अप्रतिहत प्रज्ञेचा धनी

पृथ्वीवर जन्म घेणार्या प्रत्येकच
व्यक्तीला कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावेच लागते. मात्र, जी व्यक्ती
समाजकार्य, धर्मकार्य आणि राष्ट्रसेवा करताना आपले ऋण समाजबांधवांवर ठेवून
जाते, त्या व्यक्तीचे जाणे लौकिकार्थाने यशस्वी झाले, असे मानले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक कुप्प. सी. सुदर्शनजी यांचा
मृत्यूही त्याच कसोटीवर नोंदला जायला हवा. सुदर्शनजींच्या मृत्यूच्या
निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या मालिकेतील पाचवी
कडी काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांच्या मृत्यूने संघपरिवार आणि
हिंदुत्वाचे मूल्य जाणणारे सारेच देशबांधव शोकसागरात बुडाले आहेत. प्रथम
सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी, तृतीय
सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि चतुर्थ सरसंघचालक रज्जूभय्या यांच्या
पावलावर पाऊल टाकत सुदर्शनजी यांनी संघाची प्रगतीची रेषा दशदिशांनाच नव्हे,
तर सातासमुद्रापार पोहोचवली. १० मार्च २००० रोजी नागपुरातील अ. भा.
प्रतिनिधिसभेत रज्जूूभय्या यांनी, त्यांचा उत्तराधिकारी संघाची ध्येयधोरणे
निष्ठेने आणि प्रामाणिकतेने राबविणारा राहील, याची खात्री पटल्यानेच
संघाच्या मुशीतून तयार झालेल्या सुदर्शनजी यांची नियुक्ती केली होती. संघ
ही निव्वळ देशभक्तांचीच संघटना नसून, संघ हा एक सर्वसमावेशक विचार आहे,
जीवन जगण्याची पद्धती आहे, हे पूर्वसूरींनी आखून दिलेले सूत्र सुदर्शनजी
यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत कायम ठेवले. ‘चरैवेति चरैवेति’ या मंत्राचा
त्यांनी अखेरपर्यंत विसर पडू दिला नाही. काल, १५ सप्टेंबरला सकाळी त्यांची
प्राणज्योत मालवण्यापूर्वीही ते सकाळी फिरायला जाऊन आले आणि त्यानंतर
प्राणायाम सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुठल्याही व्यक्तीची
या जीवनाची अखेर इतर कुणालाही; अगदी घरच्या व्यक्तीलाही कुठल्याही प्रकारचा
त्रास न होता व्हावी, अशी इच्छा असते. सुदर्शनजी यांचीही तशीच इच्छा होती
आणि ती त्यांनी जीवनात बालपणापासून केलेल्या तपश्चर्येमुळे पूर्ण झाली.