Saturday, June 26, 2010

डॉक्टर साहेब,

हेही समजून घ्या थोडं...
अक्कलकोट येथील शिवपुरीत शुक्रवार दि. 25 जून ते 5 जुलै या कालावधीत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर सुरू आहे. त्यानिमित्ताने...
मी काही वैद्यक क्षेत्रातला जाणकार नाही. डॉक्टर मंडळींना उपदेशाचे डोस द्यावेत असाही माझा विचार नाही. तरीही मला आलेल्या अनुभवामुळे हा लेख लिहित आहे.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी संपादकीय पानाचे काम आटोपले होते म्हणून कार्यालयातच वृत्तपत्रे चाळीत बसलो होतो. घरून लहान भावाचा फोन आला. तो घाबरलेला होता. "बाबाग्‌ यान्‌ अरे आग्याद्‌...' म्हणत तो सांगू लागला. माझ्या वडिलांना (वय साधारण 58) शेतात काम करताना अचानक पाठीत दुखायला लागले होते. तीव्र वेदना होत होत्या.
प्रकरण गंभीर असल्याचे ध्यानात आले. उपचारासाठी त्वरित शहरात आणणे आवश्यक होते. सोलापूरपासून केवळ 18 किलोमीटरवर शिर्पनहळ्ळी हे गाव असले तरी गाव आडवळणी आहे. त्यामुळे वाहनांची सोय नाही. मी वृत्तपत्रांत असलो तरी आजही माझ्या गावी रोजची वृत्तपत्रं येत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर गावाकडून रुग्णाला शहरात आणणे अवघड होते. त्यामुळे सोलापुरातूनच रिक्षा केली.
घरी गेल्यानंतर ध्यानात आले की, वडिलांना काहीच हालचाल करता येत नाहीय. बसलेल्या स्थितीतून उठायचे म्हटले तरी पाठीत जीवघेणी कळ. पाठीच्या मणक्याला इजा झाली असावी, असे वाटले. त्यांना आहे त्या स्थितीतून हळूवारपणे उचलून रिक्षात बसविले. पाय थोडे जरी हलले तरी तीव्र वेदना होत होत्या. कसे -बसे सोलापुरात आणले.
शहरातील एका नामवंत अस्थिरोग तज्ज्ञाच्या दवाखान्यात ऍडमिट केले. उपचार सुरू झाले. "एक्स' -रे आणि अन्य तपासण्या झाल्या. औषधंही सुरू होती. विशिष्ट प्रकारच्या उपकरणाने पाठीच्या मणक्यांना स्टिम्युलेशनही देण्यात येत होते. 6 दिवस झाले तरी परिणाम काही जाणवत नव्हता. उपचार खर्चाचा आलेख मात्र प्रामाणिकपणे वाढत होता. कधीही दवाखान्याची पायरी न चढलेल्या माझ्या वडिलांनी धसकाच घेतला होता. जेवण केले की पुढील गोष्टींच्या कटकटी सुरू होतील, असा विचार करून वडील केवळ दोन-चार बिस्किटांवर दिवस ढकलत होते. मी पुन्हा पुन्हा डॉक्टरांना विचारित होतो की, आजार कमी व्हायला किती दिवस लागतील? नेमका कालावधी सांगण्यास डॉक्टरही असमर्थ होते. आणखी एक-दोन आठवडे तरी काही सांगू शकत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे होते.
स्थिती गंभीर होत चालली होती. काय करावे सुचत नव्हते. आमचे ज्येष्ठ सहकारी नाना बसाटे यांनी याचवेळी अक्कलकोटच्या शिवपुरी येथे सुरू असलेल्या कायरोप्रॅक्टिक शिबिराची माहिती दिली आणि वडिलांना तिकडे नेण्यासाठी आग्रहही धरला. थोडे हायसे वाटले, परंतु दवाखान्यातून डिस्चार्ज घेण्याचे धाडस होत नव्हते. समजा शिवपुरीच्या शिबिरात नेले आणि काही उपयोग झाला नाही तर काय करायचे, अशी मनात भीती होती. हो नाही करत अखेर शिवपुरीला न्यायचे असा कौल मनाने दिला.
वडिलांना शिवपुरीच्या शिबिरात नेणार असल्याचे डॉक्टरांना सांगितले. हा शिकला सवरलेला मुलगा मूर्खासारखा का विचार करीत आहे, असा भाव डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे वाचता आला. शिबिरात कमी झाले नाही तर पुन्हा आणा काही हरकत नाही, असे डॉक्टर म्हणाले. अक्कलकोटला कसे न्यावे असा प्रश्न होता. विवेकानंद केंद्राचे बसूदादा यांच्या कारने प्रश्न सोडवला. नाना यांना सोबत घेऊन वडिलांना शिवपुरीस नेले.
मी पहिल्यांदाच शिवपुरीत गेलेलो. 4 ते 5 हजार लोकांची रांग पाहिली. आता आमचा नंबर कधी येणार असा विचार करीत "कशाला आलो इकडे', असे क्षणभर वाटले. पत्रकारांसाठी असलेल्या सुविधेअंतर्गत आम्हाला बोलावण्यात आले. नाना, मी आणि आणखी दोघे असे मिळून मोटारीतून उचलून वडिलांना समोरच्या टेबलवर झोपवले. कायरोप्रॅक्टिक उपचार करणाऱ्या तिथल्या अमेरिकन व्यक्तीने रिपोर्ट पाहिले आणि काही जुजबी माहिती विचारली. वडिलांना पालथे झोपविले. कमरेजवळ एका विशिष्ट ठिकाणी हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी जोरात दाब दिला. "कट्‌' असा आवाज झाला. त्यावेळी एकदम वडील विव्हळले. दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तीने वडिलांना उठायला सांगितले. काय आश्चर्य वडील उठून चालू लागले...
पाचच मिनिटांपूर्वी ज्या माणसाला उचलून आणले तो चालत येतोय हे पाहून तेथील सारेच अचंबित झाले. बघता-बघता आमच्या भोवताली दीड-दोनशे माणसं जमली. साऱ्यांनाच कौतुक वाटत होतं. माझ्या मनाची अवस्था मला शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. मला असा आनंद याआधी कधी झाल्याचे आठवत नाही.
तिथून थोड्यावेळाने आम्ही निघालो. चप्पळगाव-धोत्री मार्गे माझं गाव 25 किलोमिटर आहे. घरी आलो. वडील जणु काही झाले नाही असेच चालत-फिरत होते. आनंदाने संध्याकाळी सोलापूरला परतलो आणि डॉक्टर साहेबांना फोन केला. वडिलांचे दुखणे शिवपुरीच्या शिबिरात बरे झाल्याचे त्यांना सांगून टाकले. डॉक्टर साहेब म्हणाले, "ठीक आहे'. त्यांनी फोन ठेवून दिला.
मला खूप वाईट वाटले. मी उत्साहात होतो. डॉक्टरांना किती सांगू असं झालं होतं, परंतु डॉक्टर साहेबांना काहीही जाणून घ्यावं वाटलं नाही. आज वडिला शेतातली कुळव, पेरणी, बैलांना चारा-पाणी सारी कामे करतात.
ज्या उपचारपद्धतीने रुग्णाला दोनच मिनिटांत बरे केले, ती पद्धती अन्य उपचारपद्धतीच्या डॉक्टरांनी का समजून घेऊ नये ? असे काय तंत्र आहे की, ज्यामुळे त्वरित रुग्णाला आराम मिळाला, हे समजून घेणे चुकीचे आहे की काय? यामुळे संबंधित डॉक्टरच्या ज्ञानात भरच पडेल की नाही? येथे अहंकार का आडवा यावा? आपल्याला माहीत नसलेल्या काही गोष्टी सत्य असू शकतात असे डाक्टर मंडळींना का वाटू नये ?
मध्यंतरी ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर यांना नागीण या आजाराचा त्रास सुरू झाला होता. त्याचा प्रादुर्भाव डोळ्यात होऊन डोळ्यास दिसणे कमी होऊ लागले. शहरातील नामवंत डॉक्टरांकडून उपचार करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून सोलापूरजवळील कुरूल येथे जडीबुटी देणाऱ्या सामान्य शेतकऱ्याकडे सर गेले आणि आश्चर्य म्हणजे नागिणवर उतारा पडला. डोळाही पूर्ण बरा झाला.
आजही गावागावांत अनेक आजारांवर पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात. हे खरे आहे की, उपाचार करणारी मंडळी बऱ्याचदा अज्ञानी असतात. कधी कधी करण्यात येणारे उपचार चुकीचे असतात. परंतु म्हणून पारंपरिक ज्ञानात काहीच तथ्य नाही असे म्हणत उडवून लावणे हे काही मोकळ्या शास्त्रीय मनाचे लक्षण नाही. पारंपरिक उपचार पद्धतींचा आधुनिक डॉक्टर मंडळींनी अभ्यास केला पाहिजे. उपयुक्त असेल त्याचा मोकळ्या मनाने स्वीकारही केला पाहिजे. आपल्या सिलॅबसच्या बाहेरही काही मोलाचे ज्ञान असू शकते याचे भान असू द्यावे.
थोडक्यात सांगायचे तर ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, कायरो आणि आणखी किती पद्धती असतील... त्याच्याशी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फारसं देणं-घेणं नसतं. रुग्ण बरा व्हावा हाच एकमेव विचार असतो. आपल्या उपचार पद्धतीच्या बाहेरील एखादा उपचार रुग्णांवर प्रभावी ठरत असेल तर खास करून ऍलोपॅथीवाल्या डॉक्टरांनी जिज्ञासूपणाने आणि मोठ्या मनाने ती पद्धती समजून घेतली पाहिजे.
www.psiddharam.blogspot.com
mobile : 9325306283

5 comments:

  1. तुम्ही म्हणता हे खरेच आहे. मलाही अशी अमुभूती बर्याच वेळा आली आहे.डॉक्टरी पेशा हा आत्ता पैश्यासाठी झाला आहे. मी म्हणत नाही कि सर्वच सारखे असतात.पण गरिबांसाठी लोकांसाठी जगणारे फार कमी आहेत.

    ReplyDelete
  2. Anonymous26.6.10

    डॉक्टराना इतर उपचारपद्धतींचा विचार केल्यास आपण स्वीकारलेल्या अलोपेथिक गृहीताना तिलांजली द्यावी लागून आपण करीत असलेले अलोपेथिक उपचार निरुपयोगी ठरतील अशी भीती वाटते हे याचे कारण असावे.

    ReplyDelete
  3. sangeeta jadhaw27.6.10

    mi panajit asate. aajach solapurat aale ani aapala lekh waachala. mi manane khambeer bai ahe, pan mazya dolyat ashru ale. tumhala phone karawe watale, mhanun phone kartey.

    ReplyDelete
  4. dr. sammed shah27.6.10

    namaste mi indapur yethe asto. mi doctor ahe. aamachya ghari chaughe doctor aahot. aamachya ghratil 36 age asalelya natewaikachya manakyacha problem ahe. sarv upachar kele pan upyog nahi. shivpurit kami hoil ashi aaha watate.

    ReplyDelete
  5. mushid khan, oosmanabaad27.6.10

    lekh waachala. mazya aaila khup tras ahe. chalayala tras hoto. ratra ratrabhar ti zopu shakat nahi... udya mi tila neto shipurila

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी