Sunday, February 7, 2016

#rss_चा_पर्दाफाश भाग ३



#संघाने_पटेलच नाही तर #नेहरू यांनाही ओढले होते जाळ्यात
महात्मा गांधी यांचे मत होते की स्वातंत्र्यानंतर लोकांनी आपापल्या विचारधारेनुसार वेगवेगळे पक्ष स्थापन करावेत.
स्वातंत्र्य मिळेपर्यंत कॉंग्रेस हा पक्ष नव्हता, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांसाठीचे ते एक व्यासपीठ होते.
स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्ष म्हणून काम न करता कॉंग्रेसचे विसर्जन करण्यात यावे, असे गांधीजींचे मत होते. पण तसे झाले नाही.
परिणामी, समाजवादी लोक कॉंग्रेसपासून सर्वात आधी वेगळे झाले.

सरदार पटेल आणि पुरुषोत्तम दास टंडनसारख्या नेत्यांना वाटत होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कॉंग्रेससोबत येऊन काम करावे.
पटेल यांनी यासाठी तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पत्रही लिहिले होते.
१९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन हे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याच वेळी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने संघाच्या स्वयंसेवकांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश द्यावे, यासाठी प्रस्ताव पारित केला होता.
यामुळे कॉंग्रेसमध्ये वादंग माजला.
नंतर टंडन यांना राजीनामा द्यावा लागला.
याच वर्षी सरदार पटेल यांचे निधन झाले.
पण या इतिहासाची संघाला विरोध करणाऱ्या अनेकांना माहीती नसते.

संघाला विरोध करणाऱ्यांमध्ये अधिकांश लोक हे बिनडोक असतात. विरोध करण्यासाठी का होईना संघाची प्राथमिक माहिती असली पाहिजे, हेही त्यांना कळत नाही.
वागळे, सप्तर्षी, बाळ वगैरे मंडळींवरच हे विसंबून असतात.
त्यामुळे संघावर बिनतोड आरोप करता येत नाही आणि यामुळे संघाचे फावते.
संघावर करण्यात येणारे आरोप इतके बाळबोध असतात की संघाचे विरोधक सहज खोटे पडतात. यातीलच एक आरोप म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनात कुठे होता संघ, असा सवाल नेहमीच करत राहतात.
मागील लेखांकात म्हटल्याप्रमाणे संघाचे संस्थापकच विदर्भातील काॅंग्रेसचे मोठे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात जेल भोगला.
स्वातंत्र्य मिळताना मुस्लीम लीगने देशाचे तुकडे पाडले. दंगली पेटवण्यात आल्या. त्यावेळी जीव धोक्यात घालून लाखो हिंदूंना खंडित भारतात सुखरूप आणण्याचे काम संघाच्या स्वयंसेवकांनी केले.
यात शेकडो अनाम स्वयंसेवकांनी प्राणाचे बलिदान दिले. याचे ढीगभर पुरावेही उपलब्ध आहेत.
याशिवाय फाळणीनंतर काहीच दिवसांत पाकिस्तानच्या टोळ्यांनी आक्रमण केले.
तेव्हा श्रीनगर विमानतळावर साचलेला बर्फ संघाच्या स्वयंसेवकांनी ४८ तासांच्या आत दूर करून भारतीय जवानांना मोठी मदत केल्याची इतिहासात नोंद आहे.
इतकेच नाही तर १९६२ ला चीनने केलेल्या युद्धात सैनिकांच्या मदतीला संघाचे शेकडो स्वयंसेवक धावून गेले.
यामुळे प्रभावित होऊन नेहरूंनी rss ला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीच्या संचलनात सहभागी करून घेतले.
हे सत्य आहे.
असे असताना संघाच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याचा मूर्खपणा संघाचे विरोधक करतात. यामुळेच संघाला सहानुभूती मिळते. परिणामी संघाला संपवणे अशक्य होऊन बसले आहे.

संघ खूप पाताळयंत्री आहे. संघाचे षडयंत्र सहजासहजी समजत नाहीत. यामुळेच पटेल, नेहरूंसारखे दिग्गज संघाच्या जाळ्यात अडकले.
संघाचे लोक कधी आरोपाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कारण बालिश आरोपांना उत्तर देणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे त्यांना वाटते. यामागे विरोधकांना अनुल्लेखाने मारण्याचे त्यांचे षडयंत्र असते.
संघाचे बहुतांश विरोधक संघाप्रमाणे विधायक सेवाकाम उभे करू शकलेले नाहीत.
त्यामुळेही त्यांचे आरोप हे केवळ बुडबुडे ठरतात.

माणूस जितका स्वार्थी तितका तो अनीतीमान असतो.
अशी माणसं कधी एकोप्याने काम करू शकत नाहीत.
संघाच्या बहुतेक विरोधकांना ही गोष्ट तंतोतंत लागू पडते.
त्यामुळे संघाच्या विरोधकांमध्ये कधीच एकी नसते. संघविरोधकांच्या चळवळीत अनेक फाटाफुटी असतात.
याचा फायदा मात्र संघाला होतो.

थोडक्यात, संघाला संपवण्यासाठी संघाचे साहित्य, कार्यपद्धती, बलस्थाने यांचा अभ्यास व्हायला हवा.
पण संघाचे काही विरोधक तर इतके भित्रे असतात की, त्यांना वाटते आपण संघाचा अभ्यास केल्याने संघाच्या प्रेमात पडू. त्यामुळे संघाने प्रकाशित केलेली पुस्तके ते वाचतच नाहीत.
काही विरोधक खूप आळशी असतात, त्यामुळे ते वाचत नाहीत. काही खूप स्वार्थी असतात, केवळ आपल्या संघविरोधी साहेबाला खुष करण्यासाठी संघावर बुळबुळीत झालेले आरोप करत बसतात.
परिणाम काय तर संघाचे फावते.
संघ आक्टोपसप्रमाणे आहे. संघाची षडयंत्रे समजून घेणे अवघड काम आहे. संघाला चिरडून टाकतो म्हणणारे नेहरू आणि पटेलही संघाचे पाठिराखे बनले. म्हणजे संघाने किती कुटीलतेने काम केलं असेल.
हे सारं चक्रावून सोडणारं आहे. पण, मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही.
मी शक्य तेवढं संघाला उघडे पाडणारच.
पर्दाफाश करणारच.
संघाला संपवणं हेच माझे ध्येय आहे.
क्रमश:
- सिद्धाराम

#आपल्या सूचना, टीका, टिप्पणी यांचं स्वागत आहे. पर्दाफाश करण्यास उपयोगी संदर्भ असतील तर psiddharam@gmail.com वर जरूर पाठवा.
***
मागील लेख...

#rss_चा_पर्दाफाश भाग १   

#rss_चा_पर्दाफाश भाग २
 #rss_चा_पर्दाफाश भाग ३





#rss_चा_पर्दाफाश भाग २



संघ हे तर कॉंग्रेसचे पिल्लू
पहिला भाग प्रस्तावनेचा होता. पर्दाफाश म्हणजे नेमकं काय करणार? हा प्रश्न अनेकांना पडला.
काही व्हाटस् अप ग्रुपवर चर्चा रंगली.
काही विद्वान संपादकही चर्चेत उडी घेतले.
काहींनी म्हटले संघ भुलभुलय्या आहे. कोणी म्हटले संघाला विचारच नाही. कुणी सल्ला दिला सत्य ते लिहा.
कुणी म्हटलं तू संघाविरुद्ध लिहिणारच नाही. ते तुला शक्य नाही.
कुणी नथुराम, गोधरा, दादरी गाठली तर कुणी गाय उपयुक्त पशूची आठवण करून दिली.
व्हाटस अप ग्रुपवर नेहमी असं होतं. एकाच वेळी प्रश्नांचा भडीमार होतो. तिथे चर्चा मुद्द्याला धरून होण्यापेक्षा मी समोरच्याला कसं भारी पडतो हे दाखवण्याचा प्रत्येकाचा आटापिटा असतो.
दोनचार दिवसांनी ती चर्चा मागे पडते अन् पुन्हा तेच आरोप उगाळले जातात.
ही मालिका फेसबुवर चालवणार असून कॉंमेंटसह ती माझ्या ब्लॉगवरही उपलब्ध राहील. इतिहासातील संदर्भ, पुरावे यांचा लेखनात आधार असेल, संघविरोधकांच्या आरोपांचाही आधार घेतला जाईल आणि अर्थातच याला जोडून माझी मतेही मांडेन.
अर्थातच माझीच मांडणी बरोबर असा हट्ट मी करणार नाही.
सर्वांचे एकच मत होईल, हे शक्य नसते. पण यानिमित्ताने
संघाचे असली रूप पुढे यावे,
पर्दाफाश व्हावा,
षडयंत्र उघड व्हावेत
हा हेतू आहे.
सर्व मुद्दे एकाच भागात शक्य नाही पण क्रमश: पुढे आणणार आहे.

संघ_हे_कॉंग्रेसचेच_पिल्लू
rss हे कॉंग्रेसनेच जन्माला घातलेले पिल्लू आहे. हा इतिहास आहे आणि याला सबळ पुरावेही आहेत. संघाचे निर्माते डॉ. हेडगेवार हे कॉंग्रेसचे विदर्भातील मोठे नेते होते. #सत्याग्रह केला म्हणून ब्रिटिशांनी त्यांना जेलमधे टाकले. वर्षभराहून अधिक काळ ते तुरुंगात होते. #टिळकांच्या नंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष क्रांतीकारी असलेल्या अरविंद घोष यांनी व्हावे असा षडयंत्र डॉ. हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली रचण्यात आला होता. घोष यांनी योगाच्या विश्वातून बाहेर यायला नकार दिला.
थोडक्यात, ते कॉंग्रेसचे नेते होते. नथुराम गोडसे जर हिंदू महासभा व कधी काळी सदस्य असल्याने #गांधी_हत्येचा आरोप #हिंदू_महासभा व संघावर करण्यात येते तर कॉंग्रेसमधे नेतेपदावर असलेले डॉ. हेडगेवार यांनी संघ सुरू केला तर त्याला कॉंग्रेसचे पिल्लू म्हणणे काही चुकीचे नाही. संघ स्थापन झाल्यावरही #डॉ._हेडगेवार हे कॉंग्रेसकडून आंदोलनात होते.
हे सगळं का पुढे येत नाही. यामागे संघाचे आणि कॉंग्रेसचेही फार मोठे षडयंत्र आहे. कसं ते पुढील भागात पाहुया.
क्रमश:
- सिद्धाराम

# सूचना, टीका टिप्पणी, संदर्भ यांचे स्वागत आहे. psiddharam@gmail.com

***
मागील लेख...
#rss_चा_पर्दाफाश भाग १   

#rss_चा_पर्दाफाश भाग २
 #rss_चा_पर्दाफाश भाग ३


#rss_चा_पर्दाफाश भाग १



मी कधीच स्वयंसेवक नव्हतो. पण rss खूप जवळून पाहिलंय. त्यातील अनेकांशी जवळून परिचय, मैत्री आहे.
मी कधीच पुरोगामी नव्हतो. पण माझे अनेक पुरोगामी मित्र आहेत.
मी माझ्या मनातील प्रश्न मांडतो. लिहितो. माझ्या प्रश्नांना योग्य उत्तरे कधीच मिळाली नाहीत. पण मी हिंदुत्ववादी लिहितो असे अनेकांना वाटते. या काळात अनेक पुरोगामी मित्रांनी मला माझी जात विचारायला सुरुवात केली.
अरे तू तर बहुजन आहेस असे सांगत मी बहुजनांसाठी लिहावे असं काहींनी सांगितले. नाव सिद्धाराम अन् आडनाव पाटील म्हणजे तू लिंगायत आहेस की मराठा? असंही मला विचारलं गेलं.
परवा एका कॉलेजच्या कार्यक्रमात व्यासपीठावरून खाली उतरताच एक भावी पत्रकार माझी जात समजून घेण्यासाठी माझा पिच्छाच पुरवला.
प्रामाणिकपणे सांगायचे तर संघवाल्यांनी गेल्या १३ वर्षांत मला माझी जात विचारली नाही.
काहीही म्हणा संघवाले पाताळयंत्री असतात हे खरेच आहे. पडद्यामागे राहून अनेक षडयंत्र रचतात. संघाची ही कारस्थानं लोकांपर्यंत आली पाहिजेत असं मला वाटतं. त्यामुळे "rss चा पर्दाफाश" ही अनेक भागांची मालिका मी फेसबुकवरून नियमीत चालवणार आहे.

मागील लेख...
#rss_चा_पर्दाफाश भाग १   

#rss_चा_पर्दाफाश भाग २
 #rss_चा_पर्दाफाश भाग ३

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी