, याचा वस्तुपाठच होता.
प्रा. चिंचोळकर आणि प्रा. देवानंद गडलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दौऱ्यात अजित बिराजदारने यशस्वी समन्वयकाची भूमिका पार पाडली.
कधी प्रभु पुजारी तर कधी विनोद कामतकर मला प्रवासात चालायला त्रास होऊ नये यासाठी माझं "गाठोडं' घ्यायला पुढे येत होते. एक-दोन दिवसांतच माझ्या ध्यानात आले की, आपण "जीबीएस'च्या विळख्यातून पूर्णत: बाहेर पडलोय. मुंबईच्या लोकलमधली धावपळ असू द्या, वेरूळच्या लेण्यातले फिरणे, की देवगिरीच्या अंतिम शिखरावर जाणे; शरीर पूर्ववत साथ देऊ लागल्याचा अनुभव आला. सहलीची ही माझी सर्वोच्च कमाईच होय!
संपर्क : 8888847268
www.psiddharam.blogspot.com

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी