Thursday, September 27, 2012

बॉम्ब खाणारे जीव

मल्हार कृष्ण गोखले
निसर्ग हे निर्मिती आणि संहार यांचं एक सतत फिरणारं चक्र आहे. निसर्गातल्या कोणत्याही पदार्थाच्या अस्तित्वाला एक आवर्ती, चक्रीय गती आहे. यालाच निसर्गाचं चक्र म्हणतात. सूर्याच्या उन्हाने पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगातून पाऊस पडतो. बीजाचा वृक्ष होतो. वृक्षाला फळं येतात, त्यांची बीजं पुन्हा जमिनीवर पडतात. दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा पुन्हा उन्हाळा असं रहाटगाडगं गोलाकार फिरत असतं. पृथ्वीतत्त्व म्हणजे मॅटरपासून वनस्पती आणि प्राण्यांचे देह निर्माण होतात. मृत्यूनंतर त्यांचे देह कुजून ते पुन्हा मॅटरमध्ये म्हणजे मातीत मिसळतात.

सर्वसाधारणपणे आपण जिला माती म्हणतो, ती विविध रासायनिक आणि जैविक पदार्थांच्या मिश्रणाची बनलेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा म्हणजे अगदी वरचा सहा इंचाचा मातीचा थर हा पृथ्वीवरील जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचा. या थरात असंख्य जिवांची वस्ती असते. असंख्य म्हणजे किती, तर एक हेक्टर जमिनीवर सुमारे तीस कोटी जीवजंतू असतात. यात अळ्या, किडे आणि दृष्टीला न दिसणारे सूक्ष्मजीव असतात. एक हेक्टर जमिनीत राहणार्‍या जीवजंतूंचे वजन सहा हजार किलो असतं, तेच एक हेक्टर जमिनीवर राहणार्‍या माणसांचं वजन अवघं अठरा किलो असतं. यावरून जिला आपण माती म्हणतो ती जैविकदृष्ट्या किती ‘जिवंत’ असते पहा.
आणि हे जीव अशा प्रचंड संख्येने जमिनीत आहेत म्हणूनच माणसासकट सर्व सजिवांचं जीवन सुरळीत चालू आहे. कारण स्वत:चं अन्न स्वत: तयार करणारा तमाम पृथ्वीवरचा जो एकमेव घटक वनस्पती, त्या वनस्पतींना आवश्यक अशी घटकद्रव्ये हे जीवजंतू पुरवतात. हवेतला नत्रवायू जमिनीत स्थिरावणं, कोणतीही गोष्ट कुजवून त्यातली द्रव्यं मातीत मिसळवणं अशा अनेक मार्गांनी, वनस्पतींना हवी असणारी द्रव्यं जमिनीत तयार करण्याचं आणि मिसळण्याचं काम हे जीवजंतू अव्याहतपणे करत असतात.
निसर्गाच्या या चक्रात आधुनिक मानवाने मोठाच व्यत्यय आणला आहे. विज्ञानाचा उपयोग करून मानव अशा काही वस्तू निर्माण करतो आहे की, ज्या कधी नष्टच होत नाहीत, कुजत नाहीत. उदा.- प्लास्टिक. यातून जे काही निर्माण होतं त्यालाच म्हणतात प्रदूषण.
सध्याचं प्रदूषण याच वेगानं चालू राहिलं तर पन्नास वर्षांनंतर मानवी पिढीला पृथ्वीवर सर्वत्र रखरखीत वाळवंटच बघायला मिळेल, याची जाणीव सुदैवाने वैज्ञानिकांना झाली आहे आणि त्यामुळे ते प्लास्टिकसारख्या कधीच नष्ट न होणार्‍या वस्तू सडून, कुजून निसर्गचक्रात कशा पचवून टाकता येतील अशा संशोधनात व्यग्र आहेत. वनस्पतिज किंवा प्राणिज पदार्थ जसा काही विशिष्ट जीवजंतूमुळे सडून कुजून मातीत मिळतो, नष्ट होतो, निसर्गचक्रात समाविष्ट होऊन जातो, तसा प्लास्टिक आणि तत्सम पदार्थ खाऊन नष्ट करणारा एखादा बॅक्टेरिया शोधून काढता येईल का?
केवळ प्लास्टिकच नव्हे, तर अन्य पदार्थांवर कोणते बॅक्टेरिया प्रभावी ठरू शकतात, याचे संशोधन करणार्‍या इंग्लंडमधल्या कार्डिफ विद्यापीठातल्या डॉ. ग्रॅहम व्हाईट यांना एक आगळाच शोध लागला आहे. बॅक्टेरियांना स्वत:चा झपाट्याने विकास घडवण्यासाठी कार्बन आणि नायट्रोजनची जरुरी असते. डॉ. व्हाईट आणि त्यांचे सहायक संशोधक विविध प्रकारची माती, नद्यांचं पाणी, सांडपाण्याच्या नाल्यातला चिखल असे नाना नमुने गोळा करून ते परीक्षानळीत ठेवत. परीक्षानळ्यांमध्ये वेगवेगळी खनिज मिठं ठेवलेली असत. बॅक्टेरियांना कार्बनबरोबरच नायट्रोजनही मिळावा म्हणून त्यांनी जुनी झालेली स्फोटक द्रव्येही त्यात ठेवली होती. स्फोटक द्रव्यांमध्ये नायट्रोऑर्गेनिक्स भरपूर प्रमाणात असतात.
काही काळाने डॉ. व्हाईट आणि त्यांच्या सहायकांना असं आढळलं की, एका विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरियाच्या शरीरातून एक विशिष्ट स्राव एंझाइम स्रवतो आहे आणि त्या स्रावामुळे नायट्रोऑर्गेनिक्सवर प्रक्रिया होऊन ती सौम्य डीग्रेड होत आहेत आणि मग तो बॅक्टेरिया ती सौम्य नायट्रोऑर्गेनिक्स चक्क खाऊन टाकतो आहे.
डॉ. व्हाईटनी त्या बॅक्टेरियावर पुन: पुन्हा प्रयोग केले. विविध प्रकारची मिश्रणं, द्रावणं त्याचबरोबर विविध प्रकारचे बॅक्टेरियाही एकत्र ठेवून पाहिले. त्यातून असं सिद्ध झालं की, स्फोटक द्रव्यांमधली नायट्रोऑर्गेनिक्स खाऊन पचवणारा, एवढंच नव्हे, तर त्यांच्या जोरावरच प्रजनन करणारा तो एकमेव बॅक्टेरिया आहे. याचा अर्थ आला का तुमच्या लक्षात? केरकचरा, झाडाची पानं, जनावरांची विष्ठा एखाद्या खड्ड्यात एकत्र करून ठेवतात, काही दिवसांनी त्याचं उत्तम खत तयार होतं. हे कोण करतं? काही विशिष्ट प्रकारचे जीवजंतू बॅक्टेरिया ही प्रक्रिया निसर्गत:च करत असतात. कारण केरकचरा, पानं, विष्ठा हे पदार्थ वनस्पतिज किंवा प्राणिज असतात. ते कुजवून मातीत मिसळणे, हे काम त्या जीवजंतूंना निसर्गानेच नेमून दिलेले आहे.
आता याच धर्तीवर डॉ. व्हाईटना सापडलेले हे जीवजंतू विस्फोटक द्रव्ये फस्त करू शकतात. वाळवी जशी लाकडाच्या वस्तू पोखरून फस्त करते तशीच. फरक इतकाच की वाळवी दिसते, हे बॅक्टेरिया सूक्ष्म आहेत. तूर्त हे जीव क्षेमटेक्स, नायट्रोग्लिसरीन, टीएनटी अशा स्फोटक द्रव्यांचा फन्ना उडवू शकतात. पण रसायनशास्त्रज्ञांनी यांच्यापेक्षा अनेक पटींनी जास्त संहारक स्फोटकं केव्हाच शोधून काढलेली आहेत आणि जगभराच्या सर्व सेनादलांमध्ये त्यांचा सर्रास वापर केला जातो आहे. उदा.- आपणा सर्वांना उत्तम परिचय असलेलं आरडीएक्स हे अति स्फोटक द्रव्य. डॉ. व्हाईटना सापडलेल्या बॅक्टेरियांची मात्रा आरडीएक्सवर चालू शकत नाही.
पण डॉ. व्हाईटनी त्यासाठी जेनेटिक्स या विज्ञानाच्या नव्या शाखेला मदतीला घेतलं आहे. जेनेटिक शास्त्रज्ञ त्या विशिष्ट बॅक्टेरियाचे जीन्स शोधून काढत आहे. एकदा ते जीन्स सापडले की अत्याधुनिक डीएनए तंत्रज्ञानाद्वारे ते जीन्स आणखी शक्तिमान बनवता येतील. ज्यायोगे कोणत्याही अति शक्तिशाली स्फोटकावर देखील त्या बॅक्टेरियांच्या शरीरातले स्राव परिणाम घडवून आणू शकतील.
या शोधाचे परिणाम दूरगामी आहेत. जगभर सर्वत्र विखुरलेल्या आणि अनेक निरपराधांचे जीव घेणार्‍या वा त्यांना अपंग बनवणार्‍या सुरुंगांवर-लँड माईन्सवर हे बॅक्टेरिया हा एक जालीम उपाय आहे. त्याचप्रमाणे आता कुणाचेच शस्त्रसाठे सुरक्षित नाहीत. धान्याने भरलेल्या गोदामांचं ज्याप्रमाणे उंदरांपासून संरक्षण करावं लागतं, त्याप्रमाणे स्फोटक द्रव्यांच्या साठ्यांचं या नव्या बॅक्टेरियांपासून संरक्षण करावं लागेल. डॉ. ग्रॅहम व्हाईट आणि त्यांचं शोधपथक जारीने संशोधनात गुंतलेलं आहे. आपल्याला यश मिळणारच असा त्यांना पूर्ण विश्‍वास आहे.
भाषांचा मृत्यू
संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को या सांस्कृतिक संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जाणारा भाषाविषयक अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यानुसार जगभरातल्या किमान ३ हजार भाषा मृतावस्थेकडे वाटचाल करत अताहेत.
प्रा. स्टीफन वूर्म या मूळच्या हंगेरियन पण नंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या भाषातज्ज्ञाने प्रस्तुत भाषाविषयक अभ्यासगटाचं नेतृत्व केलं होतं. प्राध्यापक महाशयांना स्वत:ला पन्नास भाषा बोलता येत होत्या. एक हळहळ लावणारी बाब अशी की, अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वी अगदी आकस्मिकपणे प्रा. वूर्म यांचं निधन झालं.
अहवालानुसार या तीन हजार भाषा मृत्युपंथाला लागण्याची प्रक्रिया तीनशे वर्षांपूर्वीच सुरू झाली. वैज्ञानिक शोधांचा झपाटा सुरू झाल्याबरोबर मानवी समूहांचं चलनवलन, दळणवळण वाढलं आणि जेत्यांच्या भाषांचं जितांच्या भाषांवर आक्रमण सुरू झालं. आजच्या इलेक्ट्रॉनिक युगाने या आक्रमणाचा कळस गाठलेला आहे.
आक्रमक भाषांपैकी प्रमुख आहेत इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि चिनी. अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात स्थलांतरित होणार्‍या युरोपियनांनी तिथल्या स्थानिक भाषा खतम केल्या याचा स्पष्ट उल्लेख अहवालात करण्यात आलेला आहे. नुसत्या भाषाच कशाला, त्यांनी स्थानिक लोकांचा वंशच संपुष्टात आणलाय्! ब्रिटनमधली सेल्टिक भाषा, स्कँडिनेव्हियन देश आणि उत्तर रशियात एकेकाळी प्रचलित असणार्‍या सॅमी नि लॅपीश या भाषा, युरोपातल्या जिप्सी लोकांच्या रोमानी भाषेच्या विविध बोली, चीन आणि आफ्रिकेतल्या किमान ५०० ते ६०० बोली मृत्यूच्या काठावर उभ्या आहेत.
या भाषांबरोबरच त्यांच्यातला ज्ञानठेवा कसा संपुष्टात येणार आहे याचं उदाहरण देताना प्रा. वूर्म म्हणतात, ‘प्रत्येक प्रदेशात काही विशिष्ट औषधी वनस्पती असतात. त्यांचं नाव, त्यांचा उपयोग हे सारं स्थानिक लोकांच्या भाषेमध्ये असतं. ती भाषाच नष्ट झाली की ते ज्ञानही नष्ट होणार.’
जगातल्या ३ हजार भाषांचं काय व्हायचं असेल ते होईल. आपण काळजी घेऊ या आपल्या मायमराठीची. हिंदूंच्या हृदयात जोवर राम आणि कृष्ण जागे आहेत, तोवर हिंदू धर्म कुणीही संपवू शकत नाही, याचा अनुभव आपण गेली हजार वर्षे घेतोच आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या हृदयात जोवर ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवाजी जागे आहेत, तोवर मराठी भाषा मरूच शकणार नाही. शत्रूंनाही हे पुरेपूर माहीत आहे आणि म्हणून ती अस्मिताच पुसून टाकण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. ते प्रयत्न सफल होऊ नयेत म्हणून जाणत्यांनी या त्रिमूर्तीच्या कार्याचं सतत चिंतन मात्र करायला हवं. देव, देश, धर्म आणि भाषा यांच्या मजबूत चौथर्‍यावरच संस्कृतीचं मंदिर उभं राहात असतं.
संशोधनातल्या गमती
मानवी संबंधावर संशोधन करणार्‍या प्रा. फ्रान डिकसन आणि प्रा. कँडी वॉकर यांनी दीर्घ वैवाहिक जीवन जगलेल्या जोडप्यांची मुलाखत घेण्याचं ठरवलं. आता अमेरिकेत दीर्घकाळ वैवाहिक जीवनवाली जोडपी मिळायचीच मोठी पंचाईत. नवर्‍याने मोठ्याने ढेकर दिला म्हणून घटस्फोट मागणार्‍या बायकांच्या अमेरिकेत, असली जोडपी सापडायची कशी?
पण सापडली! ज्यांनी किमान चाळीस वर्षांचं वैवाहिक आयुष्य एकत्र घालवलंय्, अशी चक्क वीस जोडपी या संशोधक दुकलीला सापडली. सगळ्यांचीच वयं अर्थात ६५ च्या वर होती.
मुलाखतीत संशोधकांना असं आढळलं की, पुरुष आपल्या गतजीवनातील कोणत्याही अनुभवाबद्दल दिलखुलासपणे बोलतात. कित्येकदा साध्या साध्या आठवणींनीही त्यांना रडू कोसळतं आणि ते अगदी मुक्तपणे रडतात सुद्धा. याउलट ‘बोलणं’ हेच ज्याचं प्रमुख लक्षण अशा बायका मात्र हातचं राखून बोलतात, जेवढ्यास तेवढी उत्तरं देतात. काही वेळा प्रश्‍नकर्त्यांना, ‘आमच्या खाजगी गोष्टीत नाक खुपसू नका’ म्हणून खडसावतात देखील. नवरा बोलत असताना तर त्या बायका त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात. अनेकदा त्याचं उत्तर मधेच तोडून त्याला गप्प बसवतात, असा मजेदार अनुभव त्यांना आला.
यावरून त्यांनी अजून कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. काय गंमत आहे पाहा! आपल्याकडे सगळ्या नवर्‍यांना जे माहीत असतं, ते माहीत करून घ्यायला अमेरिकनांना संशोधन करावं लागतं!!
tarun bharat.net

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी