Saturday, April 13, 2013

बाबासाहेब आम्हाला क्षमा करा


आज जरी आम्ही राजकीय, सामाजीक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो आहे तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखिल आम्ही 'एक-राष्ट्र' म्हणुन उभे राहू. एक दिवस अअसाही येईल की, फाळणीची मागणी करणार्‍या मुस्लिम लीगला पण 'अखंड हिंदुस्थानच' हिताचा वाटू लागेल."                         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन

बाबासाहेब, म्हणाले होते, "जातीयतेच्या वडवानलाने गौतम बुद्ध, विवेकानंद, ज्ञानदेव, तुकाराम, सर्वांना भस्मिभूत करुन टाकले आहे." आता हा कूपमंडुक समाज कुठे आपलीही अशीच दशा करणार नाही ना, अशी भयशंका मनाला व्याकूळ करते. म्हणून हे बाबासाहेब आम्हाला क्षमा करा.


श्रद्धेय, आदरणीय बाबासाहेब, अम्हाला क्षमा करा. आम्ही करंटे आहोत. आम्ही आपली महानता अद्याप समजवून घेऊ शकलो नाही. खैरलांजी आणि कानपूर येथील हृदय विदीर्ण करणार्‍या घटना या भारत देशात आजही घडताहेत. आपल्या पश्चात आम्ही भारतवासीयांनी सर्वच क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आपल्या नि:स्वार्थ आणि देशभक्तीपूर्ण विचार-आचारांशी दुर्दैवाने आम्ही फरकत घेतली आहे. शील आणि चारित्र्याला आपण प्राणाहून अधिक महत्व दिलेत. परंतु आज आम्ही आपल्या नामाचा जप करण्यापलीकडे, 'जय भीम' म्हणण्यापलीकडे काहीच केलो नाही, हे दुर्दैव आहे. 
आपल्या प्रत्येक विचार आणि कृतीमागे तर्क आणि विवेक असायचा, परंतु खैरलांजी, कानपूरच्या दुर्दैवी घटनांनंतर बसेस जाळणे, रेल्वे जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे अर्थात या देशाचे नुकसान करणे यामागे तर्क आणि विवेक नाही. आंदोलनाला दिशा देण्याची बुद्धी आमच्या नेत्यांना अद्याप आलेली नाही म्हणूनच आम्हांला क्षमा करा. 
आज देशातील स्थिती पाहून मन व्यथित होत आहे. मन मोकळं करावं अशा विशाल हृदयाच्या महापुरुषांपैकी आपण एक आहात. समाजातील विचारी आणि देशभक्त लोकांच्या हृदयात आपला निवास आहे. म्हणूनच आपल्यासमोर मन मोकळे करीत आहे. 
जातीची सामाजीक बंधने शिथील होत चालली आहेत, जातीच्या मागचे धार्मिक अधिष्ठानही आता दुर्बल झाले आहे. विश्व हिंदु परिषदेच्या उडुपी येथील ऐतिहासीक संमेलनामध्ये भारतातील सर्व पंथ-संप्रदायांच्या धर्मगुरुंनी 'न हिंदु पतितो भवेत' आणि 'हिंदवा सहोदरा सर्वे' अर्थात कोणी हिंदु पतित नाही, आम्ही सारे एकाच मातेचे पुत्र आहोत, अशी घोषणा केली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आताच्या महंतानेही त्यांच्या पूर्वजांनी दलितांना मंदिरप्रवेश नाकारल्याच्या घटनेबद्दल जाहीर प्रायश्चित्त घेतले आहे. हिंदु समाजातील सर्वोच्च संघटनांनी अस्पृश्यता हे पाप नसेल तर जगात पाप म्हणून काहीच नाही, अशी भूमिका घेतली आहे. मनाला आनंद देणार्‍या या घटना आहेत.
परंतु हे , बाबासाहेब, जातींचे वेगाने राजकियीकरण चालले आहे. आपली क्षूद्र राजकीय महत्वकांक्षा भागवण्यासाठी जातींचा आधार घेऊन राजकारण चालले आहे. आपणाला तर जातीयभावनाविरहीत एकवर्णिय समाज हवा होता, जातीपेक्षा भारतीयत्वाची भावना मोठी असली पाहीजे, असे आपल्याला वाटॆ. जातीय भावना पक्क्या झाल्यास एकवर्णी समाज कसा निर्माण होणार ? 
सामाजीकदृष्ट्या आमची पातळी फारच खालावत चालल्याचे दिसत आहे. दलीत समाजापैकी ९५ टक्के समाज उपेक्षीत आहे. तो दारिद्र्यात खितपत पडला आहे. आरक्षण, शिष्यवृत्या यांसारख्या सुविधांचा उपयोग करुन घेण्याची त्यांची क्षमता नाही, असे भयाण वास्तव एका बाजूला आहे . या गरिबीत जीवन कंठणार्‍या दलितांची आपल्यावर नितांत श्रद्धा आहे. परंतु या श्रद्धेचा उपयोग आपल्या विचारांचा पराभव करण्यासाठी होताना दिसतो आहे. ही परिस्थीती बदलून टाकण्याचे सामर्थ्य आपल्या विचारधनात आहे. एकमेकांना समजून घेऊन आपल्या समाजातील दोष घालवण्याचा व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रामाणिक प्रयत्न होण्यासाठी प्रथम विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. 
विद्रोही आणि पुरोगामी चळवळींच्या नेत्यांना आणि लेखकांना असे वातावरण निर्माण करणे शक्य आहे कारण दलित समाजातील सुशिक्षीत समाजावर या मंडळींचा मोठा प्रभाव आहे.
परंतु हाय रे दुर्दैव !
हिंदू देवदेवतांची ओंगळ भाषेत टिंगल-टवाळी करणॆ, हिंदु धर्माचा आंधळेपणाने द्वेश करणॆ, द्वेशाने लडबडलेले साहीत्य निर्माण करणॆ हेच जणू जीवितकर्य असावे, असे या मंडाळींना वाटते. परंतु यामुळॆ दोन समाजांत अविश्वास आणि कटूता निर्माण होते. याचे दीर्घकाळापर्यंत समाजावर परिणाम होतात, हे त्यांनी समजून घ्यायला हवे ना !

६ फेब्रूवारी १९५४ रोजी आचार्य आत्रे यांनी बनवलेल्या 'महात्मा फुले' या चित्रपटाचे उद्घाटन करताना बाबासाहेब, आपण म्हणाला होतात,
"आज देशात चारित्र्य नावाची चीजच राहीलेली नाही. ज्या देशाला नैतीक मूल्यांचे महत्व कळत नाही, त्याचे भवितव्य खडतर असते... मंत्री देशाचा उद्धार करु शकत नाहीत, ज्याने खरा धर्म जाणला आहे तोच देशाला तारू शकतो... विद्या, प्रज्ञा, करुणा, शील आणि मित्रत्वाची भावना या धर्मतत्वांनीच माणसाने आपले चारित्र्य घडवावे. करुणारहीत विद्वानाला मी कसायासमान मानतो. परस्पर प्रेमभावनेने मानवाने प्रगती करणे म्हणजे करुणाच होय." 
बाबासाहेब, आपल्या या विचारांना आजचे व्यवहारचतुर लोक चर्चमध्ये होणार्‍य रविवारच्या प्रवचनापेक्षा अधिक महत्व देत नाहीत. म्हणून आम्हांस क्षमा करा. 

बाबासाहेब, आपण म्हणत होतात, "जातीयतेच्या वडवानलाने गौतम बुद्ध, विवेकानंद, ज्ञानदेव, तुकाराम, सर्वांना भस्मिभूत करुन टाकले आहे." 
आता हा कूपमंडुक समाज कुठे आपलीही अशीच दशा करणार नाही ना, अशी भयशंका मनाला व्याकूळ करते. म्हणून हे बाबासाहेब आम्हाला क्षमा करा.
बाबासाहेब, आपण चेतावणी दिली होती, "कॉंग्रेसमध्ये जाऊ नका कॉंग्रेस म्हणजे जळते घर आहे", स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्व भारतीय समाज एकरस होईल, समरस होईल याची चिंता वाहण्याऐवजी समाजात राजकारण आणून दुही रुंद करण्याचे पापच कॉंग्रेसने केले. दुर्दैवाने रिपब्लिकन नेते वैयक्तिक स्वार्थासाठी कॉंग्रेसच्या जळत्या घरात गेले. बाबासाहेब आपण द्रष्टे होता, आपले संकेत आम्ही समजू शकलो नाही, म्हणून आम्हाला क्षमा करा.
बाबासाहेब आम्हाला माहीत आहे, आपण धर्मांतराची घोषणा केलीत तेंव्हा ख्रिस्ती आणि मुस्लिम नेत्यांनी आपण त्यांचा धर्म स्विकारावा यासाठी कोट्यवधी रुपये देण्याची तयारी केली होती. आपण मात्र भारतमातेला धोका उत्पन्न होईल असा कोणताही धर्म स्वीकारणार नाही अशी बानेदार भूमिका घेतली. भारतमातेचा विचार आपल्यासाठी सर्वोच्च होता. म्हणूनच आपण करुणा, संयम, शांतीचा संदेश देणार्‍या तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग स्वीकारलात.

परंतु आज आपल्यावर श्रद्धा असलेले अनुयायी धम्म स्वीकारण्यासाठी एकत्र जमतात , तेव्हा त्यांना फसवून ख्रिस्ती केले जाते. (संदर्भ - आणि बुद्ध रडला ) अत्यंत घृणास्पद बाब म्हणजे स्वत:ला दलित म्हणवणारे नेते चार पैशांसाठी असे षडयंत्र करीत आहेत. दुर्दैवाने 'सम्राट' सारखी वृत्तपत्रे आणि आपल्या नामाचा जप करणारे राजकारणीही या घटनांना विरोध करत नहीत. दलीत समाज अशा घटनांच्या विरोधात उभे राहीलही, परंतु त्यांच्यापासून ख्रिस्तीकरणाचा डाव लपवून ठेवण्यात येत आहे, म्हणून बाबासाहेब आम्हाला क्षमा करा.

बाबासाहेब, आपण पाकिस्तानवादी इस्लामी अतिरेक्यांचे षडयंत्र ओळखले होते आणि ते आपण परखडपणे मांडले होते, परंतु आज आम्ही हे षडयंत्र ओळखण्यात कमी पडत आहोत.

डेक्कन क्विन, बसेस आदी जाळून आम्ही अतिरेक्यांच्या कटालाच तर बळी पडत नाही आहोत ना ? काहीही असो, ज्या कृतीने भारताचे, भारतातील संपत्तीचे नुकसान होत असेल ती कृती करणे म्हणजे बाबासाहेब आपल्याला दु:ख देण्यासारखे आहे. परंतु भावनेच्या आहारी जाऊन आम्ही अशी कृत्ये करीत आहोत, म्हणून हे बाबासाहेब आम्हाला क्षमा करा.

बाबासाहेब आपणावर नितांत श्रद्ध बाळगणारा वर्ग समाजात खूप मोठ्या संख्येने आहे, प्राणापलिकडे तो आपणावर प्रेम करतो. परंतु त्यांच्या या श्रद्धाशक्तीचा गैरवापर करण्याचा उपद्व्याप करंटे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे एकीकडे समाजात उद्रेक माजतात तर दुसरीकडे आपले निष्ठावंत सच्चे अनुयायी बदनाम होतात. संभावित नेते मात्र नामानिराळे राहतात. ही स्थिती आम्ही अद्याप बदलू शकलो नाही. आम्हाला क्षमा करा.
एक प्रसंग आहे. राधा आपल्या मैत्रिणिंसमोर गोपिकांसमोर सदैव म्हणत असते - कृष्ण माझा ...कृष्ण माझा… एकदा गोपी राधेला म्हणतात, 'अगं राधा, तू सदैव म्हणतेस कृष्ण माझा म्हणून. परंतु कृष्ण लबाड आहे. तो राधा माझी असे कधीच म्हणत नाही.' राधेला ही गोष्ट जिव्हारी लागते. राधा कृष्णाजवळ आपली ही व्यथा बोलून रडू लागते. कृष्ण शांतपणे म्हणतो, 'राधे ... राधा माझी ! म्हणण्यातलाही जो एकप्रकारचा दुरावा अहे तोही मला सहन होत नाही !' राधेच्या सार्‍या शंका निघून जातात. असा अंगांगी भाव हिंदु समाजात, भारतीय समाजात निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. कार्य खूप व्यापक आहे. मार्ग कठीण आहे. परंतु संघटित व समरस समाज - समर्थ भारत, हे ध्येय समोर ठेवून वाटचाल करणे हे ध्येय आहे. बाबासाहेब, आपण आश्वस्त राहा. आम्ही भारतीय हे ध्येय निश्चित सत्यात उतरऊ.

दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चलता है…
सिद्धाराम भै. पाटील
( हा लेख मी ३ डिसेंबर 2006 रोजी सोलापूर तरुण भारत मध्ये लिहिला होता. आजही हा लेख प्रासंगिक वाटला म्हणून तो येथे पुन्हा प्रसिद्ध केला.)

अन्य काही महत्वाचे लेख 

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

आणि बुद्ध रडला ...

दलित राजकारण आणि शरद पवार

क्या मुसलमान जाति नहीं मानते ????.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी