Thursday, May 9, 2013

फत्ते? नव्हे, हार!

 -कामगिरी फत्ते झाली, काम फत्ते करून आलो, असं आपण अगदी सहजपणे म्हणत असतो. असे अनेकच अरबी, तुर्की, फारसी शब्द आपण सहजपणे आत्मसात करून टाकले आहेत. हा सगळा मुसलमानी राजवटीचा परिणाम आहे. अरबस्तानात इस्लामी संप्रदाय उदयाला आला. अरबांनी तुर्कांना बाटवलं. तुर्कांनी पर्शिया म्हणजे फारस किंवा इराण जिंकला. पण, अरब आणि तुर्क दोघांपेक्षाही फारस हा श्रेष्ठ संस्कृतीचा होता. त्यामुळे जगभरच्या सर्वच इस्लाम धर्मीयांवर फारसी संस्कृतीचा पगडा बसला. भारतावर बाबरापासून औरंगजेबापर्यंत सत्ता गाजवणारे मुघल किंवा मोगल हे मुळात तुर्क मुसलमान; पण मुघल राजवटीची अधिकृत भाषा होती फारसी, तुर्की किंवा अरबी नव्हे.


अरबी, तुर्कीतले कित्येक शब्द थोडा फरक होऊन फारसीत आले आणि आणखी थोडा फरक होऊन सरळ मराठीत आले. किल्ला हा शब्द घ्या. मुळात तो ‘किला’ आहे. किला-इ-रायगड म्हणजे किले रायगड. आपण त्याला किल्ले रायगड करून घेतला आहे. जझीरा म्हणजे जलदुर्ग. आपण त्याला जंजिरा करून घेतलं आहे. अल् जझीरा ही अरबी देशातली प्रसिद्ध दूरदर्शन वाहिनी आपल्याला माहीतच असेल. पत्नीसाठी बायको हा शब्द आपण तुर्कीमधून जसाच्या तसा घेतला आहे.

तसाच फतह हा मूळ अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ विजय. अल् फतह हे नाव कदाचित आपण ऐकलं असेल. पॅलेस्टाईनी नेता यासर अराफत याच्या अतिरेकी संघटनेचं नाव आहे ते. या अरबी ‘फतह’चं फारसीत ‘फते’ झालं आणि मराठीत ‘फत्ते’ झालं. आता किलाचं किल्ला आणि फतेचं फत्ते असं रूप का झालं असावं? कदाचित, आपणा मराठी माणसांना शब्दांवर जोर देऊन बोलण्याची सवय असल्यामुळे असेल.

ते कसंही असो. पण परवा इराणच्या या ‘फते’ची पार हार झाली. दमास्कसमध्ये प्रचंड स्फोट झाले आणि इराणच्या ‘फते’चं रूपांतर पराभवात झालं.

हे काय चाललंय् काय? अरबी, तुर्की, फारसी, मराठी शब्द काय नि इराण काय, स्फोट काय, फत्ते काय नि पराभव काय? थांबा, थांबा! मी नीट सगळं सांगायलाच तर बसलोय्.

असं पाहा की, भारताच्या पश्‍चिमेकडे पाकिस्तान, त्याचा शेजारी इराण, त्याचा शेजारी इराक, त्याचा शेजारी सीरिया नि त्याचा शेजारी इस्रायल. आता इराणी हे पर्शियन वंशाचे शिया मुसलमान आहेत; तर इराक नि सीरिया हे अरब वंशाचे सुन्नी मुसलमान आहेत. त्यांचं आपसात हाडवैर आहे. पण, पलीकडच्या इस्रायलचा प्रश्‍न आला की, ते वैर विसरून त्याच्या विरोधात एकवटतात. हिटलरने ज्यू लोकांची वांशिक कत्तल केली, हे ऐतिहासिक सत्य आहे. १९३३ ते १९४५ या कालखंडात वांशिक विद्वेषापायी नाझींनी किमान ६० लाख ज्यू लोकांना ठार मारलं. हा किमान आकडा आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद अहमदीनजाद यांनी अलीकडेच एक युगप्रवर्तक शोध लावला आहे. ते म्हणतात की, ज्यूंची अशी वांशिक कत्तल कधी झालीच नव्हती. हिटलरचं ज्यू हत्याकांड ही इस्रायल आणि त्याची पाठीराखी अमेरिका यांची एक प्रचारकी थाप आहे. त्यांना हे ‘सत्य’ कोणत्या संशोधनातून गवसलं, कोण जाणे! पण ते मिळेल त्या व्यासपीठावरून (आणि मिळेल त्या ध्वनिक्षेपकावरून) ही गोष्ट पुन:पुन्हा सांगत असतात.

तर दमास्कस ही सीरियाची राजधानी. गेली दोन वर्षे सीरियात राष्ट्राध्यक्ष बशर आसाद यांच्या सेना आणि त्यांची राजवट उलथून टाकू पाहणारे सीरियातलेच बंडखोर यांच्यात घमासान युद्ध चालू आहे. बशीर आसद यांचे वडील हाफीज आसद हे सोव्हिएत रशियाच्या गटात होते. त्यामुळे त्यांना बंड चिरडून टाकण्याचा सोव्हिएत गुण आणि वाण दोन्ही लागलेला आहे. बंडखोरांवर रणगाडे घालायचे नि त्यांना खरोखरच चिरडून टाकायचं, हा खेळ आसदना फार आवडतो.

पण, परवाच्या ५ मे रोजी राजधानी दमास्कस ज्या प्रचंड स्फोटांनी हादरली, तसे स्फोट नागरिकांनी गेल्या दोन वर्षांत अनुभवले नव्हते. बरोबर! कारण ते स्फोट सीरियन सैन्य आणि सीरियन बंडखोर यांच्यातल्या युद्धातले नव्हतेच मुळी. ५ मेच्या भल्या सकाळी इस्रायलची बॉंबर विमानं दमास्कसमधल्या जमराया सायंटिफिक रीसर्च इन्स्टिट्यूटच्या दिशेने झेपावली. पण, त्यांचं उद्दिष्ट इन्स्टिट्यूटची इमारत हे नव्हतंच मुळी. त्यांचं उद्दिष्ट होतं इमारतीजवळची गोदामं. त्या गोदामांमध्ये होती ‘फते-११०’ या नावाची इराणी क्षेपणास्त्रं!

इराणने ‘फते-११०’ नावाची ही क्षेपणास्त्रं २००२ सालीच विकसित केली आहेत. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्रांचा पल्ला होता २०० कि. मी. आता २०१२ साली ‘फते-११०’ ची ताजी आवृत्ती (लेटेस्ट व्हर्शन) निघाली आहे. तिचा पल्ला दुपटीने वाढला आहे. म्हणजे ४०० कि. मी. झाला आहे. तर या फते-११० क्षेपणास्त्रांचा एक साठा इराणमधून सीरियामार्गे लेबनॉनकडे चालला होता. लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये तो हेजबोल्ला या संघटनेच्या हातात पडणार होता. आणि मग पुढे?

पुढे दुसरं काय होणार? हेजबोल्ला त्यांचा वापर इस्रायलविरुद्ध करणार. आपल्या शत्रूंनी नवनवीन अत्याधुनिक शस्त्रास्त्रं मिळवावीत नि त्यांचा वापर करून आपली माणसं मारावीत, असल्या गोष्टी सहन करायला इस्रायल म्हणजे भारत नव्हे. शत्रूने अगदी ‘राशनपानी लेकर’ आमच्यावर चढाई करावी आणि आम्ही शत्रूशी क्रिकेट सामने खेळावेत, त्यांच्या गायक-गायिकांचे जलसे आमच्याकडे घडवून आणावेत. त्यांच्या नट-नट्यांना आमच्या मालिका-चित्रपटात संधी द्यावी; याला कुणी विरोध केला तर त्यांना जातीय, धर्मांध, सांप्रदायिक म्हणून हिणवावं इत्यादी लाडिक चाळे फक्त आमच्याकडेच चालतात. इस्रायलला असं करत बसायला वेळ नाही. कारण त्याला जमायचंय् आणि नुसतं जगायचं नाहीये, तर शत्रूच्या डोक्यावर पाय देऊन, शत्रूचा उच्छेद करून, विजयी वीरासारखं, मर्दासारखं जगायचंय्.

त्यामुळे इराणमधून सीरियामार्गे लेबनॉनमध्ये हेजबोल्लाकडे ‘फते-११०’ चा साठा रवाना होतोय्, अशी खबर आल्याबरोबर इस्रायली नेत्यांनी निर्णय घेतला. तरी त्यांनी एकदम दमास्कसवर विमानं पाठवली नाहीत. प्रथम ३ मे रोजी इस्रायली विमानांनी वारंवार लेबनीज हवाई सरहद्दीचा भंग केल्याची तक्रार लेबनीज अधिकार्‍यांनी इस्रायलकडे केली. बहुधा इस्रायली सेनापती क्षेपणास्त्र साठा बैरुतमध्ये येऊन तर पोचला नाही ना, याची खातरजमा करून घेत असावेत.

मग ५ मे रोजी त्यांनी दमास्कसच्या जमराया सायंटिफिक रीसर्च इन्स्टिट्यूटच्या जवळच्या गोदामांवर बॉम्बहल्ला केला. फते-११० क्षेपणास्त्रं जमिनीवरच धडाडून पेटली आणि नष्ट झाली. इस्रायली बॉंबर विमानांचा लक्ष्यवेध अचूक होता. त्यांचा एकही बॉम्ब जवळच्या इन्स्टिट्यूटवर पडला नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या इस्रायली अधिकारी सांगायला मोकळे की, आम्हाला सीरियाचं कोणतंही नुकसान करायचं नव्हतं. अतिरेकी संघटना कदाचित सीरियन अधिकार्‍यांच्याही नकळत क्षेपणास्त्रांची तस्करी करीत असतील. आम्ही त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला.

अर्थात, सीरिया काय म्हणेल याची इस्रायल फार पर्वा करतो, अशातला भाग अजीबातच नाही. २००३ साली दमास्कसजवळचं एक पॅलेस्टाईन अतिरेकी प्रशिक्षण केंद्र इस्रायलने सरळ भरदिवसा विमानहल्ला चढवून उद्ध्वस्त केलं होतं. २००६ साली सीरियाचा पाठिंबा असलेल्या हमास संघटनेने गाझा पट्टीमध्ये एका इस्रायली सैनिकाला कैद केलं म्हणून इस्रायलची बॉम्बर विमानं राष्ट्राध्यक्ष बशर आसदच्या अलिशान प्रासादावरून अगदी कमी उंचीवरून रोरावत गेली होती. या धमकीला सीरियन विमानदल किंवा भूदलाच्या विमानविरोधी तोफांकडे कोणतंही उत्तर नव्हतं. २००७ साली इस्रायली विमानांनी सीरियाच्या अगदी अंतर्भागातल्या एका अज्ञात ठिकाणची एक इमारत बेधडक उद्ध्वस्त करून टाकली होती. या इमारतीत काय होतं, याबद्दल इस्रायल किंवा सीरिया दोघांनीही अवाक्षर उच्चारलं नाही. पण, संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षकांच्या मते, तिथे नक्कीच काहीतरी अण्वस्त्रविषयक काम चालू असावं. पण, तरी या जुन्याच गोष्टी म्हणायच्या. अगदी या चालू वर्षी म्हणजे २०१३ च्या ३० जानेवारीला इस्रायली विमानांनी सीरियाच्या हद्दीत घुसून एका अज्ञात ठिकाणी बॉम्बमारा केला होता. नंतर ३ फेब्रुवारीला त्या वेळी संरक्षणमंत्री असलेले एहूद बराक एवढंच म्हणाले होते की, आम्ही जेव्हा काहीतरी म्हणतो तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी अर्थ असतो. लेबनॉनमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रं जावीत असं आम्हाला वाटत नाही.

याचा अर्थ, त्याही वेळी सीरियातून लेबनॉनकडेच कोणती तरी अत्याधुनिक शस्त्रास्त्रप्रणाली चालली होती. इस्रायलने तो प्रयत्न हाणून पाडला. इस्रायल जेव्हा काहीतरी म्हणतो, तेव्हा तो शब्दांनी म्हणतच नाही मुळी, तो थेट कृतीनेच म्हणतो. निषेधाचा खलिता, तीव्र शब्दांत निषेध, कडक निषेधाचा खलिता वगैरे भंपकगिरी करण्यात तो कधीही वेळ घालवत नाही. त्याची एक कृती करोडो निषेध खलित्यांपेक्षा जास्त प्रभावी असते. त्या कृतीमागे उभं असतं इस्रायली समाजाचं खंबीर, पुरुषार्थाने रसरसलेलं, विजयाची आकांक्षा ठासून भरलेलं विजिगीषु मन! ते विजयाकांक्षी समाजमन हिंमतबाज नेते निर्माण करतं आणि मग ते नेते शत्रूला रगडून काढण्याची इच्छा धरतात नि त्यात यशस्वी होतात.

‘फते-११०’ असं नुसतं नाव शस्त्रास्त्रांना दिलं म्हणून फत्ते होत नसते. ज्याचा आत्मविश्‍वास मोठा त्याचीच फत्ते होते. हा आत्मविश्‍वास मिळवण्यासाठी आत्मविस्मृती दूर व्हावी लागते. आणि ती दूर होण्यासाठी जाणत्या नेत्यांना अथक प्रयत्न करावे लागतात. ज्यू समाजाच्या जाणत्या नेत्यांनी तसे प्रयत्न शतकानुशतकं केले. म्हणूनच त्यांची फत्ते होते आहे आणि बलवान शत्रू पराभव पावून मनगटं चावीत बसले आहेत.
- मल्हार कृष्ण गोखले

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी