Thursday, May 28, 2020

भारत आता सावरकर मार्गाने पुढे जातोय; गांधी-नेहरूंचा मार्ग केंव्हाच मागे सुटलाय

चीन, पाकिस्तानसाठी 
गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी 
याची जाण आजच्या नेतृत्वात आहे. 
हा नवा भारत आहे. 
देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे 
अन् जे जे घातक ते विषवत. 
कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही. 
देश आहे म्हणून आपण आहोत. 
हा सावरकर विचार आहे. 
हा शाश्वत विचार आहे. 
तारणारा आहे.  
सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.

२७ मे - नेहरू पुण्यतिथी
२८ मे - सावरकर जयंती

अनेक विद्वानांनी यानिमित्ताने या दोन्ही नेत्यांची तुलना करण्याचा प्रयत्न आपापल्या आउटलेटवरून केला.

मीही स्वतःला असे करण्यापासून आवरणार नाही. मी लहान असताना मला नेहरुही आवडायचे अन् सावरकरही.

पुढे वाचन वाढत गेलं.
त्यातून माझी स्वतः ची मते बनत गेली.

माझ्या मते -

"नेहरू आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांमुळे आपले निर्णय चुकत गेले. परिणामी आपल्या मातृभूमीचे तुकडे पडले. काँग्रेसने फाळणी होऊ देणार नाही असे देशाला सांगितले. पण ऐनवेळी फाळणी स्वीकारली.  देशाचा विश्वासघात केला. दंगली घडवून ब्लॅकमेल करून भारताच्या भूमीवर आपण पाकिस्तान बनवू शकतो याची आणि काँग्रेसचे नेते भित्रे, पुळचट अन् नेभळट असल्याची जिनाला खात्री होती.

भारताच्या भूमीवर पाकिस्तान उगवले ते आपले पाप आहे, याची लाज आणि खंत काँग्रेसला कधीच वाटली नाही. उलट, येथील हिंदू, हिंदू संघटना यांना बदनाम कसे करता येईल, हेच धोरण रेटून चालवले. शालेय अभ्यासक्रमात काँग्रेसला अनुकूल तेवढेच शिकवत राहिले.

धर्माच्या नावावर मुस्लिमांसाठी पाकिस्तान, बांगलादेश रूपात या देशाची भूमी तोडून देण्यात आली. तरी लांगूलचालन करणे काँग्रेसने सोडले नाही. काँग्रेस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६ मध्ये हद्द केली. जाहीर रित्या सांगितले की, या देशाच्या साधनसंपत्तीवर पाहिलं हक्क मुसलमानांचा आहे. बाटला हाऊस येथे जिहादी अतिरेकी मारले गेले म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रडू कोसळले.

थोडक्यात, काँग्रेसने देशभक्त मुस्लीम नेतृत्व कधीच पुढे आणले नाही. तोंडी सेक्युलर तत्वाचा जप करत प्रत्यक्षात मात्र कट्टरवादी, जिहादी गटांना बळ पुरवले. इतिहास लेखन, पाठ्यपुस्तक आणि इतर माध्यमातून वैचारिक संभ्रमाला खतपाणी घातले. या देशाचा तेजोभंग होत राहील अशी नीती राबवली. स्वार्थ आणि काँग्रेस हे १९२० नंतर
 जणू समानार्थी बनले.

स्वतः चा स्तोम माजवत राहणे हे काैंग्रेसी नेत्यांचे व्यवच्छेदक लक्षण. माझ्या मते याला गांधीजी अपवाद नव्हते. अहिंसासारख्या व्यक्तिगत जीवनातील मूल्यांना ते देशावर लादू पाहत होते.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसचे असे दोन पंतप्रधान होऊन गेले ज्यांनी स्वतःलाच "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित केलं -
१. जवाहरलाल नेहरू (१९५५)
२. इंदिरा गांधी (१९७१).

हे दोन्ही नेते निश्चितच महान होते. पण म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उणीव दुर्लक्षित करता येणार नाही. कारण या बाबींमुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. यांनी स्वतः लाच पुरस्कार कसे दिले? त्यांना संकोच वाटला नाही का ? असे प्रश्न पडतात... असं कसं होऊ शकतं, याचं आश्चर्य वाटतं.

समजा, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ला भारतरत्न पुरस्कार द्यायचे ठरवले तर किती हलकल्लोळ माजेल. मीडियात कशा प्रतिक्रिया उमटतील ?
१९५५ आणि १९७१ मध्ये स्वतः लाच पुरस्कार देऊ केले म्हणून मीडियातून टीका टीपणी झाली होती का ? याचे संदर्भ मिळत नाहीत.

आता या पार्श्वभूमीवर
वि. दा. सावरकर यांचे जीवन पाहा.

स्वार्थाचा लवलेश नाही.
विचारांमध्ये स्पष्टता आहे.
देशासमोरील खऱ्या आव्हानांची जाणिव असल्यानेच तरुणांना सैन्य भरतीसाठी त्यांनी चळवळ चालवली. यामुळे सैन्यातील हिंदूं सैनिक प्रमाण २५ टक्क्यावरून ६७ टक्याच्या पुढे गेले.
सावरकर यांनी हे एकच कार्य केले असते तरी ते सर्व काँग्रेस नेत्यांच्या एकत्रित कार्यापेक्षा ते महान गणले गेले असते.

सैन्यातील तरुणांची भरती झाली नसती तर कदाचित खंडित भारताचा आजचा नकाशा आता आहे त्याहून खूप आक्रसलेला असला असता.

सावरकर आणि त्याग हे समानार्थी शब्द आहेत. सावरकर आणि तप हे एकच शब्द आहेत.
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
हे तत्त्व भारतीयांनी स्वीकारली असती तर मातृभूमीची फाळणी झाली नसती. दंगलखोर आणि हा देश दार उल इस्लाम करण्याची मनसुबे जोपासणाऱ्या जिहादी शक्ती यांना पायबंद घालण्यात अपयश आल्यानेच या भारतभूमीवर पाकिस्तान उगवला.
देश तोडू पाहणाऱ्या शक्तींना वेसण घालण्याची क्षमता केवळ सावरकर विचारात आहे; गांधी आणि नेहरूंचे विचार फेल ठरले आहेत. देशाने याचा अनुभव घेतला आहे. त्याची फार मोठी किंमत दिली आहे.

आपण सावरकर विचाराने चाललो तर एक दिवस सांस्कृतिक गुलामीत गेलेले आपले बांधवही पुन्हा आपल्या पूर्वजांची संस्कृती अभिमानाने अंगीकार करतील. राष्ट्रांच्या इतिहासात शे - पाचशे वर्षे फार नाहीत. शक्ती आणि संघटन याची कास धरू तर एक दिवस पवित्र सिंधू नदी पुन्हा या भूमीचा भाग होईल.

सुदैवाने आज देशाचे नेतृत्व अशा लोकांच्या हाती आहे की जे या देशाच्या महापुरुषांच्या मध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांच्यासाठी कोणीच अस्पृश्य नाहीत.

त्यांच्यासाठी महात्मा गांधी वंदनीय आहेत.
नेहरू महापुरुष आहेत.
आंबेडकर, सावरकर प्रत: स्मरणीय आहेत.

गांधींची कोणती मूल्ये आज घ्यायची
अन् सावरकर, आंबेडकरांची कोणते विचार अमलात आणायचे याची योग्य जाण या नेत्यांमध्ये आहे.

चीन, पाकिस्तानसाठी गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी याची जाण आजच्या नेतृत्वात आहे.
हा नवा भारत आहे.
देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे अन् जे जे घातक ते विषवत.
कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही.
देश आहे म्हणून आपण आहोत.
हा सावरकर विचार आहे.
हा शाश्वत विचार आहे.
तारणारा आहे. 
सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.

भारत यापुढे
सावरकरांच्या मार्गानेच चालेल...
सावरकर हे
काळाच्या पुढे शंभर वर्षे असतात...
सावरकरांनी जे १०० वर्षांपूर्वी सांगितले ते या देशातील लोकांना आता पूर्णपणे समजले आहे.
तसे नसते तर या देशातील लकांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सरकारला इतक्या तगड्या बहुमताने सत्ता दिली नसती.

तगड्या बहुमतमुळे आणि सावरकर नितीमुळेच तर ३७० हटले. काश्मीर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले. सैन्यात आत्मविश्वास वाढला. सर्जिकल स्ट्राईक होऊ लागले.

असो. सर्वांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त शुभेच्छा. सावरकर अभ्यास करण्यासाठी अनेक तरुणांनी पुढे यावे हे नम्र आवाहन.

- सिद्धाराम भै. पाटील

Monday, May 25, 2020

भारतमातेच्या मुर्तीमुळे कन्याकुमारीत म्हणे "धार्मिक भावना" दुखावल्या


कन्याकुमारी जिल्ह्यातील पुलियुर या छोट्याशा गावातील ही घटना पहा.
कन्याकुमारी जिल्ह्यात ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या आहे 46.85 टक्के आणि हिंदू 48.65 टक्के. उर्वरित मुस्लिम.

200 वर्षे प्राचीन असलेल्या इसक्की अम्मन (दुर्गादेवी) मंदिराच्या भूमीवर काही दिवसांपूर्वी भारत मातेची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. हे मंदिर हिंदु व्यक्तीच्या मालकीचे आहे. एका हिंदू मजुराने पुढाकार घेऊन भारत मातेची ही मूर्ती बसवली.

मंदिराजवळ राहणाऱ्या काही ख्रिस्ती लोकांनी पोलिसात तक्रार दिली की यामुळे त्यांच्या "धार्मिक भावना" दुखावल्या. पोलिसांनी लगेच दखल घेतली. ही मूर्ती काढून टाका असे तेथील गावकऱ्यांना पीएसआयने 20 मे रोजी सांगितले. इतकेच नाही तत्परता दाखवत 21 मे रोजी पोलिसांनी निळ्या कापडाने भारत मातेची प्रतिमा झाकून टाकली.

RSS, BJP आणि हिंदू मुन्नानी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली. प्रकरण मुख्यमंत्री यांच्या पर्यंत नेले. आणि भारत मातेची प्रतिमा मुक्त केली.

जेथे हिंदू समाज हा बहुसंख्य असतो तेथे अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उभारण्यास कधीही विरोध होत नाही. सर्व धर्म सत्य आहेत. ईश्वर एक आहे. तो सर्वत्र आहे. कणाकणात आहे. चराचरात आहे. आणि तो विविध रूपातून व्यक्त होतो, अशी हिंदूंची श्रद्धा असते. त्यामुळे हिंदू कधीही इतरांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
परंतु
विस्तारवादी, एकांतिक धर्मीय व्यवस्थेचे असे नसते. "माझाच धर्म सत्य. माझाच देव सत्य. इतर देव खोटे खोटे. असत्य आहेत. जगातील इतर धर्मीय सारे माझ्याच धर्मात ओढून आणले पाहिजेत." यासाठी एक यंत्रणा काम करत असते. ही यंत्रणा देशाची सीमा मानत नाही.

धर्मांतर, जिहाद, क्रुसेड ... असे काहीही करून जग माझ्याच धर्माचे झाले पाहिजे असा धर्मवेड प्रबळ असतो. राष्ट्रवाद त्यांच्या मार्गातील काटा असतो. भारत मातेची प्रतिमा त्यांच्यासाठी धार्मिक भावना दुखावणारे असते.  "धर्मांतरमुळे राष्ट्रांतर घडते" ते असे.

महत्वाचे -
पोलिस यंत्रणा किंवा कोणतीही यंत्रणा कशी काम करते, हे समजून घेतले पाहिजे. कोणीतरी चार जण एकत्र येऊन कोणाविरुद्ध तरी तक्रार देतात आणि पोलिस कामाला लागतात. धार्मिक भावना दुखावल्या ची तक्रार असेल तर पोलिस यंत्रणा हळवी होते. अशावेळी कायद्याची थोडीफार जाण असलेली संघटित शक्ती गरजेची असते. अन्यथा चूक आपली नसली तरी "आपली भारतमाता झाकून" आपल्यावरच अरेरावी केली जाते. सत्याचा जय तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा सत्याला सामर्थ्याची जोड असते.
अन्यथा
कधी काळी हिंदू असलेला अफगाणिस्तान भारताच्या सीमेबाहेर जातो. १९४७ पर्यंत भारताचा अविभाज्य भाग असलेली भूमी पाकिस्तान, बांगलादेश बनते.

जाता जाता...
1. काही वर्षांपूर्वी कन्याकुमारी जिल्ह्याचे नाव बदलून "कन्नी मेरी" (मेरी म्हणजे येशू ख्रिस्ताची आई) असे नामकरण करण्याची मागणी आणि आंदोलन झाले होते.
2. कन्याकुमारी येथील समुद्रातील श्रीपाद शिला येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभारणी करण्यास एका गटाने मोठा विरोध केला होता. हे सेंट झेवियर्स रॉक आहे. येथे विवेकानंद स्मारक होऊ देणार नाही, अशी त्यांची भूमिका होती.
3. या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही हिंदूंना आपल्याच जागेत एखादे मंदिर उभे करायचे असेल तर ते इतके सोपे नाही.
यासंबंधीच्या काही बातम्या अधून मधून येत असतात. काही बातम्या मध्येच विरून जातात. बातमी मूल्य या निकषात अशा बातम्यांना कोण विचारतं ?

- सिद्धाराम भै. पाटील

Sunday, May 3, 2020

हमीद दाभोलकर, हमीद दलवाई आणि अंनिस


हमीद दलवाई यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने हमीद दाभोलकर यांनी स्वतःचा एक जुना लेख आपल्या fb वर शेअर केला आहे. (https://m.facebook.com/story.php?story_fbid=790338144829584&id=100015602171173) हा लेख खूप प्रभावी अन् विचार करायला लावणारा आहे.
त्यातील एका मुद्द्याने मला अस्वस्थ केले आहे. (तो मुद्दा येथे स्क्रीन शॉट ने जोडला आहे.)
नाव हमीद अन् आडनाव दाभोलकर यामुळे हमीद दाभोलकर यांना शाळेत मुले लांड्या म्हणून चिडवू लागली. का चिडवत असतील तर हमीद दा. यांना वाटतं की, "चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवाजी व अफजल खान लढाई वर्णन आहे. त्यामुळेच हे घडले असावे."
हा गंभीर मुद्दा आहे. अनेक प्रश्न पुढे येतात..
१. शिवाजी - अफजल खान लढाई वर्णनात कोठेही लांड्या हा शब्द आलेला नाही. किंवा अफजल खानशी संबंधित हमीद नावाची व्यक्तिरेखा सुद्धा नाही. मग मुले चिडवण्याचे कारण शिवाजी - अफजल खान लढाई असेल का ?
२. शिवाजी - अफजल लढाई वर्णन हे कारण असेल तर मग हा धडा अभ्यासक्रमात असू नये असे सुचवायचे आहे का ?
३. रोज बातम्यांमध्ये कुठे हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ये तोयबा, जैश ए मोहम्मद, तालिबान, लादेन, दानिश, इंडियन मुजाहिद्दीन, अल कायदा, कसाब, जिना, अफजल गुरू, याकुब वगैरे अतिरेकी, जिहादी यांचा उल्लेख येत असतो. मुलांच्या पाहण्यात, वाचनात या बाबी येतातच. मग केवळ चौथीचा धडा वगळल्याने भागेल का?
४. थोर नेते शरदचंद्र पवार सुचवतात त्याप्रमाणे तब्लीगी, जिहादी, अतिरेकी यांच्या बातम्याही प्रसिध्द करायच्या नाहीत, अशी मागणीही होऊ शकते. समजा ही मागणीसुद्धा मान्य झाली तर मूळ प्रश्न सुटणार आहे का ? (मूळ प्रश्न हिंदू - मुस्लीम एकता कशी नांदेल हा आहे.)
५. थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम हे सर्व भारतीयांना वंदनीय आहेत. त्यांचे नाव उच्चारताना कोणीही विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही हमीद यांना चिडवल त्या शब्दाचा वापर करत नाहीत, हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे.

त्यामुळे शिवाजी - अफजल खान लढाई वर्णन ही अडचण असू शकत नाही. बातम्यांतून पुन्हा पुन्हा पुढे येणारी अतिरेक्यांची नावेही समस्या असणार नाहीत. समाजापुढे डॉ. APJ कलाम यांच्यासारखी चरित्रे आणावी लागतील आणि त्याच वेळी अफजल खान, अफजल गुरू अन् कसाब यासारख्या व्यक्तींची गत काय होते हेही पुढे आणावे लागेल.

वाईट काम करेल त्याला दंडित केले जाते आणि चांगले काम केल्यास गौरव होतो. लोक डोक्यावर घेतात. येथे त्याचे नाव कोणत्या धर्मातील आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, याला काही किंमत नसते. हे विचार नव्या पिढीवर बिंबवले पाहिजे. यासाठी अंनिस मोठी भूमिका निभावू शकते. हमीद दलवाई यांना हेच अपेक्षित असावे.
परंतु, धार्मिक भेदाभेद वाढू नये म्हणून अफजल खान वध शिकवू नका, अतिरेकी काही केले तरी त्यावर बातम्या दाखवू नका... गप्प राहा.. डॉ. APJ यांच्या सारख्या महान व्यक्तीचा गौरव टाळा... अशी भूमिका अंनिस घेणार असेल तर पदरी फार काही पडणार नाही.

- सिद्धाराम

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी