बलबीर पुंज
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये काही दिवसांपूर्वी इस्लामी कट्टरवाद्यांनी घातलेला हिंसक धुमाकूळ काय अधोरेखित करतो? एका विशिष्ट समाजाच्या धर्मग्रंथाची पाने रेल्वे मार्गावर फाटलेल्या अवस्थेत आढळून आल्याची अफवा दुपारी १२ वाजता मुस्लिमबहुल डासना-मसुरी येथे पसरते आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा विशिष्ट समाजाचा जमाव एवढा हिंसक होतो की स्थानिक पोलिस ठाण्याला आग लावण्यापर्यंत त्यांची मजल जाते. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या अत्याधुनिक रायफलीतून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला, प्राण वाचविण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि परिसरावर या दंगलखोरांनी कब्जा करून टाकला होता.राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरापर्यंत हे दंगेखोर हैदोस घालत होते. सार्वजनिक व खाजगी वाहनांना आगी लावण्यात आल्या. या मार्गावरून प्रवास करणार्यांनी आपले प्राण वाचविण्यासाठी वाहनांतून उतरून शेताकडे धाव घेतली, तर त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. महिलांशी असभ्य वर्तन तसेच छेडखानी करण्यात आली. हा सारा धुमाकूळ अनेक तासपर्यंत सुरू होता आणि पोलिस फक्त मूक दर्शक बनून राहिले.
पोलिस ठाण्यावर हल्ला झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी नियंत्रण कक्षाला त्वरित कळवून हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्याबाबत कळवले होते. परंतु, राष्ट्रीय महामार्गाची दोन्ही बाजूंनी दंगलखोरांनी कोंडी केल्याने पोलिसांना वेळेवर मदत करता आली नाही. दंगलखोरांच्या दाव्यानुसार धर्मग्रंथाच्या फाटलेल्या पानांवर अपशब्दांसह मोबाईल नंतरही लिहून ठेवलेला होता. आता पोलिस सांगत आहेत की हा मोबाईल क्रमांक पिलखुआ आणि गढ येथे सिनेमा टॉकिज चालविणार्या व्यक्तीचा होता. मात्र, संंबंधित माणसाने या दंगलीशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. मसुरीच्या या हिंसक घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
काय ही घटना केवळ अपवादात्मकच आहे काय? आसाममध्ये भडकलेली हिंसा, मुंबईच्या आझाद मैदानात पोलिस व प्रसारमाध्यमे आणि आम जनतेवर हिंसक निदर्शकांचा हल्ला, पुणे-हैदराबाद-बंगलोर येथे ईशान्य भारतातील लोकांवर प्राणघातक हल्ला, चेन्नईत कुण्या अमेरिकन चित्रपटाविरुद्ध हिंसक प्रदर्शन, सोशल नेटवर्किंग साईट्सवर मुस्लिमांचा छळ होत असल्याची खोटी व भ्रम पसरवणारी छायाचित्रे व भडक लेखांचा मारा, या सर्व घटना देशातील निरनिराळ्या भागांत जरी घडल्या असल्या तरी त्याच्यामागील प्रेरणा, उद्देश सारखाच आहे. मुस्लिमांचा छळ होत असल्याच्या नावाखाली मुस्लिम समाजातील कट्टरवाद्यांच्या धार्मिक भावना भडकवण्यामागे सीमेपलीकडील शक्ती भलेही सक्रिय असतील, परंतु, याचबरोबर एक आणखी कटु सत्यही समोर येत आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या सीमेपलीकडील धोकादायक दहशतवादी संघटनांनी आता संपूर्ण देशात आपले स्थानिक नेटवर्क विकसित केले आहे. या संघटना सिमी व इंडियन मुजाहिद्दीन सारख्या बंदी असलेल्या संघटनांशी जुळलेल्या लोकांचा उपयोग करून लहान-सहान मुद्यांवरून धार्मिक भावना भडकवून हिंसक घटना घडवून आणत आहेत. गेल्या काही काळापासून देशातील मुसलमानांना भडकवण्याचे आणि मुस्लिम समाजाच्या नावावर त्यांना सामूहिक रूपात एकत्र करून दंगे भडकवण्याचे कारस्थान रचण्यात येत आहे. दिल्लीतील मशिदीचा वाद, मुंबईत रोहयांग व बांगलादेशी मुसलमानांसाठी हिंसक प्रदर्शन आणि आता गाझियाबादमधील हिंसा इत्यादी घटना या कारस्थानाला दुजोरा देतात. मुंबईतील आझाद मैदानात मूठभर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यांची शस्त्रे लुटण्यात आली. महिला पोलिस कॉन्स्टेबल्सचा विनयभंग करण्यात आला आणि परिसरातील दुकाने लुटण्यात आली. इकडे मसुरीतही जेथे पोलिस कमी संख्येत आहेत त्याच ठाण्यावर दंगलखोरांनी हल्ला चढवला, तेथे आग लावली आणि नंतर राष्ट्रीय महामार्गावर जाऊन आम नागरिकांवर व पादचार्यांवर हल्ले करण्यात आले, त्यांना लुटण्यात आले. पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचे दंगलखोरांना कारणच काय? असे करून राष्ट्रविघातक शक्ती काय संदेश देऊ इच्छितात?
मुंबई आणि मसुरीतील हिंसक घटनांवर तथाकथित पुरोगामी मुस्लिम बुद्धिजीवींचे आणि सेक्युलर नेत्यांचे मौन संशय उत्पन्न करते. मसुरी येथील हिंसक घटनांत दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या मुसलमानांसाठी त्यांचा ठेका घेतलेले नेते नुकसानभरपाई म्हणून मोठ्यात मोठ्या रकमेची मागणी करीत आहेत. परंतु, ज्या (मसुरीतील घटनेतील) पोलिसांच्या जिवाला धोका आहे त्यांच्याबाबत ही मंडळी सहानुभूतीचे चार शब्द चुकूनसुद्धा तोंडातून काढत नाहीत. बाटला हाऊस चकमकीला बनावट म्हणणार्या दिग्विजयसिंहसारख्या नेत्यांनी उद्या जर दंगलखोरांना निरपराध आणि पोलिसांना खरे गुन्हेगार ठरविले तर त्यात काहीही आश्चर्य नाही.
जेव्हा एकामागून एक सारख्याच प्रकारच्या आणि समान धागा असलेल्या हिंसक घटना घडत असतील तर कुठलाही जागरूक नागरिक ही बाब साधारण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. काही दिवसांपूर्वीच कर्नाटक पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांची सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर असे कळले की देशातील अनेक नेत्यांची हत्या करण्याची योजना या दहशतवाद्यांनी आखली होती. भारताला अस्थिर करण्याचे आणि देशातील घट्ट सामाजिक वीण उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान जवळजवळ संपूर्ण देशात सुरू असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते.
गुप्तचर संस्थांनी राज्यांतील पोलिसांना इतक्यात घडलेल्या दरोड्यांची आणि रस्त्यावर झालेल्या लूटमारीच्या घटनांची अतिशय बारकाईने तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तपास यंत्रणांना अशी माहिती मिळाली आहे, की इंडियन मुजाहिद्दीनने पैसा गोळा करण्यासाठी लूटमार हेच एकमेव साधन बनवले आहे. मुस्लिम युवकांच्या भावना भडकविण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन ज्याप्रकारे खोट्या व भ्रममूलक छायाचित्रांचा व भडक लेखांचा प्रचार-प्रसार करीत आहे, त्याबाबतही तपास संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
बंगलोर पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांमध्ये बहुतांश युवक आहेत व ते आर्थिकदृष्ट्या सुदृढ कुटुंबांतील आहेत यात काहीही आश्चर्य नाही. यातील कोणी इंजिनीअर आहेत, तर कोणी व्यवस्थापन व विज्ञानाचे पदवीधर आहेत. एक तर आमच्या संरक्षण संशोधन संस्थेचा अधिकारीच निघाला! दिल्लीच्या बाटला हाऊसमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या एका दहशतवाद्याच्या लॅपटॉपमधूनही असे अनेक प्रकार उघडकीस आले होते.
भारतातील एका विशिष्ट समुदायाच्या कट्टरपणाला व धर्मांध प्रवृत्तीला जर खतपाणी मिळत असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय येथील तथाकथित सेक्युलरिस्टांकडे जाते, जे केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी मुस्लिम कट्टरवादाचे व जिहादी तत्त्वाचे पोषण करीत आहेत. त्याचमुळे सीमेपलीकडील शक्ती स्थानिक मुस्लिम युवकांना काफीर आणि जिहादच्या नावाखाली भडकविण्यात यशस्वी ठरत आहेत. निरक्षरता व अशिक्षितपणामुळेच इस्लामी दहशतवाद फोफावतो असे सेक्युलरिस्ट नेहमीच म्हणत असतात. पण कटु सत्य हेच आहे, की मुसलमानांमधील एका मोठ्या गटात अस्तित्वात असलेली कट्टरवादी, धर्मांध मानसिकताच अशी भूमी आहे जेथून जिहादचे पीक अमाप येते. मदरसे हे कट्टरवाद आणि फुटीरपणाची केंद्रे असल्याचे सिद्ध होत आहे. इतक्यातच कर्नाटकात आणि त्यापूर्वी जगात जिथेकुठे दहशतवाद्यांची धरपकड झाली त्यातील बहुतांश उच्चशिक्षित तसेच उच्चभ्रू परिवाराशी संबंधित होते. जवळजवळ सर्व समाज काळाबरोबर आपल्या परंपरा, मूल्ये, व रितीरिवाजांमध्ये परिवर्तन आणत आहेत. या सार्या सुधारणा संबंधित समाजाच्या स्वेच्छेनेच झाल्या. परंतु, जेव्हा मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक सुधारणांचा विषय निघतो तेव्हा धर्म संकटात असल्याची आवई उठवून संपूर्ण मुस्लिम समाजालाच भडकविण्याचे प्रयत्न केले जातात. अशावेळी मात्र पंथनिरपेक्षता आणि मानवाधिकारांचे ढोल जोरजोरात बडवणारे सेक्युलर पक्ष सोयीस्कररीत्या मौन धारण करतात. ते का?
(लेखक भाजपाचे राज्यसभा सदस्य आहेत.)
- अनुवाद : अभिजितवर्तक
No comments:
Post a Comment