Sunday, June 2, 2013

विवेकानंदांनी पाहिले आधुनिक भारताचे स्वप्न - प्रणव मुखर्जी


मुंबई - देशाला बळकट करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार, तत्त्वज्ञान आजही प्रेरणादायी आहे. सामाजिक बदलांच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक भारत घडवण्याचे स्वप्न पाहिले होते, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी केले.


शिकागो येथे जागतिक धर्मपरिषदेला जाण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया ते शिकागो’ या प्रवासाला 120 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रामकृष्ण मिशनतर्फे मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्‍ट्रपती बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायण, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी,   महापौर सुनील प्रभू उपस्थित होते.

राष्‍ट्रपती म्हणाले की, काही मोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये प्रवासामुळे अनेक बदल घडतात. विवेकानंदांनी 120 वर्षांपूर्वी केलेला प्रवास तसाच अनेकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारा ठरला. देशाची एक प्रतिमा बनवण्याचे काम त्यांनी केले. शिकागोमध्ये त्यांनी दिलेल्या भाषणांचे महत्त्व अजूनही कायम असून वेगवेगळे धर्म, जाती यांनी एकत्र राहणे हा त्यांचा उपदेश केवळ आदर्शवादी नसून ती काळाची गरज आहे.

अनैतिक गोष्टींचा परिणाम देशावर होऊ नये
आधुनिक भारताच्या जडणघडणीत स्वामीजींच्या सामाजिक विचारांनी खूप मोठी क्रांती केली. आपल्या नीती, परंपरा आणि सामाजिक भानाचे पुनरुत्थान करणे हे आपले सर्वप्रथम उदिष्ट आहे. कुठल्याही अनैतिक गोष्टींचा परिणाम देशाच्या विकासावर होता कामा नये, असा स्वामीजींनी केलेला उपदेशही राष्ट्रपतींनी सांगितला.
स्वामी विवेकानंदांच्या  150 व्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणारा कार्यक्रम हा विविध गटातील सुधारकांमधील वैचारिक आदानप्रदान करणारा ठरावा. तसेच आपल्या शैक्षणिक यंत्रणेचा विस्तार आणि दर्जाला अद्ययावत अभ्यासक्रमाची जोड देण्याची गरजही राष्‍ट्रपतींनी व्यक्त केली.

 दोन पुस्तकांचे प्रकाशन
‘स्वामी विवेकानंद इन मुंबई अ‍ॅण्ड महाराष्ट्रा’ आणि ‘अ
मंक फ्रॉम बॉम्बे- स्वामी विवेकानंदाज हिस्टोरिक व्हॉयेज फ्रॉम मुंबई टू शिकागो’ या दोन पुस्तकांचे  प्रकाशन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते करण्यात आले.
divya marathi / Jun 01, 2013, 03:05AM IST
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-swami-vivekanand-first-see-modern-indias-dream-pranav-mukharjee-4279594-NOR.html

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी