Monday, January 19, 2009

पत्रकारांची कार्यशाळा


सोलापुरातील शिवस्मारक येथे शनिवार, दि। 17 जानेवारी 2009 रोजी "पत्रकारितेतील नवे प्रवाह' या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. पत्रकारांमध्ये उत्साह आणि स्फूर्ती आणणारा हा उपक्रम ठरला।
पत्रकार प्रशिक्षित असतो तेव्हा तो अधिक कुशलतेने आपले दायित्व पार पाडू शकतो, परंतु विडंबना तेव्हा होते, जेव्हा पत्रकार जुना होतो. मात्र, तो अप्रशिक्षित राहतो. जुना असल्यामुळे त्याला वाटू लागते की, आपल्याला सारं काही येतं. माहिती आणि अनुभवाच्या स्तरावर ते खरंही असतं, परंतु व्यवस्थित प्रशिक्षण आणि वैचारिक स्पष्टतेअभावी त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक साचलेपण येऊ लागतं. अशा वेळी प्रवाही न राहलेल्या साचल्या पाण्याचे जे होते, ते पत्रकाराचे होणे अगदी स्वाभाविकच आहे म्हणूनच प्रशिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते।
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची धुरा दशरथ वडतिले यांच्याकडे आल्यापासून सोलापुरातील पत्रकारितेने जणू कात टाकली आहे. सोलापुरातील पत्रकारांमध्ये संघभाव निर्माण झाला आहे. एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आत्मविश्वासाला गुणवत्तेची जोड असेल तर विधायकता येते, हे ध्यानात घेऊन संघातर्फे खास पत्रकारांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सोलापूर विद्यापीठ जनसंज्ञापन विभाग आणि पत्रकार संघाने आयोजिलेली शनिवारची कार्यशाळा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरली।
शहर-जिल्ह्यातील पत्रकारांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, जळगाव, लातूर, धाराशिव, धुळे, नगर, कोल्हापूर आदी भागातील पत्रकारितेचे विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दीर्घकाळ प्रभावीपणे काम करीत असलेले डॉ. समीरण वाळवेकर व प्रसाद काथे यांच्या सत्रांनी कार्यशाळेला एका उंचीवर नेऊन ठेवले. पत्रकारितेत नव्याने येऊ घातलेल्या संकल्पना सुलभपणे सांगण्याची हातोटी समीरण यांच्याकडे आहे।
पत्रकारांना घडविण्याच्या प्रक्रियेत बदल होणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना केवळ कालबाह्य अभ्यासक्रम शिकविणे उचित होणार नाही. सगळ्याच वाहिन्या या उदात्त ध्येयाने नाही, तर व्यावसायिक उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत. आता माध्यमकर्मींना तंत्रज्ञानाची भाषा समजून घ्यावीच लागेल. मुद्रित क्षेत्रातील अनुभवी मंडळी इलेक्ट्रानिक माध्यमांत येण्यास तयार नाहीत, हे दुर्दैवी चित्र आहे. विद्यापीठांनी पत्रकारिता अभ्यासक्रम अद्ययावत केला पाहिजे, असे विचार वाळवेकर यांनी मांडले।
दुर्दैवाने इलेक्ट्रानिक मिडियाला समर्पित असा अभ्यासक्रम कोठेही शिकविण्यात येत नाही. दीड ते दोन लाख रूपये शुल्क भरून सर्वसामान्य विद्यार्थी या कोर्सेससाठी जाणे कठीण आहे. त्यामुळे या क्षेत्रात कच्च्या मालाची अर्थात नवोदित क्षमतावान पत्रकारांची निकड जाणवते. लोकांनी आपली निवड सुधारायला हवी. माध्यमांवर सरकारने नाही तर जनतेने अंकुश ठेवायला हवा, असे विचार प्रसाद काथे यांनी व्यक्त केले. सोलापुरातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी अध्यक्षस्थान भूषविले. अध्यक्षीय भाषणांतून काही प्रमाणात पत्रकारांमध्ये ध्येयवाद जागविण्याचा प्रयत्न झाला।
संतोष पवार, प्रवीण सकपाळ, दीपक होमकर सारख्या तरुण पत्रकारांनी कार्यशाळेतील सत्रांमध्ये समन्वयकाची भूमिका यशस्वीपणे बजावली. पत्रकारितेत येणाऱ्या नव्या प्रवाहाशी कसे जुळवून घ्यायचे आणि एक पत्रकार म्हणून स्वत:चा विकास कसा करायचा याबद्दलची शिदोरी साऱ्या तरुण पत्रकारांना या कार्यशाळेतून निश्चितच मिळाली.कार्यकुशलता अंगी बाणवण्याच्या दृष्टीने कार्यशाळा यशस्वी झाली, असा भाव बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, परंतु कार्यशाळेत वैचारिक स्पष्टतेच्या अंगाने विचारमंथन झाले असते तर कार्यशाळा आणखी सार्थक ठरली असती असे वाटते।
26/11 च्या घटनेबद्दल बरीच चर्चा झाली. या घटनेत सरकार कसे निष्क्रिय होते. प्रशासकीय स्तरावर ताळमेळ कसा नव्हता. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा बेजबाबदारपणा आणि त्यामुळे त्यांची गच्छंती कशी झाली? याची चर्चा झाली. मात्र, या देशात अतिरेकी हल्ले का होतात? जिहादी मानसिकतेचे मूळ कोठे आहे? राज्यकर्ते गठ्ठा मतांकरिता दहशतवादाला पाठिशी कसे घालतात? वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार राज्यकर्त्यांच्या या ढोंगी धर्मनिरपेक्षतेकडे दुर्लक्ष का करतात? घटनेनुसार सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारण्यात आले असतानाही गोरगरीब हिंदूंचे धर्मांतरण करण्यात येते, यामुळे समाजात असंतोष निर्माण होतो. अशावेळी अल्पसंख्यकांच्या बाजूनेच बातमीदारी का करण्यात येते? यामागे परकीय षडयंत्र असते का? अशा या देशाला छळणाऱ्या महत्त्वपूर्ण विषयांबाबत पत्रकार म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? याचा ऊहापोह झाला असता, तर यशस्वी झालेली ही कार्यशाळा आणखी परिपूर्ण यशस्वी झाली असती, असे वाटते।

१९ जनुअरी २००९ पान ४ , तरुण भारत। सोलापुर

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी