Monday, December 8, 2008

बापूसाहेब नावाचा दीपस्तंभ



अरुण करमरकर, मुंबई, हिंदुस्थान समाचार

पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या प्रचारक कार्यकर्त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील परंपरा अत्यंत समृद्ध आहे। ऐन उमेदीच्या वयात व्यक्तिगत आकांक्षा आणि निजी जीवनाची उभारणी (आजच्या परिभाषेत करिअर) पूर्णपणे बाजूला सारून नि:संगपणाच्या वाटेवर काही पावले चालण्याची प्रेरणा आजवर हजारो तरुणांंच्या मनात जागविण्यात ही संघ परंपरा यशस्वी ठरली आहे. अगदी प्रारंभीच्या काळात अनेकांनी याच वाटेवर आपली मार्गक्रमणा अखंडितपणे करून आपली जीवनयात्रा संपन्न केली. तर अन्य अनेकांनी काही वर्षांनंतर प्रचारकी दिनक्रम थांबवून व्यक्तिगत जीवनाचा मार्ग पत्करला. मात्र व्यक्तिगत जीवनाकडेही त्यांनी साधना म्हणूनच पाहिले. प्रचारकी जीवनाच्या काळात प्राप्त केलेल्या जीवनदृष्टीच्या प्रकाशातच प्रत्येक पाऊल टाकण्यात आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा प्रत्येक पैलू घडविण्यात इतिकर्तव्यता मानली. चं.प. तथा बापूराव भिशीकर हे अशा तपस्वी व्यक्तिमत्त्वांपैकीच एक.

एकूण 93 वर्षांच्या आयुष्यातील 5-6 वर्षे बापूसाहेब संघाचे प्रचारक राहिले। त्यानंतरच्या 65 वर्षांमध्येही प्रचारकी मानसिकतेचा एक क्षणासाठीही त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. सामूहिकता, अनामिकता, साधनसुचिता, गुणग्राहकता, मूल्यांबाबतच्या निष्ठा, प्रथमपुरुषी एकवचनी वृत्तीतून स्वत:प्रती कठोर आणि अन्यांप्रति क्षमाशीलतेचे औदार्य या साऱ्या बाबींचा विकटस्पर्श त्यांच्या वृत्तीप्रवृत्तींनी सतत जोपासून ठेवला. संघाच्या वाट्याला आलेल्या संघर्षात साहस, संयम आणि दृढनिष्ठेने सामोरे जाणाऱ्या आघाडीच्या फळीतले स्वयंसेवक ही भूमिकाही कधी सोडली नाही. विभाजनपूर्व कराची- सिंध भागात त्यांनी संघप्रचारक म्हणून काम केले, तो काळ तर सतत संघर्षाचा आणि जोखमीचा. नंतरही पत्रकार- संपादक या नात्याने ज्या तरुण भारतच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यालाही (तरुण भारतला) सतत संकटांनी घेरलेल्या वातावरणातच वाटचाल करावी लागत आली. तशाही स्थितीत सत्य जपत आणि स्वत्वाशी तडजोड न करता त्यांनी तरुण भारत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आणि लौकिकप्राप्त बनवला. पुढे ज्यांनी पत्रकार-स्तंभलेखक-लेखक म्हणून मानमान्यता मिळविली, अशा अनेकांना लिहिते करण्याचे श्रेय बापूसाहेबांच्याच नावावर लिहिले जाते. आणीबाणी आली, हुकुमशाहीचा बेजुमान वरवंटा लोकशाही मूल्यांना चिरडत निघाला, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. सुमार बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे सरकारी अधिकारी सेन्सॉरशिपच्या नावाखाली वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून मुजोर हडेलहप्पी करू लागले. अशा अत्यंत विपरित परिस्थितीत मोठ्या कुशलतेने पण खंबीरपणे मोजक्याच पत्रकारांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची नौका हाकत ठेवली. बापूसाहेबांचे नाव अशा पत्रकार/ संपादकांच्या यादीत अग्रभागी तळपले. संघविचारावरील अतूट, अविचल निष्ठा आणि अस्सल पत्रकाराची तटस्थता यांच्यातील समतोल सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी होते. अनिष्ट, अनौचित्यावर कठोर प्रहार करताना त्यांची लेखणी कधीच थरथरली नाही, पण भाषेचे साधन, सौष्ठव, सभ्यता, शालीनता, यांच्या मार्यादांचाही त्यांनी कधी अतिक्रम केला नाही.

शाश्वत नीतिमूल्ये, सुसंस्कार यांचा पाझर तर त्यांच्या लेखणीतून अखंड स्त्रवत असे. संपादकीय आणि विविध विषयांवर विविध नियतकालिकांमधून त्यांनी दीर्घकाळ केलेले स्तंभलेखन असो. साध्या, सोप्या, सुगम आणि नेमक्या शब्दांमध्ये अर्थगर्भ लिखाण कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच बापूसाहेबांचे लेखन साकार करीत आले. म्हणूनच सध्याच्या काळात पत्रकारितेत फोफावलेल्या सवंगपणाने आणि उथळपणाने ते व्यथित होत असत. दोनच वर्षांपूर्वी राष्ट्रीय पत्रकारिता न्यासातर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकाराचा नामवंत पुरस्कार त्यांना सांगली येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या ज्येष्ठ पत्रकार बापूराव लेलेंचे सहकारी, समकालीन या नात्यानेच बापूसाहेब भिशीकर संपादक म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरले. त्यामुळे बापूराव लेलेंच्या नावाचा पुरस्कार बापूसाहेब भिशीकर यांना हा एक अपूर्व समसमा संयोग होता. त्या समारंभात बापूसाहेबांनी केलेल्या भाषणामधून त्यांनी आजच्या पत्रकारितेवर केलेले भाष्य अतिशय मोलाचे होते. नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे त्यांनी आपल्या भाषणातून मुक्तपणे स्वागत केले, पण त्याचबरोबर यांत्रिक झगमगाटाने दीपून न जाण्याचा, पत्रकारितेच्या मूलमंत्रांचा विसर पडू न देण्याचा संदेशही आजच्या पत्रकारांना देण्यास ते विसरले नाहीत. एखाद्या मोठ्या समारंभात बापूसाहेबांनी केलेले बहुधा ते शेवटचेेच मोठे भाषण असावे. व्यक्तिगत संवादातून आजच्या साऱ्या ज्वलंत विषयांवर मनोज्ञ चर्चा करण्याचा क्रम आणि उत्साह मात्र त्यांनी अखेरच्या क्षणांपर्यंत टिकविला हे विशेष. त्यांच्यापाशी बसून ही उत्साही उद्‌बोधक चर्चा करण्याचे भाग्य मला अगदी अलीकडच्या दिवसांपर्यंत लाभत राहिले.
सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणाबाबतची त्यांच्या मनात दाटून राहिलेली खंत त्यांच्या गप्पांमधून जाणवत असे, पण तरीही त्यांचा सूर आणि त्यांच्या वृत्ती कधीही निराशावादाकडे झुकल्या नाहीत हे विशेष। कार्यकर्त्यांमधील अभ्यासूवृत्ती, व्यासंग कमी होत चालल्याबद्दल जशी त्यांच्या मनात व्यथा होती, तशीच अनौपचारिक स्नेहसंबंध, परस्परसंवाद, संपर्क आणि त्यातून परस्परांबद्दल निर्माण होणारा विश्वास यांना ओहोटी तर लागली नाही ना ही शंका त्यांना भेडसावत असे. अडवाणी- अटलजी यांच्याविषयी सरसंघचालकांनी दिलेल्या मुलाखतीवरून प्रसारमाध्यमांनी माजवलेला गदारोळ, अडवाणी यांनी जिनांविषयी, पाकिस्तान दौऱ्यात, काढलेल्या उद्‌गारांच्या विषयावरून स्वयंसेवकांच्या वर्तुळात निर्माण झालेले अस्वस्थतेचे वातावरण, अन्यान्य राजकीय पक्षांबरोबरच भारतीय जनता पक्षातही प्रसंगी अनुभवाला येणारे निराशाजनक प्रसंग अशा अतिशय नाजूक विषयांबाबत त्यांनी प्रत्यक्ष चर्चेत तेसच पत्रांच्या द्वारे केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी सदैव पथदर्शक राहील.

नव्वदी उलटल्यानंतरही शरीर मनाची सर्व गात्रे बऱ्यापैकी सक्षम स्थितीत राहिली हा अर्थातच त्यांच्या सात्विक आणि तपस्वी जीवनशैलीचा परिणाम होता। शेवटपर्यंत त्यांची लेखणी लिहिती होती हे विशेष. पत्रकार या नात्याने राजकारणावर जितक्या अधिकारवाणीने ते बोलू- लिहू शकत, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच अधिकाराने ते अध्यात्म सांगत- लिहित राहिले. हा अधिकार त्यांना अर्थातच व्यासंगाने आणि तपश्चर्येने प्राप्त झाला होता.

सर्वार्थाने बापूसाहेब "एक दीपस्तंभ' या विशेषणाला पात्र ठरतात. पत्रकार म्हणून स्वयंसेवक म्हणून आणि माणूस म्हणूनही त्यांचे जीवन सदैव दीपस्तंभासारखेच मार्गदर्शन करीत राहील, यात शंका नाही.


ऋषी संपादक : बापूसाहेब भिशीकर


ऋषी संपादक :
बापूसाहेब भिशीकर

पत्रकाराचे लेखन कसे असावे, याबाबत लोकमान्य टिळक यानी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की, पत्रकाराची लेखणी ही धीरगंभीर नदीच्या प्रवाहासारखी असावी. तिच्या प्रवाहाला खळखळीचा वेग नसावा पण कोठे तुंबूनही राहता कामा नये. थोडक्यात तिला कोठेतरी पोहोचण्याची घाई नसावी आणि वाया घालवायला वेळही नसावा. या साऱ्या वर्णनाची प्रचीती बापूराव यांच्या लेखनातून नेहेमी येते.

रात्रंदिवस आपण रहात असलेली जमीन आपल्याला केवळ वजनापुरताच आधार देत असते असे नव्हे तर पावलोपावली आपल्याला सांभाळून घेत असते. "अतिपरिचयात अवज्ञा' असल्याने आपल्याला त्या आधाराची किंमत कळत नाही. ऋषीमुनी जेंव्हा त्या पायाखालच्या जमिनीबाबत बोलतात, तेंव्हा "पादस्पर्शम्‌ क्षमस्व मे' असे उद्‌गार काढूनच पुढचे बोलायला सुरुवात करतात. आज या पायाखालच्या जमिनीची आठवण येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात गेली सत्तर वर्षे ज्यांनी आपल्या राष्ट्रवादी चिंतन, पत्रकारितेतून प्रखर लेखन आणि संतवाङ्‌मयातून महाराष्ट्रातील फार मोठ्या वर्गाला जमिनीचा आधार वाटावा, अशी जीवनमूल्यांची बैठक दिली, त्या श्री.बापूराव भिशीकर यांचे सोमवारी वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
ज्या वेळी सिंधमध्ये पाकिस्तान निर्मितीच्या प्रक्रियेची धग सामान्य हिंदूला बसण्यास सुरुवात झाली होती, त्या काळात तेथे जावून संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले बापूराव, महाराष्ट्रात तरुण भारत वाढावा व त्याच्या अधिकाधिक आवृत्त्या निघाव्या म्हणून आणिबाणीसारख्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संपादक म्हणून काम करणारे बापूराव आणि गेली तीस वर्षे संतवाङ्‌मयाच्या माध्यमातून संस्कार बांधणीचा एक नवा अध्याय रचणारे बापूराव असा त्यांचा बहुआयामी परिचय महाराष्ट्रातील तीन पिढ्यांना आहे.गेली तीस वर्षे बापूराव प्रामुख्याने संतवाङ्‌यावर व जीवनमूल्ये मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संस्कारप्रक्रियेवर लिहित आहेत. पण त्यांचा हा एकमेव परिचय नाही. आपल्या समाजाची आणि देशाची उभारणी ही प्रखर राष्ट्रवादाच्या आधारे व्हावी, यावर ते जवळजवळ सत्तर वर्षे लिहीत आहेत. 1948साली महात्मा गांधी यांची हत्या झाल्यावर संघावर बंदी आली, त्यामुळे ती उठवण्यासाठी भूमिगत राहून आपले म्हणणे प्रखरपणे मांडत राहणे हे काम त्यानी केले व त्यासाठी आवश्यक ती किंमतही मोजली. ते सहा महिने कारावसातही होते. बापूराव हे एम ए होते, येवढाच परिचय करून दिला तर तो उल्लेख "बायोडाटा' सारखा वाटेल पण सत्तर वर्षापूर्वीच्या नागपूरच्या डॉ. केशव बळिराम हेडगेवार हे संघ कामाची आधार शीला रचत असतानाच्या वातावरणात "जे करू ते अत्युत्कृष्ट करू' असे म्हणून जीवन देण्यास तयार झालेली जी तरुळमंडळी होती, त्यात बापूराव यांचा समावेश होता, त्यामुळे त्या काळात सायकलवरून दररोज काही मैल जावून शाखा घेणे हा त्यांचा दिनक्रम होता, त्याच प्रमाणे एम ए परीक्षा द्यायची असेल तर तेथे असलेले सुवर्णपदक हे आपल्या अभ्यासाने आपल्याकडेच आले पाहिजे, असे ठरविणाऱ्या तरुणांच्यापैकी ते होते, त्यामुळे त्यांच्या सुवर्णपदक मिळवण्यास राष्ट्रउभारणीच्या कामात पायाभूत होण्याची उंची आहे. त्याच वेळी त्यांच्या कामाच्या विरोधकांनी त्यांच्यावर जेंव्हा हल्ला करून त्यांचे काम बंद पाडण्याचा जेंव्हा प्रयत्न झाला, तेंव्हा हल्ला करण्यासाठी आलेल्या पन्नास जणांशी दोन होत करून सर्व शक्तिनिशी त्यातून निसटण्याचे कौशल्यही त्यानी दाखवले आहे. पण मराठी मनावर त्यांच्या लेखनाची जी छाप आहे ती प्रखर पण संयमित लेखकाची.
दैनिक वृत्तपत्रांच्या विषयांची व्याप्ती ही मोठी असते. तेथे धारदार टीकेचीही आवश्यकता असते पण हळुवार संवादाचीही आवश्यकता असते. या दोन्ही कसोट्यांचा बापूराव यांचे लेखक हे वस्तुपाठ आहेत, याची प्रचीती कालपर्यंत त्यांचे लेखन वाचताना येते. अलिकडे त्यानी राजकीय संदर्भ असलेले लेखन कमी केले होते. तरीही अतिरेक्यांचे देशात व सीमावर्ती प्रदेशात होणारे हल्ले, ईशान्य भारतातील पंचमस्तंभीयांचा प्रश्र्न, सत्तेवर असणाऱ्या त्या त्या वेळच्या राज्यकत्यार्ंची "कच खाऊ भूमिका' ही त्याना अस्वस्थ करायची आणि नव्वदी ओलांडल्यानंतरच्या वयातही ते धारदार लेखन करीत. असे असले तरी त्याना टीका करताना "आपल्या विचाराच्या विरोधकाचा कोठेही संबंध आला तर लगेच कर टीका' सरधोपट मार्ग स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर कधी येत नाही. त्यांचे लेखन येवढे संयमित असते की, कोणत्याही कारणाने अस्वस्थ झालेल्या कोणालाही मन शांत करून घ्यायचे असेल तर त्यानी बापूराव भिशीकर यांचा कोणताही लेख वाचावा.
अडतीस साली म्हणजे अवघ्या तेविसाव्या वर्षी बापूराव सिंधमध्ये प्रचारक म्हणून गेले. त्या काळी पाकिस्ताननिर्मितीची धग सामान्य माणसास जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्या काळात त्यानी पाच वर्षे काम केले. त्यांच्या त्या वेेळच्या कामाचा त्यानी संघात आणलेले माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी अतिशय गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 1943 मध्ये सिंधमधून आले आणि संघाच्या कार्यकर्त्यामंडळींनी सुरु केलेल्या नवयुग विद्यालयाचे मुख्याध्यापक झाले. या काळात बापूराव यानी संघाच्या कामावर बरेच लेखन केले. काही काळ ते एका साप्ताहिकाचे संपादकही होते. 1949 मध्ये त्यावेळचे संघाचे वरीष्ठ पदाधिकारी श्री बाळासाहेब देवरस यांच्या पुढाकाराने श्री.ग.त्र्यं.माडखोलकर यांचा तरुणभारत हा नरकेसरी या संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. त्यात संपादक म्हणून काम करत असलेले श्री.माडखोलकर यांचे सहकारी म्हणून बापूराव काम करू लागले. वृत्तपत्राच्या संपादक विभागाच्या कामाचे सर्व प्रकारचे अनुभव त्याना येथे घेता आले. 1957 मध्ये तरुणभारतची पुण्यात आवृत्ती काढण्यात आली व त्याचे संपादक म्हणून श्री ग वि केतकर यांनी जबाबदारी स्वीकारली. 1963 मध्ये त्यानी पुणे तरुणभारतची संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकालात पुणे तरुणभारत हे संपूर्ण मराठवाडा, नाशिक विभाग, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात सर्वात अधिक गावी जाणारे दैनिक म्हणून पसरू शकले. त्याकाळी दैनिकांचे कमाल खप हे एक ते दीड लाख या घरात असत आणि बापूराव यांनी निवृत्तीच्या वेळी जेंव्हा तरुणभारतची जबाबदारी हस्तांतरीत केली, तेंव्हा त्यात तरुण भारतचा समावेश असे. त्या अतिशय प्रतिकूल काळात तरुणभारतची प्रगती कशी झाली किंवा कोणत्या समस्या उभ्या राहिल्या हा स्वतंत्र अध्याय आहे. पण एक गोष्ट खरी की, महाराष्ट्रात फार मोठा जनसंपर्क, नवनवीन विषय हाताळण्यासाठी परिश्रमी सहकारी मंडळींनी केलेले सहकार्य आणि प्रतिकूल परिस्थितीला न डगमगण्याची संघभावना हे तरुणभारतच्या यशाचे रहस्य आहे. त्यात आणिबाणीतील दहशतवादाचे वातावरण आणि वृत्तपत्रावरील प्रसिद्धिपूर्वतपासणीची बंधने हा सारा वेदनाकर विषय असायचा.
रस्त्यावर सायकलला दिवा नसणे किंवा डबलसीट नेणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस मंडळीवर अचानक वृत्तपत्रावर प्रसिद्धीपूर्व बंधने हाताळण्याची वेळ आली होती, त्यामुळे रात्रीअपरात्री बापूराव यांच्या घरी जावून दरडवायलाही ही मंडळी मागेपुढे बघत नसत. त्याकाळात त्यावेळच्या सरकारची अशी इच्छा असायची की, कोणत्याही कारणाने का होईना तरुण भारत बंद पडावा, त्यासाठी अधिकाधिक अपमामित करण्याचा सपाटा सरकारने लावला होता. हा हेतू लक्षात आल्यावर अपमानाची पर्वा न करता तरुण भारत चालू ठेवण्याचा चंग त्यावेळच्या जबाबदार मंडळींनी बांधला आणि त्याला यशही मिळाले. पुण्याच्या एका आवृत्तीतून नंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या चार आवृत्त्या आजही आपल्या संकल्पसिद्धिसाठी जिद्दीने उभ्या आहेत.

त्या काळातील सरकारी बंधनामुळे राजकीय विरोध करणारा एखादा जरी शब्द कच्च्या प्रुफात दिसला तरी कार्यालयावर हत्यारी पोलीसांचा बंदोबस्त वाढायचा. पण या प्रतिकूलतेतून मार्ग काढण्यासाठी बापूराव यानी तरुणांशी संवाद करून त्यावर लेखन करण्याचा एक निराळाच मार्ग स्वीकारला आणि त्यातून एका नव्या लेखन प्रकारालाच सुुरुवात झाली. आणिबाणीचा एक सर्वात मोठा परिणाम म्हणजे तरुणांमध्ये अशाश्र्वततेची भावना निर्माण झाली होती. भारतासारख्या खंडप्राय देशात कोणी एक हुकुमशहा उभा राहतो आणि देशातील कोट्यवधी तरुणांपुढे अनिश्र्चिततेचे प्रश्र्न चिन्ह निर्माण करतो,असे वातावरण तयार झाले होते.यातून सावरण्यासाठी त्यानी भक्कम जीवनमूल्यांच्या आधारे आणि त्यांच्याच घरच्यांशी संवाद करून त्याना आत्मविश्र्वास निर्माण करण्यावर त्यानी भर दिला.दर आठवड्याला या विषयावर एक लेख साप्ताहिक अंकात असे आणि त्याला महाराष्ट्रात फार मोठा वाचक वर्ग असे. आजूबाजूच्या परिस्थितीने अस्वस्थ झालेल्या प्रत्येकाला काही तरी म्हणायचे असायचे आणि बापूराव त्यांची वेदना व्यक्त करत. प्रत्येकाची वेदना निराळी असली तरीही त्याचे स्वरुप प्रातिनिधिक असे. त्याला कधी जीवनातील उदाहरणाचा दृष्टांत दे तर कधी संत वाङमयाचा आधार दे, यातून सुरु झालेला तो संवाद आजही सुरु आहे.
1978साली बापूराव निवृत्त झाले.त्यांच्या निरोपसमारंभाच्या अध्यक्षपदी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार होते. गेल्या पन्नास वर्षात जे फार थोडे लक्षात राहण्यासारखे निरोप समारंभ झाले, त्यात त्या कार्यक्रमाचा समावेश करावा लागेल. बापूराव यांच्या वृतस्थ जीवनावर शरदराव यानी केलेले विवेचन हे आजही अनेकांच्या स्मरणात असेल.
बापूराव निवृत्त झाले म्हणजे वृत्तपत्राच्या दररोजच्या धबडग्याच्या कामातून बाजूला झाले येवढेचे काय ते. पण दररोजचे लेखन, ग्रंथनिर्मिती, नव्या नव्या लोकांशी संवाद आणि कूट वाटणाऱ्या समस्या त्याच्यावरील उपायासह सोप्या भाषेत मांडणे हे त्यांचे काम कालपर्यंत अविरतपणे सुरु होतेे. त्यानी त्यांचे बरेच व्याप कमी केल्यावरही पंचवीस गं्र्रथांची निर्मिती झाली आहे. त्यांच्या गं्रथांच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक लागतो तो म्हणजे संघजीवनावरील वाङ्‌मयाचा. डॉ.हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांच्या जीवनावर लिहिण्याचा अधिकार फार थोड्याना प्राप्त झाला आहे आणि तो अधिकार त्यागाने प्राप्त झाला आहे. बापूराव यांचे लेखन लक्ष लक्ष संघस्वयंसेवकांच्या दररोजच्या वाचनात आहे. संघटना जीवनात अनेक प्रसंग असे असतात की, जेथे संघटना वाढणाऱ्या, काम वाढणाऱ्या आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या परामर्षाची आवश्यकता असते, अशावेळी बापूराव हे आधारवड वाटतात. गेली तीस वर्षे संतवाङमयांचा वेध घेत त्यानी राष्ट्रबांधणीच्या आपल्या ध्येयाच्या कामात भर टाकली आहे. भारतातील संतांनी ईश्र्वरी आराधनेच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे काम केले आहे आणि तेच काम आपल्याला पुढे न्यायचे आहे हा श्री गुरुजींचा विचार बापूराव यानी कदाचित काही हजार लेखातून पुढे नेला. सकाळ, पुढारी, तरुण भारत अशा दैनिकातून कधी साप्ताहिक सदर तर कधी दैनंदिनी सदर यातून तो मांडला. बापूराव यांच्या आजपर्यंतच्या लेखांची सर्व प्रकाराच्या लेखाचे संकलन करणे हा कदाचित स्वतंत्र कामाचा विषय होईल. अर्थात त्यांच्या या कामात प्रामुख्याने सौ. कुसुमताई आणि मुले, सूनबाई, नातवंडे या साऱ्यांचा त्यांच्या त्यांच्या परीने सहभाग आहे.
बापूराव यांचे मार्गदर्शन हे कार्यकर्त्यांना ईश्र्वरीप्रसादाची अनुभूती देऊन जात असे. बातूसाहेबांनी निर्माण केलेल्या वाङमयातूनही ही अनुभूती येऊ शकते.
कै. बापूसाहेब भिशीकर यांना तरुण भारत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

मोरेश्वर जोशी, पुणे प्रतिनिधी

चं. प. भिशीकर यांचे निधन


तरुण भारतचे माजी संपादक

चं. प. भिशीकर यांचे निधन
सोलापूर: पुणे तरुण भारतचे माजी संपादक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक चंद्रशेखर परमानंद तथा बापूसाहेब भिशीकर यांचे सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील हराळी ज्ञानप्रबोधिनी केंद्रात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कन्या डॉ. स्वर्णलता भिशीकर आणि पुत्र आनंद हे आहेत.
सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी पुणे येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यंसंस्कारासाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले आहे.
अल्प परिचय: बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. एम.ए. पर्यंतचे शिक्षण नागपूरमध्ये झाले. 1938 ते 1943 या कालावधीत विभाजनपूर्व सिंध प्रांतात- कराची येथे संघ प्रचारक म्हणून कार्य केले. संघबंदी काळात कारावास. नागपूर तरुण भारतमध्ये सहसंपादक, पुणे तरुण भारतचे प्रारंभी कार्यकारी संपादक व नंतर प्रमुख संपादक. आणीबाणीच्या काळात उमेद वाढविणारे लेखन. प्रारंभापासून 1979 पर्यंत पुणे तरुण भारतमध्ये 15 वर्षे "हितगुज' हे अत्यंत लोकप्रिय सदर. संतवाङमयावर प्रवचने. पू. स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रह. दै. सकाळमध्ये दोन वर्षे भक्तीरंग आणि भक्तिगंगा ही दैनिक सदरे. वरील दोन्हीचीही पुस्तके भारतीय विचार साधनेतर्फे प्रकाशित. लेखन व सामाजिक-राष्ट्रीय जागरण कार्याबद्दल अनेक पुरस्कार. विश्व हिंदू परिषद, ज्ञान प्रबोधिनी-सोलापूर, विवेक विचार (विवेकानंद केंद्राचे मराठी मासिक) इ. कार्यांना वैचारिक मार्गदर्शन. समर्थांच्या स्फूट रचनांवर अलीकडेच 700 पानी ग्रंथ प्रकाशित.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी