जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते
सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी
एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्या तद्दन
खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय
पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना
शिकविली जात आहेत ! केवढी दु:खाची गोष्ट ही | मी काही मोठा पंडित असल्याचा
दावा करीत नाही. पण मला जे काही कळले आहे, त्याच्या आधारे पॅरिसच्या
परिषदेत मी हे म्हणणे प्रखरपणाने मोडून काढले. भारतीय आणि युरोपीय
पंडितांशी मी याबद्दल वेळोवेळी बोलत आलो आहे. आर्य बाहेरून आले या
सिद्धान्तावरचे माझे आक्षेप मी वेळ मिळताच सविस्तर रीतीने मांडणार आहे.
माझे तुम्हाला सांगणे आहे की, आपले जुने धर्मग्रंथ स्वत: अभ्यासा आणि मग
निष्कर्ष काढा. युरोपीय लोकांना जेव्हा जेव्हा संधी मिळली, तेव्हा तेव्हा त्यांनी, ते
जातील तिथल्या मूळच्या रहिवाशांना नेस्तनाबूत केले आणि तेथे ते आरामात राहू
लागले. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तेच केले असेल ! पाश्चिमात्य
लोक आपापल्या देशातल्याच साधनसंपत्तीवर अवलंबून राहून तिथे सुखात
राहीलेअसते तर त्यांना जगात ऐदी, उनाड समजण्यात आले असते. म्हणून त्यांना
जगात सर्वत्र भटकावे लागले. जिथे ते गेले तिथे त्यांनी कत्तली केल्या,
दरोडे घातले, लोकांची संपत्ती लुटली. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही
तसेच केले असेल ! पण याला पुरावा काय ? युरोपीय पंडितांनो, हे सारे तुमचे
तर्कटच ना ? मग ते कृपा करून गुंडाळी करून तुमच्या बासनातच ठेवून द्या कसे ! कोणत्या वेदात नि कोणत्या सूक्तात असे लिहिलेले आहे की, आर्य बाहेरच्या
देशातून आले ? कुठे पुरावा आहे की, त्यांनी एतद्देशीयांच्या कत्तली केल्या
? असल्या वेडपट गोष्टी बोलून तुम्हाला काय मिळते ? रामायणाचा तुमचा अभ्यास
व्यर्थ आहे. आपल्या सोयीची एक कपोलकल्पित गोष्ट तुम्ही रामायणावरून रचली
आहे इतकेच ! रामायणात आहे तरी काय ? दक्षिण भारतातील अनार्य जमातींचा आर्यांनी
केलेला पराभव. अहा ! काय पण प्रतिभा ! रामचंद्र हे आर्य सम्राट होते ना ?
त्यांचे युद्ध कोणाबरोबर चालले होते ? - लंकेचा सम्राट रावण याच्याबरोबर.
जरा रामायण वाचा म्हणजे कळेल की, रावण हा रामापेक्षा काकणभर जास्तच विद्वान
होता. लंका ही अयोध्येपेक्षा समृद्ध होती. आणि वानरांवर किंवा दक्षिण
भारतीयांवर रामचंद्रांनी विजय तरी केव्हा मिळविला ? - ते तर सारे
रामचंद्रांचे मित्र आणि सहकारीच होते. वाली आणि गुहक यांची राज्ये खालसा
करून रामाच्या राज्याला जोडली होती काय? - हा खुळेपणा आता पुरे ! महासरितांच्या विस्तीर्ण पात्रांनी खंडित झालेला विराट, समतल आणि
समशीतोष्ण सुखद असा आर्यभूमीचा या भूभाग आर्यसंस्कृतीच्या महावस्त्राचा भाग
आहे. येथील धागा उच्च संस्कृतीच्या, विकसनशील संस्कृतीच्या आणि वनवासी
संस्कृतीच्या मानवांनी - बह्वंशी आर्यांनी घडविला आहे. वर्णाश्रमधर्माच्या
चौकटीत या वस्त्राची निर्मिती होत आहे. निसर्गातील स्पर्धा आणि संग्राम
यांच्यावर विधायक बुद्धीने विजय मिळविण्याच्या आकांक्षेच्या आडव्या-उभ्या
धाग्यांनी हेमंगल वस्त्र विणले आहे. युरोपीय लोकांनो ! मला असे सांगा की,
कोणत्या देशाला तुम्ही उन्नतीसाठी हात दिलात ? तुमच्याहून दुर्बल वंश
तुम्हाला जिथे जिथे आढळले,तिथे तिथे तुम्ही त्यांचा समूळ उच्छेद केलात.
तुम्ही त्यांची भूमी बळकावलीत. हे आजतागायत चाललेले आहे. अमेरिका,
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक बेटे आणि दक्षिण आफ्रिका यांचा इतिहास काय
सांगतो ? तिथल्या मूळच्या जमाती आता कोठे आहेत ? पशूंची कत्तल करावी, तशी
तुम्ही त्यांची निर्घृण कत्तल केली आहे. ज्या ठिकाणी असे करणे तुम्हाला
शक्य झाले नाही, त्या ठिकाणची राष्ट्रे अद्यापही जिवंत आहेत. हिंदुस्थानने असे कधीच केले नाही. आर्य हे सहृदय, उदार होते. त्यांची
हृदये सागरासारखी अथांग होती आणि त्यांची प्रज्ञा हिमाचलासारखी उतुंग होती.
त्यात या पशुवत जीवनाला, पाशवी आकांक्षांना तिळमात्र स्थान नव्हते.आणि
माझ्या देशातल्या मूर्खांनो ! मी तुम्हाला विचारतो की, हिंदुस्थानात
एतद्देशीयांच्या कत्तली झाल्या असल्या तर चतुर्वर्णांची रचना अस्तित्वात
तरी आली असती काय ? स्वत: जगण्याकरिता इतरांच्या मुंड्या मुरगाळाव्यात हे पाश्चात्यांचे
ध्येय आहे. आर्यांचे ध्येय सर्वांनाच उन्नत करणे, सुसंस्कृत करणे, आर्य
करणे हे आहे. युरोपीयांचे साधन शस्त्र हे आहे. आर्यांचे साधन चतुर्वर्णांची
रचना हे आहे. संस्कृतीच्या निर्मितीसाठी समाजाची चार वर्णात विभागणी करणे
आर्यांना आवश्यक वाटले. वर्णांचे कप्पे कडेकोट नव्हते. जो तो आपल्या
साधनेने उच्च वर्णात प्रविष्ट होऊ शके. युरोपात दिसते की, सबलांनी
दुर्बलांना सदैव खाऊन टाकले आहे. भारतात मात्र प्रत्येक सामाजिक नियम हा
दुर्बलांच्या रक्षणासाठी आहे. म्हणून म्हणतो की, या दोन संस्कृतींचे
ताणेबाणेच सर्वस्वी भिन्न आहेत. (पूर्व आणि पश्चिम, स्वामी विवेकानंद समग्र वाङ्मय, खंड ५)