Tuesday, January 27, 2009

विजय! पूर्ण विजय!!


युवाशक्तीला घातलेली साद
31 डिसेंबर 2008 ते 4 जानेवारी 2009 या कालावधीत महाराष्ट्रातील युवाशक्तीचे शेगाव (जि। बुलढाणा) येथे महाशिबीर झाले।

Tuesday, January 20, 2009

अडाणी निरक्षर की जागरूक साक्षर



मकरंद मुळे


गझलकार सुरेश भट यांच्या एका गझलेच्या ओळी थोड्या बदलून "पुन्हा पुन्हा चूक तीच ती आम्ही करीत गेलो,
"त्यांचाच' खुनी हात परत धरत गेलो।।
आपली सामूहिक स्थिती यापेक्षा फारशी वेगळी नाही. घटना घडतात. आक्रोश होतो. चर्चा होते. श्रद्धांजलीच्या सभा होतात आणि आता होर्डिंग्जही लागतात, परंतु अजूनही आपल्या देशाचा नेमका शत्रू कोण? आपल्याला कोणाला धडा शिकवायचा आहे ? याबद्दल आपण अज्ञानी आहोत. अडाणीपणाची ही स्थिती सार्वत्रिक आहे. माध्यमे, नोकरशहा, राजकारणी, बुद्धिवंत, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) व निधर्मी (?) आदी त्यांच्या निहित स्वार्थासाठी (वेस्टेड इंटरेस्ट) व वैयक्तिक अजेंड्यासाठी मिशनरी, इस्लामिक व कम्युनिस्ट दहशतवादाबाबत निरक्षर राहू इच्छितात. सर्वसामान्य भारतीय त्याच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षात इतका गुरफटलेला आहे की, या निरक्षरतेविषयी त्याला काही सोयरसुतक नाही आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर दहशतवाद या शब्दामागे "स्वदेशी' शब्द हेतूत: लिहितात. दिशाभूल करणारा नवा शब्द "कॉईन' करून स्थापित करण्याची बौद्धिक चूक करू शकतात. गैरसमज पसरविणारी वैचारिक खेळी करतात, याला त्याच परिभाषेत सणसणीत प्रत्युत्तर देण्याचे धाडस करण्यात आपण असमर्थ आहोत. आपली बौद्धिक उदासिनता याला कारणीभूत आहे. खरे तर कुमार केतकर यांच्या "स्वदेशी दहशतवाद' यातील बुद्धिभेद उघड करणे फारसे अवघड नाही. मुळातच दहशतवाद हा भारतीय भूमीतला नाही. ही भूमी दहशतवादाची बळी ठरलेली आहे. परकीयांनी साम्राज्य विस्तार, धर्म विस्तार व कम्युनिझमचा पगडा यासाठी भारतात दहशतवाद आणला. रशिया, चीन, युरोप, अमेरिका, इंग्लंड व इस्लामिक देशांतून आलेला हा दहशतवाद यत्किंचितही निर्बुद्ध नाही. या दहशतवादाने मूळनिवासी, बहुजन-अभिजन, दलित-दलितेतर, अल्पसंख्याक, आर्य-अनार्य, नेशन इन मेकिंग, निधर्मीवाद, धर्मनिरपेक्षता वंचित-शोषित अशी अ-भारतीय परिभाषा बेमालूमपणे रूढ केली आहे. केतकरसारख्या प्रभृतींनी ती प्रचलित केली आहे. याचा आधार घेऊन या परकीय दहशतवादाने भारतीय सण, परंपरा, संस्कृती, उत्सव, मान्यता यांवर पाश्चिमात्त्य मापदंडाच्या आधारे टीका करून सामाजिक विद्वेष पसरविला. प्रलोभने, धाकधपट याद्वारे छुपे धर्मांतर सुरू केले. भारतीय समाजाची मानसिकता लक्षात घेऊन या दहशतवादाने सेवेचा मुखवटा धारण केलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपले तत्त्वज्ञान मांडण्यास सुरुवात केली. या स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) इंग्रजी प्रसारमाध्यमांनी सामाजिक नेतृत्व बहाल केले आहे. दहशतवाद, तत्त्वज्ञान म्हणून रुजला, कारण एक प्रचंड अर्थकारण, दुसरे "जुने जाऊ द्या मरणा लागोनी' ही वृत्ती, तिसरे परक्यांचे आकर्षण, चौथे इतिहासाकडे दुर्लक्ष, पाचवे वैचारिक-बौद्धिक क्षेत्राविषयी अनास्था, सहावे भ्याड व तडजोडी वृत्ती आणि सातवे "स्व'त्वाचा शोध नाकारणे हे आहे.
ज्यांना तत्त्वज्ञानाच्या रूपात दहशतवाद सांगणे अवघड असते किंवा कळत नाही; पण ज्यांना मरण्याची, मारण्याची भाषा कळते त्यांच्या हातात बंदूक-बॉम्ब देणे सोपे असते. त्यांचे पंथीय, भाषिक, जातीय अहंकार जागवून त्यांच्या तत्कालीन गरजा पूर्ण करून आपल्याला हवे ते कृत्य करून घेता येते. इथे कुमार केतकर यांच्या परिभाषेतील स्वदेशी दहशतवाद पुढे येतो. हा "स्वदेशी' दहशतवादी "केवळ जन्माने' भारतीय असतो. त्याचे केवळ "डोमिसाईल' भारतीय असते. तो "काया वाचा मनाने' परकीय झालेला असल्यानेच तो भारतविरोधी दहशतवादी कृत्य करू शकतो. किंबहुना, तो अनेकदा धर्मांतरित असतो; ज्याची नोंद झालेली नसते. हे सर्व सविस्तरपणे लिहिण्याचे कारण कुमार केतकर यांनी आसाममध्ये नुकत्याच झालेल्या स्फोटांचा संदर्भ घेऊन लोकसत्तेच्या अग्रलेखात स्वदेशी दहशतवादाची चर्चा केली आहे. ज्या भारताच्या भूभागाचा संदर्भ कुमार केतकर देतात तो पूर्वांचल मिशनरी कारवाया व बांग्लादेशी घुसखोरीने त्रस्त आहे. स्वातंत्र्यापासून "नेहरू डॉक्टरीन'चे कुमार केतकर चाहते आहेत. त्या "नेहरू डॉक्टरीननेच पूर्वांचलावर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. याच जवाहरलाल यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न युनोत नेला. पूर्वांचल व जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरतावाद जोपासला गेला. हा फुटिरतावाद राजकारण्यांनी सत्तेसाठी वापरला, हाच फुटिरतावाद आता दहशतवादाच्या रूपात थैमान घालत आहे. याला "स्वदेशी' हे विशेषण लावणे म्हणजे भारतविरोधकांच्या हाती कोलित देणे आहे. हे न कळण्याइतके केतकर साहेब निरागस नाहीत. तरीही कुमारजी असे लिहितात म्हणजे ते दहशतवादाबद्दल सोईने निरक्षर राहू इच्छितात. प्रत्येकाच्या अशा सोईच्या भूमिकांमुळेच दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी "राष्ट्रीय भूमिका' तयार होत नाही. दहशतवादाला धर्म नसतो, असा कंठशोष बेंबीच्या देठापासून करायचा आणि त्याचवेळी "स्वदेशी' दहशतवादाचे पिल्लू सोडून द्यायचे या दुटप्पीपणाने समूहमन घडत नाही, ते गोंधळते. असे गोंधळलेले नागरिक "मला काय त्याचे?' या मानसिकतेत जातात व कर्तव्य विसरतात. या पार्श्वभूमीवर आणखी काही बातम्या पाहूया.
दि. 31 डिसेंबरच्या "हिंदुस्थान टाईम्स'ने वर्षभरातील काही प्रमुख घटना प्रकाशित केलेल्या आहेत. यात या इंग्रजी दैनिकाने ओरिसातील चर्चवरील हल्ला याची नोंद घेतली आहे, पण समाजसेवक स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची मिशनरी पुरस्कृत निर्घृण हत्या हिंदुस्थान टाईम्सला नोंदवावी असे वाटले नाही. दि. 1 जानेवारी 09 च्या "दि टाईम्स ऑफ इंडिया'च्या पहिल्या पानावर रशिया येथून हनिमूनसाठी आलेल्या दांपत्याने "लॉंग किस' देऊन नववर्षाचे स्वागत केल्याचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. मात्र त्याच रात्री ठाण्यातील शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन दहशतवादाच्या विरोधात राष्ट्रगीत गायन करून नव्या वर्षाचे स्वागत केल्याची बातमी छापावीशी वाटली नाही. मंगलोर (कर्नाटक) येथे चर्चवर हल्ला झाल्याची, ख्रिश्चनांना मारहाण झाल्याची बोंब एकमुखाने प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाने दणदणीतपणे मारली, परंतु "न्यू लाईफ ख्रिश्चन सेक्ट'च्या घटनाविरोधी कारवायांविषयी माहिती देण्याची हिंमत कोणी केली नाही. या सेक्टने "सत्यदर्शिनी' या पुस्तिकेचे मंगलोर, उडपी, चिकमंगळूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाटप केले होते.
या पुस्तिकेतून हिंदू देवदेवतांची विटंबना करण्यात आली होती.या सेक्टने अनधिकृत प्रार्थनास्थळे (चर्च) उभारली आहेत. मंगलोरमधील संघर्ष पोलीसविरुद्ध न्यू लाईफ असा झाला होता. ज्याला तथाकथित "नॅशनल मिडिया'ने आपल्या मालकांशी एकनिष्ठता राखून हिंदू-ख्रिश्चन दंगल असे स्वरूप दिले होते. प्रत्यक्षात न्यू लाईफच्या प्रार्थनास्थळातून पोलिसांवर दगडफेक झाली होती. मिशनरी समर्थकांनी जनजीवन विस्कळीत केले होते. पोलिसांनी या प्रार्थनास्थळावर कारवाई केल्यावर त्यांना अवैध शस्र मिळाली होती.
दि. 27 डिसेंबर रोजी "द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाने ओरिसातील कंधमहाल येथील हुतात्मा स्वामी लक्ष्मणानंद यांच्या हत्येविषयी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी "हेडिंग'म्हणून प्रकाशित केली होती. अतिशय सविस्तर असलेल्या या बातमीत सीआयडीने कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य राधाकांत नायक यांना सबळ पुराव्याच्या आधारे स्वामीजींच्या हत्येसाठी दोषी ठरविले असल्याचे म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने या बातमीचा सलग तीन दिवस पाठपुरावा केला आहे. स्वाभाविकच ही बातमी देणे म्हणजे सेक्युलॅरिझमच्या विरोधात जाणे ठरले असते हे जाणून अन्य सर्व माध्यमांनी ही बातमी दुर्लक्षित केली. हा सर्व घटनाक्रम माध्यमे दहशतवाद व राष्ट्रविरोधी कारवायांना पुष्ट करत आहेत हे दर्शविणारा आहे.
ईमेलद्वारा दोन बातम्या स्वरूपातील माहिती मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर एकमेकांना मोठ्या संख्येने पाठविल्या जात आहेत. यातील एक मेल दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये 60तास ओलीस ठेवलेल्या व नंतर ठार केलेल्या स्री, पुरुष, लहान मुलांशी केलेल्या विकृत अमानवी व्यवहाराची इत्यंभूत माहिती देणारा आहे. डोळे काढणे, बोट कापणे, नख उपटणे, स्रियांच्या गुप्तांगात गोळ्या घालणे, पाशवी बलात्कार करणे, केस उपटणे, ओलिसांवर विशेषत: मूल व स्रियांवर लघवी करणे, त्वचा खेचणे, कान-नाक यासह अन्य अवयव कापणे अशी माणुसकीला काळीमा फासणारी ही कृत्ये आहेत. मेलमधील माहितीनुसार या दुर्दैवी नागरिकांना "अधिकृत मृत' घोषित करणाऱ्या डॉक्टरांनी व त्यांची प्रेते शवागारात ठेवणाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे म्हटले आहे. या माहितीच्या आधारे दै. सामना व दै. लोकमत व्यतिरिक्त कुठल्याही "मोठ्या' वृत्तपत्राने बातमी दिलेली नाही. कुठल्याही वृत्तवाहिनीला ही ब्रेकिंग न्यूज वाटलेली नाही. विशेष म्हणजे ही बातमी (मेल) अतिरंजित, कपोलकल्पित असल्याचे कुठल्याही शासकीय यंत्रणेने अद्याप म्हटलेले नाही. दुसरी मेल दक्षिणेतील एका नागरिकाने सर्व वाहिन्यांना पाठविलेली आहे. वािहन्यांनी 60 तास बातमी दिली ती ताज, ओबेराय येथील धुमश्चक्रीची, छत्रपती शिवाजी टर्मिंनस या सर्वसामान्य माणसाच्या रेल्वेस्थानकाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
ज्यांना यापूर्वी देशातील कुठल्याही दहशतवादी कृत्याची झळ पोचली नव्हती, ज्यांना स्फोटात मरणाऱ्या भारतीयांच्या रक्ताची किंमत नव्हती अशा उच्चभ्रूंचे दु:ख ग्लोरीफाय करण्यात धन्यता मानली. ही सर्व उदाहरणे "त्यांचाच' खुनी हात परत धरत गेलो, याची साक्ष देतात.
"बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो...'
हे समाजवादी स्वप्नरंजन वास्तवात परावर्तित करायचे असेल तर भारतीय संस्कृतीशी ओळख करून घ्यावी लागेल. आपल्या मूळांचा शोध घ्यावा लुागेल. (बॅक टू रुटस्‌) असा प्रयत्नपूर्वक शोध अरुणाचल प्रदेशातील तरुणांनी नुकताच घेतला आहे. चार हजार तरुण-तरुणींनी स्वधर्म युवा महोत्सवात भाग घेतला होता. (इंडिजीनस्‌ युथ फेस्टिव्हल) अरुणाचलात 1952 साली पहिले चर्च उभारले गेले आहे. त्यानंतर धर्मांतराला सुरुवात झाली. 1980 नंतर ख्रिस्ती धर्मप्रसारक आक्रमक झाले आणि त्यांनी अरुणाचलात थैमान घातले. याच्याविरोधात 1986 साली पासीघाट येथे तालुम रुकबो यांनी "दोन्थी पोलो येलम केवांग' या नावाने साकार उपासना पद्धती सुरू केली. दोन्थी पोलो याचा अर्थ सूर्यचंद्र असा आहे. दद्य जिल्ह्यात 450पेक्षा अधिक ठिकाणी गांगीर (आदि), न्योदर नाम्लो (न्यीटी), मेदर नेलो (आपातामी), इंगतोंगहोम (तांगसा, तुक्सा, नॉवटे) अशा विविध भाषांतून उपक्रम सुरू झाला आहे. राज्यात विविध जनजातींच्या स्वधर्म संघटनात समन्वय असावा यासाठी "इंडिजीनस फेथ ऍन्ड कल्चरल सोसायटी ऑफ अरुणाचल प्रदेश' ही समिती कार्यरत आहे. या समितीतर्फे युवा महोत्सव होतो. यंदाच्या युवा महोत्सवात अरुणाचल राज्यातील 15 जिल्ह्यांतील 16 जनजातींच्या युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवात स्वधर्म रक्षणात युवकांचा सहभाग, बांग्लादेशी घुसखोरी, चीनचे छुपे आक्रमण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. समाजावरील संकट, राष्ट्रावरील आक्रमणाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्वधर्म रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा संकल्प झाला. धर्मांतरांवर कायद्याने बंदी आणण्याची मागणी केली गेली. भारतीय संस्कृतीच्या शत्रूंना इशारा देण्यात आला. अरुणाचलातील तरुणाईने प्रतिकूल परिस्थितीतही आपला शत्रू ओळखला आहे. दहशतवादाविरुद्ध साक्षरता अभियान सुरू केलेले आहे. अज्ञानाचे आवरण काढून राष्ट्रीय विचारांचे ज्ञानदीप प्रज्वलित केले आहेत.
वाचकहो, आता आपण निरक्षर, अडाणी राहणार की साक्षर होऊन शत्रूची ओळख करून घेणार ? हा कळीचा मुद्दा आहे.
mak2244@gmail.com
9869296109

Monday, January 19, 2009

पत्रकारांची कार्यशाळा


सोलापुरातील शिवस्मारक येथे शनिवार, दि। 17 जानेवारी 2009 रोजी "पत्रकारितेतील नवे प्रवाह' या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. पत्रकारांमध्ये उत्साह आणि स्फूर्ती आणणारा हा उपक्रम ठरला।
पत्रकार प्रशिक्षित असतो तेव्हा तो अधिक कुशलतेने आपले दायित्व पार पाडू शकतो, परंतु विडंबना तेव्हा होते, जेव्हा पत्रकार जुना होतो. मात्र, तो अप्रशिक्षित राहतो. जुना असल्यामुळे त्याला वाटू लागते की, आपल्याला सारं काही येतं. माहिती आणि अनुभवाच्या स्तरावर ते खरंही असतं, परंतु व्यवस्थित प्रशिक्षण आणि वैचारिक स्पष्टतेअभावी त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक साचलेपण येऊ लागतं. अशा वेळी प्रवाही न राहलेल्या साचल्या पाण्याचे जे होते, ते पत्रकाराचे होणे अगदी स्वाभाविकच आहे म्हणूनच प्रशिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते।
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची धुरा दशरथ वडतिले यांच्याकडे आल्यापासून सोलापुरातील पत्रकारितेने जणू कात टाकली आहे. सोलापुरातील पत्रकारांमध्ये संघभाव निर्माण झाला आहे. एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आत्मविश्वासाला गुणवत्तेची जोड असेल तर विधायकता येते, हे ध्यानात घेऊन संघातर्फे खास पत्रकारांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सोलापूर विद्यापीठ जनसंज्ञापन विभाग आणि पत्रकार संघाने आयोजिलेली शनिवारची कार्यशाळा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरली।
शहर-जिल्ह्यातील पत्रकारांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, जळगाव, लातूर, धाराशिव, धुळे, नगर, कोल्हापूर आदी भागातील पत्रकारितेचे विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दीर्घकाळ प्रभावीपणे काम करीत असलेले डॉ. समीरण वाळवेकर व प्रसाद काथे यांच्या सत्रांनी कार्यशाळेला एका उंचीवर नेऊन ठेवले. पत्रकारितेत नव्याने येऊ घातलेल्या संकल्पना सुलभपणे सांगण्याची हातोटी समीरण यांच्याकडे आहे।
पत्रकारांना घडविण्याच्या प्रक्रियेत बदल होणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना केवळ कालबाह्य अभ्यासक्रम शिकविणे उचित होणार नाही. सगळ्याच वाहिन्या या उदात्त ध्येयाने नाही, तर व्यावसायिक उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत. आता माध्यमकर्मींना तंत्रज्ञानाची भाषा समजून घ्यावीच लागेल. मुद्रित क्षेत्रातील अनुभवी मंडळी इलेक्ट्रानिक माध्यमांत येण्यास तयार नाहीत, हे दुर्दैवी चित्र आहे. विद्यापीठांनी पत्रकारिता अभ्यासक्रम अद्ययावत केला पाहिजे, असे विचार वाळवेकर यांनी मांडले।
दुर्दैवाने इलेक्ट्रानिक मिडियाला समर्पित असा अभ्यासक्रम कोठेही शिकविण्यात येत नाही. दीड ते दोन लाख रूपये शुल्क भरून सर्वसामान्य विद्यार्थी या कोर्सेससाठी जाणे कठीण आहे. त्यामुळे या क्षेत्रात कच्च्या मालाची अर्थात नवोदित क्षमतावान पत्रकारांची निकड जाणवते. लोकांनी आपली निवड सुधारायला हवी. माध्यमांवर सरकारने नाही तर जनतेने अंकुश ठेवायला हवा, असे विचार प्रसाद काथे यांनी व्यक्त केले. सोलापुरातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी अध्यक्षस्थान भूषविले. अध्यक्षीय भाषणांतून काही प्रमाणात पत्रकारांमध्ये ध्येयवाद जागविण्याचा प्रयत्न झाला।
संतोष पवार, प्रवीण सकपाळ, दीपक होमकर सारख्या तरुण पत्रकारांनी कार्यशाळेतील सत्रांमध्ये समन्वयकाची भूमिका यशस्वीपणे बजावली. पत्रकारितेत येणाऱ्या नव्या प्रवाहाशी कसे जुळवून घ्यायचे आणि एक पत्रकार म्हणून स्वत:चा विकास कसा करायचा याबद्दलची शिदोरी साऱ्या तरुण पत्रकारांना या कार्यशाळेतून निश्चितच मिळाली.कार्यकुशलता अंगी बाणवण्याच्या दृष्टीने कार्यशाळा यशस्वी झाली, असा भाव बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, परंतु कार्यशाळेत वैचारिक स्पष्टतेच्या अंगाने विचारमंथन झाले असते तर कार्यशाळा आणखी सार्थक ठरली असती असे वाटते।
26/11 च्या घटनेबद्दल बरीच चर्चा झाली. या घटनेत सरकार कसे निष्क्रिय होते. प्रशासकीय स्तरावर ताळमेळ कसा नव्हता. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा बेजबाबदारपणा आणि त्यामुळे त्यांची गच्छंती कशी झाली? याची चर्चा झाली. मात्र, या देशात अतिरेकी हल्ले का होतात? जिहादी मानसिकतेचे मूळ कोठे आहे? राज्यकर्ते गठ्ठा मतांकरिता दहशतवादाला पाठिशी कसे घालतात? वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार राज्यकर्त्यांच्या या ढोंगी धर्मनिरपेक्षतेकडे दुर्लक्ष का करतात? घटनेनुसार सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारण्यात आले असतानाही गोरगरीब हिंदूंचे धर्मांतरण करण्यात येते, यामुळे समाजात असंतोष निर्माण होतो. अशावेळी अल्पसंख्यकांच्या बाजूनेच बातमीदारी का करण्यात येते? यामागे परकीय षडयंत्र असते का? अशा या देशाला छळणाऱ्या महत्त्वपूर्ण विषयांबाबत पत्रकार म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? याचा ऊहापोह झाला असता, तर यशस्वी झालेली ही कार्यशाळा आणखी परिपूर्ण यशस्वी झाली असती, असे वाटते।

१९ जनुअरी २००९ पान ४ , तरुण भारत। सोलापुर

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी