Sunday, November 18, 2012

हिंदुहितावर गझनीसारखे आघात


हैदराबादचे प्राचीन आणि मूळ नाव भाग्यनगर होते. मुस्लिम आक्रमणानंतर त्या शहराचे नाव बदलून हैदराबाद ठेवण्यात आले. तेथे चारमिनारच्या शेजारी एक छोटेसे मंदिर असून, त्याला भाग्यलक्ष्मी मंदिर असे संबोधले जाते. या शहराच्या प्राचीन नावाच्या आधारे मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या देवीला भाग्यलक्ष्मी म्हटले जाते. तथापि, फुटपाथवर स्थापन करण्यात येणार्या छोट्याशा मंदिरासारख्या देवालयाला भाग्यलक्ष्मीसारखे भारदस्त नाव देणे, हे हिंदूंच्या संकुचित होण्याचे आणि आकुंचन पावण्याचेच उदाहरण ठरावे.
भाग्यनगरच्या भाग्यलक्ष्मी देवीचे मंदिर, त्या प्राचीन नगराची हिंदू समृद्धी, वैभव आणि विराटतेच्या अनुरूपच असावयास हवे होते. पण, खेदाची बाब म्हणजे, या वितभर मंदिरासाठी तंटे-बखेडे होत आहेत आणि ज्या रजाकारांनी निजामाच्या शासनकाळात हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तेच तत्त्व आज या लहानशा मंदिरातील पूजेत आणि उत्सवांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा संघर्ष वाढायला नको. कारण याचा फायदा इस्लामी कट्टरपंथीयांनाच मिळणार आहे. पण, या प्रकरणातून भारतात हिंदूंशी संबंधित विभिन्न प्रतीकांबद्दल एका सेक्युलर गटाची तालिबानी वृत्तीच जगजाहीर झाल्याशिवाय राहत नाही.

आपल्या देशात विदेशी लोकांच्या व्यापारी संस्कृतीचे दास्यत्व स्वीकारणार्या व्यक्तिसमूहाची एक मालिका उभी झाली आहे. त्यांना स्वतःच्या आपल्या तथाकथित उच्च जातीचा अहंकार तर आहेच, शिवाय या देशाच्या हिंदुहितैषी संस्कृतीवर ते गझनी आणि घोरीप्रमाणे आक्रमण करण्यात धन्यता मानतात. विद्यासागर नायपॉल यांच्यावर गिरीश कर्नाड यांनी केलेली तिखट प्रतिक्रिया आणि त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांना दुय्यम दर्जाचे नाटककार असल्याचे संबोधणे, यातून त्यांच्या छद्मसेक्युलर, तालिबानी वृत्तीचीच ओळख पटते. त्या संस्कृतीने केवळ आत्मदैन्याने ग्रस्त झालेले आणि पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करणारी माणसे आम्हाला दिलीत. यांच्या पराभवानेदेखील दिवाळीसारखा आनंद व्हायला हवा. नायपॉल असो, कवी गुरू ठाकूर असो वा श्यामाप्रसाद मुखर्जी, यांच्या ज्ञानोत्कर्षाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, त्यांचा या भारत भूमीतच तिरस्कार करणे, त्यांच्याविरुद्ध टीका-टिप्पणी करणे अथवा त्यांची उपेक्षा करणे, हे सारे प्रकार केवळ विदेशी डाव्या विचारांमार्फतच शक्य आहेत. ज्या विचारांचा ना भारताशी संबंध आहे, ना त्या विचारांना भारताच्या मातीचा गंध आहे. नायपॉल आणि रवींद्रनाथ ठाकूर या भूमीतील हिंदुपरंपरांमधून निर्माण झालेल्या विचारस्वातंत्र्याचा तसेच निर्भीड मतप्रदर्शनाचा आत्मविश्वास प्रकट करतात. पण, जे सायबेरिया, गुलाग तसेच बामियन-हंता तालिबान्यांच्या सेक्युलरवादाचा तुघलकी झेंडा हातात घेऊन फिरतात, त्यांना दिवाळीच्या दिव्यांच्या स्वातंत्र्याचा प्रकाश स्पर्शदेखील करू शकत नाही.

कुणाची इच्छा असो वा नसो, दिवाळीचे तीळ, बत्तासे आणि दीपमाळांनी संस्कृतीची एक माळ तर गुंफली जातेच. आपलाच एकमेव देश जगाच्या पाठीवार आहे, जिथे दिव्यांची पूजा केली जाते. प्रकाश तर सर्वांना हवाहवासा वाटतो आणि कुणाला आपल्या घरात आणि अंगणात आनंद नको असतो? कुठून का असेना, कसा का असेना, पण आपल्या घरात आनंद, उत्साह आणण्यासाठी प्रत्येकाची सदासर्वदा धडपड सुरू असते. म्हणूनच कुणी साता समुद्रापार जरी राहत असेल, तरी दिवाळीसाठी आपल्या घरी असावे, असा त्याचा प्रयत्न असतो. आत्ता-आत्ताच सरलेल्या दिवाळीच्या वातावरणात हे चूक आहे, ते चूक आहे, जिकडे बघावे तिकडे अंधारच अंधार आहे, फक्त चुकीचे काम करणार्यांचाच उदोउदो होताना दिसतो, असे म्हणणे खरोखरीच रूढिवादाचे काम होईल. केवळ आपसातील वैमनस्य आणि भेदभाव यामुळेच हिंदू समाज दुर्बल झाला नसून, हिंदू विरोधकांविरुद्ध एकजूट होण्यास असमर्थ ठरल्यामुळेही त्याची शक्ती क्षीण झाली आहे. म्हणूनच शक्तीच्या दिव्याचे प्रज्वलन करायचे असेल, तर ते प्रथम आपल्या घरापासून करावे लागेल. रामाचीच उपासना करणार्या ज्या लोकांनी कधीकाळी ज्यांची अस्पृश्य म्हणून हेटाळणी केली, ज्यांना मागास जातीचे म्हणून टोमणे मारले, अशा किती लोकांची नावे त्यांच्या यादीत आदराने आणि सन्मानाने घेतली जातात, याचा विचार करायला हवा. उत्सव साजरा करायचा असेल, तर थोडा आनंद त्यांच्यासोबतही वाटला जायला हवा, त्यांच्या घरातील अंधार आपल्या ज्योतीने पाहण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. ज्या समाजात दररोज मिर्चपूरसारख्या घटना घडतात, जेथे दलितांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांना साधारण बातम्यांचा दर्जा देण्याची वृत्ती बळावते, तेथे रामाच्या अयोध्येतील आगमनाच्या आनंदाने दिवे प्रज्वलित करणारे रामभक्त दलितांच्या जीवनात असणार्या अंधाराकडे कानाडोळा कसे करू शकतात?

आपल्या आसपासच्या नद्या प्रदूषित होत आहेत आणि त्यांचे पाणीदेखील आटत आहे. पण, आमचे त्याकडे दुर्लक्ष असून, आपणच त्यात अस्थिविसर्जन, प्लास्टिक, घरातील आणि कारखान्यांमधील केरकचरा टाकण्याचे काम अव्याहतपणे करीत असतो. नदीकाठीच अंत्यसंस्कार केले जातात. या सर्व बाबी, परंपरा आणि मतिमंद भावुकतेच्या नावाखाली कुठवर खपवून घेतल्या जायला हव्यात? याविरुद्ध आपण कधीतरी आवाज उठवणार आहोत की नाही? विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केल्याने कोणत्याही प्रकारे पुण्यक्षय होत नाही, हे कुणीतरी सांगायलाच हवे. त्याचप्रमाणे प्लास्टिक आणि केर-कचरा नदीत टाकणार्या व्यक्तीने कितीही होमहवन केले तरी त्याला पुण्य मिळू शकत नाही, हेदेखील प्रत्येकाला सांगण्याची गरज आहे.

आपण फक्त आपल्या घरी दिवाळीच्या पणत्या उजळायच्या आणि बाकी ठिकाणचा अंधार आपल्याशिवाय इतरांनी दूर करण्याची अपेक्षा बाळगायची, असा विचार केला तर दिवाळी अर्धवट साजरी केल्यासारखे होईल. भ्रष्टाचारी, काळाबाजार करणारे, देशाची संपत्ती लुटून घेऊन जाणारे तसेच विदेशी पैसा आणि विदेशी मानसिकता असणारे लोक कधीच दीपमाळा उजळू शकत नाहीत. त्यांचा अंत एक ना एक दिवस होणारच आहे, हा दिलासा मिळणे, म्हणजेच दिवाळी साजरी करणे होय. आपले घर स्वच्छ राहावे आणि केर-कचरा शेजारच्याच्या अंगणात, अशीच थोडीफार वृत्ती आमची होऊन गेलेली आहे.

आमचे उत्सव राष्ट्रीय आणि सामाजिक संदेश देतात, ही बाब तर आपण मान्य केलेली आहे. पण, या सणांचे रीतिरिवाज आणि परंपरांना आपल्या आस्थेच्या ज्योतीने वेगवेगळे करून आपल्याला पाहता येईल काय? आपल्या आस्था आणि विश्वासाचा सामाजिक बांधिलकीशी काही संबंध असायला हवा की नको? दुर्गा पूजा करायची, दिवाळी साजरी करायची आणि फुटपाथवरील सडलेले अन्न गोळा करणार्यांशी आपले कुठलेच नाते नाही, हे सांगायचे, हे उचित दिसेल का? आम्ही ज्या रामाची पूजा करतो, त्या रामाला मानणार्या समाजात आपसी स्नेहसंबंधांचे नाते असायला हवे की नको? प्रत्येक रामभक्ताने आपण स्वतः स्वयंभू धर्मद्वीप होऊन स्तब्ध बसल्याने काय साध्य होणार?

नद्यांमध्ये दुर्गंधी, समाजात दारिद्र्य, सीमेवर तणाव आणि शेजारच्या दिवाळी साजर्या करणार्या प्रत्येक व्यक्तीवर सातत्याने वाढणारे अमानवीय अत्याचार. दिवाळी साजरी करून टाका आणि देऊन द्या ढिगभर शुभेच्छा. जर सणांच्या दिवशी थोडे थांबून एखाद्याला सूचना केली की, भाऊ, पाकिस्तानातील हिंदू कशा प्रकारे दिवाळी साजरी करीत असतील, याचा थोडा तरी विचार करा, तर ताबडतोब, ‘‘आले का तुम्ही पुन्हा पूर्वपदावर,’’ असे उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही! पाकिस्तानात जे होत आहे, ती त्यांची अंतर्गत बाब आहे. त्याचे आपण कशाला मनाला लावून घ्यायचे? मग फिलिपाईन्स आणि तिबेटमध्ये ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे आम्हाला चिंता का व्हावी? संंबंध मनुष्याच्या नात्याचा असल्यामुळे काळजी तर करावीच लागते.

रामावर श्रद्धा आणि विश्वास असणार्या लोकांची संख्या सातत्याने कमी होत चालली आहे. उलट, त्यांच्यावर रामाच्याच देशात आणि बाहेरही असे आघात केले जात आहेत की, ज्यामुळे एकतर त्यांनी जीव गुदमरल्याने आपले हिंदुत्व विसरून जावे किंवा सेक्युलर संप्रदायात मतांतरण करून हिंदूंवर टीका-टिप्पणी करण्याचेच जीवनध्येय निश्चित करावे. त्यामुळे राजकारण आणि व्यापार या दोन्ही बाबींची चकाकी वाढण्याच्या शक्यता बळावतात. मी स्वतः नदी दूषित करणार नाही, शेजार्यांप्रती संवेदनशील राहील तसेच सर्व काही सरकारच्या माथ्यावर सोडून देण्याऐवजी माझ्या आजूबाजूला मी काय करू शकतो याचा विचार करील, हे मनोमन ठरवणे, याचाच अर्थ उत्सव साजरा करणे होय. यासोबतच कंबर कसून रामाच्या अयोध्येवर आस्था असणार्यांचा तिरस्कार होणार नाही, त्यांना हतोत्साहित होऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा करण्याची गरज आहे. भगवान रामाने द्वेषाचा अंधार आणि आपसी विद्वेष संपवून टाकावा, हीच मनोकामना या उत्सवी दिवसात करू या.

(लेखक राज्यसभा सदस्य आहेत)

अनुवाद चारुदत्त कहू

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी