Thursday, October 8, 2009

नमस्ते,

१५ अगस्त पासून मी gbs या आजाराने पीड़ित आहे. ५ दिवस icu मधे आणि २ सितम्बर पर्यंत यशोधरा हॉस्पिटल, सोलापुर येथे भरती होतो. या आजारात हाता पायातील शक्ति जाते. उपचारानंतर महिनाभराने पूर्ववत शक्ति येऊ लागते. आता मी २० मिनिटे सावकाश चालू शकतोय. लिहिता येत नाही पण दोन बोटांनी कीबोर्ड वापरतोय. diwaliparyant चालता फिरता येईल. हिंदुत्वावर प्रेम करणार्या असंख्य कार्यकर्त्यांची स्नेहपूर्ण साथ मिलाल्यानेच मी या आजारातून सहज बाहेर पडतोय. सर्वांना नमस्कार.
लवकरच पुर्वीप्रमाने ब्लॉगवर सक्रीय होइन.

http://en.wikipedia.org/wiki/Guillain-Barr%C3%A9_syndrome

Thursday, August 6, 2009

Friday, June 26, 2009

स्मृति वन


प्रभु, सिद्धराम ( मी ), आप्पा, संताजी...

Monday, June 1, 2009

स्मरण गोनीदांच्या साहित्याचे


मराठीतील विख्यात लेखक आणि कादंबरीकार गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या साहित्यकृतींची ओळख करून देणारे "पुनर्भेट - गोनीदांच्या साहित्यकृतींची' हे पुस्तक त्यांच्या स्मृतिदिनी, सोमवार, दि. 1 जून रोजी सायं. 6.30 वा. सोलापुरातील शिवस्मारक येथे प्रकाशित होत आहे. गोनीदांच्या साहित्यावर प्रेम करणारे ऍड. आनंद देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला गोनीदांच्या कन्या डॉ. वीणा देव यांची प्रस्तावना असून, त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने...
ज्ञानसागरात मनुष्याने जीवनभर जरी चालायचे म्हटले तरी तो फारतर गुडघाभर पाण्यापर्यंत पोहोचू शकतो, अशा आशयाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक उक्ती आहे. खरेच आहे ते. एका आयुष्यात खूप काही करायचे ठरविले तरी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. जसजसे आपण विविध क्षेत्रांतील अधिक ज्ञान मिळवू पाहतो, तसतसे आपले अज्ञान उघडे पडत जाते.
पुस्तक हे ज्ञान मिळविण्याचे एक प्रमुख साधन आहे. वाचन ही अशी साधना आहे, की जी साधकाला तात्काळ वरदान देते. मनुष्याच्या घडणीमध्ये पुस्तकांचे स्थान खूप महत्त्वाचे असते. पुस्तके माणसाला विवेकी बनवतात. विविधांगी वाचनाने मनुष्य प्रगल्भ बनतो. असे असले तरी आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत इच्छा असूनही अनेक चांगली पुस्तके वाचणे राहून जाते. यावर चांगला उपाय म्हणजे काही व्यासंगी लोकांनी मौल्यवान पुस्तके वाचली पाहिजेत आणि ती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजेत.
छत्रपती शिवराय आणि गड-किल्ले यांना दैवत मानून भ्रमंती केलेल्या ऍड. आनंद देशपांडे यांनी नेमके हेच केले आहे. तपस्वी लेखक गो. नी. दाण्डेकर यांच्या साहित्याचा परिचय करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. फुले सुंदरच असतात, पण ती कलात्मकतेने गुंफल्यावर जी माला तयार होते तिचे सौंदर्य हे मोकळ्या फुलांहून अधिक असते आणि त्याचे श्रेय ती माला वेधक रीतीने गुंफणाऱ्या कलाकाराला असते. "गोनीदां'चे संस्कारशील साहित्य, त्यांचा संपन्न जीवनानुभव, अभिजात कल्पनाशक्ती हे सारे अत्यंत प्रभावीपणे वाचकांसमोर आणण्याचे श्रेय आनंद देशपांडे यांना आहे.
1 जून 1998 ला गोनीदांचे निधन झाले. त्यानंतर सोलापूर तरुण भारतमधून आनंद देशपांडे यांनी गोनीदांच्या साहित्याचा परिचय करून देणारी लेखमाला लिहून आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. गोनीदांच्या निवडक 28 पुस्तकांचा परिचय करून देणारे 28 लेख देशपांडे यांनी लिहिले आहेत. ""वाघरू, रानभुली, माचीवरला बुधा, पवनाकाठचा धोंडी, जैत रे जैत, मृण्मयी, पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा, मोगरा फुलला, शितू, बया दार उघड, तुका आकाशाएवढा, वादळातील दीपस्तंभ'' आदी मराठी मनाला संस्कारित करीत आलेल्या कादंबऱ्यांचा यात समावेश आहे.
येथे विशेष नोंद करण्यासारखी बाब म्हणजे लेखकाची गोनीदांवर विशेष भक्ती आहे. महाराष्ट्राच्या मातीवर, संस्कृतीवर गोनीदांचे असलेले गहिरे प्रेम, भटकेपणाची दाण्डेकरांची प्रवृत्ती, इतिहासासंबंधी आत्मीयता या सर्वांबद्दल आनंद देशपांडे यांच्या मनात श्रद्धा आहे. ही श्रद्धाच त्यांच्या पुस्तकाची प्रेरणा आहे. शिवचरित्र आणि किल्ल्यांची तीव्र ओढ ही लेखकाची जमेची बाजू आहे. याशिवाय कोणी गोनीदांच्या पुस्तकांचा परिचय करू पाहील तर त्यात जिवंतपणा येणे शक्य नाही. भटकंती ही गोनीदांच्या लिखाणामागील प्रेरणा आहे. गोनीदांच्या साहित्याने आनंद देशपांडे यांचे भावविश्व बनले आहे, याची प्रचिती पुस्तक वाचताना पानोपानी येते.
पुस्तकातील प्रत्येक प्रकरण साधारणपणे तीन-चार पानांचे आहे. प्रत्येक प्रकरण मूळ कादंबरी वाचल्याचा आनंद देते आणि मनात मूळ कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण करते. पराग घळसासी यांनी रेखाटलेल्या जिवंत चित्रांमुळे पुस्तकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. मनोविश्व समृद्ध करणारे हे पुस्तक नव्या पिढीला जीवनदृष्टी देणारे आहे.

Saturday, May 9, 2009

जलपुनर्भरण कार्यशाळा

विवेकानंद केंद्रातर्फे रविवारी जलपुनर्भरण कार्यशाळा
सोलापूर: विवेकानंद केंद्र, पर्यावरण मंडळातर्फे रविवार दि. 10 मे रोजी जलपुनर्भरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक येथे सकाळी 10 वा. ही कार्यशाळा होईल.
भूमीमधून कूपनलिका (बोअरवेल) आणि विहीरी याद्वारे प्रचंड प्रमाणात पाण्याचा उपसा करण्यात येतो. परंतु भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न मात्र खूपच कमी प्रमाणात होताना दिसतो. घराच्या छतावर पडणारे पाणी एकत्रित करून कूपनलिकेत फिल्टरद्वारे सोडण्याच्या प्रक्रियेला जलपुनर्भरण म्हटले जाते. विवेकानंद केंद्रातर्फे सोलापूर आणि परिसरामध्ये गेल्या 5 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जलपुनर्भरण केल्यामुळे कूपनलिकेभोवती जमिनीत पाण्याचा साठा होतो आणि उन्हाळ्यात या साठ्याचा उपयोग होतो.
जलपुनर्भरण घरच्या घरी कसे करावे यासंबंधीचे मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये प्रात्यक्षिकासह दाखविण्यात येणार आहे. तरी या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी कार्यशाळेचा लाभा घ्यावा. तरुण-तरुणींनी पर्यावरण रक्षणाच्या या उपक्रमात मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाचे समन्वयक अजित ओक यांनी केले आहे.

Sunday, April 19, 2009

मत कोणाला ?

आपल्या देशात हजारोंनी अशी गावं होती की, ज्या गावांना पक्के (डांबरी) रस्ते नव्हते। पावसाळ्यात या गावांच्या रस्त्यावरून सायकल नेणेही मुश्कील असायचे। आपल्या गावाला डांबरी रस्ता होऊ शकतो, असे स्वप्नातही या ग्रामस्थांना वाटले नसेल, परंतु वाजपेयी सरकारने पंतप्रधान ग्राम सडक योजना राबविली आणि छोटे छोटे खेडे डांबरी रस्त्यांनी जोडले. लाखो गावं जोडली गेली. 50 वर्षांमध्ये कॉंग्रेस पक्षाने जेवढे रस्ते बांधले नाहीत त्याहून अधिक रस्ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केवळ 6 वर्षांत बांधले. चांगले रस्ते असणे ही विकासासाठीची पहिली गरज असते.

दि. 23 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सोलापुरात याच दिवशी मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसे प्रचाराचे अनेक पैलू समोर येत आहेत. सोलापूर मतदारसंघात भाजपाचे ऍड. शरद बनसोडे आणि कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यात थेट लढत आहे. सदैव सुशीलकुमारांच्या पाठिशी उभा राहिलेला दलित समाज यावेळी भाजपा, बसपा आणि कॉंग्रेस या तीन पक्षांत विभागला गेल्याचे दिसत आहे. कणबससारख्या खेड्यातील बौद्ध वस्त्यांमध्ये भाजपाचे झेंडे डौलाने फडकताना दिसत आहेत. असे पहिल्यांदाच होत आहे. यामुळे गोंधळलेले कॉंग्रेसचे नेते भाजपा जातीयवादी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र खरा जातीयवादी कॉंग्रेसच आहे, असे त्यांना प्रत्युत्तर मिळत आहे. बाबासाहेबांनी कॉंग्रेसला जळते घर म्हटल्याचा दाखला देण्यात येत आहे. बाबासाहेबांना जिवंतपणी यातना देणारा कॉंग्रेस पक्षच होता. बाबासाहेबांच्या हयातीत 15 खासदार निवडून आले होते, परंतु आज रिपब्लिकन पक्षाचा एकच खासदार कॉंग्रेसवाल्यांच्या दयेवर निवडून येतो. कॉंग्रेसमुळेच दलित चळवळीचे वाटोळे झाल्याची भावना प्रबळ होत असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागातून कॉंग्रेसला नेहमी अनुकूलता असते. मात्र यावेळी ग्रामीण भागात शिंदेंविरुद्ध तीव्र असंतोष दिसत आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये कॉंग्रेसला मते देऊनही गावांना कॉंग्रेसवाले पाणीही देऊ शकले नाहीत, ते काय विकास करणार, असा प्रश्न ग्रामीण भागातून विचारण्यात येत आहे. एका गावात ग्रामस्थांनी ग्रामीण विकास मंत्र्यांची सभा उधळून लावल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कॉंग्रेसला विकास करायचा होता तर गेल्या 60 वर्षांत का केला नाही? असा रोकडा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
कितीही कॉंग्रेसविरोधी वातावरण असले तरी शेवटच्या दोन रात्रींमध्ये "अर्थ'पूर्ण बैठका आणि संपर्कातून वातावरण बदलून जाईल असे भाकित या क्षेत्रातील जाणकार ठामपणे करीत आहेत. आम्हाला पैसे वाटण्यात आले तर आम्ही प्रसंगी पैसे घेऊ, पण आमच्या मनातील उमेदवारालाच मत देऊ, अशी व्यावहारिक आणि चतुर भूमिका युवक मतदार घेताना दिसत आहे.
गेल्या वर्षभरात सावरकर विचार मंचच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. क्रांतिसूर्य सावरकर, सावरकर जयंतीचा भव्य कार्यक्रम आदींतून शेकडो तरुण हिंदुत्वाकडे आकर्षित झाले आहेत. नॉर्थकोट आणि कामगार मैदान येथे हिंदू जनजागरण समितीने घेतलेल्या धर्मसभांचा प्रभाव शहरात अजूनही टिकून आहे. शेळगी, बापूजी नगर, जुळे सोलापूर आदी भागांतून राजकारणापासून अलिप्त असलेले, परंतु तळागाळापर्यंत प्रत्यक्ष संपर्क असलेले हिंदू जनजागरण समितीचे शेकडो कार्यकर्ते हिंदू हितासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. एका बाजूला असे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला दिग्गज नेतेमंडळी खोटे बोलण्याच्या स्पर्धेत उतरली आहेत. सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारही या स्पर्धेत मागे नाहीत.
अँटोनिया मायनो ऊर्फ सोनिया गांधी यांचा बसता उठता जप करणारे सुशीलकुमारजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावात प्रचाराच्यावेळी म्हणाले, "कॉंग्रेसचा घराणेशाहीला विरोध आहे.' कमजोर पंतप्रधान म्हणून विख्यात झालेले मनमोहनसिंग म्हणतात, "राहुल गांधी (राऊल विन्सी या नावाने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे) यांच्यात पंतप्रधान बनण्याचे सारे गुण आहेत.' गेल्यावेळी उज्ज्वलाताई शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रश्न त्या निवडणुकीत हरल्या याचा नाही; धडधडीत खोटे बोलण्याचा आहे. सतत खोटी आश्वासने आणि खोटी विधाने ऐकून सामान्य जनतेस खरे काय आणि खोटे काय असा प्रश्न पडल्यास आश्चर्य नको.
ज्यांनी कधी स्वत:च्या फायद्याशिवाय समाजाचा, देशाचा विचार केला नाही, ज्यांना "साहेबांशी' असलेल्या ओळखीमुळे चांगले दिवस आले, साहेबांच्या मर्जीत राहिल्यामुळे सात पिढ्या बसून खातील इतकी "माया' जमा करता आली, साहेबांमुळे स्वत:च्या बायकोला पुरस्कार मिळाले, त्यांच्या समवेत फोटो काढून दिवाणखाण्यात लावता आला, साहेबांमुळे आपल्या हॉस्पिटलचा, उद्योगाचा, कंत्राटदारीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा झाला अशा लोकांना मत कोणाला द्यावे, असा प्रश्नच पडत नाही. (येथे साहेब म्हणजे गोड-गोड बोलून समाजाचे नेतृत्व करणारा, केवळ कार्यकर्त्यांची (चेल्यांची) गरिबी दूर करणारा, स्वत:च्या पदासाठी, स्थान पक्के ठेवण्यासाठी देशाच्या स्वाभीमानाचा विचार न करणारा नेता असा अर्थ घ्यावा.) किंबहुना अशी मंडळीच प्रचारकाळात रान उठवत असतात.
पक्ष कोणताही असो, चांगले आणि लबाड लोक कमी-अधिक प्रमाणात असतातच. अशावेळी त्या पक्षाचा इतिहास तपासणे आवश्यक बनते. जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ या देशावर राज्य केलेल्या कॅंाग्रेसच्या नेत्यांनी या देशाचा काहीच विकास केला नाही, असे म्हणणे पूर्णपणे बरोबर होणार नाही. कणभर काम करून जनतेच्या डोळ्यात मणभर धूळ फेकत देशाच्या संपत्तीची या मंडळींनी कशी लूट केली याचा पुराव्यांसह पर्दाफाश करणारे थोर विचारवंत एस. गुरुमूर्ती यांचा याच "आसमंत'मधील लेख पाहा म्हणजे ध्यान्यात येईल.
आपल्या देशात हजारोंनी अशी गावं होती की, ज्या गावांना पक्के (डांबरी) रस्ते नव्हते. पावसाळ्यात या गावांच्या रस्त्यावरून सायकल नेणेही मुश्कील असायचे. आपल्या गावाला डांबरी रस्ता होऊ शकतो, असे स्वप्नातही या ग्रामस्थांना वाटले नसेल, परंतु वाजपेयी सरकारने पंतप्रधान ग्राम सडक योजना राबविली आणि छोटे छोटे खेडे डांबरी रस्त्यांनी जोडले. लाखो गावं जोडली गेली. 50 वर्षांमध्ये कॉंग्रेस पक्षाने जेवढे रस्ते बांधले नाहीत त्याहून अधिक रस्ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केवळ 6 वर्षांत बांधले. चांगले रस्ते असणे ही विकासासाठीची पहिली गरज असते.
भारतातील शेतकरी सुखी व्हावा, शेती सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी 2016 पर्यंत भारतातील सगळ्या प्रमुख नद्यांना जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली. भारतातील प्रत्येक खेड्यामध्ये सार्वजनिक दूरध्वनी पोचविण्याची योजना अमलात आणून 85 टक्के गावांमध्ये दूरध्वनी सेवा सुरू केली. वाजपेयी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दूरध्वनी मिळविण्यासाठी लोकांना वर्षानुवर्षे रांगा लावाव्या लागत असत, पण वाजपेयी सरकारने चमत्कार केला. ग्रामीण भागातील शेतमजूरदेखील मोबाईल फोनवरून बोलताना दिसू लागला. स्वयंपाकाचा गॅस घरपोच मिळणे सहजशक्य झाले. देशाच्या विकासाच्या दृष्टीने देशात अभूतपूर्व क्रांती झाली.
कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकारने काय प्रगती केली हे आपल्यासमोर आहे. गगनाला भिडलेले जीवनावश्यक वस्तूंचे आजचे भाव आणि 5 वर्षांपूर्वीचे भाव याची तुलना करा. म्हणजे नेमका फरक ध्यानात येईल. खेड्यांमध्ये 12-12 तास 14-14 तास वीज उपलब्ध नसते. भाजपाचे राज्य असलेल्या गुजरातकडे पाहा तिथे 24 तास सतत वीजपुरवठा केला जातो. लोकाभिमुख सरकारे भारतीय जनता पक्षाने राबविली आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात ही राज्ये याची उदाहरणे आहेत. कॉंग्रेसच्या दृष्टीने विकासाची व्याख्या समजून घेताना मला अनुभवास आलेली एक घटना सांगतो, म्हणजे यावर अधिक भाष्य करण्याची गरज भासणार नाही. शिवसेनेत अनेक वर्षे काम केलेल्या एका महिला लोकप्रतिनिधीने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेस प्रवेशाचे समर्थन करताना त्या बाई मला म्हणाल्या, "पाहा, मी गेल्या 15-20 वर्षांपासून शिवसेनेत काम करीत होते, पण मला रिक्षानेच ये-जा करावे लागायचे. आता मी कॉंग्रेसमध्ये गेलेय- पुढील वर्षभरात माझ्या घरासमोर चारचाकी दिसेल.'
विकासाच्या बाबतीत आनंदी आनंद असणाऱ्या कॉंग्रेसप्रणित सरकारचे मुसलमानांप्रतिचे आणि ख्रिश्चनांप्रतिचे धोरणही हिंदूंवर अन्याय करणारेच राहिले आहे.
"मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा...' कुराण (9.5)
"आकाशातून पडलेले पाणी या ना त्या मार्गाने अंती सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही ईश्वराची केलेली उपासना अंती एकाच ईश्वराला जाऊन मिळते....' (शिवमहिम्न स्तोत्र)
मुस्लिम आणि हिंदू विचारांमधील हा फरक कॉंग्रेसच्या नेत्यांनी कधीच समजून घेतलेला नाही. याचाच परिणाम म्हणजे 1947 साली 23 टक्के मुस्लिमांसाठी भारताची फाळणी करण्यात आली. 23 टक्के (ही आकडेवारीसुद्धा बोगस होती) मुस्लिमांसाठी 30 टक्के भारतभूमी देण्यात आली. लोकसंख्येची अदलाबदलही झाली नाही. 23 टक्क्यांपैकी काहीच टक्के पाकिस्तानात गेले. आज भारतातील मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात कॉंग्रेस पक्षाने कोणतीही कसूर ठेवलेली नाही.
सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरासमोरील कृत्रिम थडग्यामुळे रस्त्याला होणारा अडथळा असो की 2002 च्या सोलापूर दंगलीतील आरोपींना पाठिशी घालणे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने सदैव धर्मांधांना पाठिशी घातले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेसचे हेच धोरण राहिले आहे. अतिरेक्यांची तळी उचलून धरण्याचा निर्लज्जपणा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. कोणत्याही दिवशीचा दै. सनातन प्रभात काढून पहा उदाहणांसह हे लांगूलचालन आपल्या नजरेत येईल.
देशभरात थैमान घालत असलेल्या इस्लामी दहशतवादाला आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतरणाच्या कारवायांना पायबंद घालायचा असेल तर केंद्रातील सरकार बदलणे आवश्यकच आहे.

Friday, April 3, 2009

खाटीक मशिदीने केले रस्त्यावर अतिक्रमण

सोलापूर (खास प्रतिनिधी): शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी येथील सोन्यामारुतीसमोरील खाटीक मशिदीने रस्त्यावर अतिक्रमण सुरू केले आहे. आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण करून बांधकाम सुरू केल्याने येथील रस्त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मशिदीने रस्त्याकडील बाजूस रस्त्यावर खड्डा खणून बांधकाम सुरू केल्याची कुणकुण जागरूक नागरिकांना लागली. जागरुक नागरिकांनी लागलीच पोलिसांना याची खबर दिली. दुपारी पोलिस तत्काळ पोचले.
आधीच्या अतिक्रमणामुळे अरुंद बनलेल्या रस्त्यावर नव्याने मशिदीलगत सुमारे 3 ते 4 फूट रुंदीचे अतिक्रमण सुरू आहे. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य आणून टाकण्यात आले आहे.

Wednesday, March 4, 2009

"अंधश्रद्धाळू' अंनिस

श्रद्धेची वर्गवारी ही अंध आणि डोळस या प्रकारे करता येत नाही, असे श्रीरामकृष्ण परमहंस सांगतात। मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे। माणसातून "विचार' वजा केला तर शिल्लक राहतो तो केवळ प्राणी. माणूस हा विचार करणारा असल्यामुळे काही गोष्टींवर त्याची श्रद्धा असते. विचार करणारा मनुष्य श्रद्धेशिवाय जगूच शकत नाही.

"अंधश्रद्धा निर्मूलन समिती'वाल्यांचीही काही गोष्टींवर श्रद्धा असते. अंनिसवाल्यांची गांधीजींवर श्रद्धा आहे. सोनिया गांधींवर श्रद्धा आहे. धर्मनिरपेक्षतेच्या (तथाकथित) तत्त्वांवर श्रद्धा आहे. कॉंग्रेसवर श्रद्धा आहे. भारताच्या राज्यघटनेवर श्रद्धा आहे. अंनिस कधीही वरील श्रद्धास्थानांवर आघात करताना दिसते का पाहा.
समाजातून अंध समजुती, दुष्ट रूढी यांचे उच्चाटन व्हावे, सामान्य जनांची होणारी फसवणूक थांबावी, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी या देशात मोठी चळवळ चालविण्याची आवश्यकता आहे। "अंनिस'ने हे काम करावयास हवे होते, परंतु अंनिसचे नेतृत्त्व याकामी अपयशी ठरले आहे. अंनिसच्या धुरिणांनी याकामी कुचराई केली आहे, असे खेदपूर्वक म्हणावे लागते.

जादूटोणाविरोधी कायदा येथील "पुरोगामी' राज्य सरकारने मंजूर केला नाही म्हणून अंनिसचे 300 कार्यकर्ते दि। 17 मार्च रोजी स्व-रक्ताने पत्रे लिहिण्याचा "अघोरी' प्रकार करणार आहेत. या पत्रांमुळे सरकारमध्ये संवेदना उत्पन्न होऊन सरकार गांभीर्याने विचार करेल अशी अंनिसची श्रद्धा (की अंधश्रद्धा) आहे. अंनिसवर ही नामुष्कीची पाळी यायला अंनिसच कारणीभूत आहे.

अंनिसने राजकारणापासून दूर राहणे अपेक्षित होते, परंतु अंनिसने सदैव कॉंग्रेससी लगट केली। स्वत:ला विज्ञानवादी म्हणवून घेणाऱ्या अंनिसने हिंदू धर्म आणि परंपरांविषयी शुद्ध अवैज्ञानिक आणि द्वेषपूर्ण दृष्टिकोन अवलंबिला। आपल्याला न पटणाऱ्या, माहीत नसणाऱ्या गोष्टी अस्तित्वात असूच शकत नाहीत, असा संकुचित दृष्टिकोन अंनिसने योग आणि अध्यात्म याविषयी बाळगला.

जगातील अनेक प्राचीन संस्कृती परकीय रानटी टोळ्यांच्या आक्रमणाबरोबर नेस्तनाबूत झाल्या, परंतु भारत मात्र सततच्या रानटी आक्रमणानंतरही टिकून राहिला- याचे रहस्य येथील जीवनधारेत आहे। धर्म हा या देशाचा प्राण आहे, हे अंनिसने समजून घेतलेच नाही। सुधारणा म्हणजे मोडतोड नव्हे, हे अंनिसवाल्यांना समजलेच नाही.

इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे खुळ्या समजुती आणि अंध रूढी यांचे गाठोडे आहेत, मात्र अंनिसने कधी त्याविरोधात अवाक्षरही उच्चारले नाही। परधर्मीयांकडून हिंदू धर्माचे लचके तोडण्याचे जे काम सुरू आहे, त्याला पूरक असेच अंनिसचे काम राहिले। यामुळे सुरुवातीच्या काळात काही शुद्ध हेतूने कार्य करणारे अंनिसचे कार्यकर्ते अंनिसपासून दुरावले।

अंनिसचे धुरंधर कार्यकर्ते म्हणजे ढोंगीपणा आणि कॉंग्रेसी राजकारण्याची हुजरेगिरी असे समीकरण बनले। अंनिसने आत्मपरीक्षण करावे. (आत्मपरीक्षण करणे अंधश्रद्धा आहे का, याची मला कल्पना नाही.)

अहिंसा तत्त्वाचा उदोउदो करणारे अंनिस कार्यकर्ते मुंबईच्या आझाद मैदानावर दि। 17 रोजी स्वरक्ताने पत्रे लिहिण्याचा कार्यक्रम करणार आहेत। त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा !

४ मार्च ०९ पण ४ तभा

Saturday, February 14, 2009

सावरकरांचा जीवनक्रम

(जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)
१८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि। नाशिक)...

१८९२ मातृ निधन...

१८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ...

१८९९ सप्टें ५ पितृनिधन....

१९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना

१९०१ मार्च विवाह

१९०१ डिसे।१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.

१९०१ जाने।२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.

१९०४ मे। अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.

१९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी।

१९०५ डिसे।२१ बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.

१९०६ जून ९ लंडनला प्रयाण।

१९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव।

१९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले।

१९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव।

१९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले।

१९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार।

१९०९ जून वडील बंधु श्री।बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.

१९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध।

१९०९ आक्टो।२४ लंडनमधे दसर्‍याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ।गांधी.

१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक।

१९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी।

१९१० डिसे।२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.

१९११ जाने।३१ दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा।

१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ।

१९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ।येसुवहिनींचे निधन.

१९२० नोव्हें। धाकचे बंधु डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.

१९२१ मे।२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.

१९२१ नि १९२२ अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास।

१९२३ मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा।

१९२४ जाने।६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.

१९२५ जाने।७ कन्या "प्रभात" हिचा जन्म.

१९२६ जाने।१० हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ 'श्रद्धानंद' साप्ताहिक मुंबईत सुरू केले.

१९२७ मार्च १ रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट नि चर्चा।

१९२७ मार्च १७ पुत्र "विश्वास" याचा जन्म।

१९३० नोव्हें १६ रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन

१९३१ फेब्रु।२२ पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.

१९३१ फेब्रु २५ मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष।

१९३१ एप्रिल २६ सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष। पतित-पावन मंदिरात सभा.

१९३१ सप्टें २२ नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली।

१९३१ सप्टें १७ श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन।महाराचा गीतापाठनि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.

१९३७ मे १० रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता।

१९३७ डिसे।३० हिंदु महासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.

१९३८ एप्रिल १५ 'महाराष्ट्र-साहित्य-संमेलन' २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष।

१९३९ फेब्रु १ निजाम विरोधी 'भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार' प्रारंभ।

१९४१ जून २२ सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले।

१९४१ डिसे।२५ भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.

१९४३ मे २८ ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ।भा. सत्कार आणि निधी समर्पण.

१९४३ आगस्ट १४ नागपूर-विद्यापीठाने डी। लिट। ही सन्मान्य पदवी दिली.

१९४३ नोव्हें ५ अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष।

१९४५ मार्च १६ वडील बंधु श्री।गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.

१९४५ एप्रिल १९ अ।भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.

१९४५ मे ८ कन्या 'प्रभात' चा विवाह, पुणे।

१९४६ एप्रिल मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली।

१९४७ आगस्ट १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले।

१९४८ फेब्रु। ५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.

१९४९ फेब्रु १० गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका।

१९४९ आक्टो १९ धाकटे बंधु डा। नारायणराव यांचे निधन.

१९४९ डिसे। अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.

१९५० एप्रिल ४ पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास।

१९५२ मे १०-१२ 'अभिनव-भारत' संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे।

१९५५ फेब्रु। रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.

१९५६ जुलै २३ लो।टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.

१९५६ नोव्हें १० अ।भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.

१९५७ मे १० दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण।

१९५८ मे २८ ७५ वा वाढदिवस। मुंबई महापालिकेकडून सत्कार.

१९५९ आक्टो ८ पुणे विद्यापीठाने 'डी-लिट' सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली।

१९६० डिसें। २४ मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).

१९६१ जाने।१४ मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).

१९६२ एप्रिल १५ मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले।

१९६३ मे २९ मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात।( मुंबई)

१९६३ नोव्हें ८ पत्नी सौ। यमुनाबाई यांचे निधन.

१९६४ आगस्ट १ मृत्युपत्र केले।

१९६४ आक्टो। भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.

१९६५ सप्टें गंभीर आजार।

१९६६ फेब्रु १ अन्न नि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ।

१९६६ फेब्रु २६ शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन। वय८३

१९६६ फेब्रु २७ महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा।स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार....

संकलन : सुजीत...

Sunday, February 1, 2009

मोची समाज जागा होतोय...

दि। 8 जानेवारी 2009 रोजी सोलापुरातील उपलप मंगलकार्यालात मोची समाजाचा मेळावा झाला. यावेळी ख्रिस्ती बनलेल्या तरुण दांपत्याने पुन: स्वधर्मात प्रवेश केला.

सोलापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला आणि कर्नाटक-आंध्रच्या सीमेजवळ वसलेले एक महत्त्वाचे शहर आहे. हुतात्म्यांची नगरी अशीही या शहराची ओळख आहे. शिवयोगी सिद्धराम हे येथील ग्रामदैवत आहे. हे शहर हिंदूबहुल आहे. या शहरात लिंगायत, पद्मशाली, मराठा आणि अन्य समाज मोठ्या प्रमाणात राहतो. सुमारे 2 लाख संख्येने राहणारा मोची समाज हा येथील एक प्रमुख घटक आहे. मादिगा किंवा मातंग समाज म्हणूनही या समाजाला ओळखले जाते. रामायण काळात वीर हनुमंताला लंका उड्डाणासाठी तयार करणाऱ्या वीर जांबुवंतांचा वारसा या समाजाला लाभला आहे.
गेल्या दोन-तीन दशकांपासून या शहराला एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हिंदूबहुल सिद्धेश्वर पेठेत आता हिंदू घरांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच राहिली आहे. अधूनमधून होणाऱ्या दंगलींच्या वेळी या कुटुंबाना दहशतीत वावरावे लागते. लक्ष्मी मंडईजवळ रमजान ईदच्या दिवशी दुकान चालू का ठेवले म्हणून धर्मांधांनी हल्ला चढविल्याची घटना अजून ताजी आहे. मुस्लिमबहुल वस्त्यांमधून आणि कॉलेजमधून हिंदू मुलींना गळाला लावून मुस्लिम बनविण्याचे प्रकार सोलापुरात आता अपवाद राहिले नाहीत. पद्मशाली समाजात याबद्दल काही प्रमाणात जागृती आली असली तरी उर्वरित हिंदू समाजात तेवढी जागृती दिसत नाही. हिंदूबहुल सोलापुरात हिंदू अल्पसंख्यक तर होणार नाहीत ना, अशी शंका मनात येत आहे.
तीन-चार दशकांपूर्वी शहरात दत्त चौकाजवळ एक चर्च होते. ख्रिश्चन समाजाची लोकसंख्याही मोजकीच होती. मशिदींची संख्याही आजच्यासारखी फोफावलेली नव्हती. मुस्लिम बांधव हिंदूंमधे मिळून-मिसळुन राहत होते. दरम्यानच्या काळात आपल्या मूळ स्वभावानुसार हिंदू राजकारणी सर्वधर्मसमभावाचा जप करीत राहिले. अन्य धर्मीयांची विस्तारवादी रणनीती समजून घेण्याची दृष्टी नसल्यामुळे गाफील राहिले. गठ्ठा मतांसाठी दाढी कुरवाळण्याची नीती अवलंबिणाऱ्या नेत्यांचे प्रस्थ राहिल्यामुळे शहरात अन्यधर्मीयांचे वर्चस्व वाढतच राहिले.
शहराच्या विविध भागांमध्ये ख्रिस्ती मिशनरी पैशाच्या बळावर ख्रिस्तीकरणाची मोहीम राबवू लागले. शहराच्या अनेक भागांमध्ये चर्चेसची संख्या वाढू लागली. समाजमंदिरांचे चर्चमध्ये रूपांतर होऊ लागले. हिंदू लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलीबाळींची लग्ने ख्रिस्ती पद्धतीने चर्चमध्ये लावण्यापर्यंत परिस्थितीत परिवर्तन आले.
ख्रिस्ती मिशनऱ्यांचा सर्वाधिक आघात झाला असेल तर तो येथील मोची (मादिगा) समाजावर. सोलापूरच्या जडणघडणीत या समाजाचा वाटा मोलाचा राहिला आहे. समाजात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी आहे, पण व्यवसाय मग ते हातमागावर कपडे विणणे असो की विडी वळणे, यात आघाडीवर आहे. शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळेच ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या समाजाला लक्ष्य केलं. ख्रिश्चन मिशनरी या लोकांना नोकरीची आमिषे तर कधी पैशाची लालूच दाखवून धर्मांतरं घडवून आणू लागले. मोची समाज जो मोठ्या प्रमाणात होता त्याची दिवसेंदिवस संख्या घटू लागली. ख्रिश्चनांच्या संख्येला मात्र सूज येत राहिली. हे इथेच थांबले असते तर ठीक, पण ख्रिश्चन समाजात लग्न करून गेलेल्या मुली या परत घरी येऊ लागल्या. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच होती.
सुरुवातीला समाजातील लोकांचे याकडे लक्ष नव्हते. हिंदू समाजातील मुलींची ख्रिश्चन मुलांशी बेधडक लग्ने होत होती, मात्र याउलट होत नव्हते. हिंदू मुलाला ख्रिस्ती बनलेल्या मुलीशी लग्न करायचे असेल तर मुलाला ख्रिस्ती बनणे बंधनकारकच होते. मोची समाजातील धुरिणांनी वेळीच धोका ओळखला. समाज जागरूक झाला. ख्रिस्ती मिशनऱ्यांची चालाखी मोची समाजाच्या ध्यानात आली. समाजाने काही नियम बनविले. परिणामी मोची समाजातून ख्रिस्ती बनण्याचा प्रकार थांबला. मोची समाजातील मुलींची लग्ने मोची मुलांशीच होऊ लागली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मोची समाजातील काही नेत्यांना वश करण्याचा प्रयत्न केला, पण समाजाने भीक घातली नाही.
हिंदू देवदेवतांबद्दल बदनामीकारक, ओंगळ माहिती देऊन हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करणे. मूर्तीपूजा चुकीची आहे असे सांगणे. तुम्ही मूर्तीपूजा केलात तर नरकात जाल, अशी भीती दाखविणे. आकाशातल्या बापाच्या कळपात आलात तर तुमचे कल्याण होईल असे सांगणे. तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असे सांगणे. चमत्कारांचे कुंभाड रचून देवामुळे चमत्कार घडतोय. जीझस तुमचा कल्याण करेल असे सांगत, धर्मांतरण करणे या प्रकारांनी लोकांना खूप काळ वेड्यात काढणे शक्यच नव्हते. दरम्यान ख्रिस्ती मिशनऱ्यांचा भोंगळपणा उघड करणाऱ्या पुस्तकांचा प्रसार, हिंदू धर्म जागृती सभा आणि व्याख्याने यांमधून मिशनऱ्यांचा खोटेपणा उघड होऊ लागला. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांची लबाडी ओळखली होती. माझ्या हातात सत्ता आली तर प्रथम मी या मिशनऱ्यांना देशाबाहेर काढेन, असे गांधीजी म्हणाले होते. हे सारे विचार मोची समाजासमोर येऊ लागले.
मोची समाजाचा गौरवशाली इतिहास जांबमुनी महोत्सवातून समोर आणण्यात येऊ लागला. मोची समाजाला स्वत:ची ओळख होऊ लागली. मोची समाजात आत्मविश्वास आला. समाज संघटित होऊ लागला. समाजातील तरुण एक झाले. याचा खूप चांगला परिणाम झाला. अज्ञानामुळे, चुकीने, फसले गेल्यामुळे ख्रिश्चन बनलेले बांधव पुन्हा हिंदू समाजात, मोची समाजात दाखल होऊ लागले.
दि. 8 जानेवारी 2009 रोजी सोलापुरातील उपलप मंगल कार्यालयात हिंदू मोची समाजाचा मोठा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. पूर्णानंद भारती महाराज आणि षडाक्षर मुनी स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला तोडमे गुरुजी, मल्लया महाराज शरदराव ढाले, तायप्पा म्हेत्रे, प्रा. नरसिंग आसादे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अंबादास म्हेत्रे यांनी आपल्या पत्नीसह पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. उपस्थित मोची समाजाने अतिशय आनंदात त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर जांबमुनी महाराजांची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली होती. मोची समाज आता जागा होत आहे. लबाड ख्रिस्ती मिशनऱ्यांनो आता सावध राहा.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांची या प्रसंगी आठवण होत आहे. विवेकानंद म्हणतात, ""येशू भारतात आला आहे आणि आकाशातल्या बापाचा आदेश लौकरच फळाला येणार आहे!, असे डंके पिटणाऱ्यांनो, तुम्ही उघड्या कानांनी ऐका, जीझस्‌ही इथे आलेला नाही आणि येहोवा त्याहून आलेला नाही. ते येण्याची सुतराम शक्यताही नाही. आपापल्या चुली सांभाळताना त्यांना इथे यायला उसंत देखील होणार नाही !
तुम्हाला जर ही दैवते सोसत नसली तर रामराम! तुमच्यासारख्या मूठभर करंट्यांसाठी काय या देशाने दम उखडावा आणि मुलखाचे नीरस जीवन पत्करावे? एवढे जग तुमच्यापुढे पडले आहे. शोधा की, तुम्हाला सोयीचे कुरण मनमुक्त चरायला! पण हे मूठभर करंटे असे गुण्यागोविंदाने जातील थोडेच? तसे करायलाही हिंमत लागते. ते शिवाच्या या भूमीतच पोटे भरून घेतील, पण शिवाचीच बदनामी करतील आणि कोण्या परक्या प्रेषिताचे गोडवे गातील!''
-सिद्धाराम भै. पाटील २९ जनुअरी ०९
www.psiddharam.blogspot.com
mobile: 9325306283

Tuesday, January 27, 2009

विजय! पूर्ण विजय!!


युवाशक्तीला घातलेली साद
31 डिसेंबर 2008 ते 4 जानेवारी 2009 या कालावधीत महाराष्ट्रातील युवाशक्तीचे शेगाव (जि। बुलढाणा) येथे महाशिबीर झाले।

Tuesday, January 20, 2009

अडाणी निरक्षर की जागरूक साक्षर



मकरंद मुळे


गझलकार सुरेश भट यांच्या एका गझलेच्या ओळी थोड्या बदलून "पुन्हा पुन्हा चूक तीच ती आम्ही करीत गेलो,
"त्यांचाच' खुनी हात परत धरत गेलो।।
आपली सामूहिक स्थिती यापेक्षा फारशी वेगळी नाही. घटना घडतात. आक्रोश होतो. चर्चा होते. श्रद्धांजलीच्या सभा होतात आणि आता होर्डिंग्जही लागतात, परंतु अजूनही आपल्या देशाचा नेमका शत्रू कोण? आपल्याला कोणाला धडा शिकवायचा आहे ? याबद्दल आपण अज्ञानी आहोत. अडाणीपणाची ही स्थिती सार्वत्रिक आहे. माध्यमे, नोकरशहा, राजकारणी, बुद्धिवंत, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) व निधर्मी (?) आदी त्यांच्या निहित स्वार्थासाठी (वेस्टेड इंटरेस्ट) व वैयक्तिक अजेंड्यासाठी मिशनरी, इस्लामिक व कम्युनिस्ट दहशतवादाबाबत निरक्षर राहू इच्छितात. सर्वसामान्य भारतीय त्याच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षात इतका गुरफटलेला आहे की, या निरक्षरतेविषयी त्याला काही सोयरसुतक नाही आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर दहशतवाद या शब्दामागे "स्वदेशी' शब्द हेतूत: लिहितात. दिशाभूल करणारा नवा शब्द "कॉईन' करून स्थापित करण्याची बौद्धिक चूक करू शकतात. गैरसमज पसरविणारी वैचारिक खेळी करतात, याला त्याच परिभाषेत सणसणीत प्रत्युत्तर देण्याचे धाडस करण्यात आपण असमर्थ आहोत. आपली बौद्धिक उदासिनता याला कारणीभूत आहे. खरे तर कुमार केतकर यांच्या "स्वदेशी दहशतवाद' यातील बुद्धिभेद उघड करणे फारसे अवघड नाही. मुळातच दहशतवाद हा भारतीय भूमीतला नाही. ही भूमी दहशतवादाची बळी ठरलेली आहे. परकीयांनी साम्राज्य विस्तार, धर्म विस्तार व कम्युनिझमचा पगडा यासाठी भारतात दहशतवाद आणला. रशिया, चीन, युरोप, अमेरिका, इंग्लंड व इस्लामिक देशांतून आलेला हा दहशतवाद यत्किंचितही निर्बुद्ध नाही. या दहशतवादाने मूळनिवासी, बहुजन-अभिजन, दलित-दलितेतर, अल्पसंख्याक, आर्य-अनार्य, नेशन इन मेकिंग, निधर्मीवाद, धर्मनिरपेक्षता वंचित-शोषित अशी अ-भारतीय परिभाषा बेमालूमपणे रूढ केली आहे. केतकरसारख्या प्रभृतींनी ती प्रचलित केली आहे. याचा आधार घेऊन या परकीय दहशतवादाने भारतीय सण, परंपरा, संस्कृती, उत्सव, मान्यता यांवर पाश्चिमात्त्य मापदंडाच्या आधारे टीका करून सामाजिक विद्वेष पसरविला. प्रलोभने, धाकधपट याद्वारे छुपे धर्मांतर सुरू केले. भारतीय समाजाची मानसिकता लक्षात घेऊन या दहशतवादाने सेवेचा मुखवटा धारण केलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपले तत्त्वज्ञान मांडण्यास सुरुवात केली. या स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) इंग्रजी प्रसारमाध्यमांनी सामाजिक नेतृत्व बहाल केले आहे. दहशतवाद, तत्त्वज्ञान म्हणून रुजला, कारण एक प्रचंड अर्थकारण, दुसरे "जुने जाऊ द्या मरणा लागोनी' ही वृत्ती, तिसरे परक्यांचे आकर्षण, चौथे इतिहासाकडे दुर्लक्ष, पाचवे वैचारिक-बौद्धिक क्षेत्राविषयी अनास्था, सहावे भ्याड व तडजोडी वृत्ती आणि सातवे "स्व'त्वाचा शोध नाकारणे हे आहे.
ज्यांना तत्त्वज्ञानाच्या रूपात दहशतवाद सांगणे अवघड असते किंवा कळत नाही; पण ज्यांना मरण्याची, मारण्याची भाषा कळते त्यांच्या हातात बंदूक-बॉम्ब देणे सोपे असते. त्यांचे पंथीय, भाषिक, जातीय अहंकार जागवून त्यांच्या तत्कालीन गरजा पूर्ण करून आपल्याला हवे ते कृत्य करून घेता येते. इथे कुमार केतकर यांच्या परिभाषेतील स्वदेशी दहशतवाद पुढे येतो. हा "स्वदेशी' दहशतवादी "केवळ जन्माने' भारतीय असतो. त्याचे केवळ "डोमिसाईल' भारतीय असते. तो "काया वाचा मनाने' परकीय झालेला असल्यानेच तो भारतविरोधी दहशतवादी कृत्य करू शकतो. किंबहुना, तो अनेकदा धर्मांतरित असतो; ज्याची नोंद झालेली नसते. हे सर्व सविस्तरपणे लिहिण्याचे कारण कुमार केतकर यांनी आसाममध्ये नुकत्याच झालेल्या स्फोटांचा संदर्भ घेऊन लोकसत्तेच्या अग्रलेखात स्वदेशी दहशतवादाची चर्चा केली आहे. ज्या भारताच्या भूभागाचा संदर्भ कुमार केतकर देतात तो पूर्वांचल मिशनरी कारवाया व बांग्लादेशी घुसखोरीने त्रस्त आहे. स्वातंत्र्यापासून "नेहरू डॉक्टरीन'चे कुमार केतकर चाहते आहेत. त्या "नेहरू डॉक्टरीननेच पूर्वांचलावर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. याच जवाहरलाल यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न युनोत नेला. पूर्वांचल व जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरतावाद जोपासला गेला. हा फुटिरतावाद राजकारण्यांनी सत्तेसाठी वापरला, हाच फुटिरतावाद आता दहशतवादाच्या रूपात थैमान घालत आहे. याला "स्वदेशी' हे विशेषण लावणे म्हणजे भारतविरोधकांच्या हाती कोलित देणे आहे. हे न कळण्याइतके केतकर साहेब निरागस नाहीत. तरीही कुमारजी असे लिहितात म्हणजे ते दहशतवादाबद्दल सोईने निरक्षर राहू इच्छितात. प्रत्येकाच्या अशा सोईच्या भूमिकांमुळेच दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी "राष्ट्रीय भूमिका' तयार होत नाही. दहशतवादाला धर्म नसतो, असा कंठशोष बेंबीच्या देठापासून करायचा आणि त्याचवेळी "स्वदेशी' दहशतवादाचे पिल्लू सोडून द्यायचे या दुटप्पीपणाने समूहमन घडत नाही, ते गोंधळते. असे गोंधळलेले नागरिक "मला काय त्याचे?' या मानसिकतेत जातात व कर्तव्य विसरतात. या पार्श्वभूमीवर आणखी काही बातम्या पाहूया.
दि. 31 डिसेंबरच्या "हिंदुस्थान टाईम्स'ने वर्षभरातील काही प्रमुख घटना प्रकाशित केलेल्या आहेत. यात या इंग्रजी दैनिकाने ओरिसातील चर्चवरील हल्ला याची नोंद घेतली आहे, पण समाजसेवक स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची मिशनरी पुरस्कृत निर्घृण हत्या हिंदुस्थान टाईम्सला नोंदवावी असे वाटले नाही. दि. 1 जानेवारी 09 च्या "दि टाईम्स ऑफ इंडिया'च्या पहिल्या पानावर रशिया येथून हनिमूनसाठी आलेल्या दांपत्याने "लॉंग किस' देऊन नववर्षाचे स्वागत केल्याचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. मात्र त्याच रात्री ठाण्यातील शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन दहशतवादाच्या विरोधात राष्ट्रगीत गायन करून नव्या वर्षाचे स्वागत केल्याची बातमी छापावीशी वाटली नाही. मंगलोर (कर्नाटक) येथे चर्चवर हल्ला झाल्याची, ख्रिश्चनांना मारहाण झाल्याची बोंब एकमुखाने प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाने दणदणीतपणे मारली, परंतु "न्यू लाईफ ख्रिश्चन सेक्ट'च्या घटनाविरोधी कारवायांविषयी माहिती देण्याची हिंमत कोणी केली नाही. या सेक्टने "सत्यदर्शिनी' या पुस्तिकेचे मंगलोर, उडपी, चिकमंगळूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाटप केले होते.
या पुस्तिकेतून हिंदू देवदेवतांची विटंबना करण्यात आली होती.या सेक्टने अनधिकृत प्रार्थनास्थळे (चर्च) उभारली आहेत. मंगलोरमधील संघर्ष पोलीसविरुद्ध न्यू लाईफ असा झाला होता. ज्याला तथाकथित "नॅशनल मिडिया'ने आपल्या मालकांशी एकनिष्ठता राखून हिंदू-ख्रिश्चन दंगल असे स्वरूप दिले होते. प्रत्यक्षात न्यू लाईफच्या प्रार्थनास्थळातून पोलिसांवर दगडफेक झाली होती. मिशनरी समर्थकांनी जनजीवन विस्कळीत केले होते. पोलिसांनी या प्रार्थनास्थळावर कारवाई केल्यावर त्यांना अवैध शस्र मिळाली होती.
दि. 27 डिसेंबर रोजी "द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाने ओरिसातील कंधमहाल येथील हुतात्मा स्वामी लक्ष्मणानंद यांच्या हत्येविषयी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी "हेडिंग'म्हणून प्रकाशित केली होती. अतिशय सविस्तर असलेल्या या बातमीत सीआयडीने कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य राधाकांत नायक यांना सबळ पुराव्याच्या आधारे स्वामीजींच्या हत्येसाठी दोषी ठरविले असल्याचे म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने या बातमीचा सलग तीन दिवस पाठपुरावा केला आहे. स्वाभाविकच ही बातमी देणे म्हणजे सेक्युलॅरिझमच्या विरोधात जाणे ठरले असते हे जाणून अन्य सर्व माध्यमांनी ही बातमी दुर्लक्षित केली. हा सर्व घटनाक्रम माध्यमे दहशतवाद व राष्ट्रविरोधी कारवायांना पुष्ट करत आहेत हे दर्शविणारा आहे.
ईमेलद्वारा दोन बातम्या स्वरूपातील माहिती मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर एकमेकांना मोठ्या संख्येने पाठविल्या जात आहेत. यातील एक मेल दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये 60तास ओलीस ठेवलेल्या व नंतर ठार केलेल्या स्री, पुरुष, लहान मुलांशी केलेल्या विकृत अमानवी व्यवहाराची इत्यंभूत माहिती देणारा आहे. डोळे काढणे, बोट कापणे, नख उपटणे, स्रियांच्या गुप्तांगात गोळ्या घालणे, पाशवी बलात्कार करणे, केस उपटणे, ओलिसांवर विशेषत: मूल व स्रियांवर लघवी करणे, त्वचा खेचणे, कान-नाक यासह अन्य अवयव कापणे अशी माणुसकीला काळीमा फासणारी ही कृत्ये आहेत. मेलमधील माहितीनुसार या दुर्दैवी नागरिकांना "अधिकृत मृत' घोषित करणाऱ्या डॉक्टरांनी व त्यांची प्रेते शवागारात ठेवणाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे म्हटले आहे. या माहितीच्या आधारे दै. सामना व दै. लोकमत व्यतिरिक्त कुठल्याही "मोठ्या' वृत्तपत्राने बातमी दिलेली नाही. कुठल्याही वृत्तवाहिनीला ही ब्रेकिंग न्यूज वाटलेली नाही. विशेष म्हणजे ही बातमी (मेल) अतिरंजित, कपोलकल्पित असल्याचे कुठल्याही शासकीय यंत्रणेने अद्याप म्हटलेले नाही. दुसरी मेल दक्षिणेतील एका नागरिकाने सर्व वाहिन्यांना पाठविलेली आहे. वािहन्यांनी 60 तास बातमी दिली ती ताज, ओबेराय येथील धुमश्चक्रीची, छत्रपती शिवाजी टर्मिंनस या सर्वसामान्य माणसाच्या रेल्वेस्थानकाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
ज्यांना यापूर्वी देशातील कुठल्याही दहशतवादी कृत्याची झळ पोचली नव्हती, ज्यांना स्फोटात मरणाऱ्या भारतीयांच्या रक्ताची किंमत नव्हती अशा उच्चभ्रूंचे दु:ख ग्लोरीफाय करण्यात धन्यता मानली. ही सर्व उदाहरणे "त्यांचाच' खुनी हात परत धरत गेलो, याची साक्ष देतात.
"बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो...'
हे समाजवादी स्वप्नरंजन वास्तवात परावर्तित करायचे असेल तर भारतीय संस्कृतीशी ओळख करून घ्यावी लागेल. आपल्या मूळांचा शोध घ्यावा लुागेल. (बॅक टू रुटस्‌) असा प्रयत्नपूर्वक शोध अरुणाचल प्रदेशातील तरुणांनी नुकताच घेतला आहे. चार हजार तरुण-तरुणींनी स्वधर्म युवा महोत्सवात भाग घेतला होता. (इंडिजीनस्‌ युथ फेस्टिव्हल) अरुणाचलात 1952 साली पहिले चर्च उभारले गेले आहे. त्यानंतर धर्मांतराला सुरुवात झाली. 1980 नंतर ख्रिस्ती धर्मप्रसारक आक्रमक झाले आणि त्यांनी अरुणाचलात थैमान घातले. याच्याविरोधात 1986 साली पासीघाट येथे तालुम रुकबो यांनी "दोन्थी पोलो येलम केवांग' या नावाने साकार उपासना पद्धती सुरू केली. दोन्थी पोलो याचा अर्थ सूर्यचंद्र असा आहे. दद्य जिल्ह्यात 450पेक्षा अधिक ठिकाणी गांगीर (आदि), न्योदर नाम्लो (न्यीटी), मेदर नेलो (आपातामी), इंगतोंगहोम (तांगसा, तुक्सा, नॉवटे) अशा विविध भाषांतून उपक्रम सुरू झाला आहे. राज्यात विविध जनजातींच्या स्वधर्म संघटनात समन्वय असावा यासाठी "इंडिजीनस फेथ ऍन्ड कल्चरल सोसायटी ऑफ अरुणाचल प्रदेश' ही समिती कार्यरत आहे. या समितीतर्फे युवा महोत्सव होतो. यंदाच्या युवा महोत्सवात अरुणाचल राज्यातील 15 जिल्ह्यांतील 16 जनजातींच्या युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवात स्वधर्म रक्षणात युवकांचा सहभाग, बांग्लादेशी घुसखोरी, चीनचे छुपे आक्रमण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. समाजावरील संकट, राष्ट्रावरील आक्रमणाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्वधर्म रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा संकल्प झाला. धर्मांतरांवर कायद्याने बंदी आणण्याची मागणी केली गेली. भारतीय संस्कृतीच्या शत्रूंना इशारा देण्यात आला. अरुणाचलातील तरुणाईने प्रतिकूल परिस्थितीतही आपला शत्रू ओळखला आहे. दहशतवादाविरुद्ध साक्षरता अभियान सुरू केलेले आहे. अज्ञानाचे आवरण काढून राष्ट्रीय विचारांचे ज्ञानदीप प्रज्वलित केले आहेत.
वाचकहो, आता आपण निरक्षर, अडाणी राहणार की साक्षर होऊन शत्रूची ओळख करून घेणार ? हा कळीचा मुद्दा आहे.
mak2244@gmail.com
9869296109

Monday, January 19, 2009

पत्रकारांची कार्यशाळा


सोलापुरातील शिवस्मारक येथे शनिवार, दि। 17 जानेवारी 2009 रोजी "पत्रकारितेतील नवे प्रवाह' या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. पत्रकारांमध्ये उत्साह आणि स्फूर्ती आणणारा हा उपक्रम ठरला।
पत्रकार प्रशिक्षित असतो तेव्हा तो अधिक कुशलतेने आपले दायित्व पार पाडू शकतो, परंतु विडंबना तेव्हा होते, जेव्हा पत्रकार जुना होतो. मात्र, तो अप्रशिक्षित राहतो. जुना असल्यामुळे त्याला वाटू लागते की, आपल्याला सारं काही येतं. माहिती आणि अनुभवाच्या स्तरावर ते खरंही असतं, परंतु व्यवस्थित प्रशिक्षण आणि वैचारिक स्पष्टतेअभावी त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक साचलेपण येऊ लागतं. अशा वेळी प्रवाही न राहलेल्या साचल्या पाण्याचे जे होते, ते पत्रकाराचे होणे अगदी स्वाभाविकच आहे म्हणूनच प्रशिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते।
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची धुरा दशरथ वडतिले यांच्याकडे आल्यापासून सोलापुरातील पत्रकारितेने जणू कात टाकली आहे. सोलापुरातील पत्रकारांमध्ये संघभाव निर्माण झाला आहे. एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आत्मविश्वासाला गुणवत्तेची जोड असेल तर विधायकता येते, हे ध्यानात घेऊन संघातर्फे खास पत्रकारांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सोलापूर विद्यापीठ जनसंज्ञापन विभाग आणि पत्रकार संघाने आयोजिलेली शनिवारची कार्यशाळा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरली।
शहर-जिल्ह्यातील पत्रकारांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, जळगाव, लातूर, धाराशिव, धुळे, नगर, कोल्हापूर आदी भागातील पत्रकारितेचे विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दीर्घकाळ प्रभावीपणे काम करीत असलेले डॉ. समीरण वाळवेकर व प्रसाद काथे यांच्या सत्रांनी कार्यशाळेला एका उंचीवर नेऊन ठेवले. पत्रकारितेत नव्याने येऊ घातलेल्या संकल्पना सुलभपणे सांगण्याची हातोटी समीरण यांच्याकडे आहे।
पत्रकारांना घडविण्याच्या प्रक्रियेत बदल होणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना केवळ कालबाह्य अभ्यासक्रम शिकविणे उचित होणार नाही. सगळ्याच वाहिन्या या उदात्त ध्येयाने नाही, तर व्यावसायिक उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत. आता माध्यमकर्मींना तंत्रज्ञानाची भाषा समजून घ्यावीच लागेल. मुद्रित क्षेत्रातील अनुभवी मंडळी इलेक्ट्रानिक माध्यमांत येण्यास तयार नाहीत, हे दुर्दैवी चित्र आहे. विद्यापीठांनी पत्रकारिता अभ्यासक्रम अद्ययावत केला पाहिजे, असे विचार वाळवेकर यांनी मांडले।
दुर्दैवाने इलेक्ट्रानिक मिडियाला समर्पित असा अभ्यासक्रम कोठेही शिकविण्यात येत नाही. दीड ते दोन लाख रूपये शुल्क भरून सर्वसामान्य विद्यार्थी या कोर्सेससाठी जाणे कठीण आहे. त्यामुळे या क्षेत्रात कच्च्या मालाची अर्थात नवोदित क्षमतावान पत्रकारांची निकड जाणवते. लोकांनी आपली निवड सुधारायला हवी. माध्यमांवर सरकारने नाही तर जनतेने अंकुश ठेवायला हवा, असे विचार प्रसाद काथे यांनी व्यक्त केले. सोलापुरातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी अध्यक्षस्थान भूषविले. अध्यक्षीय भाषणांतून काही प्रमाणात पत्रकारांमध्ये ध्येयवाद जागविण्याचा प्रयत्न झाला।
संतोष पवार, प्रवीण सकपाळ, दीपक होमकर सारख्या तरुण पत्रकारांनी कार्यशाळेतील सत्रांमध्ये समन्वयकाची भूमिका यशस्वीपणे बजावली. पत्रकारितेत येणाऱ्या नव्या प्रवाहाशी कसे जुळवून घ्यायचे आणि एक पत्रकार म्हणून स्वत:चा विकास कसा करायचा याबद्दलची शिदोरी साऱ्या तरुण पत्रकारांना या कार्यशाळेतून निश्चितच मिळाली.कार्यकुशलता अंगी बाणवण्याच्या दृष्टीने कार्यशाळा यशस्वी झाली, असा भाव बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, परंतु कार्यशाळेत वैचारिक स्पष्टतेच्या अंगाने विचारमंथन झाले असते तर कार्यशाळा आणखी सार्थक ठरली असती असे वाटते।
26/11 च्या घटनेबद्दल बरीच चर्चा झाली. या घटनेत सरकार कसे निष्क्रिय होते. प्रशासकीय स्तरावर ताळमेळ कसा नव्हता. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा बेजबाबदारपणा आणि त्यामुळे त्यांची गच्छंती कशी झाली? याची चर्चा झाली. मात्र, या देशात अतिरेकी हल्ले का होतात? जिहादी मानसिकतेचे मूळ कोठे आहे? राज्यकर्ते गठ्ठा मतांकरिता दहशतवादाला पाठिशी कसे घालतात? वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार राज्यकर्त्यांच्या या ढोंगी धर्मनिरपेक्षतेकडे दुर्लक्ष का करतात? घटनेनुसार सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारण्यात आले असतानाही गोरगरीब हिंदूंचे धर्मांतरण करण्यात येते, यामुळे समाजात असंतोष निर्माण होतो. अशावेळी अल्पसंख्यकांच्या बाजूनेच बातमीदारी का करण्यात येते? यामागे परकीय षडयंत्र असते का? अशा या देशाला छळणाऱ्या महत्त्वपूर्ण विषयांबाबत पत्रकार म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? याचा ऊहापोह झाला असता, तर यशस्वी झालेली ही कार्यशाळा आणखी परिपूर्ण यशस्वी झाली असती, असे वाटते।

१९ जनुअरी २००९ पान ४ , तरुण भारत। सोलापुर

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी